संपादने
Marathi

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

Ranjita Parab
23rd Mar 2016
4+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठे-महांकाळ हा तालुका आज जगाच्या नकाशावर उठून दिसत आहे, ते पयोद उद्योगसमूह आणि त्याचे संस्थापक देवानंद लोंढे यांच्यामुळेच. देवानंद यांचा जन्म कवठे-महांकाळ तालुक्यात असलेल्या हिंगणगावातील एका दलित कुटुंबात झाला. कवठे-महांकाळ हा तालुका कायमच अवकर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील स्थानिकांना फक्त पावसाळ्यातील चार महिनेच शेतीची कामे करायची असतात. त्यानंतर या परिसरातील स्थानिकांसमोर रोजगाराचा यक्षप्रश्न उभा राहतो. बालपणापासूनच देवानंद यांनी ही परिस्थिती जवळून अनुभवली असल्याने त्यांना या परिस्थितीची पुरेपुर जाणीव होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही देवानंद यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी सांगलीतील एका सूतगिरणीत त्यांना सुपरवायजर म्हणून नोकरी करावी लागली, जी खरे पाहता त्यांच्या शिक्षणास अनुकूल अशी नव्हती. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना 'एवढे शिक्षण घेऊनही तू गाढवं राखायचे काम करतो आहेस', असे चिडवले. याचा खोलवर परिणाम देवानंद यांच्या मनावर झाला आणि अखेरीस १९९२ साली त्यांनी नोकरीच्या शोधार्थ गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरचा काळदेखील देवानंद यांची परीक्षा पाहणारा होता. मुंबई आणि नाशिक येथे काही काळ त्यांनी नोकरी केली. मात्र त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात त्यांची स्नेहल नावाच्या मुलीशी ओळख झाली आणि त्यांचा आंतरधर्मीय मंगलपरिणय झाला. २००१ साली गुजरात येथे झालेल्या भूकंपानंतर देवानंद हे ऑक्सफॅम जीबी या आंतरराष्ट्रीय संस्थेअंतर्गत तेथील लोकांचे पुनर्वसन करण्याचे काम करत होते. तसेच त्यांनी राजस्थानमधील अवकर्षणग्रस्त परिसरात पाणी साठवण्यासाठी उपाययोजनादेखील राबवल्या. त्यानंतर त्यांनी युनिसेफ, ऑक्सफॅम, रिलीफ इंटरनॅशनल अशा मान्यवर संस्थांसाठी सल्लागार म्हणून त्यांनी ८० देशांकरिता काम पाहिले. देवानंद यांनी अफगाणिस्तानमध्येदेखील काही काळ भरपूर पगाराची नोकरी केली. मात्र गावची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

image


देवानंद सांगतात की, 'अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असताना मला सतत वाटायचे की, मी लोकांचे पुनर्वसन करण्याचे, त्यांना विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. इथे मी हे काम करत आहे कारण या कामाचे मला पैसे मिळत आहेत. मात्र माझ्या आजवरच्या जडण-घडणीत ज्या गावाचा मोठा हातभार आहे, तेथील लोकांनादेखील माझी गरज आहे. त्यांना विकासाचा मार्ग दाखवणे, हे माझे मुख्य कर्तव्य आहे.' पाणीपुरवठा, स्वच्छता या विषयावर जगभर काम करणारे देवानंद यांनी केवळ या एका विचारामुळेच लाखो रुपयांच्या नोकरीला रामराम ठोकला आणि पुन्हा हिंगणगाव गाठले. हिंगणगावातील माळरानावर ५० हजार स्क्वेयर फिट परिसरात 'लक्ष्मी जिनिंग एण्ड प्रोसेसिंग' नावाची सहकार संस्था सूतगिरणी चालवत होती. दरम्यानच्या काळात शासकिय अनुदानातून चालणारी ही गिरणी बंद झाली होती. कर्जात बुडालेली मिल बॅंकेने ताब्यात घेतली होती. संस्थेवरील कर्ज आणि व्याज असे मिळून एकूण वीस लाख रुपये अशी तिची किंमत झाली होती. परिणामी बॅंकेने ती मिल लिलावात काढली होती. देवानंद लोंढे यांनी ही गिरणी विकत घेतली. विशेष म्हणजे, एकेकाळी देवानंद यांचे भाऊ याच मिलमध्ये नोकरी करत होते. देवानंद यांनी भलेही ही मिल विकत घेतली होती, मात्र या ठिकाणी काय काम करायचे, हे मात्र त्यांनी निश्चित केले नव्हते. गिरणी बंद पडल्यामुळे निश्चितपणे तेथील स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. त्यामुळे देवानंद यांनी स्थानिकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे काम तेथे सुरू करण्याचे निश्चित केले. त्याही वेळेस त्यांच्या मनात मात्र एकच विचार सुरू होता, तो म्हणजे आपण गावात बसून डॉलर्सची कमाई कशी करू शकतो? पाश्चात्य आणि प्रगत देशांमध्ये हातमोज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, या एका माहितीच्या आधारे त्यांनी या व्यवसायात उडी घेतली.

image


याबाबतीत बोलताना देवानंद सांगतात की, 'मिल तर मी विकत घेतली होती, मात्र तेथे काय उत्पादन करायचे, हे मात्र निश्चित केले नव्हते. माझी एकच इच्छा होती की, हिंगणगावात निर्माण केलेल्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत स्थान मिळायला हवे. तसेच ते उत्पादन लोकांनी सहानुभूतीपोटी विकत घ्यायला नको, उत्पादनाचा दर्जा पाहूनच त्याची विक्री व्हायला हवी. त्यावेळेस आमच्या मनात हातमोजे (हॅण्डग्लोव्हज) तयार करण्याचा विचार आला. हॅण्डग्लोव्हजला मुख्य बाजारपेठ ही जपानमध्ये होती. तेथील लोक हे स्वच्छतेच्याबाबतीत खुपच काटेकोर आहेत. तेथील राजकारणीदेखील आपल्या सभांदरम्यान सफेद हातमोज्यांचा वापर करतात. आमचे हात स्वच्छ आहेत, कोणत्याही भ्रष्टाचाराने ते बरबटलेले नाहीत, हे दाखवण्याचा तो प्रतिकात्मक प्रयत्न असतो.' या व्यवसायाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी हातमोज्यासाठी प्रसिद्ध असलेले थेट चीन गाठले. तेथे ते अनेक कंपन्या फिरले. तेथे त्यांना बराच चांगला-वाईट अनुभव आला. चीनमध्येच एका कंपनीने त्यांना हातमोजे कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. त्या ठिकाणहून एक मशीन त्यांनी खरेदी केली आणि पुन्हा हिंगणगाव गाठले. हातमोजे बनवण्याच्या कामासाठी महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. मात्र देवानंद यांना महिला बचतगट तसेच स्थानिक महिलांकडून या कामासाठी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळेना. अखेरीस त्यांनी या कामाचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना १०० रुपये विद्यावेतन देण्याचे ठरविले. त्यांची ही युक्ती कामी आली आणि स्थानिक महिलांनी त्यांच्याकडे हातमोजे बनविण्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. कालांतराने देवानंद यांनी चीनमधुन अजून मशीन्स मागवल्या आणि हातमोजे बनवण्याचे काम सुरू केले. अशा प्रकारे ५ मे २००८ रोजी देवानंद यांनी हातमोजे बनविण्याच्या आपल्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. देवानंद यांनी आपल्या या व्यवसायाचे 'पयोद उद्योगसमूह' असे नामकरण केले. याबद्दल बोलताना देवानंद सांगतात की, 'पयोद हा एक संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ पाण्याने भरलेला काळा ढग. आमचा परिसर अवकर्षणग्रस्त आहे ज्याचा फटका स्थानिकांच्या रोजगाराला बसतो. मात्र पयोद उद्योगसमूहामुळे तेथील स्थानिकांच्या हाताला सदैव काम मिळेल.' पयोद उद्योगसमूहात सध्या ७५० ते ८०० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. स्थानिक महिलांना घर सांभाळून रोजगार मिळवता यावा, याकरिता देवानंद यांनी त्या महिलांना घरातूनच काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी प्रत्येक महिलेला एक मशीन दिले असून, त्यावर ती हातमोजे बनविण्याचे काम करते. पयोद उद्योगसमूहाच्या कारखान्यात प्रत्यक्षपणे सात ते आठ मजूर काम करतात. पयोद उद्योगसमूहाची पहिली ऑर्डर निर्यात करताना त्या कंटेनरची गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती, अशी आठवण ते सांगतात. भारतीय दलित उद्योग संघटनेच्या माध्यमातून मुंबईत भरलेल्या प्रदर्शनात देशभरातील अनेक नामांकित उद्योगसमूहांचे प्रतिनिधी आले होते. तेव्हा ‘टाटा’ उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पयोद इंडस्ट्रीज’च्या स्टॉलला भेट दिली होती. त्यानंतर टाटांच्या देशभरातील उद्योगसमुहात ‘पयोद’चे हातमोजे वापरले जात आहेत. त्याशिवाय ‘फोर्बस मार्शल’ आदी कंपन्यांनीदेखील पयोदचे उत्पादन वापरण्यास सुरुवात केली आहे. सध्या सप्ततारांकित, पंचतारांकित हॉटेलमध्ये पयोदचे हातमोजे वापरण्यास सुरुवात करण्यात आले असल्याचे देवानंद सांगतात. पयोद कंपनीची सध्याची उलाढाल आठ कोटींची असून, भविष्यकाळात ती २५ कोटींपर्यंत नेण्याचा देवानंद यांचा मानस आहे.

image


मराठी माणसाच्या उद्योजकतेच्या वृत्तीबाबत बोलताना ते सांगतात की, 'मराठी माणूस उद्योजक बनू शकत नाही, हा समज खोटा आहे. मराठी माणसाने उद्योजकतेच्या क्षेत्रात येण्याचे म्हटले की, पहिले तर त्याचे कुटुंब त्याच्याकडे साशंकतेच्या नजरेने पाहते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि त्यानंतर लग्न, असे जवळपास प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरातील समीकरण असते. ते बदलणे गरजेचे आहे. एखादा तरुण किंवा तरुणी जर चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा विचार करत असेल, तर त्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. तरच उद्योजकतेची प्रवृत्ती वाढीस लागेल.' दलित कुटुंबात जन्माला आल्यामुळे देवानंद यांनी दलितांची होणारी होरपळ फार जवळून पाहिली आहे. त्यांच्या मते, 'दलितांसोबत होणाऱ्या भेदभावावर एकच उपाय आहे, तो म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे.' आपल्या गावातील स्थानिकांना रोजगाराची संधी देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा देवानंद अथक प्रय़त्न करत आहेत. सध्या ते गावातील १०० होतकरु तरुणांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करत आहेत. भांडवल उभारणीपासून ते उत्पादनाच्या विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन ते तरुणांना करतात. पयोद उद्योगसमूहाने हातमोज्याच्या यशस्वी उत्पादनानंतर फूड प्रोसेसिंग युनिटदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. पयोद उद्योगसमूहाचा प्रतिस्पर्धी कोण?, या प्रश्नाला उत्तर देताना देवानंद सांगतात की, भारतात तरी सध्या कोणीच नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीन. कारण आम्ही आमची सर्व उत्पादने जपानला निर्य़ात करतो. त्याचा परिणाम निश्चितपणे चीनच्या बाजारपेठेवर झाला आहे. भविष्यकाळात पयोदचे हातमोजे युरोप आणि इतर देशांमध्येदेखील निर्यात करण्यात येणार असल्याचे देवानंद सांगतात.

image


पयोद उद्योगसमूह उभा करण्याच्या प्रवासात आलेल्या अडचणींबद्दल बोलताना देवानंद सांगतात की, 'मूळात या व्यवसायाला लागणारे भांडवल, ज्याकरिता मला कोणतीही बॅंक कर्ज देत नव्हती. कारण माझ्याकडे बॅंकेला दाखवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उत्पादन नव्हते तसेच हातमोजांचे उत्पादन करणारी कोणतीही कंपनी भारतात नव्हती, जिचे उदाहरण मी बॅंकेला देऊ शकत होतो. त्यामुळे अनेक बॅंकांनी मला कर्ज नाकारले होते. अखेरीस पैशाची जुळवाजुळव करुन आम्ही ती मिल विकत घेतली होती. चीनमध्येदेखील मला चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा अनुभव आला. चीनमधील अनेक कंपन्यांनी आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांची यंत्रणा बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी नकार दिला होता.' अशा अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करत अखेरीस पयोद उद्योगसमूह उभा राहिला. देवानंद सांगतात की, 'पयोद उद्योगसमूह स्थापन करणे आणि तो यशस्वी करणे, यात मला माझी पत्नी स्नेहल हिचा मोठा पाठिंबा मिळाला. पयोद उद्योगसमूहाच्या जडणघडणीपासून ते तो यशस्वी होण्यापर्यंतच्या सर्व प्रवासात ती माझ्या सोबत होती. याशिवाय मला माझ्या मित्रांचादेखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाठिंबा आणि सहकार्य़ मिळाले. माझ्या आई-वडिलांनी दिलेले संस्कारदेखील मला या प्रवासात मोलाची साथ देत होते. माझी आई कायम म्हणायची की, नवा दिवस आपल्यासाठी सकारात्मक उर्जा घेऊन येतो. त्यामुळे आपण आपले काम त्याच जिद्दीने आणि जोमाने करायचे. तसेच माझे वडिल मला कायम सांगायचे की, माणूस जन्माला येतानाही मुहूर्त पाहत नाही आणि मरतानादेखील. मग आपण काम करताना तरी कशाला मुहूर्त पाहायचा. काम करण्यासाठी कोणतीही वेळ ही चांगलीच असते. आई-वडिलांच्या या संस्कारांमुळे, पत्नीच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच पडत्या काळात मित्रांनी केलेल्या सहकार्य़ामुळे पयोद उद्योगसमूह यशस्वी झाला', असे देवानंद सांगतात. यापुढे बोलताना देवानंद सांगतात की, 'जेव्हा मी परदेशातून परत आलो तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की, स्थानिक लोकांना विकासाचा मार्ग दाखविणे. त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे. यासाठीच मी पयोदची स्थापना केली. पयोद उद्योगसमूह हा मला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करायचा होता कारण जर मी या व्यवसायात अपयशी झालो असतो, तर भविष्यकाळातील पिढीला माझे उदाहरण एक अपयशी व्यक्ती म्हणून देण्यात आले असते, जे मला नको होते. तसेच मी अपयशी झाल्यानंतर आमच्या गावातील कोणीही व्यक्ती व्यवसाय करायला धजावली नसती. त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायचे होते', असे देवानंद सांगतात.

देवानंद यांच्या या यशाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनीदेखील घेतली आहे. आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१२ साली त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाद्वारे सर्वोत्तम उद्योजक, २०११ साली महाराष्ट्र ऑफिसर फोरम अवॉर्ड, २०१२ साली सांगली आयकॉन, नाशिक – युवा पुरस्कार, कराड अर्बन बॅंकद्वारे इन्टरप्रॉनर ऑफ द इयर २०१३ तसेच यशस्वी उद्योजक म्हणून आयबीएन लोकमतच्या प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दलित कुटुंबात जन्मलेला एक सर्वसामान्य मुलगा ते स्थानिकांना रोजगार देत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःचा ठसा उमटवणारे उद्योजक असा प्रवास करणाऱ्या देवानंद लोंढे यांच्या 'पयोद उद्योगसमूहा'ची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे.

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

शाळाबाह्य मुलाने कसा उभारला ६० कोटींचा व्यवसाय

आयटी उद्योगातून आलेल्या कर्मचाऱ्यांची शेती उद्योगात यशस्वी इनिंग- अक्षयकल्प फार्म्स

दिनदर्शिकेच्या माध्यमातून साहित्य कला आणि संस्कृती यांना जोडणारे सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय’!

4+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags