संपादने
Marathi

'हम होंगे कामयाब एक दिन!' - गतीमंद मुलांच्या भविष्याला आकार देणारी ‘तमाहर’

ही कथा आहे मायेची, ही कथा आहे एका आईची. अशी आई, जिला मुलांची भाषा समजते. मायेचा पाझर फुटलेल्या या आईचं नाव आहे वैशाली पै. गतीमंद मुलांचा विकास होऊ शकतो, ती स्वत:च्या पायावर उभी राहून आपलं स्वातंत्र्य जपू शकतात. समाजात ती तुमच्या आमच्यासारखी वागू शकतात, समाजासाठी काही तरी योगदान देऊ शकतात. मात्र यासाठी आवश्यक आहे ते या गतीमंद मुलांची भाषा समजणं. या मुलांना प्रेमाची भाषा समजते. हीच भाषा ज्यांना समजली त्या वैशाली पैंची आणि त्यांनी उभी केलेल्या ‘तमाहर’ या संस्थेची ही कथा.

29th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“लोकांचं सक्षमीकरण करून त्यांना शक्य तितकं स्वतंत्र बनवण्याऐवजी लोकांची काळजी घेण्यापोटी भरपूर पैसा खर्च केला जात आहे.” माणसाला सर्वप्रकारच्या पारतंत्र्यातून मुक्त होऊऩ स्वत:च्या पायावर उभं राहता आलं पाहिजे असा विचार मांडणा-या तमाहर संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका वैशाली पै यांचे हे बोल आहेत.

मुलांच्या भविष्याला आकार देताना, वैशाली पै

मुलांच्या भविष्याला आकार देताना, वैशाली पै


पै ज्यांचा ‘लोक’ असा उल्लेख करतात ती गतीमंद मुलं आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंगळुरू आणि पाली इथं शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करता यावी म्हणून दोन केंद्र सुरू केली आहेत. “ विचार कसा करावा, कोणतीही गोष्ट आत्मसात कशी करावी, त्यावर प्रतिक्रिया कशी द्यावी, गोष्टी लक्षात कशा ठेवाव्यात या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवाव्या लागतात असं आम्हाला वाटतं. ज्यांना विशेष मदतीची गरज आहे अशा गतीमंद मुलांच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे. ती समजू शकतील अशा पद्धतीनं त्यांना प्रश्न विचारणं आणि त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांना पुरेशी वेळ देणं याच्याशी या सगळ्या गोष्टी संबधित आहेत.”

२५ वर्षांपूर्वी जेव्हा वैशाली मुंबईहून बंगळुरूमध्ये आल्या तेव्हा त्याच्याकडं केवळ ऑक्युपेशनल थेरपी या विषयात मास्टर्सची पदवी होती. “ कर्नाटकातल्या इंदिरानगर इथं मी द स्पॅस्टिक सोसायटीमध्ये काम करणं सुरू केलं. मी कार्यालयापासून १९ किलोमीटरच्या अंतरावर राहत होते, मला ऑफिसला येण्यासाठी तीन तीन बसेस बदलाव्या लागत होत्या. या प्रवासादरम्यान मला अनेक कुटुंबांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यासोबत जी मुलं असायची ती नीट चालू आणि हालचाल करू शकत नव्हती अशी गतीमंद मुलं असायची. अशा मुलांसोबत त्या इतका मोठा प्रवास करत होत्या. त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे मोठी कठीण गोष्ट होती.” बोलत असताना वैशालींना हे सगळं आठवत होतं.

'हम होंगे कामयाब एक दिन!'

'हम होंगे कामयाब एक दिन!'


मुलांची ही स्थिती पाहिल्यानंतर वायव्य बंगळुरूमध्ये निमशहरी आणि ग्रामीण भागासाठी तमाहर नावाचा एक उपक्रम त्यांनी सुरू केला. आणि डोक्यात स्पष्ट अजेंडा ठेवूनच त्यांनी हे काम केलं. “ मला वाटतं की शहरात दर सात किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात एक केंद्र असावं तर ग्रामीण भागात ते दर १५ - २० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात असावं.”

दृष्टीकोण

त्या म्हणतात, “जेव्हा आम्ही मुलांबरोबर काम करतो, त्यावेळी त्यांना कधी हालचाली शिकवणं तर कधी शब्द शिकवणं असं भागाभागात न शिकवता आम्ही त्यांच्या संपूर्ण मेंदूलाच आवाहन करतो,” वेगवेगळ्या थेरपींच्या नेहमीच्या प्रयोगांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम हाच तमाहरच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे. 

त्या पुढं म्हणतात, “ इनडोअर आणि आऊटडोअर खेळ शिकवणं हा अभ्यासक्रमाचाच भाग आहे, या मागची कल्पना अशी आहे की ही आमची गतीमंद मुलं इतरांचे खेळ, वागण्याच्या पद्धती आणि हालचालींचं निरीक्षण करायला शिकतील. अशा वेळी जरी त्यांना खेळात स्वत: सहभागी होता आलं नाही ( काही मुलांच्याबाबतीत), तरी इतरांचे खेळ बघून ते आनंद मिळवू शकतात.”

अभ्यासक्रम

गतीमंद मुलांना त्यांचे कुटुंब आणि समाजासोबत त्यांचे संबंध आणि व्यवहार कशा प्रकारे असावेत याबाबीशी संबंधित असणा-या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन या मुलांच्या आई, भावंडं आणि इतर नातेवाईंकासाठी या संस्थेनं विशेष कार्यक्रम तयार केला आहे. 

खेळातून जलदगतीनं  शिकता येतं

खेळातून जलदगतीनं शिकता येतं


वैशाली म्हणतात, “ गरज भासल्यास मुलांसोबत कोणत्या वेळी कसं वागलं पाहिजे या संदर्भात आम्ही सर्व कुटुंबाला उपयुक्त माहिती आणि सूचना देतो.” त्यांचा असा ठाम समज आहे की अपंग मुलांना ते सर्वसामान्य मुलांसारखेच आहेत असं समजण्यापेक्षा गतीमंद मुलांना अपंग समजणं समजाच्या दृष्टीनं सोपं आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मुलांच्या जीवनाचा जे लोक एक भाग झालेले असतात त्या लोकांवर लक्ष केंद्रीत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

वैशाली आम्हाला सांगतात, “ ब-याच पालकांना वाटतं की आपलं मुल इतर सर्वसामान्य मुलांसारखं ठिकठाक व्हावं, पण हा काही पर्याय नाही.” असं असलं तरी, त्या पुढं म्हणतात, “ आपल्या मुलाला नेमकं काय हवं हे जेव्हा पालकांना समजेल, तेव्हा खरचं पालक हे सर्वोत्कृष्ट थेरपीस्ट होऊ शकतात.”


टीम

एकीचं बळ मोठं

एकीचं बळ मोठं


कोणत्याही टीम मेंबरला जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल, तर त्या गोष्टी आहेत मुलांवर आणि शिकवण्यावर प्रेम करणं.

वैशाली म्हणतात,“ शैक्षणिक अर्हता ही बोनसप्रमाणे आहे, ती काही अत्यावश्यक गोष्ट नाही! कामाची क्षमता आणि दर्जा या गोष्टी ज्ञानापेक्षा जास्त गरजेच्या आहेत.” योग थेरपी, क्लिनिकल सायकॉलॉजी, म्युझिक थेरपी, सायकोथेरपी किंवा सेंद्रीय शेती अशा विशिष्ट कार्यक्षेत्रासाठी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते.

'शो मस्ट गो ऑन'

वैशाली म्हणतात, “ आपण कोणत्याही प्रकारची मोफत सेवा दिली तर लोक त्या गोष्टीला फारसं महत्त्व देत नाहीत. हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रत्येक कुटुंबाला फी आकारतो, आणि आमच्या सेवेवर आमचा विश्वास आहे.” कुंटुंबाचं उत्पन्न किती आहे आणि त्यांना किती प्रवास करावा लागतो यानुसार आम्ही किती पैसे आकारायचे ते ठरवतो. ही सगळी केंद्रं देणग्यांवर चालतात. तर शाळेत दररोजच्या वापरातल्या वस्तू वैशालींचं कुटुंब पुरवत असतं. त्या म्हणतात की हे आव्हानात्मक आहे खरं, पण अशक्य काहीही नाही.

प्रेमाची भाषा शिकवणारी 'तमाहर'

प्रेमाची भाषा शिकवणारी 'तमाहर'


ही केंद्रे जरी अद्याप आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभी राहिलेली नसली तरी, प्रशासकीयदृष्ट्या मात्र ती पूर्णपणे स्वतंत्र आहेत. तमाहर ही संस्था आपला प्रमुख उपलब्ध नसला तरी दररोजचा कार्यक्रम सुरू राहील, अडणार नाही एवढी सक्षम बनली आहे. याकडं लक्ष वेधत वैशाली म्हणतात,“ दररोजच्या कामकाजाबरोब काही मॅनेजमेंट स्तरावरचं काम आता आम्ही सोडून दिलेलं आहे. ” 

त्या पुढं म्हणतात, “ आमचं काम नुकतच सुरू झालेलं आहे. निमशहरी भाग, किंवा झोपडपट्टी अथवा सर्व शहरातल्या तळागाळात राहणा-या कुटुंबांना मदत करावी हाच आमचा उद्देश आहे. या मुलांना स्वत:चा विकास करून समाजासाठी इतरांप्रमाणं एक उपयुक्त नागरिक बनण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नाहीतर समाजाची मोठ्या प्रमाणात असलेली कच्ची, अविकसित अशी मानवी प्रतिभा व्यर्थ जाईल.”

विविध घटकांची संघटनात्मक रचना

वैशाली आणि त्यांची टीम जे काही करत आहेत त्यात अपवादात्मक असं काहीही नाही. “ प्रत्येक मुल हे समान आहे आणि प्रत्येक मुलाला समान वागणूक दिली गेली पाहिजे असं म्हणणं अशक्य आहे. तथापि, मुलं ही नेहमी मुलच असणार, मग ती न्यूरोटिपिकल असोत किंवा मग गतीमंद असोत. ”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा