संपादने
Marathi

ग्लोबल सिटीझन इंडिया मोहिमेचा शुभारंभ

Nandini Wankhade Patil
13th Sep 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छाशक्ती असून त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. सामाजिक आर्थिक विकासामध्ये युवकांनी सहभाग घेऊन त्याला चालना दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वांद्रे येथील हॉटेल ताज लॅन्डस एन्ड येथे ‘द ग्लोबल एज्युकेशन ॲण्ड लीडरशीप फाउंडेशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया’ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार पूनम महाजन, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आमीर खान, करिना कपूर, फरहान अख्तर यांच्यासह जागतिक स्तरावरील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

image


मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, ग्लोबल सिटीझन अभियानाचे मी स्वागत करतो. जागतिक स्तरावरील ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हलच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे. याबद्दल मला अभिमान वाटत असून राज्य शासन यासाठी सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, भारताची 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांखालील तरुणांची आहे. प्रचंड इच्छाशक्ती असलेले हे युवक सामाजिक आर्थिक विकासाचे वाहक झाले पाहिजेत. त्‍यादृष्टीने त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ग्लोबल सिटीझन इंडिया या मोहिमेद्वारे युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होण्यास मदत होईल आणि युवा शक्ती मोठ्या संख्येने विविध सामाजिक उपक्रमांत प्रत्यक्ष सहभागी होऊन विकासाला चालना देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. युवकांना सामाजिक कार्यामध्ये जोडणारी ही मोहीम एक दुवा ठरणार आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना युवकांमध्ये जागृत करणाऱ्या या मोहिमेस मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

image


राष्ट्राच्या विकासात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे समाजाच्या प्रत्येक घटकातील युवकांनी विकासाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. ग्लोबल सिटीझन इंडिया ही मोहिम विकसित राष्ट्राच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

image


खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, स्त्री-पुरुष समानतेसाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. ग्लोबल सिटीझन इंडिया या मोहिमेच्या माध्यमातून शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि स्वच्छता या क्षेत्रामध्ये युवकांना प्रत्यक्ष सहभागी करुन घेण्यात येणार आहे. स्वत:च्या खासदार निधीतील सर्वाधिक खर्च हा मुंबईमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यावर केला जात आहे, असेही श्रीमती महाजन यांनी यावेळी सांगितले.

image


बदलाची सुरुवात स्वत:पासून करा, असा संदेश देत भारतातील शहरी व ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक जबाबदारीची ओळख करुन देतानाच सामाजिक विकासाच्या मोहिमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि युवा नेतृत्वाला दिशा देण्याचे काम ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया मोहिमेच्या माध्यमातून पुढील 15 वर्ष केले जाणार आहे. तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि स्वच्छता या क्षेत्रात या मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. गतवर्षी न्यूयॉर्कमध्ये झालेला जागतिक स्तरावरील ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हल यावर्षी 19 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. त्यासाठी या मोहिमेचा शुभारंभ आणि युवकांची सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

यावेळी अमिताभ बच्चन, आमीर खान, फरहान अख्तर, करिना कपूर यांचीही भाषणे झाली. फाउंडेशनचे अध्यक्ष शिव खेमका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी ईश्वरन यांनी या मोहिमेबद्दल मनोगत व्यक्त केले. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags