एचआयव्ही बाधित मुलांचे भविष्य साकारण्याचा एका दांपत्याचा साहसी प्रयत्न

0 CLAPS
0

हिंदी सिनेमातील एक गाणे ‘नन्हे मुन्हे बच्छे तेरी मुठ्ठी मी क्या है .....मुठ्ठी में है तकदीर हमारी’ याच प्रकारची काहीशी विचारधारा त्या सतरा एचआयव्ही बाधित मुलांची आहे, ज्यांची जबाबदारी उचलली आहे पुण्यात राहणाऱ्या सुजाता आणि महेश यांनी. ही दोघे या मुलांबरोबरच पुण्याच्या जवळपास गावातील राहणाऱ्या अंदाजे शंभरएक एचआयव्ही बाधित मुलांची देखरेख करीत आहेत. कधीकाळी बँकेत व्यवस्थापक असणाऱ्या महेश यांनी या मुलांसाठी आपल्या नोकरीवर पाणी सोडले. एवढेच नाहीतर त्यांची पत्नी सुजाता हिच्याशी पण लग्नाला त्यांच्या पालकांचा कडाडून विरोध होता, कारण सुजाताच्या आई-वडिलांचा मृत्यूसुद्धा हा एड्स ने झाला होता.


महेश आणि सुजाता महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका गावात राहणारे आहेत. सुजाताच्या पालकांना एड्स सारखा गंभीर आजार होता पण जेव्हा त्यांना या आजाराची कल्पना आली तोपर्यंत बराच उशीर झाला होता. यानंतर सुजाताचे आई-वडील सहा महिन्यातच वारले. पण सुजाताला त्याची लागण झाली नव्हती तरीपण गावकऱ्यांनी तिच्याशी संबंध तोडले. याचदरम्यान महेश एका बँकेत व्यवस्थापक होते. जेव्हा त्यांना सुजाताच्या या कठीण परिस्थितीची कल्पना आली तेव्हा तिला मदतीचा हात पुढे करुन लग्नाचा निर्णय घेतला. याचा महेशच्या घरच्यांनी खूप विरोध केला. महेश यांचे कुटुंब संपन्न होते तर सुजाता ही गरीब घरातली होती म्हणून कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सुजाताशी लग्न करून गाव सोडले. त्यांना वाटले भलेही कुटुंबाने त्यांना स्वीकारले नसले तरी नातेवाईक आणि मित्र त्यांच्या भावना समजून घेतील पण महेश यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना समजले की त्यांचा समाज चुकीचा आहे. एकवेळ त्यांना ही वाटले की त्यांनी काही चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला?


तेव्हा महेशच्या मनात विचार आला की एखाद्या सामान्य मुलांच्या बाबतीत असा व्यवहार झाला तर, जी मुले एचआयव्ही बाधित आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल या विचारांनी महेश आणि सुजाता पुण्यात आले जिथे त्यांनी नोकरी सोडून एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी काम करून जनजागृतीचा निर्णय घेतला. याप्रकारे ते पुण्याला एका स्वयंसेवी संस्थेत आले जी संस्था एड्सच्या क्षेत्रात काम करीत आहे. या संस्थेच्या तर्फे ते गावोगावी जाऊन एचआयव्हीसंबंधी जनजागृतीचे काम करू लागले. याच दरम्यान त्यांनी एका आदिवासी गावात बघितले की गावकऱ्यांनी एका मुलाला गावाच्या बाहेर ठेवले आहे कारण त्याचे पूर्ण शरीर सडले होते आणि गावातील कुणीही त्याला दवाखान्यात घेऊन जायला तयार नव्हते. तेव्हा महेश आणि त्यांची पत्नी सुजाता यांनी त्या मुलाला पुण्याला आणून त्याचे उपचार केले.

यानंतर महेश आणि सुजाता यांनी निर्णय घेतला की गावोगावी जाऊन अशा मुलांना शोधून आणतील जे निराधार आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन आदिवासी मुलांना आपल्या बरोबर घेतले ही १७ मुले एचआयव्ही पीडित असून निराधार आहेत. आज ते यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळत आहेत. महेश सांगतात की, ‘मी माझ्या मुलांना सांगतो की आपल्याला मागून नाहीतर लढून मारायचे आहे’. हेच कारण आहे की महेश यांनी कुणाच्याही मदतीशिवाय मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपल्या मुलांच्या मदतीने परफ्युम, फिनाईल, फ्लॉवरपॉट, ग्रिटिंगकार्ड, दिवे आणि मेणबत्त्या बनविण्याचे काम करतात व या सगळ्या वस्तू ते आयटी कंपनीला विकतात. या मुलांना खाण्यापेक्षा कौटुंबिक जिव्हाळा आपलासा वाटतो कारण त्यांना कुटुंब कसे असते हेच माहित नाही’.

आज महेश आणि सुजाता यांच्याबरोबर जी १७ मुले आहेत ते एका सरकारी शाळेत जातात. यात ७ मुली व १० मुले आहेत. ही सगळी मुले ६ ते १६ वर्ष वयाची आहेत, आणि विशेष म्हणजे ही सगळी मुले अभ्यासात हुशार आहेत. यातील दोन मुली १० वीच्या वर्गात आहेत. महेश सांगतात की, या मुलांचा उपचार जवळच्या एका सरकारी दवाखान्यात सुरु आहे. मागच्या ६ वर्षापासून एचआयव्हीपीडित मुलांशी जिव्हाळ्याचे नाते असलेले महेश आणि सुजाता सांगतात की प्रारंभी त्यांनी पुण्यात आल्यावर एक घर भाड्याने घेतले. त्यानंतर जवळपास रहाणाऱ्या लोकांनी त्यांना बरेच छळले. परंतु कालांतराने त्यांच्या स्वभावात फरक दिसू लागला आणि आज तेच लोक त्यांच्या संगतीत राहून त्यांना मदत करीत आहेत.

महेश आणि सुजाता यांनी आपल्या बरोबर राहणाऱ्या १७ मुलांच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या अनेक मुलांच्या देखरेखीची जबाबदारी घेतली आहे. ही मुले आपापल्या कुटुंबात राहून देखील त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. हे दांपत्य त्यांचे शिक्षण आणि आरोग्याशिवाय त्यांच्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष पुरवितात. महेश आणि सुजाता यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली असून त्यांना एक ७ वर्षाचा मुलगा आहे जो एचआयव्ही पीडित दुसऱ्या मुलांबरोबर शाळेत जातो, त्यांच्याबरोबर खातो-पितो आणि खेळतो. महेश यांचा प्रयत्न आहे की, या मुलांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे जिथे ते कोणत्याही बंधनाशिवाय आपले आयुष्य सुंदर आणि मनाप्रमाणे जगू शकतील.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

Latest

Updates from around the world