संपादने
Marathi

रोनी स्क्रुवाला : शिक्का मारून घेणं भावलंच नाही!

Team YS Marathi
7th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

बहुतांश लोक एक कंपनी सोडल्यानंतर काही काळ तरी अवकाश घेतात. त्यात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २४ वर्षे एका कंपनीशी निगडित राहिल्यानंतर, त्या कंपनीत जीव ओतल्यानंतर अवकाशाचा प्रसंग उद्भवलेला असेल तर तो हा अवकाश स्वाभाविकपणे मोठाच असणार, पण रोनी स्क्रुवाला हे अशा लोकांपैकी खचितच नाहीत.

रोनी हे माध्यम क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या यूटीव्हीचे संस्थापक. , २०१४ मध्ये त्यांनी या कंपनीला रामराम ठोकला. रोनी सध्या कधीही नव्हते एवढे व्यग्र आहेत. एका नव्या ‘स्टार्टअप’चे ते सहसंस्थापक आहेत, गुंतवणूकदार आहेत, प्रो कबड्डी लिग टिमचे मालक आहेत, पत्नी झरिना यांच्यासह ‘फिलॅन्ट्रॉफिक फाउंडेशन’चे संस्थापक आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याच वर्षात लेखक म्हणूनही ते नावारूपाला आलेले आहेत. Dream with Your Eyes Open: An Entrepreneurial Journey या पुस्तकाचे लेखन त्यांनी केलेले आहे आणि हे पुस्तक प्रकाशित होऊन चर्चेचा विषयही ठरले. ‘यूटीव्ही’, ‘विजय टीव्ही’ आणि ‘हंगामा’सारख्या नामवंत कंपन्यांच्या उभारणीनंतर, कंपन्यांची वाटचाल मार्गी लावल्यानंतर आणि त्या सोडल्यानंतर ते आता हे सगळे करताहेत. तीन तपांची तपस्या करून झाल्यानंतर त्यांची ही नवी साधना सुरू झालेली आहे.

रोनी सांगतात, ‘‘मी माध्यमांतून आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातून अवकाश (ब्रेक) घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलेलो नाही. मी माध्यमं आणि मनोरंजनाचे क्षेत्र सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे नवा प्रवास सुरू करण्यासाठीची ती योग्य वेळ होती. अर्थात मला हा विश्वास होताच, की जे काही मी नव्याने करणार आहे, ते सगळे व्यापक परिणाम करणारे असेल. प्रभाव पाडणारे असेल. स्वाभाविकच मला त्यासाठी भरपूर कष्ट उपसावे लागणार होते. त्यातही नव्या प्रकल्पात मला सगळेच शून्यापासून सुरू करायचे होते.’’ रोनी यांना शून्यातून सुरवात करायला तसेही आवडतेच. तो त्यांचा स्वभावच बनलेला आहे.

image


‘स्वत:वर विश्वास ठेवा’

१९८० च्या सुरवातीला स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करणे म्हणजे आताइतके साधेसरळ नव्हते. ‘स्टार्टअप’ हा शब्दही तेव्हा यासाठी वापरला जात नव्हता. अशा काळात रोनी यांनी आपले स्वत:चे काही सुरू करण्याचे ठरवलेले होते. ‘दूरदर्शन’शिवाय दुसरे तेव्हा काही नव्हते, त्यातही या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर कार्यक्रमांसाठी काही मोजके तासच उपलब्ध असत. रोनी यांनी लोकल केबल टीव्ही नेटवर्क सुरू केले आणि मुंबईतील काही घरांतून सेवा द्यायला सुरवात केली. रोनी सांगतात, ‘‘व्यवसाय सुरू केला तेव्हा अनेकांना ती एक भन्नाट कल्पना वाटली, पण वर्षभरातच त्याला कुणी विचारेनासे झाले.’’ रोनी ते दिवस आठवतात, ‘‘एक व्यावसायिक म्हणून तेव्हा खरं तर माझ्यासाठी एक चांगली पार्श्वभूमी तयार झाली. अनुभवाचे गाठोडेच पाठीवर आले. मी हजारो दारे काय ठोठावली. प्रात्यक्षिके काय दिली.’’

रोनी म्हणतात, ‘‘नंतर मी एक धडा शिकलो आणि तो म्हणजे ‘तुम्हाला जर कशावर विश्वास ठेवायचा असेल तर तो तुम्ही स्वत:च्या कल्पनांवर ठेवा.’’ रोनी यांचे हे मत उद्योजक-व्यावसायिकांसाठी आजही प्रासंगिक असेच आहे. ‘‘तुम्ही जीव ओतून सुरू केलेल्या तुमच्या व्यवसायाला जर एकही ग्राहक उपलब्ध होत नसेल तर हे विदारक आहे. तुमचा उत्साह संपूर्णपणे घालवणारे आहे,’’ रोनी म्हणतात. रोनी तेव्हा अवघे २० वर्षांचे होते. आणि केबल टीव्ही नेटवर्कला ग्राहक मिळणे अवघड बनलेले असतानाही ते या व्यवसायाला चिकटून राहिले. त्यांनी नवी शक्कल लढवली. हॉटेल्सकडे आपला मोर्चा वळवला. हॉटेल्सना केबल सर्व्हिस देऊन व्यवसायासाठी एक पाया उभा केला. सगळीच परिस्थिती उलट असतानाही व्यवसाय बंद करण्याचा पर्याय त्यांनी निवडला नाही. स्वत:च्या कल्पनेवरला विश्वास कायम ठेवला.

‘‘मला वाटते तेव्हा मी जे काही केले ते अत्यंत वेगळे होते. आजकाल आपण पाहतो सुरवातीच्या तीन-चारच महिन्यांत जर मनाजोगा परिणाम समोर आला नाही, व्यवसाय झाला नाही आणि पैसा मिळाला नाही तर बहुतांश लोकांचा आपल्या कल्पनेवरला विश्वास उडतो.’’ रोनी यांच्या या सांगण्यात दम आहेच. कुठल्याही व्यवसायात लोकांना आता पटकन पैसा पाहिजे असतो. थोडी कळ काढण्याची तयारी नसते. आपल्या व्यवसायाची आपली कल्पना नफ्यामध्ये परिवर्तित होण्यास थोडा वेळ घेणारी असू शकते, यावर विश्वास ठेवायलाच कुणी तयार नाही.

रोनी यांचा केबल टीव्ही नेटवर्क उभारणीतील अनुभव पुढे त्यांच्यासाठी कमालीचा उपयोगी ठरला. खूप धक्के यात खावे लागलेले असले तरी यूटीव्हीचा पाया याच अनुभवांनी रचला आणि पुढे या प्रकल्पाची दिमाखदार इमारतही उभी राहिली. यूटीव्ही म्हणजे एक भव्य माध्यम कंपनी. टेलिव्हिजन कार्यक्रम, खेळ, चॅनेल्सचे प्रसारण, चित्रपट स्टुडियो… असे काय काय…

image


‘योजना आखून वाऱ्यावर सोडू नका’

‘यूटीव्ही’ची नेत्रदीपक वाटचाल म्हणजे एक दैदिप्यमान प्रवास आहे. अनेक यशाचे टप्पे त्यात आहेत. इतर माध्यम कंपन्यांसाठी कार्यक्रम तयार करण्यापासून ते कितीतरी प्रसारण वाहिन्या सुरू करण्यापर्यंत या कंपनीने अनेक आव्हाने पार केलेली आहेत. ‘जोधा अकबर’सारख्या प्रचंड बजेट असलेल्या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. ‘अ वेनस्डे’, ‘डेली बेली’ तसेच ‘नो वन किल्ड जेसिका’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवलेले आहेत. यूटीव्हीचा असा मोठा प्रवास आहे. पुढे २०१२ मध्ये ‘डिस्ने’ने ‘यूटीव्ही’ अधिग्रहित केली. नंतर पुढे आणखी दोन वर्षे रोनी हे कार्यकारी संचालक म्हणून कंपनीत कायम राहिले. तोवर बऱ्याच जणांनी कंपनी सोडली. रोनी यांच्याबाबतही तशा वावड्या उठत, पण रोनी म्हणतात, ‘‘बऱ्याच गोष्टी तेव्हा घडल्या, पण माझ्या मनात कंपनी सोडण्याचे कधीही आलेले नव्हते. तुम्ही एके सकाळी उठता आणि म्हणता हे सगळे मी केलेले आहे आणि आता मी हे सोडत आहे, असे कधी होत नाही.’’ यूटीव्ही विकत घेण्याबाबत डिस्नेकडून आलेल्या ऑफरसंदर्भात रोनी म्हणतात, की मला असे वाटते, की या गोष्टीने यूटीव्हीला यशाचा एक नवा मानदंडच मिळवून दिला. कंपनीतील सगळ्याच सहकाऱ्यांसाठी ही गोष्ट म्हणजे एक पुढली पातळी होती, पुढली पायरी होती, असेच मी मानतो.

दूरदर्शन मालिकांचा निर्माता म्हणवून घेणे रोनी यांना अजिबात आवडत नाही. त्यामागचे कारण सांगताना ते म्हणतात, ‘‘माझ्यासाठी मालिका म्हणजे पूर्व-नियोजित माध्यम आहे. माझ्या दृष्टीने हेच सदोष आहे.’’ कुठल्याही व्यावसायिकाने, उद्योजकाने, निर्मात्याने आपल्या प्रवासात आपण कधी आणि कुठे बाहेर पडणार आहोत, हे डोक्यात ठेवून करू नये, असे रोनी यांचे ठाम मत आहे. रोनी म्हणतात, ‘‘बाहेर पडणे हे आखलेल्या धोरणाचा भाग असूच शकत नाही. तुमचे बाहेर पडणे, हे कधीही तुम्ही तसे ठरवलेले होते म्हणून घडलेले नसते. तुम्हाला हवे असलेले साध्य पूर्ण होते, तेव्हाही ते घडू शकते. तुम्ही मोकळे असता.’’

सेकंड इनिंग्स्

डिस्नेने यूटीव्ही अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली तसे रोनी यांनी Unilazer या आपल्या पुढल्या प्रवासासाठी निधीची जुळवाजुळव सुरू केलेली होती. ही एक गुंतवणूक कंपनी होती. तथापि, ते सांगतात, की केवळ गुंतवणूकदार म्हणून भूमिका बजावणे हे काही त्यांच्या रक्तात नव्हते. पुन्हा नवी सुरवात करणे हा एक पर्याय होता. यावेळी रोनी यांनी सहसंस्थापक म्हणून भूमिका बजावण्याचे ठरवले आणि आपल्या विविध आवडीनिवडींकडेही लक्ष घालण्याचे ठरवले.

ऑनलाइन शिक्षण उपक्रम त्यांनी सुरू केले. UpGrad च्या माध्यमातून त्यांनी कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. उद्योजकता-व्यावसायिकता केंद्रित १५ आठवड्यांचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला. डिजिटल माध्यमातही ते उतरले. Arre या डिजिटल माध्यमाद्वारे ते कथानक स्वरूपातील आणि इतर विषयांची निर्मिती करणार आहेत. बाजारातील नेतृत्वापेक्षा कमी त्यांना काहीही नको आहे.

रोनी यांनी Unilazer Sports चीही स्थापना केली. क्रीडा-विपणन क्षेत्रातील ही कंपनी आहे. कबड्डी, फुटबॉल आणि मोटरस्पोर्ट या खेळांवर या कंपनीचा फोकस आहे. Unilazer Sports च्या माध्यमातून त्यांनी प्रो-कबड्डी लिगमधील टिम ‘यू मुंबा’ची मालकी मिळवली होती. ‘यू ड्रिम फुटबॉल’ नावाने फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रमही चालवला. येत्या २०१६ मध्ये मोटरस्पोर्टस्‌वर आधारलेला ‘यू मोटो २५०’ हा उपक्रमही सुरू केला जाणार आहे.

गुंतवणुकीच्या व्यवसायात ते जसे पडले तसा अनेक तरुण उद्योजकांशी त्यांचा संबंध आला. यातूनच त्यांनी एक पुस्तक लिहायला घेतले. १९८० पासून उद्योजकतेवर बसलेला एक डाग आजवर पुसला गेलेला नाही, ही बाब त्यांच्या लक्षात आली. ८० मध्ये जेव्हा रोनी यांनी व्यवसाय सुरू केला, तेव्हा लोक हे म्हणत, की रोनीला नोकरी वगैरे करताच येत नाही. त्याला ते काही झेपत नाही म्हणून शेवटी लागला बिचारा धंद्याला. आजही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. रोनी म्हणतात, ‘‘काहीही बदल झालेला नाही.’’ आपले पुस्तक वाचून आणखी बरेच युवक उद्योजकतेकडे वळतील, अशी आशा आणि अपेक्षा रोनी यांना आहे. रोनी म्हणतात, ‘‘१.३ बिलियन लोकसंख्येमागे १०,००० उद्योजक हे काय प्रमाण आहे. पुढल्या ५ वर्षांत आम्हाला (भारताला) विकासासंदर्भातली परिणामकारकता साधायची तर १० दशलक्ष उद्योजकांची आवश्यकता भासणार आहे.’’

मयांककुमार हे अपग्रेडचे एक सहसंस्थापक आहेत. नवउद्योजकांसाठी रोनी यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे मयांक यांचे म्हणणे आहे. मयांक म्हणतात, ‘‘समकालिन प्रश्न सोडवतानाही रोनी तुम्हाला लांब पल्ल्याचा विचार करायला शिकवतात. ब्रँडची उभारणी कशी करावी, याचे तंत्र तर रोनी यांच्याकडून शिकावेच शिकावे. कोण काय म्हणतंय त्याकडे दुर्लक्ष करून तातडीने निर्णय घेणे, ही त्यांची आणखी एक खासियत.’’ अपग्रेड या स्टार्टअपआधी मयांककुमार हे Bertelsmann India Investments चे व्हाइस प्रसिडेंट होते.

नव्या खेळीत रोनी मस्त आहेत. रमलेले आहेत. मजेत आहेत. रोनी यांना आनंद देते, उत्साह देते आणि प्रोत्साहित करते असे काय आहे? रोनी या प्रश्नावर म्हणतात, ‘‘मी मला आवडणाऱ्या गोष्टी व्यवसायात रुपांतरीत करतो. उदाहरणार्थ शिक्षण, खेळ हे माझे छंद आहेत. मी काय करायला हवं यापेक्षा मला काय करायला आवडतं, ते करण्याची संधी मला नियतीने मिळवून दिलेली आहे… आणि मोठ्या तामझामासह, डामडौलासह वाजत-गाजत मी ते करतोय. आनंद, उत्साह आणि प्रोत्साहनासाठी माणसाला दुसरं आणखी काय हवं?’’

नवउद्योजकांसाठी रोनी यांचे सल्ले

१) पैशांची उभारणी हे ध्येय असू शकत नाही. गुंतवणूक वाढवण्याच्या तुमच्या क्षमतेवरून तुम्ही स्वत:ला जोखू नका.

२) आपल्या कल्पनांशी प्रामाणिक राहा. त्यांना वेळ द्या. नवतेचा ध्यास धरा.

३) मोठा विचार करा. अगदी सुरवातीपासूनच तंतोतंत विचार करा.


लेखिका- राधिका पी नायर

अनुवाद- चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags