संपादने
Marathi

ढोल-ताशाला नवी ओळख प्राप्त करुन देणारे ‘रिधम इव्होल्युशन’

ढोल-ताशाच्या वापराच्या कक्षा रुंदावणारा एक अभिनव प्रयोग

19th Feb 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

ढोल-ताशे हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये वाजणारे ढोल-ताशे हे इथल्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य. या काळात ढोल-ताशांच्या गजराने सारा आसमंत दणाणलेला असतो. या गजराची धुंदीच निराळी. रक्त सळसळवणारी, झिंग आणणारी. खरं तर ढोल-ताशा हे एक रणवाद्य आहे. पूर्वीच्या काळी राजा लढाईवर जात असताना मोठ-मोठयाने ढोल-ताशे वाजवून शत्रूच्या मनात भिती निर्माण करायची आणि शत्रूचे मनोधैर्य खच्ची करायचे हा रणनितीचा भाग असायचा. त्यामुळे स्वाभाविकच ढोल-ताशे म्हणजे दणदणाट हे पूर्वीपासूनचे समीकरण. मात्र अनेकांना हाच दणदणाट म्हणजे केवळ बडवणे वाटते. क्लासिकल, मेलोडिअस म्युझिकचे अनेक चाहते ढोल-ताशाच्या आवाजाने कानावर हात ठेवतात. हेच चित्र बदलण्यासाठी आता पुण्यातले काही तरुण प्रयत्न करत आहेत. या वाद्यांबाबतचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा याकरिता केवळ ठराविक रसिकांनाच नाही तर समस्त संगीत वेड्यांना मंत्रमुग्ध करणारे संगीत या वाद्यातून उमटवायचे आणि या वाद्यांना एक नवी ओळख प्राप्त करुन द्यायची या ध्येयाने झपाटलेले काही तालवेडे पुणेकर ‘रिधम इव्होल्युशन’च्या व्यासपीठावर एकत्र आले आहेत.


image


“रमणबाग ढोल-पथकामध्ये आमची एकमेकांशी ओळख झाली. एका गणेशोत्सवाला आम्ही रमणबागेत २१ नवीन ठेके ढोल-ताशावर बसवून गणपती बाप्पाला नैवेद्य सादर केला. त्यानंतर आमच्या मनात विचार आला की इतर वाद्यांवरचे ठेके ढोल-ताशावर वाजवून ‘केवळ रस्त्यावर मिरवणुकीत वाजवलं जाणारं वाद्य’ ही ढोल-ताशाची ओळख आपण बदलू शकतो आणि मग त्या दृष्टीकोनातून एक वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०१२ ला आम्ही ‘रिधम इव्होल्युशन’ची सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही १० जण होतो. आता आमचा ग्रुप १९ जणांचा झाला आहे. यामध्ये अगदी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते १० वर्षांचा अनुभव असलेले वर्किंग प्रोफेशनल्सही आहेत. ढोल-ताशे आणि संगीताचं वेड हे आमच्या सर्वांमध्ये कॉमन आहे,” गेली २५ वर्ष रमणबागेत ढोल-ताशे वादन करणारा आणि रिधमच्या क्रिएटिव्ह सेंटरची जबाबदारी सांभाळणारा सुमीत सोमण सांगतो.

तो पुढे सांगतो, “ढोल-ताशा म्हणजे फक्त मोठमोठा आवाज हा दृष्टीकोन आम्हाला बदलायचा आहे. त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या विविध भागांचा वापर करुन ढोलकी, ढोलक, दीडकी, तबला यासारखी भारतीय चर्मवाद्य आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स यांचे ठेके ढोल-ताशावर वाजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजवर शास्त्रीय संगीतामध्ये तबला, पखवाज यासारखी वाद्य मुख्य करुन वाजवली गेली आहेत. आम्हाला हेच चित्र बदलायचं आहे. क्सासिकल, मेलोडियस म्युझिकसाठीही ढोल-ताशाचा वापर करता येऊ शकतो हेच आम्हाला दाखवून द्यायचं आहे. मुख्य वाद्य म्हणून ढोल-ताशे आणि सहाय्याला इतर वाद्य असं नवं चित्र निर्माण करुन संगीताच्या क्षेत्रात एक क्रांती घडवायची आहे. ढोलावर वाजणाऱ्या ‘धम’मधून क्रांती घडवायची असल्यानेच आम्ही आमच्या ग्रुपचे नाव ‘रिधम इव्होल्युशन’ ठेवले आहे,” असं सुमीत सांगतो.


image


आजवर केवळ शास्त्रीय संगीताला साथ देणाऱ् चर्मवाद्यांवर वाजवली गेलेली तिहाई ‘रिधम इव्होल्युशन’ने ढोल-ताशांवर आणली आहे. “२०१२ च्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आम्ही एकशे अकरा ढोलांवर तिहाई वाजवली. केवळ तिहाईच नाही तर चक्रधार तिहाई म्हणजे एक तिहाई सलग तीन वेळा वाजवली. त्यानंतर ‘झा पलुझा फेस्टीव्हल’मध्ये सहाव्या फेरीत आम्ही पखवाज विरुद्ध ढोल-ताशा, ढोलकी विरुद्ध ढोल-ताशा आणि वेस्टर्न कीट विरुद्ध ढोल-ताशा अशी जुगलबंदी सादर केली होती,” सुमीत ‘रिधम इव्होल्युशन’च्या नवनिर्मितीबाबत माहिती देताना सांगतो.

नुकतंच ‘रिधम इव्होल्युशन’ने कोथरुड येथील कलमाडी हायस्कूलच्या ‘स्टेप्झ स्टुडिओ’च्या वार्षिक समारंभाला बॅले नृत्यांगना अझिझा आणि कथ्थक नृत्यांगना आभा औटी यांच्या साथीने एक नवीन प्रयोग सादर केला. “यावेळी या नृत्यांना साथ देणाऱ्या पारंपरिक वाद्यांच्या ऐवजी ढोल-ताशाच्या साथीने बॅले आणि कथ्थक हे दोन नृत्यप्रकार सादर करण्यात आले. बॅलेसाठी आम्ही अडीच मिनिटांचा ट्रॅक तयार केला होता. तर कथ्थकमध्ये तत्कार ढोल-ताशासह सादर केला,” सुमीत सांगतो.


image


‘रिधम इव्होल्युशन’ने विविध प्रयोग करत आजवर अनेक इव्हेंट केले आहेत. “आम्ही आतापर्यंत जवळपास ३०-४० इव्हेंट केले आहेत. त्यापैकी २०-२२ सामाजिक कार्य म्हणूनही केले आहेत. त्याचबरोबर काही फिल्म्ससाठीही आम्ही काम केलेलं आहे. रिधमला दोन वेळा प्रसिध्द वादक शिवमणींसोबत काम करण्याची संधीही मिळाली आहे. त्यांच्यासोबत बारामती आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन ठिकाणी आम्ही जुगलबंदी सादर केली. बारामतीच्या कार्यक्रमाला आम्ही दहा ढोल - चार ताश्यांसह या जुगलबंदीत उतरलो होतो आणि बीकेसीमध्ये सव्वीस ढोल – चार ताशे होते. आमच्या सादरीकरणामुळे शिवमणी खूप खूष झाले. आमचं तालात चाललेलं सादरीकरण ऐकून ढोल-ताशांवरही असे ठेके सादर होऊ शकतात याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं,” सुमीत सांगतो.

‘रिधम इव्होल्युशन’ने शिवरायांची आणि रेणुका मातेची आरतीही ढोल-ताशाच्या सहाय्याने सादर केली आहे. या आरत्यांच्या निर्मितीची रंजक कहाणी सुमीत सांगतो, “वेस्टर्न कीट परफॉर्मर आणि म्युझिक कम्पोझर अभिषेक काटे याने गेल्यावर्षी १६ फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या चार दिवस आधी शिवजयंतीला काहीतरी वेगळं करण्याचा विचार मांडला आणि शिवाजी महाराजांवर आरती करायचं असं सर्वानुमते ठरलं. १७ तारखेला शब्द लिहिले गेले. १८ तारखेला ढोल-ताशांच्या ठेक्यावर आरती रेकॉर्ड झाली आणि १९ ला रिलीज झाली. केवळ चार दिवसात आम्ही ही आरती रिलीज केली. आदर्श शिंदे यांनी ही आरती गायली आहे. असंच घडलं गेल्यावर्षीच्या नवरात्रीला. नवरात्रीच्या आदल्या दिवशी रेणुका मातेची पारंपरिक आरती, जी केवळ जावळीच्या खोऱ्यातील गोंधळ्यांकडून ऐकायला मिळते, ती आरती ढोल-ताशावर करायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आरती रेकॉर्डही झाली.” ही आरती स्वतः सुमीतने गायली आहे. सुमीत उत्तम ढोल-ताशा वादकाबरोबरच चांगला गायकही आहे. त्याने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. गायनाबरोबरच अभिनयाचीही जाण असलेला सुमीत पुण्यातील डिझाईन स्टुडिओबरोबर विज्युअलायझर म्हणून काम करतो.


image


१९ जणांचा ग्रुप, त्यातही वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्समधल्या व्यक्ती एकत्र काम करत असताना येणाऱ्या अनुभवाविषयी बोलताना तो सांगतो, “काम करताना याचा आम्हाला भरपूर फायदा होतो. आमच्या ग्रुपमधल्या १९ जणांमध्ये सहा कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आहेत आणि बाकीचे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. त्यामुळे आम्ही केवळ आठवड्यातले दोन दिवस प्रत्येकी दोन तास असे मिळून दर आठवड्याला केवळ चार तास ड्रम स्टीक्स वापरुन प्रॅक्टीस करतो. एवढ्या कमी वेळातही काहीतरी नवीन, चांगलं काम करणं शक्य होतं ते आमच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले वादक असल्यामुळेच. एखादा नवीन ट्रॅक सेट करत असताना मिहीर सारख्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांमुळे आजच्या तरुण पिढीला ते आवडेल की नाही हे समजतं. ते लगेच त्यावर आपली प्रतिक्रिया देतात. अनेकदा त्यांना तो अपडेटेड वाटत नाही मात्र तो ट्रॅक तिशी-पस्तिशीतल्या आम्हाला आवडलेला असतो. मग अशावेळी त्याचा सुवर्णमध्य काढून सगळ्यांना आवडेल असा ट्रॅक तयार करणं यामुळे शक्य होतं. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रोफेशनमधील वादकांमुळे इव्हेंट करताना खूप फायदा होतो.”

सुमीत पुढे सांगतो, “ग्रुपमधल्या मुलांना वादनाबरोबरच इव्हेंट मॅनेज करण्याचा अनुभवही मिळतो. ‘रिधम इव्होल्युशन’च्या कारभारात, पैशाच्या व्यवहारात सुसूत्रता रहावी यासाठी आम्ही एखाद्या कंपनीप्रमाणेच हा ग्रुप चालवतो. आम्ही चार-पाच जणांचे मिळून चार विभाग केले आहेत. पहिला विभाग ज्याला आम्ही ‘क्रिएटिव्ह सेंटर’ म्हणतो, त्या विभागाचं काम ढोल-ताशा वादनाचा थोडा जास्त अनुभव असलेले, शिवाय लाईव्ह शोचा अनुभव असलेले आम्ही चार-पाच जण मिळून पाहतो. दुसरी आहे मेंटेनन्स टीम. ही टीम गोडाऊन ते कार्यक्रमाचे ठिकाण आणि तिथून परत गोडाऊनपर्यंत ढोल-ताशांची ने-आण करण्याची जबाबदारी सांभाळते. त्याशिवाय वाद्यांचा मेंटेनन्स कधी करायचा याबाबत निर्णय घेते. त्यानंतर ठरल्या दिवशी आम्ही सगळे मिळून मेंटेनन्सचं काम करतो. तिसरी टीम ट्रान्सपोर्टेशन पहाते. सेल्समधला अनुभव असणारी मुलं या विभागासाठी काम करतात. त्यांना ट्रान्सपोर्टेशनचं ज्ञान चांगलं आहे. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अकाउंट्स. या विभागातर्फे सर्व आर्थिक व्यवहार रितसर कागदोपत्री केले जातात. या विभागाच्या कामकाजात इतर कुठल्याही विभागातील व्यक्ती हस्तक्षेप करत नाही. तसा आमचा अलिखित नियम आहे.”


image


येत्या काळात रिधम इव्होल्युशनला ढोल-ताशांचा वापर मेडिटेशनमध्ये करायचा आहे. “काही दिवसांपूर्वी ताल इन्कचा ड्रमर आणि म्युझिक थेरपिस्ट वरुण वेंकटने आमची भेट घेतली आणि ढोलावर वाजलेल्या ‘धम’चे वायब्रेशन्स कुठे स्ट्राईक करतात याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पुण्यातल्या आणखीही काही विद्यार्थ्यांनी आमच्या बरोबर राहून ढोल-ताशाच्या आवाजाचा म्युझिक थेरपीसाठी कसा उपयोग आहे यावर अभ्यास केला. ढोल-ताशाचा आवाज वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या अवयवांना जागृत करतो. त्याचबरोबर या वादनामध्ये आपण जेवढी एनर्जी खर्च करतो तेवढाच तो आवाज आपल्याला आनंद आणि स्फूर्ती मिळवून देतो. यामुळे आपल्या नकळत आपल्याला मनःशांती आणि उत्साह अनुभवायला मिळतो. म्हणूनच आता आम्ही ढोल-ताशाचा मेडिटेशनमध्ये वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत," असं सुमीत सांगतो.

‘रिधम इव्होल्युशन’च्या विविध प्रयोगांच्या माध्यमातून ढोल-ताशाला केवळ नवी ओळखच प्राप्त झालेली नाही. तर त्याच्या वापराच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. ‘टीम रिधम इव्होल्यूशन’चे हे प्रयत्न आणि आपल्या उद्देशाप्रतीचे समर्पण पहाता ढोल-ताशा वादकांसाठी लवकरच संगीत आणि आरोग्य क्षेत्रातही नवे दालन खुले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा:

डुडलच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आधुनिक रयतेची ऑनलाईन मोहिम

भारतीय तरुणांमधली सकारात्मता आणि जिज्ञासाच चांगला बदल घडवेल : ओमर बिन मुसा

बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags