संपादने
Marathi

गगन भरारी

अंबरनाथसारख्या एका लहानशा उपनगरातून येऊन एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीची व्हिपी अर्थात उपाध्यक्ष होणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती... पण शीनम ओहरी यांनी ते शक्य करुन दाखविले. कसा होता हा प्रवास? जाणून घेऊन या...

Supriya Patwardhan
13th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आठवणीतील अंबरनाथ:

image


शीनम ओहरी यांचा जन्म महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसारख्या एका लहानशा उपनगरात झाला. तेथेच ‘द इनर व्हिल पब्लिक स्कूल’ या शाळेत त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.“त्याकाळी अंबरनाथमध्ये केवळ दोनच ऑटो होत्या, माझे शाळेत जाण्यासाठी वाहन म्हणजे याच दोन रिक्षा.... सांगायचा मुद्दा म्हणजे, अशा अगदी साध्या वातावरणात माझे बालपण गेले,” आजही त्या तेंव्हाच्या आठवणीत रमून जातात.

सातवीनंतर मात्र वडीलांच्या नव्या नोकरीमुळे त्यांना अंबरनाथ सोडून ठाण्याला जावे लागले. तेथेच त्यांचे आठवी ते दहावीचे शिक्षण झाले. त्यानंतरचा मोठा टप्पा होता तो म्हणजे बंगलोर (आताचे बंगळूरु) ज्याने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. दहावीनंतर वडीलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यादेखील बंगलोरला गेल्या. तेथे माऊंट कारमेलमधून त्यांनी अकरावी आणि बारावी केले. सीईटी परीक्षेत त्यांचा क्रमांक होता २८६....त्यांनी बंगलोर विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी मिळविली. गणित आणि विज्ञान विषय खूपच चांगले असल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची तेंव्हा निवड केली. ते साल होते १९८७... त्यावेळी संगणकाचे नुकतेच आगमन झाले होते आणि हे क्षेत्र भविष्यात कसे वळण घेईल, याविषयी फारशी कोणालाच खात्री नव्हती.

एकूणच बंगलोरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना त्या म्हणतात, “एका लहानशा गावातून बंगलोरसारख्या मोठ्या शहरांत येण्याचा अनुभव निश्चितच घाबरवून सोडणारा होता. महाविद्यालयातील माझे पहिले सहा महिने खूपच कठीण गेले. मात्र हळूहळू मी इतरही विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. अर्थात यासाठी मला वडीलांची शिकवणूक खूपच कामी आली.” वडिलांविषयीचा सार्थ अभिमान त्यांच्या बोलण्यात दिसून येतो. “संकट कितीही मोठे असो, खचून जायचे नाही, हे त्यांनी मला शिकवले. तसेच ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, ती तुम्ही निश्चितपणे शक्य करुन दाखवू शकता, हा विश्वासही त्यांनीच दिला. सत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांचे काम सुरुच राहिले आहे,” त्या अभिमानाने सांगतात.

संगणकाशी ओळखः

“महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असताना, माझी फोरट्रानशी पहिल्यांदा ओळख झाली आणि मी त्याच्या प्रेमातच पडले. मला त्याविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. त्यामुळे मी 'सी' आणि 'पास्कल' स्वतःची स्वतःच शिकले. त्यावेळी मला लक्षात आले, की मी हे खूपच चांगल्या प्रकारे करु शकते आणि ही नवनिर्मितीची प्रक्रिया मला खूपच आनंददायी वाटू लागली. त्यामुळेच मग सॉफ्टवेअरला एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे, असा विचार मी केला,” त्या सांगतात.

पुढे १९९२ साली आय-फ्लेक्स कंपनीत वॉक-इन इंटरव्ह्यू अर्थात मुलाखती सुरु होत्या. जी पुढे ओरॅकलने नियंत्रित केली. त्यावेळी शीनम तेथे जाऊन धडकल्या आणि त्यावर्षी आय-फ्लेक्सने निवडलेल्या वीस लोकांपैकी त्यादेखील एक होत्या. “मी सुमारे पंधरा वर्षे ओरॅकलबरोबर काम केले आणि हा काळ माझ्यासाठी खूपच आनंददायी होता. सॉफ्टवेअर डेवलपमेंटमध्ये शक्य त्या सर्व गोष्टी मी केल्या, अगदी गरजांची परिभाषा निश्चित करण्यापासून ते कोड लिहिण्यापर्यंत किंवा ग्राहक, भागीदार किंवा टीम व्यवस्थापनापर्यंत मी सर्व काही केले,” त्या सांगतात. त्यानंतर २००७ साली त्या बिझनेस ऑबजेक्टसमध्ये संचालक म्हणून रुजू झाल्या. बिझनेस ऑब्जेक्टस् २००९ साली एसएपीने घेतली. त्यावेळी त्यांच्या भारतातील एसएपी टेस्ट सेंटरच्या नेतृत्वाचा त्या एक भाग बनल्या.

एसएपी, इंडीयामधील नेतृत्वः

एसएपीमध्ये त्यांनी इंडीया टेस्ट सेंटरच्या संचालक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी तीन प्रोडक्ट लाईन्सचे व्यवस्थापन थेट त्यांच्यामार्फत होत होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे १३० लोक काम करत होते. त्यानंतर त्या चीफ प्रोडक्ट ओनर या भूमिकेकडे वळल्या. एका अगदी नव्या कोऱ्या उत्पादनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे एक असे उत्पादन होते ज्याने ग्राहकांच्या आयुष्यात संभाव्य बदल शक्य होता. त्यानंतर २०११ ला त्यांच्याकडे ऑपरेशन्स ची जबाबदारी आली. “ टेस्ट इंजिनियरींगची सीओओ या नात्याने माझे काम होते ते कार्यक्षमता वाढविण्याचे... मी एसएपीमध्ये आजपर्यंत केलेल्या कामांपैकी हे सर्वोत्तम स्वरुपाचे काम होते,” त्या सांगतात. त्यानंतर त्यांच्याकडे भारतातील युजेबिलिटी टेस्ट लॅबची जबाबदारी आली, ज्याअंतर्गत १७० लोकांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. “स्वतःमधील सर्वोत्तम ते पुढे आणण्यासाठी सतत स्वतःलाच एक आव्हान देणारा आणि स्वतःचाच शोध घेणारा असा हा प्रवास आहे,” त्या सांगतात.

एसएपी इंडियातील प्रयोगः

“लैंगिक भिन्नतेवर आमचा खास भर आहे. आम्ही इग्नाईट नावाचे एक विशेष व्यासपीठ तयार केले असून उदयोन्मुख महिला व्यवस्थापकांना नेतृत्व फळीतील सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाते. तर ज्या महिला नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, अशांना आमच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येते,” एसएपी इंडीयातील आपल्या कामाविषयी त्या सांगतात.

त्याचबरोबर सांस्कृतिक तसेच पिढ्यांमधील विविधतेबाबत टीम्समध्ये संवेदनशीलता आणण्यावरही त्यांचा भर दिसतो. त्यांच्या टीममधील काही जण ऑटीस्टीक (स्वमग्न) आहेत. तर अंधुक दृष्टीच्या दोघांचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय आणखी एका महत्वाच्या विषयावरही त्यांचे काम सुरु आहे. ते म्हणजे एलजीबीटी समुदायाबाबत जागरुकता निर्माण करणे. इतर विविध क्षेत्रातील मान्यवरही त्यांच्या टीम्सबरोबर संवाद साधण्यासाठी येतात. ज्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान अधिकारी, कलाकार, लेखक, कार्यकर्ते, डीजायनर्सही त्यांच्या विश्वातील अनुभवांबद्दल बातचीत करतात.

त्यांचा स्वतःचा संपूर्ण भर सध्या पिढ्यांमधील भिन्नतेवर आहे. यामध्ये आणखी खूप काम करण्यास जागा असल्याचे त्या मानतात. त्याचबरोबर महिलांबरोबर काम करण्याविषयी जागरुकता निर्माण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांना वाटते. “ कामाचे ठिकाण आमच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अधिकाधिक चांगले कसे होऊ शकेल, याचा आम्ही सतत विचार करत असतो. आमच्याकडे आता एक प्ले स्कूल आहे. तसेच अधिकाधिक महिला नेतृत्वाचा भाग कसा बनतील, यावरही आमचा सतत विचार सुरु असतो. आई होण्याच्या टप्प्यावर कारकिर्दीला रामराम करण्याकडे महिलांचा कल दिसतो किंवा त्यांच्यावर वृद्ध पालकांची जबाबदारी असते. अशा वेळी महिलांनी काम करत रहावे, यादृष्टीने सामाजिक आणि संस्थांत्मक बदलांची गरज आहे. महिलांकडे प्रचंड गुणवत्ता असते आणि त्यामुळे या प्रश्नावर तातडीने उत्तर शोधण्याची गरज आहे,” त्या सांगतात.

मोलाचा सल्लाः

“मूल्यनिर्मिती मला नेहमीच विशेष प्रोत्साहीत करते. त्याचबरोबर केवळ स्वतःचेच नाही तर भवतालच्या परिस्थितीचे मूल्यही वाढविणे माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे. स्वतःला आणि भवतालच्या परिसराला अधिक चांगले करण्यासाठी नाविन्यपूर्ण कृती करत रहाणेच मला प्रोत्साहीत करते,” त्या सांगतात. तर आजच्या तरुणाईला त्या एक खास संदेशही देतात, “ स्वप्ने बघा, धीर सोडू नका,स्वतःची मूळ शिकवण विसरु नका आणि धैर्याने टिकून रहा.”

शिनाम यांना भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags