एका क्लिकवर डॉक्टरांना भेटण्याची सोय- ‘INEEDDOCOTR.IN’
बदलत्या काळानुसार रोजचं जीवनही वेगवान झालंय. पण हा बदल आता फक्त मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर छोट्या शहरांमध्येही हा बदल दिसू लागला आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडली तर पहिला प्रश्न पडतो जवळपास चांगले डॉक्टर असतील का? लोकांची हीच समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय ‘INEEDDOCOTR.IN’ संस्थेने...या सेवेअंतर्गत तुम्हाला रुग्णालय आणि चांगल्या डॉक्टरची माहिती तर मिळतेच पण ही संस्था तुम्हाला डॉक्टरांची अपॉइन्टमेंटही घेऊन देते.
अमित अग्रवाल, अभिषेक तिवारी आणि आकाश गोयल या तिघांनी मिळून 'इननीडडॉक्टर डॉट इन'ची स्थापना केली. संस्थेचं कामकाज सध्या छत्तीसगढची राजधानी रायपूर आणि आजूबाजूच्या परिसरात चालतंय. आज देशात आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत, पण त्या सर्व वेबसाईट फक्त कोणत्या आजाराचे डॉक्टर कुठे असतात याची माहिती देतात. याउलट इननीडडॉक्टर डॉट इन डॉक्टरांना भेटण्याची वेळ ठरवून देण्याची सेवा देते असं संस्थेचे सह संस्थापक अमित अग्रवाल सांगतात. रुग्णांना डॉक्टरांची भेट घेण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा असा प्रयत्न असल्याचंही अमित सांगतात. एकत्र कुटुंबात राहत असल्यानं सतत कोणत्या तरी व्यक्तीला रुग्णालयात न्यावं लागायचं, पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरांची भेट घेण्यासाठी तासनतास ताटकळत बसावं लागत असल्यानं कोणता मार्ग काढता येईल यावर विचार केल्याचं अमित सांगतात.
त्याचबरोबर अमित यांच्या मते डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधांचा खर्च आणि तपासणीच्या खर्चाचीही रुग्णांना चिंता असते. त्यामुळे एखाद्या रोगनिदान केंद्रानं जर खर्चात सूट दिली तर त्याचा फायदा रुग्णांनाही होईल असा विचार या तिघांनी केला. यानंतर जुलै २०१५मध्ये त्यांनी इननीडडॉक्टर डॉट इनची सुरूवात केली. आज रायपूरमधील साडे सातशे डॉक्टर आणि सुमारे ८०० रोगनिदान केंद्र संस्थेसोबत आहेत.
‘INEEDDOCTOR.IN’ शी संपर्क साधून कोणतीही व्यक्ती डॉक्टरांना भेटू शकते. तसंच संस्थेच्या कॉलसेंटर किंवा मोबाईल ऍपवरुन डॉक्टरांची भेट ठरवता येते. या ऍपमध्ये लाइफट्रेकर म्हणून एक पर्याय आहे त्यावर क्लीक केलं तर रुग्णाला डॉक्टरांना भेटण्याची वेळ ठरवता येते. तसंच या संस्थेमार्फत वेळ घेतलेल्या रुग्णांना डॉक्टर दिलेल्या वेळतच तपासतात. याबरोबरच कोणत्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि रुग्णाला कोणतं रोगनिदान केंद्र जवळ पडेल याचीसुद्धा माहिती दिली जाते. त्याचबरोबर रुग्णांचं समुपदेशन करण्याचं कामही संस्थेतर्फे करण्यात येतं आणि वेळोवेळी आरोग्य शिबिरांचंही आयोजन केलं जातं.
संस्थेकडे दिवसाला ४० ते ५० रुग्ण संपर्क साधतात. टू टायर आणि थ्री टायर दर्जाच्या शहरांमध्ये भविष्यात सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. “मोठ्या शहरांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध असतात पण छोट्या शहरात त्यांचा अभाव असतो म्हणून येत्या तीन महिन्यात छत्तीसगड आणि ओरिसाच्या छोट्या शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचा विचार आहे आणि त्यानंतर इतर राज्यांमध्येही अशी सेवा सुरू केली जाईल, ” असं अमित सांगतात.
‘INEEDDOCTOR.IN’ तर्फे ही सेवा मोफत पुरवली जाते. त्याचबरोबर संस्थेमार्फत कोणत्याही रोगनिदान केंद्रात गेलात तर १० ते ६० टक्क्यांपर्यंत सूटही मिळते. गेल्या चार महिन्यात सुमारे पाच हजार रुग्णांनी आमच्या सेवेचा लाभ घेतलाय आणि ही संख्या दररोज वाढतेय असा दावा अमित करतात. संस्थेची सध्या १० जणांची टीम आहे. सुरूवातीला तिघांनी मिळून भांडवल उभं केलं पण आता त्यांना आणखी भांडवलाची गरज असल्यानं त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचं अमित सांगतात.