संपादने
Marathi

गर्भवती महिलांना प्रसुतीकरीता पसंतीचे रुग्णालय निवडण्याचा अधिकार मिळावा - राज्यपाल

Team YS Marathi
12th Dec 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

महाराष्ट्रातील महिलांना प्रसुतीकरीता आपल्या पसंतीचे रुग्णालय निवडण्याचा अधिकार मिळावा यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच परिचारिकांना नर्स संबोधण्याऐवजी वैद्यकीय सहाय्यक संबोधण्यात यावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी केल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले (पश्चिम) येथील डॉ.रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय यांच्याशी संलग्न ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय’ नामकरण व लोकार्पण राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत झाले.

image


राज्यपाल चे.विद्यासागर राव पुढे म्हणाले की, या वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण माझ्या हस्ते झाले याचा मला अभिमान आहे. कारण, लाखोंच्या हृदयावर राज्य केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नांव या वैद्यकीय महाविद्यालयास लाभले आहे. मुंबईची लोकसंख्या आज सव्वा कोटींहून अधिक असून सरकारी रुग्णालये कायम रुग्ण संख्येने ओसंडून वाहतात. खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च सामान्यांना परवडणारा नसतो. अशा स्थितीत सरकारी रुग्णालये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज, आधुनिक सुविधांनी युक्त करणे आवश्यक आहे. तळागाळातल्या रुग्णांचे आपण देणे लागतो. रुग्णालयांच्या परिसरात रुग्ण सदन, धर्मशाळा यांची संख्या वाढली पाहिजे, अशी मौलिक सूचनाही राज्यपाल महोदयांनी केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वैद्यकीय महाविद्यालयास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नांव एकमताने दिल्याबद्दल कुटुंबियांच्या वतीने मी आभारी आहे. बाळासाहेब हे राजकारणापलीकडचे व्यक्तिमत्त्व होते. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र जपताना रुग्ण सेवेत देखील बाळासाहेबांनी योगदान दिले. आजच्या काळात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे प्रवेश घेता येत नाही. त्यावेळी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये गरजेची ठरतात. या वैद्यकीय महाविद्यालयात जगातील सर्वोत्तम असे तंत्रज्ञान आणू, असे ठाकरे यांनी नमूद केले.

imageशालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री विनोद तावडे म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांनी समाजसेवा करताना रुग्ण सेवा, रुग्णवाहिका उपलब्धतता यांना प्राधान्य दिले. सामान्य माणसाच्या नितांत गरजा बाळासाहेबांनी ओळखल्या होत्या. या महाविद्यालयास बाळासाहेब ठाकरे यांचे नांव दिल्याबद्दल राज्य सरकारच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रात वैद्यकीय परिषदेच्या मान्यतेने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या सुमारे 1 हजार जागा येत्या काळात वाढणार असून प्रत्येक जिल्हा रुग्णालय अद्ययावत करुन त्यांच्याशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरीता महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. इतर वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे या महाविद्यालयाचे नांव संक्षिप्त न संबोधतात पूर्ण विस्तारित स्वरुपातच लिहिले आणि बोलले जाईल, याची काळजी विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांनी घ्यावी, कारण हे नामकरण म्हणजे बाळासाहेबांना दिलेली आदरांजली आहे, असे भावपूर्ण आवाहनही तावडे यांनी केले. 

समारंभाच्या प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय’ चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरणही माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags