संपादने
Marathi

वेगन फॅशनसंदर्भात समाजात सजगता निर्माण करणारे 'एड्रेस चिक'

Team YS Marathi
16th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

दोन अनोळखी व्यक्ती २०१२ साली इंदौर येथील एका जैन मंदिरात भेटल्या. त्या दोघांच्या आध्यात्मिक, फॅशन याबाबत असलेल्या समान छंदांनी त्यांना बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर २०१३ साली हे काम पुढे नेण्यासाठी त्या दोघी एकमेकींशी जोडल्या गेल्या. रितिका जैन आणि श्रुती जैन अशी त्या दोघींची नावे असून, त्या स्वतःचे वर्णन धैर्यवान स्त्रिया ज्या आपले काम समर्थपणे पार पाडतात, असे करतात. फॅशनवर बराच काळ चर्चा मसलत केल्यानंतर त्यांनी फॅशन, सौंदर्य प्रसाधने आणि फॅशनेबल जीवनशैलीबाबतचा व्यवसाय तो ही पारंपारिक ट्विस्टसोबत करण्याचे ठरवले. रितिका आणि श्रुती यांचे फॅशनवर अतोनात प्रेम होते. त्यातूनच त्यांनी अहिंसक (ज्यामुळे प्राणीमात्रांच्या जीवाला धोका होणार नाही) आणि पारंपारिक जीवनशैलीला प्रोत्साहन दिले.

image


'शाकाहारी लोक जगात बहूसंख्येने आहेत. जेव्हा त्यांच्यावर आपली जीवनशैली निवडण्याची वेळ येते, तेव्हा एकतर त्यांना त्याबद्दल काही सजगता नसते किंवा ते शोधत असलेल्या गोष्टींमध्ये त्यांना त्याच प्रकारचा दर्जा मिळत नाही. त्यामुळे अखेरीस त्यांना प्राण्यांचा वापर करण्यात आलेल्या गोष्टींवर समाधान मानावे लागते.' या दोघींना ही पोकळी 'एड्रेस चिक'च्या मदतीने भरुन काढायची होती. त्यांचे लक्ष्य केवळ लोकांना चांगल्या दर्जाची उत्पादने शोधण्यास मदत करणे एवढेच नव्हते तर त्यांना त्यातील पर्यायांची माहिती देणे हे देखील होते. या प्रकारच्या फॅशनबद्दल लोकांमध्ये सजगता निर्माण झाल्यानंतर तसेच त्यांच्या मागणीत वाढ झाल्यानंतर काही दुकानांनी तसेच मासिकांनी त्यांच्याशी दर्जेदार फॅशन हाताळण्यासंबंधी संपर्क साधला. 'समोरुन येणाऱ्या या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही आमचे वेगन फॅशन ऑनलाईन मासिक आणि स्टोअर जून २०१४ साली बाजारात दाखल करण्याचे ठरवले', असे रितिका आणि श्रुती सांगतात.

या दोन्ही महिला मूळच्या इंदौरच्या असून त्यांनी आपले बालपण इंदौरमध्येच व्यतित केले आहे. रितिका यांनी आपले शालेय शिक्षण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स या विषयातील बी.टेकचे शिक्षणदेखील इंदौरमध्येच पूर्ण केले आहे. तसेच २०१५ सालापासून त्या जयपूर शहराबाहेर स्थायिक झाल्या आहेत. त्या सांगतात की, 'माझी कार्यालये दोन्ही शहरांमध्ये आहेत. तसेच मी कामासंदर्भात अनेकदा इंदौरला येत जात असते.' २७ वर्षीय रितिका या उद्योजकतेच्या क्षेत्रात काही नव्या नाहीत. एड्रेस चिकच्या पूर्वी, त्यांनी एमएमएफ इन्फोटेक नावाची एक माहिती तंत्रज्ञान कंपनीदेखील सुरू केली होती. त्यांची ही कंपनी अमेरिका आणि युरोपमधील ग्राहकांना ई-कॉमर्स सॉल्युशन्स पुरवण्याचे काम करायची. माहिती-तंत्रज्ञान आणि विपणन क्षेत्रातील त्या तज्ज्ञ आहेत. ३१ वर्षीय श्रुती या दुबईबाहेर स्थित झाल्या असून, दर दोन महिन्यांनी त्या कामासंदर्भात भारतवारी करत असतात. श्रुती यांची पार्श्वभूमी फायनान्सची असून, त्यांनी मुंबईतील एका स्टॉक ब्रेकिंग कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट व्यवस्थापक म्हणूनदेखील काम पाहिले आहे. ग्रेट ब्रिटन येथून त्यांनी फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट विषयात मास्टर्स पदवी घेतली आहे. ई-कॉमर्सद्वारे त्यांनी जयपूर, इंदौर आणि दुबई येथे काम पाहिले आहे.

दहा जणांच्या टीमच्या सहकार्य़ामुळे त्यांचे हे काम व्यवस्थित चालले आहे. या टीममध्ये माहिती तंत्रज्ञान टीम, एसईओ तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे. ते काळजीपूर्वक एखादे उत्पादन निवडतात आणि त्याची पडताळणी करतात. ग्राहकांना ते उत्पादन सुचवण्याआधी ते स्वतः त्या उत्पादनाची विविध बाजूंनी जाच पडताळणी करतात. त्यांची माहिती तंत्रज्ञान टीम ही भारतात स्थित असून, दुबईमधून त्या या व्यवसायाची रणनिती आखतात. तेथे त्या जगातील अनेक ब्रॅण्ड्ससोबत तसेच डिझायनर्ससोबत काम करतात. 'अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन हे देश वेगन बाजारपेठेकरिता उत्तम आहेत', असे त्या सांगतात. त्या दावा करतात की, गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि युरोप येथुन आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'वेगन फॅशनसंदर्भात आमच्याकडे अनेक प्रश्न येत असून, या परिसरातील अनेक लोक आम्हाला सूचनादेखील देतात. आमचे दुकान नुकतेच सुरू झाले असून, विपणन सुरू करण्यापूर्वी आम्हाला अनेक ब्रॅण्ड आमच्याशी जोडून घ्यायचे आहेत.' आजवर त्यांना सर्वाधिक आव्हानांचा सामना ई-कॉमर्स क्षेत्रात करावा लागला, असे रितिका आणि श्रुती सांगतात. त्यांना डिझायनर्स तसेच ब्रॅण्डचे मालक यांच्याशी जगाच्या विविध कोपऱ्यात जाऊन संपर्क साधावा लागतो. त्यांची भेट यशस्वी झाल्यानंतरच या दोघींना समाधान मिळते. त्या सांगतात की, 'हे खूप आव्हानात्मक असायचे. आमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे आमच्या ब्रॅण्डचा दर्जा कायम राखणे'. या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला, विविध लोकांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्याकरिता हे आव्हान सहज सुकर झाले होते.

image


रितिका सांगतात की, 'त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आव्हान होते, ते म्हणजे त्यांच्या ब्रॅण्डची जाहिरात करणे. हे एक असे उत्पादन होते की, जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होते. मात्र त्याचे सर्व कामकाज भारतातून पाहिले जायचे.' या दोघींनीही युरोप आणि ग्रेट ब्रिटनमधील डिझायनर्ससोबत संपर्क वाढवण्याकरिता तसेच स्थानिक स्तरावर ओळख वाढवण्याकरिता अनेकदा या देशांची वारी केली. श्रुती यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे इंटरनेटचे जग ज्याप्रमाणे काम करते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी काम करणे. ''एड्रेस चिक'ची सुरुवात करण्यापूर्वी, मला एसईओ म्हणजे काय?, हेदेखील माहित नव्हते. तसेच ब्रॅण्डच्या जाहिरातीकरिता सोशल माध्यमांच्या ताकदीचादेखील मला अंदाज नव्हता. आकडेमोड करणे, पोर्टफोलियोंचा अभ्यास करणे, यात मी सर्वाधिक काळ व्यस्त असायचे. सुदैवाने रितिका या विषयात तज्ज्ञ होती. तिच्यामुळेच मला या सर्व गोष्टी शिकण्यास मदत झाली. आमच्यासारख्या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी हा दृष्टीकोन फार महत्वाचा होता. आत्ता त्या गोष्टींचा मला आनंद घेता येतो', असे श्रुती सांगतात.

image


या दोघींनाही गेल्या वर्षी विविध गोष्टी शिकत्या आल्या तसेच अनुभव घेता आले. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, सोशल मिडिया हे माध्यम भविष्यकाळातील एक प्रभावी माध्यम असून, त्याद्वारे विपणनाची रणनिती आखता येऊ शकते. त्या सांगतात की, 'आम्हाला हे देखील जाणवले की, जेव्हा सोशल मिडिया आणि विपणनाचा विषय येतो, तेव्हा आपल्याला निश्चित लक्ष्य ठेवावे लागते.' २०१६करिता या दोघींच्या मोठ्या योजना असून, यावर्षी त्या विविध कामे करणार आहेत. यावर्षी त्या 'एड्रेस चिक'ची लाईन प्रकाशित करणार आहेत. तसेच अधिकाधिक पारंपारिक डिझायनर्ससोबत व्यवसायसंबंध वाढवण्याचे त्या प्रयत्न करणार आहेत. शिवाय 'एड्रेस चिक'च्या प्रगतीवर त्या प्रामुख्याने लक्ष देणार असून, त्यासोबतच संकेतस्थळाकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना रितिका सांगतात की, 'माझ्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी माझ्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. विशेष करुन माझे पालक, ज्यांनी कायम मला माझी स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली. मला नेहमीच एक यशस्वी उद्योजिका व्हायचे होते.' श्रुती यांना कायमच स्वतः काहीतरी करुन दाखवायचे होते. याशिवाय महिलांना त्या फक्त महिला असल्याकारणाने आयुष्यात कोणत्याही तडजोडी करण्याची गरज नाही, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. 'पुरुष आणि महिलांच्या जीवनशैलीसाठी विविध नियम लागू करणे गरजेचे नाही, असे मला वाटते. त्या दोघांनाही आयुष्यात समान संधी मिळायला हवी आणि तो त्यांचा अधिकारच आहे, असे माझे मत असायचे. माझ्या मते मला प्रेरणा देणारे हेच मुख्य कारण होते', असे श्रुती सांगतात. आमच्या स्वतःच्या मुख्यओळीसह आमची वेगन उत्पादने या वर्षाअखेरपर्यंत बाजारात दाखल होतील, असे त्या दोघी सांगतात. या दोघींकरिता 'एड्रेस चिक' हे एक मोठे व्यासपीठ असून, वेगन उत्पादनेच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदतीची ठरणार असल्याचा विश्वास त्या दोघींना आहे.

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags