संपादने
Marathi

‘जनुकपत्रिके’साठी ‘अनू’, ‘आचार्य’च जणू!

Chandrakant Yadav
31st Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

अनू आचार्य अमेरिकेत शिकागोला होत्या. छान चाललेले होते आणि अचानक एक नवे ध्येय ठरवून त्या २०१० मध्ये हैदराबादला परतल्या… हा केवळ शिकागो-हैदराबाद असा प्रवास नव्हता… तर अनू आचार्य यांच्या व्यावसायिक मुशाफरीचीही ती सुरवात होती. अन्य सहकाऱ्यांसह ‘ओसिमम सॉल्युशन’ नावाची कंपनी त्यांनी इथं सुरू केली. शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनाच्या विषयात मदत करणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट ठरलेले होते. ‘ओसिमम’ने फार थोड्या कालावधीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. तीन कंपन्या अधिग्रहित केल्या. ‘केबेर पार्टनर्स’ आणि ‘जागतिक बँके’कडूनही निधी मिळवण्यातही यश मिळवले. निरंतर विकासाच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झाली. अनू आचार्य यांनाही तसे पाहिले तर खुप काही मिळालेले होते, यशाची एक मालिकाच होती. पण तरीही त्या समाधानी नव्हत्या. कारण, सामान्य लोकांच्या जीवनाशी थेट संबंध येईल, असे काही तरी त्यांना करून दाखवायचे होते. याच आकांक्षेच्या गर्भातून MapMyGenome (मॅप-माय-जिनोम) जन्माला आली.

image


MapMyGenome चा प्रारंभ

काहीतरी वेगळे करावे, हा संकल्प अनू यांनी २०११ मध्येच केलेला होता. दुसरीकडे आपल्या क्षेत्रात ‘ओसिमम बायो’ जे काही करत होती, ते उत्तमच होते. अशात काहीतरी आणखी वेगळा प्रयोग करणे म्हणजे कंपनीतील अनेकांच्या दृष्टीने लोढणे मागे लावून घेण्यासारखे होते. अनू यांचा दृष्टीकोन मात्र वेगळा होता. अनू यांनी ‘ओसिमम बायो’च्याच कार्यक्षेत्रात TheMapMyGenome ही नवी कंपनी ‘सब्सिडरी’ म्हणून, म्हणजेच हच्चाला म्हणून स्थापन केली. ‘ओसिमम बायो’कडे आधीच आणि आयताच उपलब्ध असलेला ‘डाटाबेस’ म्हणजे अनू यांच्या दृष्टीने वरदानच होते. ‘ओसिमम’कडे तेव्हा जनुकांचे जवळपास २२ हजार नमुने होते. डाटाबेसच्या मदतीने जनुकांशी संबंधित सगळी माहिती अनू यांच्या पुढाकाराने एकत्रित केली गेली.

कंपनीचे ‘बोर्ड ऑफ मेंबर्स’ (संचालक मंडळातील सदस्य) मात्र या प्रयोगाबद्दल जरा साशंकच होते. खरं तर याच कारणाने ‘मॅप-माय-जिनोम’च्या स्थापनेला जरा काळच जावा लागला. हा उपक्रम पुढे तब्बल २ वर्षे थंड बस्त्यात पडून राहिला. शेवटी अनू यांनी स्वत:च २०१३ मध्ये ‘ओसिमम बायो’ला बाय बाय केला. त्याशिवाय आपले संपूर्ण चित्त ‘मॅप-माय-जिनोम’मध्ये घालता येणे अनू यांना शक्य नव्हते.

जन्मपत्रिका ते ‘जिनोम’पत्रिका

‘जिनोम’पत्रिका म्हणजे खरंतर जन्मपत्रिकेहूनही अधिक महत्त्वाची. जन्मपत्रिकेत ग्रहदशा आणि त्यावरून ठरणारी राशी आपल्याला चिकटते. भविष्याचे आडाखे बांधले जातात. शेवटी ही एक श्रद्धेची कुंडली असते, पण ‘जिनोम’पत्रिका म्हणजे वैज्ञानिक कुंडली!

‘जिनोम’पत्रिका थेट तुमच्या आरोग्याशी निगडित असते. हे म्हणजे जिन्स प्रोफाइलच. तुमच्या जनुकांची ती एक छोटेखानी गाथाच. ‘जिनोम’पत्रिकेला आपण मराठीत थेट जनुकपत्रिका म्हणूयात.

...तर जनुकपत्रिकेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला भविष्यात कुठला आजार जडू शकतो, त्याचे भाकित करता येते. विशेष म्हणजे हे भाकित भाकड नसते, त्याला विज्ञानाचा आधार असतो.

जनुकपत्रिकेच्या आधारावर एखादा आजार जडण्याची शक्यता असल्यास तो जडू नये म्हणून काय काळजी घ्यावी, ते कळते. खाण्या-पिण्याच्या सवयी, जीवनशैली ठरवण्यात मदत होते.

एवढेच काय तर एखाद्या खास औषधाचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होतो, हे देखील या जनुकपत्रिकेवरून लक्षात येते.

उदाहरणार्थ तुम्ही ५० वर्षांचे आहात आणि तुम्हाला मधुमेह आहे तर तुम्ही कुठले औषध घेतले म्हणजे तुम्हाला अधिक फायदा होईल, हे तुम्हाला जनुकपत्रिकेच्या आधारावर सुचवले जाऊ शकते. उपचारादरम्यान केवळ अजाणतेपणामुळे चुकीची औषधे घेत असलेल्यांना या जनुकपत्रिकेचा किती फायदा होऊ शकतो, हे देखिल लक्षात घेतले पाहिजे.

जनुकपत्रिकेची प्रक्रिया

तुमच्याशी संबंधित सगळा तपशिल एकत्रित केला जातो. उदाहरणार्थ ‘फॅमिली हिस्ट्री’, अर्थातच इथे कुटुंबाच्या आरोग्याचा इतिहास अभिप्रेत असतो. आई-वडिलांसंदर्भातले तपशिल, भावंडांचे, काका, मामा, मावशीशी संबंधित तपशिलही लक्षात घेतला जातो. तुमच्या चालू वैद्यकीय अहवालाची माहिती घेतली जाते. दहा ते वीस मिनिटांची वेळ या सगळ्याला लागते. जनुक विशेषज्ञांकडून या सगळ्या तपशिलांचा बारकाईने अभ्यास केला जातो. विश्लेषण केले जातो आणि त्यानुसार तुमची जनुकपत्रिका तयार केली जाते.

३८ रुग्णालयांशी टाय-अप

जनुकपत्रिका बनवण्यासाठी तुम्ही सरळ ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता. नंतर मग MapMyGenome शी करार असलेल्या रुग्णालयांत, आरोग्य केंद्रांत, योग केंद्रात किवा मग वितरकाकडे जाऊन जनुकपत्रिका बनवून घेऊ शकता.

अनू सांगतात, ‘‘MapMyGenome चे ३८ रुग्णालयांसोबत टाय-अप आहे. शिवाय Dr.Lal’s यांच्यासोबतही टाय-अप आहे. Dr.Lal’s यांच्या डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये मिळून दररोज जवळपास ३८ हजार रुग्णांची तपासणी केली जाते.’’

जनुकपत्रिकेसाठी खर्च

MapMyGenome कडून तपासणीनिहाय शुल्क आकारले जाते. १ हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत हे दर आहेत. जनुकपत्रिकेच्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत हे शुल्क फार कमी आहेत.

आरोग्याचा हा आरसा

Genomepatri™ च्या माध्यमातून तुम्ही स्वत:ची आरोग्यविषयक ओळख स्वत:ला करवून देऊ शकता. तुम्हाला हे देखील यातून कळते, की तुम्हाला काय हवे आहे आणि काय नको आहे.

म्हणजे तुम्ही काय खायला हवे, काय खायला नको. भविष्यात कुठला आजार तुमच्या ताटात वाढून ठेवलेला आहे आणि तसा तो तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुमच्या जेवणाच्या ताटात काय असायला हवे आणि काय असायला नको. तुम्ही त्यादृष्टीने कुठली अन्य पथ्ये पाळावयाची आहेत.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags