संपादने
Marathi

स्वानुभवाच्या प्रेरणेतून अनाथांना कौटुंबिक जिव्हाळा मिळवून देणारे धेंडे दाम्पत्य

Anudnya Nikam
16th Mar 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

केशव धेंडे आणि नलिनी धेंडे हे १५ मुले आणि आई यांच्यासह पुण्यातील हडपसर येथे सुखाने नांदणारे दाम्पत्य. मोहम्मद वाडी येथील या कुटुंबाचे घर म्हणजेच २०१० साली ‘निरंकार शिक्षण प्रसारक मंडळा’अंतर्गत केशव धेंडे यांनी सुरु केलेले ‘निरंकार बालग्राम’. इथले वातावरण पाहून हे एक अनाथालय आहे हे कुणाच्या लक्षातच येणार नाही. इन्जिनिअरिंगला शिकत असलेला केशव यांचा मुलगा आणि सातवीत शिकत असलेली मुलगी वगळता १५ पैकी १३ मुले ही मुळची अनाथ. मात्र आज त्यांनाही केशव आणि नलिनीच्या रुपात मायेचे छत्र सापडले आहे. अनाथ मुलांना पोटच्या मुलांप्रमाणे वाढविणाऱ्या केशव आणि नलिनी यांच्या या कार्याचे मूळ दडले आहे ते त्यांच्या भूतकाळात. केशव आणि नलिनी हे दोघेही अनाथाश्रमात लहानाचे मोठे झाले.


image


जन्मतःच पित्याचे छत्र हरविलेले केशव हे त्यांच्या आई-वडिलांचे पाचवे अपत्य. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे घरधन्याच्या निधनानंतर पाच मुलांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत असलेल्या केशव यांच्या आईने अखेर त्यांना डॉ दादा गुजर यांच्या अनाथाश्रमात नेऊन ठेवले. “वयाच्या चौथ्या वर्षापासून मी अनाथाश्रमात वाढलो. तिथेच घडलो. तिथे माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले. आम्ही सर्व अनाथ मुलं-मुली एकत्र भावंडांप्रमाणे रहायचो. तिथे नेहमीच आम्हाला घरच्याप्रमाणे वागणूक दिली गेली. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपणही अनाथ मुलांसाठी काम करायचं. त्यांनाही हे संस्कार, हे वातावरण आणि एक कुटुंब मिळवून द्यायचं,” केशव सांगतात.

अनाथाश्रमाकडून केशव यांना दहावीपर्यंतचे शिक्षण देण्यात आले. “१९९१ साली दहावी झाल्यानंतर यापुढचा मार्ग आता मला स्वतः शोधायचा होता. डीएड करण्याची इच्छा होती. मात्र पैशांअभावी ते शक्य झालं नाही. इथे संस्थेने पुन्हा साथ दिली आणि आपल्या वर्कशॉपमध्ये दोन वर्ष फॅब्रिकेशन आणि मेकॅनिकलचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर १९९५ मध्ये संस्थेच्याच डॉ दादा गुजर प्राथमिक/ माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरीही मिळाली. १९९५ ते ९७ या कालावधीत शाळेमध्ये शिपाई, क्लार्क, शिक्षक, लॅब अटेन्डन्ट, ड्रॉईंग टीचर अशी सर्व कामं केली,” केशव सांगतात.

शाळेत नोकरी करत असतानाच त्यांनी सामाजिक भान राखून एक प्रकारे आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते सांगतात, “मला एक हजार रुपये पगार होता. त्या पगारात मी पाच गरजू विद्यार्थीनींची जबाबदारी स्वीकारली. मी त्यांची शाळेची फी भरायचो. जेणेकरुन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये.”

स्वतःचे काहीतरी करायचे या इच्छेपोटी त्यांनी १९९७च्या अखेरीस शाळेची नोकरी सोडली आणि फॅब्रिकेशन वर्क सुरु केले. त्यांना इण्डियन एअरलाइन्सचे काम मिळाले. जवळपास पाच वर्ष त्यांनी हे काम केले. मात्र त्यांच्यातील समाजसेवी वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. अशातच २००३ साली त्यांचे एक शिक्षक मित्र त्यांना भेटले आणि त्यांनी केशव यांना शाळा अर्धवट सोडलेली, वस्तीवरची, भंगार वेचणारी मुलं अशांकरिता ‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत काम करण्यास सुचविले. “मला ती कल्पना आवडली. मी लगेचच या कामाला लागलो. शिक्षण मंडळात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो. स्वामी म्हणून एक अधिकारी होते. त्यांनी मला सांगितलं की ५० मुलांची यादी आणा, प्रोजेक्ट देतो. मी दुसऱ्या दिवशी यादी घेऊन त्यांच्यासमोर हजर झालो. प्रोजेक्ट सुरु झालं. ‘निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ’ या नावाने संस्था रजिस्टर झाली. बांधकामाच्या ठिकाणची, झोपडपट्टीतली, भंगार गोळा करणारी, शाळा सोडलेली मुलं अशा मुलांना त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही शिकवू लागलो. या अभियानाअंतर्गत २००३ ते २०१० या कालावधीत मी जवळपास ५०० मुलांना मुख्य प्रवाहात आणलं. २०१० साली पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा सरकारचा जीआर निघाला आणि प्रोजेक्ट बंद झालं,” केशव सांगतात.


image


त्यानंतर लहानपणी पाहिलेले अनाथ मुलांना कुटुंब मिळवून देण्याचे स्वप्न केशव यांच्या मनात पुन्हा रुंजी घालू लागले. २०१० साली महिला व बाल कल्याण विभागाला रितसर ऑनलाईन ऍप्लिकेशन करुन २० अनाथ मुलांसाठीच्या अनाथाश्रमाची परवानगी काढण्यात आली आणि निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत ‘निरंकार बालग्राम’ हे अनाथाश्रम सुरु करण्यात आले. आज स्वतःच्या दोन मुलांबरोबरच १३ अनाथ मुलांसाठीही केशव ‘बाबा’ आहेत.

दरम्यानच्या काळात १९९५ च्या सुमारास त्यांना लग्नासाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा केशव यांनी अनाथ मुलीशीच लग्न करण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच पुण्यात येरवडा येथे असलेल्या ‘एसओएस चिल्ड्रन बालग्राम’ या अनाथाश्रमात वाढलेल्या नलिनीबरोबर त्यांनी संसार थाटला. केशव यांच्या कल्पनेतील अनाथाश्रम सत्यात साकारण्यात नलिनी यांचा मोलाचा वाटा आहे. “नलिनी आपल्या दोन बहिणींसह एसओएस चिल्ड्रन्स बालग्राममध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनाही समाजसेवेची मूळात आवड आहे. त्यांनी पेशाही तसाच निवडला आहे. त्या नर्स आहेत. रुग्णांच्या घरी जाऊन त्या सेवा-सुश्रृषा करतात. रात्री आठ ते सकाळी आठ स्वतःचं काम केल्यानंतर दिवसा निरंकार बालग्रामच्या कामात मला मदत करतात,” असं केशव सांगतात.


image


लहानपणी परिस्थितीमुळे केशव यांच्या आईला त्यांना अनाथाश्रमात ठेवावे लागले असले तरी आज मात्र त्यांची आई स्वतःला खूप सुदैवी समजत असावी. आज वृद्धापकाळी त्यांचा हा मुलगा आणि सून त्यांची मायेने काळजी घेत आहेत. केवळ आपल्या आईची काळजी घेऊनच हे दाम्पत्य थांबले नाही. तर अनाथ मुलांप्रमाणेच, पोटच्या मुलांना नकोशा झालेल्या निराधार आई-वडिलांनाही आपलेसे करण्याकरिता, त्यांना मायेची माणसे आणि हक्काचे कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. “आजवर निरंकार बालग्राम जाधवगड, सासवड येथे भाड्याच्या जागेत सुरु होतं. आता खेड-शिवापूर येथे खोपी गावात आम्ही साडे पाच गुंठे जागा विकत घेतली आहे. जिथे अनाथाश्रमाबरोबरच वृद्धाश्रमही सुरु करण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाथ मुलांना कुटुंबातील थोरा-मोठ्यांचा अनुभव मिळेल आणि निराधार वृद्धांना अनाथाश्रमातील माझ्या मुलांकडून माया आणि काळजी अनुभवायला मिळेल. ते त्यांची सेवा सुश्रृषा करतील आणि दोघांनाही कुटुंबाचा अनुभव मिळेल. त्याशिवाय नलिनी यांचा नर्सिंगचा अनुभव या वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांची सेवा-सुश्रृषा करण्यासाठी याठिकाणी आम्हाला कामी येणार आहे,” असं केशव सांगतात.

निरंकार बालग्राममध्ये विविध वयोगटातील मुले आहेत. धेंडे दाम्पत्य या सर्व मुलांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करत आहेत. या ठिकाणी ही मुलं एका कुटुंबाप्रमाणे रहात आहेत. या मुलांना चांगल्या दर्जाचे रहाणीमान, अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. ही सर्व मुले आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. “माझ्या या तेराही मुलांना मला स्वावलंबी बनवायचे आहे. यासाठी त्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण देऊन त्यानंतर आयटीआय प्रोफेशनल कोर्स किंवा त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देणार आहे. त्यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे योग्य जोडीदाराशी लग्न लावून द्यायचे आणि त्यानंतर त्यांना त्यांचे आयुष्य जगायला सांगायचे असे आम्ही ठरवले आहे,” केशव सांगतात. ते पुढे सांगतात, “याकरिता आमच्या खेड-शिवापूरच्या नव्या जागेत एक आयटीआय सेंटरही सुरु करण्याची योजना आहे. जिथे आमच्या मुलांबरोबरच गावातील इतर मुलेही येऊन शिक्षण घेऊ शकतील.”


image


निराधार बालग्राममधील मुलांचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण करण्याकरिता येणारा सर्व खर्च पेलविण्याकरिता सुरुवातीला केशव यांनी खूप कष्ट घेतले. ते सांगतात, “२०१० ते २०१२ ही पहिली दोन वर्ष मी रोज सकाळी हडपसरहून कॅम्प परिसरात जायचो. तिथे एक ७५ वर्षांचे पारसी गृहस्थ रहायचे. ते अंथरुणाला खिळलेले होते. त्यांचे मलमूत्र काढण्यापासून सर्व प्रकारची सेवा सुश्रृषा करायचो. रोज एक तास काम केल्याचे मला १५० रुपये मिळायचे. तर रात्रीच्या वेळी केईएम, ससून या रुग्णालयांमध्ये नाईट वॉर्डबॉयचे काम करायचो. त्या कामाचे प्रत्येक रात्रीचे ३०० रुपये मिळायचे. हे पैसे लागलीच हातात मिळत असल्यामुळे माझ्या मुलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सुटायचा. त्यानंतर एक दिवस एका नावाजलेल्या वर्तमानपत्राचे पत्रकार आमच्या इमारतीमध्ये खाली रहाणाऱ्या एका गृहस्थांकडे आले होते. त्यांच्याकडून त्या पत्रकार महोदयांना आमच्या कामाबद्दल समजले आणि ते मला भेटायला आले. ते पत्रकार असल्याची मला कल्पना नव्हती. कुणीतरी आश्रम बघायला आले आहे असं समजून मी त्यांना सर्व माहिती दिली. ते सर्व ऐकून ते एकदम भारावले आणि लागलीच माझी मुलाखत घेतली. त्या वृत्तपत्राने माझ्या कामाची दखल घेतल्यानंतर मात्र माझे दिवस पालटले. अनेक मदतीचे हात पुढे आले. आज देश-विदेशातील लोक निरंकार बालग्रामला भेट देऊन आपला अमूल्य वेळ आमच्या मुलांबरोबर व्यतित करत आहेत, मदतीचा हात पुढे करत आहेत. देणगीदारांमध्ये कॉर्पोरेट्सचाही समावेश आहे. आज अशा शुभचिंतक आणि दानशूर लोकांच्या मदतीमुळेच मी माझ्या सर्व मुलांचं चांगल्या पद्धतीने पालनपोषण करु शकत आहे.” सर्व शुभचिंतक आणि दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार मानतानाच सरकारकडून मात्र कोणताही निधी मिळाला नसल्याचंही ते आवर्जून सांगतात.

केशव सांगतात, “पूर्वी शिक्षक म्हणून काम केलेले असल्यामुळे मी डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत चोख असतो. संस्थेचं सर्व काम कायदेशीररित्या, प्रामाणिकपणे चालतं. सर्व व्यवहारांचं काटेकोरपणे ऑडीट ठेवलं जातं. संस्था सुरु करतानाही मी सरकारची रितसर परवानगी घेतली. संस्थेचा कारभार पारदर्शी ठेवण्याच्या उद्देशाने देणगीदारांकडून ज्या देणग्या येतात त्यांचे सर्व तपशील व संस्थेबाबतची सर्व माहिती www.nirankarbalgram.org या संस्थेच्या वेबसाईटवर नियमितपणे अपडेट केली जाते.” संस्थेच्या या प्रामाणिक आणि प्रेरणादायी कामासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्वतःच्या शिक्षणाकरता २०० रुपयांची याचना करणारी महिला, आज दुर्लक्षित घटकातल्या १४ हजार मुलांच्या स्वप्नांना खतपाणी घालते आहे

कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपडत आहेत, बनारसचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव! 

४२ मुला-मुलींचे ते आहेत आदर्श माता-पिता

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags