संपादने
Marathi

क्षयरोगामुळे २२ किलो वजन आणि अंशतः बहिरेपणा आलेल्या नंदिताला नृत्याने दिली संजिवनी

Team YS Marathi
11th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

नंदिता वेंकटेसन या २६ वर्षीय तरुणीचं आयुष्य काही काळासाठी थिजून गेललं. नोव्हेंबर २०१३ मध्ये आपला २४ वा वाढदिवस साजरा केल्यावर तिच्या आयुष्याला एक विचित्र कलाटणी मिळाली. क्षयरोगावरील (Tuberculosis – TB) उपचारादरम्यान देण्यात आलेल्या, क्षयरोगप्रतिबंधक जीवनदायी औषधांच्या परिणांमामुळे तिला आता केवळ 30%च ऐकू येतं.

क्षयरोग जणू तिचा जुना मित्र असल्यासारखा तिला भेटला. ऑगस्ट २००७ मध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि महिन्याभरातच तिला आतड्यांचा क्षयरोग झाल्याचं निदान झालं. तिचे मित्र-मैत्रिणी सिनेमा पाहण्यात, कॉलेज कट्ट्यावर टाईमपास करण्यात दंग असताना, नंदिता मात्र क्षयरोगाशी लढा देत होती. या पहिल्या धक्क्यातून ती बरी झाली पण, २०१३ मध्ये तिला परत एकदा क्षयरोगाने गाठलं.

image


आजारपणाशी सामना करताना आणि ऐकण्याची क्षमता बऱ्यापैकी गमावल्यावर आपल्यातले खूपजण निराशेच्या गर्तेत जाऊ, पण नंदिताने सगळ्या वेदना सोसल्या, उदास झाली तरी तेवढ्यापुरतं. धैर्याने या सगळ्याचा सामना केला. या सगळ्यातून बाहेर यायला ती तिचं पहिलं प्रेम नृत्याकडे वळली. संगीत किंवा ताल ऐकू येत नव्हते, पण तरीही ती जिद्दीने स्टेजवर येऊन नृत्य करू लागली.

नंदिताची कथा ही केवळ प्रेरणादायीच नाही, तर आपली इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही याचं मूर्तीमंत उदाहरण आहे.

मुंबईकर

नंदिताचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झालं. तिनं रामनारायण रुईया कॉलेजमधून २०१० मध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून २०११ साली तिनं पदव्युत्तर अभ्यासक्रम केला. लगेचच तिनं दिल्लीमधून ‘द इकनॉमिक टाईम्स’मध्ये कामाला सुरूवात केली. आर्थिक पत्रकारीतेत स्पेशलायझेशन करण्याकरता तिनं पुढं शिकण्याचं ठरवलं. नोव्हेंबर २०१२ मध्ये तिनं दिल्लीत नोकरीचा राजीनामा दिला. मुंबईत शिक्षणासोबतच कामही करता येईल, या विचारानं ती मुंबईत परतली.

‘पद्य’ न्यास

करिअर प्लान व्यवस्थित मार्गी लागल्यावर नंदितानं आपला मोर्चा नृत्याकडे वळवला. वयाच्या सातव्या वर्षी तिनं नाटनप्रिया डान्स इंस्टिट्यूटमध्ये भरतनाट्यम शिकायला सुरूवात केली. नंदिता सांगते, “मला नृत्यात असलेली हालचाल, हावभाव, सौंदर्य, डौल या गोष्टी भावतात. नृत्य म्हणजे ‘पद्य’ न्यास. माझ्याकरता छंदापेक्षा नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे, व्यक्त होण्याचं माध्यम आहे”.

पण तिला नृत्यातनं मिळणारा आनंद फार काळ टिकला नाही.

क्षयरोगाची दस्तक

सहा वर्षापूर्वीचा जंतूसंसर्ग २०१३ मध्ये पुन्हा एकदा नंदिताला शोधत आला. परत आतड्याच्या क्षयरोगाचं निदान झाल्यावर यावेळी तिला अतिशय तीव्र औषधोपचारांना सामोर जावं लागलं.

पहिल्यांदा क्षयरोग झाला तेव्हा तिला १४ महिने उपचार घ्यावे लागले होते.

हॉस्पीटलमध्ये नंदिता

हॉस्पीटलमध्ये नंदिता


नंदिता आपल्या आजाराबाबत सविस्तर सांगते, “ज्यांनी क्षयरोगाशी लढा दिलाय, त्यांनाच हा रोग किती जर्जर आहे आणि त्यातून बाहेर पडतानाची पीडा समजू शकते. उपचारांदरम्यान दिवसाला १० ते १५ गोळ्या रोज घ्याव्या लागतात. ज्याचे साईड इफेक्टस् पण खूप आहेत. भयंकर मळमळ, उलट्या, नैराश्य हे सतत सुरू असतं. सर्वात भीषण काय असेल तर टीबीचं उलटणं आहे”.

दुसऱ्यांदा औषधांनी प्रतिसाद द्यायला नकार दिला. सतत खुपणारी पोटदुखी, पचनशक्तीचा ऱ्हास आणि वजनातली जलद घट. तिच्यामध्ये काहीही सुधारणा दिसून येत नव्हती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आतड्याचा जंतुसंसर्ग झालेला भाग काढण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन आयुष्य आणि अभ्यासात काहीही फरक पडणार नसल्याचं आश्वासन डॉक्टरांनी नंदिताला दिलं.

नंदिता आठवून सांगते, “आई-बाबा आणि माझ्या भावासोबत मी पहिल्यांदा हॉस्पीटलमध्ये गेले. मी स्वतःची समजूत काढत होते, हे काही फारसं गंभीर नाही आणि मी लवकर यातून बाहेर पडेन. हॉस्पीटलमधलं वास्तव्य हा एक आपल्यासाठी वेगळा अनुभव असेल असा विचार करतच मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले”.

सर्जरी व्यवस्थित झाल्याचं सांगण्यात आलं आणि दहा दिवसांनी नंदिताला घरी पाठवण्यात आलं. पण थोड्याच दिवसात तिची तब्येत बिघडली.

मळभ

एका आठवड्यानंतर तिची तब्येत जास्तच ढासळू लागली. तिला मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. तिची तब्येत खूप गंभीर असल्याचं डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं.

नंदिता सांगते, “पचनसंस्थेत जंतुसंसर्ग पसरला असल्यामुळे आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असं डॉक्टरांनी सांगितलं. आता कुठल्याही परिस्थितीत माझं आयुष्य वाचवणं हाच उद्देश होता. दिवसागणिक दिवस जात होते. एका शस्त्रक्रियेची मानसिक तयारी झालेली पण चार शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. माझं हिंडण फिरणं थांबून मी अंथरुणाला खिळून राहिली. केसही गळायला लागले. मला आठवतं, मी हॉस्पीटलमध्ये थोडसं चालत होते आणि एका आरशात स्वतःला पाहिलं. केसांचे काहीच पुंजके शिल्लक राहिले होते. खूप कृश, भयंकर दिसत होते. माझं मलाचं ओळखता येत नव्हतं. मी वाचेन का? याची मलाही खात्री नव्हती. पण मी मनाशी नक्की ठरवलं, आपण खचून जायचं नाही”.

मन खंबीर करून तिने हातात असलेला वेळेचा सदुपयोग करायचं ठरवलं. तिने वाचन सुरू केलं. तिच्या आरोग्याविषयी माहिती करून घ्यायला लागली. तिच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. कारण आता तिला तिच्या तब्येतीविषयी योग्य त्या शंका डॉक्टरांना नीटपणे विचारता येत होत्या.

image


नंदिताला संगीतामुळेही खूप ताकद आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. दोन महिन्यांनंतर तिला हॉस्पीटलमधून रजा मिळाली. पण परत आठ महिन्यांनंतर आणखीन शस्त्रक्रियांकरता यायचं होतचं.

तिला आठवतं, “२२ किलोपेक्षा जास्त वजन घटल्यामुळे मी निस्तेज आणि अशक्त दिसत होते. जालीम औषधापचारांनी मला काबीज केलं होतं. पण घरी यायला मिळालं हेच काय ते समाधान होतं”.

शांततेचा धक्का

घरी आल्यावर साधारण महिन्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात नंदिता एक डुलकी काढून उठली आणि तिला टाचणी पडली तरी आवाज येईल, अशी शांतता जाणवली. तिची ऐकण्याची क्षमता फक्त 30% च असल्याचं निष्पन्न झालं.

त्या दिवसांच्या आठवणी सांगताना नंदिता भावूक होते. ती सांगते, “मी बघत होते माझी आई माझ्याशी काहीतरी बोलतेय, पण मला काहीच कळत नव्हतं. खूप गोंधळ उडत होता. पाठोपाठच्या चार शस्त्रक्रियानंतर खूप वेदना होत होत्या. त्यामुळे पहिले काही दिवस नीट ऐकू येत नसल्याचं लक्षातच आलं नाही. माझ्या इतर शारिरिक वेदना इतक्या प्रचंड होत्या की, आपल्याला ऐकू येत नाहीये हे कळतचं नव्हतं. काही दिवसांनंतर मला यातलं गांभीर्य लक्षात आलं. मी गोंधळले, निराश झाले, माझी चीडचीड होऊ लागली. माझ्या कुटुंबियांशी संवाद साधायला मला खूप जड जाऊ लागलं, त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं. माझा बाह्य जगताशी, ज्यामुळे मला आधार मिळाला त्या संगिताशी, टीव्ही, सिनेमा या सगळ्याशी माझी ताटातूट झाली. मला खोल दरीत पडल्यासारखं झालं होतं. माझ्याभोवतीचे कोश पडले असं वाटलं. मी नेहमी सामाजिक जीवनात खूप उत्साहाने वावरायचे. या सगळ्याला आता मुकणार होते. हे सर्व पचवायला मला खूप जड गेलं”.

अंशतः बहिरेपणाचं निदान झाल्यावर नंदिताने आपल्या स्थितीबद्दल कुढत बसायचं नाही असं ठरवलं. परिस्थितीशी सामना करणं कठीण होतं, पण ती आता दोन हात करायला तयार होती.

ती विश्वासाने म्हणते, “वेळ सगळ्याचं गोष्टींवर मलमपट्टी करेल असं नाही. पण परिस्थितीचा स्वीकार केल्यावर वेदना कमी होते हे नक्की”.

चैतन्याचा प्रतिशोध

या क्षणी नृत्य नंदिताच्या जगण्याची प्रेरणा बनलं होतं. ऑक्टोबर महिन्यात नाटनप्रियाने आयोजित केलेल्या नृत्य कार्यक्रमात भाग घेण्याची इच्छा तिनं दर्शवली. ती सांगते, “मला या सर्वातून बाहेर यायचं होतं आणि याकरता नृत्यापेक्षा आणखी कोणतही चांगलं माध्यम मला दिसत नव्हतं”.

image


पण हे सगळं काही सोपं नव्हतं. कोणताही आवाज ऐकू येत नसल्यामुळं, नंदिताला सोबतच्या नृत्यांगनांकडे पाहून तालाचा अंदाज लावत स्टेप्स कराव्या लागत होत्या. त्यापेक्षा अधिक म्हणजे सहा शस्त्रक्रिया, वर्षापेक्षा अधिक काळ अंथरुणाला खिळून आणि अशक्तपणा या गोष्टींचं मोठं आव्हान तिच्यासमोर होतं.

ती सांगते, “स्टेजवर नृत्य सादर करून खूप काळ लोटला होता आणि कोणाच्या मदतीशिवाय मी धड उभीही राहू शकत नव्हती, या विचारांनी मला भीती वाटायची. पण मी हा कार्यक्रम करायचं ठरवलं. परिस्थिती बदलू लागली”.

तिनं तिचं वेळापत्रक बनवलं. नियमित सरावाव्यतिरिक्त ती थांबून आणखी काही वेळ सराव करायची. ती म्हणते, “मी ऐकू न येणाऱ्या दुसऱ्या नर्तिकांचे अनुभव वाचू लागले. उदाहरणार्थ, लंडनमधल्या एका ऐकू न येणाऱ्या बॅले डान्सरचा अनुभव. यामुळे माझा आत्मविश्वास वाढू लागला आणि माझ्या मनाची तयारी करायलाही याचा छान उपयोग झाला”.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी तिला संगीत काही कळत नव्हतं पण हिअरींग एडच्या साहय्याने तिला ताल कळत होते.

नंदिता सांगते, “माझ्या बहिरेपणावर मात करण्याच्या मार्गात ‘नृत्य’ हे मी टाकलेलं पहिलं पाऊल होतं”.

इंद्रधनुष्याची उधळण

नंदिता तिचा पहिला कार्यक्रम सादर करायला स्टेजवर गेली.

“मी स्टेजच्या दिशेने पाऊल टाकलं आणि भावनांचा उद्रेक माझ्यात होऊ लागला. संगीत नसेल तर चालू शकेल. मला माहीत होत की, मला नृत्य करायचं आहे आणि मी पुढे गेले. बेधुंद असा नृत्याविष्कार मी सादर केला. नृत्याने मला माझ्या आयुष्याच्या नविन क्षितिजाची वाट दाखवली. माझ्यातला आत्मविश्वास, डौलदारपणा पुन्हा प्राप्त करून दिला”.

पण, बहिरेपणामुळे नंदिताला तिच्या दैनंदिन आयुष्यात खूप झगडावं लागतं.

आजच्या काळात आपल्या संवाद आणि संपर्कांमध्ये दृक-श्राव्य माध्यमांचा मोठा भाग आहे, पण नंदिता जगात काय चालू आहे याबाबत बऱ्याचदा अनभिज्ञ राहते. बाहेरच्या जगाशी आई-बाबा आणि सोशल मिडीयाद्वारे ती संपर्कात राहते.

उज्ज्वल भविष्याकरता

व्यवस्थित तंदुरस्त होण्याकरता, साधारण वर्षभर तरी काहीही करताना काळजीपूर्वक, सावकाश करण्याचा सल्ला नंदिताला देण्यात आला आहे. पण पुढच्या वर्षीपासून तिनं पूर्णवेळ काम करण्याचं ठरवलं आहे. सध्या ती भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक घडामोडींवर ती फ्रिलान्सर म्हणून लेख लिहिण्याचं काम करते.

उज्ज्वल उद्याचा आशेचा किरणचं तिला रोजच्या अडचणींवर मात करून पुढे यायची प्रेरणा देतं.

ती सांगते, “मला वाटतं एखाद्यानं स्वप्न बघणं कधी थांबवू नये. तुमच्या सद्यस्थितीनुसार तुमच्या स्वप्नांना आकार द्या. पण तुम्हांला जे हवं ते करताना मध्येच सोडून नका देऊ. तुमचं स्वप्न भले छोटं असेल पण तुमच्याकरता ते धडाडी आणि प्रेरणा देणारं असतं. हॉस्पीटलमध्ये असताना, मी लवकर बरी होऊन, किमान खाऊपिऊ लागावं एवढीच माझी इच्छा होती. यावर्षी पूर्णपणे तंदरुस्त होऊन नृत्य आणि थोडंफार काम सुरू करण्याची माझी आकांक्षा होती”.

नंदिता तिने पार केलेल्या दिव्यातून चांगल्या गोष्टी टिपते. तुम्ही जेव्हा परत न येण्याच्या मार्गावर पोहोचता किंवा धोकादायक कड्यावर असता, तेव्हा तुम्ही मार्ग शोधायला पाहिजेत, अर्ध्यातच गळून जायचं नाही. या सगळ्या काळात तिला वाटतं की ती खूप शांत, धाडसी आणि अडीच वर्षापूर्वीपेक्षा अधिक समंजस झाली.

नंदिता यावर्षी नृत्याचा नविन आविष्कार शिकण्याच्या विचारात आहे. ती म्हणते, “मला वाटतं, मी माझा सर्वात वाईट काळ पाहिलाय. माझ्यासमोर काहीही उभं ठाकलं तरी मी त्याचा सामना करू शकते, ही ताकद या काळात मी मिळवली. आज, प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे. हा प्रत्येक क्षण मला जगायचा आहे. मी प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकत राहते. या संधींचा पुरेपुर वापर करत त्यांना मी माझ्या क्षमता बनवते”.

लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags