संपादने
Marathi

एक विजय..ज्यानं हिंदुस्थान बदलला...

23rd Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share


भारताचा प्रमुख खेळ आणि या देशातील मनोरंजनाचं मोठं साधन म्हणून क्रिकेटचं वर्णन केलं जातं. हीच भावना प्रकर्षानं जाणवली जेव्हा आशुतोष गोवारीकर आणि आमीर खाननं लगान हा चित्रपट बनवला. हा असा चित्रपट होता ज्यात अन्यायकारक करांपासून गावाला मुक्त करण्यासाठी गावातील तरुणांनी ब्रिटीश संघाला हरवलं होतं. हा परकीय सरकारविरुद्धचा विजय तर होताच पण या विजयाचं आणखी एक वेगळं रुप म्हणजे खेळाची निर्मिती करणारेच पराभूत झाले होते. लगानने जागतिक पातळीवरील चित्रपट जगतात स्वत:चं स्थान निर्माण केलं हे आपल्याला माहित आहे, पण एका खेळानं इतिहासात नाव कोरलं आहे त्य़ाची आपल्याला माहिती नाही.

फोटो

image


१९११ मधील भारताची कल्पना करा. हिंदु-मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असं विभाजन झालं होतं. ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाविरुद्ध देशात संताप खदखदत होता. पण तेव्हाचे व्हॉईसराय लॉर्ड कर्झन हे मात्र कुशल प्रशासनासाठी हे विभाजन करण्यात आल्याचा दावा करत होते. पण त्यांचा हा दावा फेटाळत १९११ मध्ये बंगाल पुन्हा एकसंध झाला. पण यातूनच निर्माण झालेल्या धार्मिक द्वेषातून १९४७ मध्ये विभाजन झालं आणि यातूनच निर्माण झालेले परिणाम आजही आपण भोगत आहोत.


image


त्या काळी भारतात राहण्याचा अर्थ होता इंग्रजांची गुलामी. तुमचं स्वातंत्र्य आणि सन्मान हिसकावून घेतला जात असला तरी त्यांच्यापुढे नम्र रहावं लागत होतं. देशाचे तुकडे केले जात होते आणि पुन्हा जोडले जात होते, पण ते पाहण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करता येत नव्हतं. या अन्यायाविरुद्ध तुमच्या मनात राग होता पण तरीही काहीही करता येणं शक्य नव्हतं. ब्रिटीशांची एकाधिकारशाही होती आणि शिक्षण, सरकारचं दैनंदिन कामकाज यात ते या एकाधिकारशाहीचा क्रूरतेने वापर करत होते. पण खेळाचं मैदान एकतर्फी नसतं. खेळात मालक-नोकर असं काही नसतं.यामध्ये माणसाची ताकद आणि जोश याचा कस लागतो...याच कारणामुळे आपले चित्रपटातले नायक जिंकले होते.


image


याचसंदर्भात फूटबॉलच्या इतिहासाचे विश्लेषक विवेक मॅनेजेस लिहितात, “१९११ मध्ये (मोहन) बागानच्या अनवाणी खेळानंच बंगालींनी शेवटच्या पाच मिनिटांत दोन गोल करून ब्रिटीश सैन्याच्या यॉर्कशॉयर रेजिमेंटला पराभूत केलं होतं आणि इंडियन फूटबॉल असोसिएशनचा किताब जिंकला होता. ‘लगान’ चं हे क्षण साठ हजार प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. “ मोहन बागान ही फक्त फूटबॉल टीम नाही तर एक पददलित देश आहे ज्यानं आता मान उंचावण्यास सुरूवात केली आहे,” या शब्दात वर्तमानपत्रांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

क्रीडा इतिहासकार बोरिया मुजुमदार लिहितात, “ भारतीयांच्या मनात आत्मसन्मानासाठीच्या संघर्षात विजयी होण्याची भावना १९११ मध्ये काही काळाकरीता प्रत्यक्षात अवतरली होती. ” राष्ट्रीय फूटबॉल संघाच्या रुपात मोहन बागानला या विजयाने साम्राज्यवाद्यांच्या विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रतीक बनवलं. स्वातंत्र्य लढ्यात तर मोहन बागान हे नाव वंदेमातरम या घोषणेला समानार्थी म्हणून वापरलं जात होतं. युरोपीय संघांविरुद्ध त्यांचा सामना असेल तर त्याला राज्यकर्त्यांविरुद्धचा संघर्ष म्हणून पाहिलं जात होतं. मोहन बागान आणि कलकत्ता फुटबॉल संघांमधील सामन्याला याच दृष्टीकोनातून पाहिलं गेलं होतं.


image


या प्रसिद्ध सामन्याआधी मोहन बागानने ट्रेड्स कपसारख्या छोट्या मोठ्या सामन्यांमध्ये युरोपीय संघांना धूळ चारली होती. पण त्या स्पर्धांमध्ये कोणतीही प्रमुख ब्रिटीश टीम नव्हती. २९ जुलै १९११ या दिवशी मोहन बागानला ब्रिटीश सैन्याची उच्च शाखा असलेल्या यॉर्कशायर रेजीमेंटविरुद्ध लढत द्यायची होती. देशभरातील नागरिक कोलकातामध्ये हा सामना पाहण्यासाठी जमू लागले होते. तणाव प्रचंड वाढला होता, आजूबाजूच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे जादा बोटींची सोय करावी लागली होती. ट्रामही गर्दीनं फुलून गेल्या होत्या, रस्त्यांवरही गर्दी वाढू लागली होती. बंगालमध्ये पहिल्यांदाच तिकीटांची ब्लॅकमध्ये विक्री झाली, २ रुपयांचं तिकीट १५ रुपयांना विकलं गेलं. त्या काळात ही रक्कम खूपचे मोठी होती. स्टेडियमच्या एका बाजूला श्रीमंत बंगाली बाबू बसले होते, स्टेडियमचा एक भाग इंग्रजी प्रेक्षकांसाठी आरक्षित होता. तर इतर लोक झाडं आणि छतांवर जमून सामना पाहण्याचा प्रयत्न करत होते. वातावरण एकदम भावनाप्रधान झालं होतं.

एवढ्या प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती की समालोचकांना स्कोअरची घोषणाच करता आली नाही. शेवटी त्यांनी आकाशात पतंग सोडून स्कोअरची घोषणा केली. दोन्ही संघांच्या समर्थकांनी उत्साहात आपापल्या संघांना प्रोत्साहन दिलं. इंग्रज महिलांनी तर मोहन बागानच्या खेळाडूंचे पुतळे जाळले. हा अतिशय तणावूर्ण सामना होता ज्यात दोन्ही संघ बराचवेळ समान खेळ खेळत होते. एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार एका संघाच्या समर्थकाने दुसऱ्या संघाच्या समर्थकाला ताजा स्कोअर विचारला तेव्हा त्याने विचारणाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली होती.

विजयाची आशा संपुष्टात आली असताना सामन्याच्या २७ व्या मिनिटाला अभिलाष घोष याला कर्णधाराकडून एक पास मिळाला आणि एक जोरदार शॉट मारुन त्यानं त्याचं गोलमध्ये रुपांतर केलं. काही सेकंदातच संपूर्ण कोलकाता शहर फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे गर्जून उठलं, मैदानात काठ्या, शर्ट आणि बुटांची तर बरसातच झाली. इंग्रज तातडीनं बाहेर निघून गेले. ‘वंदे मातरम’ आणि ‘मोहन बागान की जय’ या घोषणा सगळीकडे ऐकू येत होत्या. मुसलमान या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, “ मुस्लिम स्पोर्टिंग क्लबचे सदस्य तर आपल्या हिंदू बांधवांच्या विजयामुळे बेधुंद होऊन नाचत होते.”

या ऐतिहासिक विजयानं स्वातंत्र्याच्या लढ्याला एक अभूतपूर्व असा जोश, उत्साह मिळाला. त्यावेळच्या इंग्लीशमॅन (आताच्या स्टेट्समॅन) या वृत्तपत्रानं या विजयानंतरच्या प्रभावाचं संक्षिप्त वर्णन छापलं होतं, “ ब्रिटीश सर्वंच क्षेत्रांमध्ये अजिंक्य आहेत, या गैरसमजाला मोहन बागाननं चांगलीच चपराक दिली आहे. काँग्रेस आणि स्वदेशीवाले जे कधीही करू शकले नाहीत ते मोहन बागाननं केलं.” युरोपीय लोकांमध्ये अत्यंत निराशेचं वातावरण होतं आणि त्याचवेळेस आपल्याकडे मात्र राष्ट्रप्रेमाची उत्साही लाट सळसळत होती. मुजुमदार लिहितात , “सामना झाल्यानंतर लगेचच युरोपीय लोक राहत असलेला शहरातला भाग अंधारात होता, काहीतरी अत्यंत वाईट घटना घडल्यासारखं अत्यंत उदास वातावरण तिथं होतं,अशी बातमी एका देशी भाषेतील वृत्तपत्रानं छापली होती. तर इंग्लिशमनमध्ये छापलं होतं, “या पराभवानंतर ‘साहेब’ राहत असलेले भाग अंधारात गुडूप झाले होते. तर काही युरोपीय लोकांनी आपल्या कटू भावना जाहीरपणे बोलूनही दाखवल्या होत्या.”

मोहन बागान आयएफए किताब जिंकणारी पहिली आशियाई टीम होती. खेदाची गोष्ट म्हणजे १९४७ मध्ये त्यांनी हा किताब ईस्ट बंगाल क्लबला १-० नं पराभूत करून जिंकला होता. मुजूमदार याचं नेमकं विश्लेषण करतात. ते म्हणतात, “देशभरात सर्वत्र देशप्रमाचीच लाट होती. अशा वातावरणात क्रीडा क्षेत्र अत्यंत उपेक्षित राहिलं होतं. तरीही १९११ वर्षातल्या या सामन्याचं भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सामाजिक इतिहासातील एक ऐतिहासिक घटना म्हणूनच स्मरण करावं लागेल. “ याकडे फक्त क्रीडा क्षेत्रातील एक घटना म्हणून पाहू नका तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या घटनेचं स्मरण करा आणि महत्त्वाचं म्हणजे या खेळाडूंचा गौरव केवळ फूटबॉल खेळाडू म्हणून नाही तर स्वातंत्र्य सैनिक म्हणून करा...तोच त्यांचा खरा हक्क आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags