पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

Monday December 28, 2015,

5 min Read

दिल्लीत राहणारे २१ वर्षाचे तेजस्वी शर्मा पुरातन योग मध्ये निपुण आहेत आणि ते सहजरित्या कठीणातील कठीण योगासन करतात, जी करणे कुणासाठीही कठीण आहे. त्यांच्याबाबत सर्वात आश्चर्यचकीत करणारी बाब ही आहे की, ते केवळ ९ महिन्यांचे असताना पोलिओ झाल्यामुळे त्यांना दोन्ही पायाने चालण्यात समस्या येत होत्या. मात्र तेजस्वी आणि त्यांच्या आई-वडिलांनी आशा सोडली नाही आणि केवळ एक वर्षाचे असताना योग प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला. गेल्या अनेक वर्षात तेजस्वी यांनी स्वतःला योग क्षेत्रात इतके निपुण केले आहे की, ६९ टक्के अपंगत्व येऊनही ते कठीणातील कठीण योगासन खूपच सहजतेने करतात.

image


गेल्या २८ ऑक्टोबरला तेजस्वी यांना ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने ‘मोस्ट फ्लेक्सिबल हँडिकॅप्ड योग विजेता-२०१५’ च्या पुरस्काराने नावाजले. तेजस्वी यांनी २०११ मध्ये दिल्लीत आयोजित झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक, वर्ष २०१२ मध्ये हॉंगकॉंग मध्ये आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०१४ मध्ये चीन मध्ये आयोजित झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.

image


सध्या दिल्लीच्या विश्व प्रसिद्ध जेएनयू(जवाहरलाल नेहरु विद्यापीठ) येथून जर्मन भाषेत ‘ऑनर्स’चे अखेरच्या वर्षातील विद्यार्थी असलेले तेजस्वी योगच्या प्रवासाबाबत ‘युअर स्टोरी’ सोबत विस्ताराने झालेल्या संवादा दरम्यान सांगतात की,“मी आता केवळ ९ महिन्यांचाच होतो आणि गुडघ्यावर चालायला शिकत होतो आणि त्यावेळीच मला पोलिओ झाला. माझे आई-वडील मला डॉक्टरांकडे घेऊन गेले, ज्यांनी मी आपल्या पायांवर चालू शकणार नसल्याचे सांगितले आणि मला दिल्लीतील चांगल्या रूग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. माझ्या वडिलांनी मला दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात आणले, जेथे माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.”

शस्त्रक्रियेनंतर तेजस्वी यांच्या पायांवर रक्ताभिसरण सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ एक वर्षाचे असताना योग प्रशिक्षण देणे सुरु ठेवले.

image


एकदा योग शिकण्यास प्रारंभ केल्यानंतर सर्व गोष्टी तेजस्वी यांच्या बाजूने सुरु झाल्या आणि खूपच लहान वयात योगासनाचा अभ्यास प्रारंभ केल्यामुळे त्यांचे शरीर खूप लवचिक होत गेले. तेजस्वी सांगतात की, केवळ पाच वर्षाचे असताना ते प्रतिदिन ६० ते ७० योगासनांचा अभ्यास करायचे.तेजस्वी सांगतात की,“मी पाच वर्षाचा झाल्यानंतर, माझे काका मला शिक्षणासाठी दिल्लीला घेऊन आले आणि मला नोएडा सेक्टर ८२ स्थित विद्या मंदिरमध्ये प्रवेश मिळाला. या शाळेत आल्यानंतर, मी योग मध्ये अधिक पारंगत होण्यास यशस्वी झालो आणि त्याव्यतिरिक्त मी येथे लक्ष देणे देखील शिकलो.”

या प्रकारे तेजस्वी दाखल झाल्यानंतर स्वतःला योग क्षेत्रात अधिक पारंगत करण्यात यशस्वी झाले आणि सोबतच स्वतःचे शिक्षण देखील केले. तसे पाहिले तर, तेजस्वी योग मुळे आपल्या शाळेत खूप प्रसिद्ध होते, मात्र त्यांचे काही वर्गमित्र त्यांच्या अपंगत्वावर थट्टा करायचे. त्याच दरम्यान त्यांच्या शाळेत एका आंतरविद्यालयीन योग स्पर्धेचे आयोजन झाले. तेजस्वी सांगतात की,“मी पहिल्यापासूनच माझ्यावर थट्टा करणा-या मुलांना दाखवू इच्छित होतो की, मी काय करू शकतो. मी आपल्या पीटीआय(शारिरीक शिक्षण मार्गदर्शक) प्रवीण शर्मा यांच्या प्रेरणेने या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या योगासनाच्या बळावर त्यात प्रथम येण्यात यशस्वी झालो.

त्यानंतर तेजस्वी यांनी मागे वळून पाहिले नाही आणि त्यांची निवड पहिले जिल्ह्याच्या संघात झाली आणि त्यानंतर ते प्रादेशिकस्तरावर स्पर्धेत सहभागी व्हायला लागले. तेजस्वी सांगतात की, “योगच्या आयोजित होणा-या अनेक स्पर्धांमध्ये अपंग असलेल्या प्रौढांचा कुठलाही वर्ग नसतो, त्यासाठी मला सामान्य मुलांप्रमाणेच सर्वांसोबतच प्रतिस्पर्धा करावी लागते. असे असूनही ही बाब माझ्या बाजूनेच राहिली. कारण यामुळे मला सामान्य लोकांसोबत सामना करावा लागतो, त्यामुळे मी अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित झालो.”

image


काही स्पर्धा जिंकल्यानंतर तेजस्वी यांना वाटले की, आता त्यांना आपल्या या कलेला प्रदर्शनात बदलले पाहिजे. त्यांनी वर्ष २०१० मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीयस्तरावर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला, जेथे त्यांनी कलात्मक योगचे प्रदर्शन केले. तेजस्वी सांगतात की, “ कलात्मक योगात प्रतिस्पर्ध्याला केवळ १.५ मिनिटात आपले सर्वश्रेष्ठ आसन करून दाखवायचे असतात. त्या व्यतिरिक्त या आसनांचे प्रदर्शन त्यांना संगीतासोबत ताळमेळ ठेवून करायचे असते. मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्तरावर स्पर्धेत भाग घेतला आणि कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.”

एकदा पदक जिंकल्यानंतर तेजस्वी यांना वाटले की, आता त्यांना या कलात्मक योगचा आपल्या भविष्यातील दिवसांसाठी अवलंब केला पाहिजे आणि त्यांनी त्यात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला. तेजस्वी पुढे सांगतात की, “ आता मला वाटायला लागले होते की, माझ्यात काहीतरी खास आहे आणि मी निश्चय केला की, आता त्याला कारकिर्दीचे स्वरुप द्यावे.”

त्यानंतर तेजस्वी यांनी काही प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रमात आपली प्रतिभा दाखविण्याचा निर्णय घेतला आणि ते ‘एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा आणि‘इंडियाज़ गॉट टेलेंट’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. दोन्ही कार्यक्रमात त्यांच्या प्रदर्शनाला परिक्षक आणि प्रेक्षकांनी खूप पसंत केले आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. इतक्या वर्षापर्यंत विभिन्न योगासनांचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्यासाठी कठीणातील कठीण आसन देखील सहज झाले आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या अनेक आसनांना बदलले आहे, जे एखाद्या व्यक्तीसाठी खूपच कठीण तर आहेत, शिवाय काही आसने करणे जवळपास असंभव आहेत. त्यानंतर त्यांनी वर्ष २०११ मध्ये दिल्ली तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित झालेल्या योग विश्वचषकात भाग घेतला आणि आर्टिस्टिक योगमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले. त्यानंतर त्यांनी वर्ष २०१२ मध्ये हाँगकाँग मध्ये आयोजित झालेल्या आंतरराष्ट्रीय योगस्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांना चीनच्या शांघाई मध्ये आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय योगस्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली, जेथे ते अंतिम ६ मध्ये स्थान बनविण्यात यशस्वी झाले आणि अखेर त्यांनी येथे देखील आपल्या प्रतिभेमुळे रौप्य पदक जिंकले.

योगासने करण्याची त्यांची प्रतिभा आणि त्यांच्या शरीराचा लवचिकपणा यांमुळे २८ ऑक्टोबरला ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने तेजस्वी यांना ‘मोस्ट फ्लेक्सिबल हँडिकँप्ड विजेता-२०१५’च्या खिताबाने सन्मानित केले. अखेर तेजस्वी सांगतात की,“जर आपण आपल्या योग्यतेला चांगल्या प्रकारे ओळखले आणि नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलले तर, कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मी सर्वाना हाच सल्ला देतो की, योग करा आणि निरोगी रहा.”

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव प्रसिद्ध करणा-या तेजस्वी यांना केवळ याच गोष्टीचे दु:ख आहे की, सरकारने योग ला खेळाचा दर्जा तर दिला, मात्र आतापर्यंत यात अपंगांचा कुठलाही वर्ग बनविण्यात आलेला नाही, ज्यामुळे त्यांच्यासारखे अनेक अपंग प्रतिस्पर्धी भाग घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.