भरमसाठ वेतनाची संधी नाकारून विणकरांच्या विश्वात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या 'इंडोफॅश'च्या पल्लवी

0 CLAPS
0

पल्लवी मोहाडीकर यांचे आजोबा विदर्भातले एक विणकर होते. पल्लवी यांचं बालपण देशी वस्त्रांच्या ताग्यांमध्ये हुंदडत गेलं. नुसत्या धाग्यांपासून रेशमी वस्त्र गुंफताना पल्लवी यांनी आपल्या आजोबांना जवळून पाहिलंय. म्हणूनच मोठमोठाल्या पदव्या घेऊन सुद्धा पल्लवी वळल्या त्या उद्यमतेकडे! (पल्लवी यांनी अभियांत्रिकीसोबतच एमबीएची पदवी मिळवली आहे.) आणि उद्योग निवडताना त्यांनी अर्थात आपल्या परंपरेची निवड केली. 'इंडोफॅश' हे एक ई-कॉमर्स पोर्टल असून यामध्ये गावागावातले विणकर आपल्या विणलेल्या खास वस्त्रांचं प्रदर्शन करू शकतात आणि ज्यामुळे त्यांना देशभरातून मागणी मिळते.

इलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियर असलेल्या पल्लवी यांनी एमबीए करण्यापूर्वी एका आयटी फर्ममध्ये नोकरी केली. इथेच त्यांच्या व्यावसायिकतेची बीजं रोवली गेली. " आयआयएम लखनऊला मी प्रवेश घेतला त्यावेळी माझ्या बाबांसोबत तिथल्या स्थानिक बाजारात फेरफटका मारला. तिथल्या चिकनकरी काशिद्याने मी भारावून गेले. पुढच्या वर्षी मी त्या बाजाराचा सखोल अभ्यास केला. मी जवळपास १०० कारागिरांना भेटले आणि पुरवठा साखळी कशी बनवता येईल याचा अभ्यास केला. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या कारागिरांच्या कामातला सच्चेपणा ते पटवून देऊ शकत नाहीत आणि दुसरं म्हणजे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ते स्वत: पोहोचू शकत नाहीत. म्हणून मग एक व्यापारी चिन्ह म्हणजेच ब्रांड बनवायचं ठरवलं ज्यामुळे या कलेला ओळख मिळेल आणि भारतभर ते पोहोचू शकेल. तो क्षण होता जेव्हा मला माझी वाट सापडली." पल्लवी उत्साहात सांगत होत्या. 


चिकनकारी कारागिरांचं काम बघून विस्मयचकीत झालेल्या पल्लवीला विदर्भातल्या विणकारांशी लहानपणापासून जुळलेली नाळ ही या विस्मयाला कारणीभूत आहे, हे त्यावेळी मात्र जाणवलं नाही. आयआयएमनंतर त्यांनी गोल्डमन सेकमध्ये नऊ महिने नोकरी केली. " मी मध्यम वर्गीयकुटुंबात वाढलेली आहे. माझ्या पदवी अभ्यासक्रमानंतर माझ्या पालकांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. भरमसाठ पगाराची नोकरी सोडून देऊन स्वत:च काहीतरी करायचं, हे त्यांच्या पचनी पडणार नव्हतं. पण आता मात्र ते खुश आहेत." पल्लवी आनंदात सांगत होत्या.

चिकनकारीच्या सुंदर मोहातून थोडसं बाजूला झाल्यावर पल्लवी यांना मग अशाच जुन्या पारंपारिक कलाकुसरी शोधून काढायचा मोह् जडला. " जेव्हा मी अशा अनेक विणकर कारागिरांशी बोलले ज्यांचा उदरनिर्वाह या कालाकुसरीवर अवलंबून आहे. मला एक जाणवलं ते म्हणजे हे काम ते पिढ्यानपिढ्या करत आले आहेत आणि त्यांना आपल्या या कलेचा अभिमान आहे. माझ्या आजोबांच्या विणकामाच्या आवडीनं मी प्रभावित झाले होते. 


प्रत्येक साडीला पूर्ण होण्यासाठी तब्बल एक महिना लागतो. त्यामुळे माझ्या डोक्यात एक विचार घोळू लागला तो असा की विभिन्न संस्कृती असलेल्या आपल्या या देशात कित्येक लपलेल्या कला असतील ज्याची आपल्याला माहिती नाही. औद्योगिकरणाच्या रेट्यात या कला कुठेतरी मागे पडत चालल्या आहेत. पण या कला म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्कृष्ट पैलू आहेत. प्रत्येक कलेमागे एक अनोखी आणि आकर्षक कहाणी आहे. जी आमच्या पिढीला माहित नाही. भारतीय पेहरावांना स्वत:ची ओळख देणाऱ्या या कलांना पुनरुज्जीवित करण्याचा इंडोफॅशचा प्रामाणिक प्रयत्न आहे."

पल्लवीसाठी इंडोफॅशचा मुख्य घटक आहे तो म्हणजे कंपनीचं विणकारांशी असलेलं नातं ! " हे अर्थात एक व्यावहारिक नातं आहे पण त्यामध्येसुद्धा आपुलकी आहे. आम्ही त्यांना त्यांच्या हक्काचे फायदे देतो आणि आम्हाला उत्तम उत्पादनं मिळतात. आजच्या जीवघेण्या व्यापारी जगात त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मुबलक रोजगार मिळवून देतानाच मी हा वारसा जपण्याचा प्रयत्न करते, या भावनेने मला खूप आनंद मिळतो."

याचबरोबर पल्लवी कापडावर काही प्रयोगसुद्धा करतात, जसे की, दोन भिन्न भौगोलिक प्रदेशातल्या कलांना एकत्रित आणून कापडावर एक नवा प्रयोग साकारणे. " हे कलाप्रकार एकत्रित आणून आम्ही आमचं वेगळ उत्पादन तयार करतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमच्याकडे कर्नाटकातली मलबेरी सिल्क साडी आहे ज्यावर आम्ही अत्यंत नाजूक असं लखनवी चिकनकरी कशिदा काम केलं आहे. इंडोफॅशच्या फ्युजन या संग्रहामधला हा पहिला प्रकार ज्यामुळे आमच्या संग्रहात इंडोफ्युजनची सुरुवात झाली. " हे प्रयोग आता अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत, मात्र पल्लवी यातल्या प्रयोगाबाबत आणि कल्पनाबाबत अत्यंत उत्साहात आहेत. पल्लवी म्हणतात," इंडोफ्युजन ही बाजारपेठेत धमाका उडवून देणार हे नक्की ! भारतीय वस्त्र त्यावर कशिदा आणि छपाई वापरून बनवलेली पाश्चिमात्य सिल्लोट्स ( काळी छायाकृती) परिधान करणाऱ्यांकडे नजर वळून लोक पाहतील यात शंका नाही ."

बाजारपेठेत ई -कॉमर्स सारखे खेळाडू असताना पल्लवी समोर ग्राहक मिळवणे हे आव्हान नक्कीच मोठं आहे. "आज ऑनलाईन खरेदी हा एक उत्तम पर्याय ग्राहकांसमोर आहे. त्यांना नवनव्या फॅशनची जाण आहे आणि त्यांना एकंदरीत कल माहित असतो त्यामुळे ते इंडोफॅशकडे वळतात." 


व्यवसाय वृद्धीच्या नियोजनाबाबत त्या म्हणतात ," ऑनलाइन दुकान हे एक माध्यम आहे ज्याच्या काही सुविधांसाठी आम्ही त्याचा आधार घेतला आहे. आमचं अस्तित्व सशक्त रीतीने जगभरात पोचावं यासाठी आम्ही अन्य माध्यमांवर लक्ष्य केंद्रित करत आहोत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे निधीचा जो आम्ही गुंतवणुकीच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. " निधीचा प्रश्न जरी असला तरी यामुळे पल्लवीच्या उत्साहात मात्र खंड पडलेला नाही." इंटरनेटच्या अत्याधिक वापरामुळे भारतात बाजारपेठेची दिशा संपूर्ण बदलली गेली आहे . ई-कॉमर्स मुळे अनुकुलता आणि निवड या दोन्ही गोष्टी ग्राहकांना मिळतात. सर्वच जण ग्राहकांना उत्तम अनुभव आणि कलात्मक उत्पादन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बाजारात प्रचंड उलथापालथ होत असते आणि आम्ही तर पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. "

इंडोफॅश मधली गुंतवणूक ही त्यांची स्वत:ची आहे. आपल्या स्पर्धकांबद्दल बोलताना त्या म्हणतात ," फॅब इंडिया हे नाव आमच्यासमोर मापदंड म्हणून आहे. पण आम्ही आमच्यासाठी स्वत:च स्थान निर्माण करू इच्छितो. ज्यामध्ये आम्ही इंडो-फ्युजनची नवी संकल्पना समोर आणत आहोत. भारतीय वस्त्र वापरून पाश्चिमात्य सिल्लोट्स असोत वा अन्य कपडे असोत, त्यावर तात्कालीन रचना साकारून अनोख्या कपड्यांची शृंखला आम्ही इंडो फ्युजनमध्ये आणणार आहोत."

आतापर्यंत त्यांनी साध्य केलेलं ध्येय हे त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. " आम्ही मार्च २०१५ पासून पूर्ण वेळ या कामामध्ये उतरलो. पहिला टप्पा होता तो म्हणजे एक हुशार आणि कुशल संघ बांधणे. दुसरं म्हणजे आमच्या विक्रीच्या बाबतीत आम्ही ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा पुढे गेलो. ग्राहकांच्या प्रतिसादाने आम्ही खूप खुश आहोत. लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला त्यांनी घेतलेल्या कपड्यांचा प्रतिसाद पाठवतात, ही आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि यामुळे आमच्या भागीदारांकडून सुद्धा आम्हाला खूप सकारात्मक पाठबळ मिळालं आहे. 


या ध्येयपूर्तीपेक्षा सुद्धा पल्लवी यांना काम करायला बळ मिळतं ते त्यांच्या व्यवसायातल्या संघ सदस्यांकडून! " सध्या आमची पाच जणांची टीम आहे. विकास जो आयआयएम पदवीधर आहे, त्याने त्याच्या पूर्वीच्या नोकरीत विणकर समुदायासोबत अत्यंत जवळून काम केलं आहे. त्याला प्रवास आवडतो आणि देशातल्या कानाकोपऱ्यातून कलाप्रकार संशोधन सुद्धा आवडतं. शशिकांतची पदवी आहे अभियांत्रिकी क्षेत्रातली, पण त्याला आवड आहे ती ग्राफिक कलेची. त्यामुळे त्याच्याकडे रचना हा भाग आहे. प्रमित,ज्याने आयआयटी खरगपूरमधून औद्योगिक अभियांत्रिकी शाखेत पदवी घेतली आणि त्याला वित्तीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे आमची आर्थिक बाजू सांभाळणारा तो मुनीमजी आहे. एनआयएफटीमधील रिचा ही सुद्धा रचना हा विभाग सांभाळते. आम्ही एकमेकाना आमच्या कौशल्यासाठी नेहमीच दाद देतो आणि मुख्य म्हणजे आम्ही जे काम करतो ते आम्हाला आवडतं.

पल्लवी यांच्यासाठी या व्यवसायाचा सर्वात आवडता भाग कोणता असेल तर तो म्हणजे शिकण्याचा अनुभव! कामासाठी लोकांची निवड करण्यापासून ते वाटाघाटी करून उत्तम पर्याय निवडण्यापर्यंत !"त्या पुढे म्हणतात, " स्वातंत्र्य ! मला आव्हान पेलायला आवडतं आणि इंडोफॅश माध्यमातून मला बऱ्याच आव्हानांना समोर जावं लागतं. माझ्या सहकाऱ्यांबरोबर काम करणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. दररोज स्वत:ला नवीन घडताना मी पाहते आणि यात खरंच गम्मत आहे. माझ्या कामाच्या तासावर माझं नियंत्रण नाही, त्यामुळे स्वत:चं आयुष्य आणि काम यात ताळमेळ बसवताना खूप कठीण जातं." त्या काहीशा नाराज सुरात सांगत होत्या.

त्यांना मिळालेला सर्वाधिक मोलाचा सल्ला म्हणजे ," तुमच्या प्रकल्पाविषयी अनेक जणांशी बोला, त्यांचे दृष्टीकोन माहित करून घ्या, यामुळे तुम्हाला अधिक उत्तम घडण्यासाठी प्रेरक ठरेल असं डोक्याला चालना देणारं खाद्य मिळतं." पल्लवी या मुक्त नेतृत्व या उक्तीवर विश्वास ठेवतात ." माझा माझ्या लोकांवर विश्वास आहे आणि संपूर्ण स्वातंत्र्य देण्यावर मी विश्वास ठेवते. मला त्यांच्या क्षमतांविषयी पूर्ण विश्वास आहे , पण मी त्यांचे प्रयत्न आणि कुशलता यांची सांगड इंडोफॅशच्या व्यापक ध्येयपूर्तीसाठी होईल या दृष्टीने प्रयत्न करते. कोणत्याही क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छीणाऱ्यांना त्या एक सल्ला देतात तो म्हणजे ," तुमचे हात खराब व्हायलाच हवेत हाच शिकण्याचा एकमेव मार्ग आहे. "

पल्लवी यांना 'इंडोफॅश' हा ब्रान्ड संपूर्ण जगभरात पसरवायचं आहे. "मी स्वत: या माझ्या इंडोफॅश या शृंखलेकडे, फ्युजन या प्रकारातलं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करेल या पद्धतीने बघते आहे. भारतीय शैली, तत्कालीन रचना आणि आरामदायी, हे या कपड्यांचं ब्रीद असेल. लीजा बु, या स्वप्नांबद्दल बोलताना म्हणतात ," स्वप्न सत्यात उतरणे, फक्त हेच स्वप्नांचं उद्दिष्ट्य नव्हे ! तर त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट्य आहे ते म्हणजे या स्वप्नांचा उगम कुठून झाला आहे ते पाहणे, आवड नेमकी कुठे आहे ते पाहणे, आनंद कुठून येतो आहे ते पाहणे "

नेमक्या याच भावनेतून सांगायचं झालं तर पल्लवी यांचं हे स्वप्न म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, मोठं झाल्यावर महत्वाकांक्षा साकारण्यासाठी जोपासलेली आवड या साऱ्याचा परिपाक म्हणजे इंडोफॅश ! ही त्यांची भरारी झेप घेइलही, पण सध्या त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत हेही नसे थोडके!

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘लखनवी चिकनकारी,’ खाणे नव्हे, हे कापड भारी! ‘आंचल’ सप्त-आकाशी… तयाची दुमदुमते ललकारी!!

‘ब्ल्यू पॉटरी’ – नामशेष होऊ घातलेल्या पिढीजात कलेचं पुनरूज्जीवन

निशा नटराजन: फॅशनच्या दुनियेला नवी झळाली देऊ पाहणारी चांदणी

लेखिका : राखी चक्रवर्ती

अनुवाद : प्रेरणा भराडे 

Latest

Updates from around the world