संपादने
Marathi

गरजूंना मदतीचा हात देणारी ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼ

Ranjita Parab
27th Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ʻफॅण्ड्रीʼ या चित्रपटापासून प्रेरीत होऊन रविंद्र चाचे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने गरजूंना मदत करणारी एक संस्था उभारली आणि तिचे नाव ठेवले फॅण्ड्री फाऊंडेशन. २०१४ साली चार-पाच जणांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या संस्थेत सध्या १५० जण सहभागी झाले आहेत आणि ते अनेक समाजोपयोगी कामे पूर्णत्वास नेतात. संस्थेच्या नावाबद्दल बोलताना संस्थापक रविंद्र चाचे सांगतात की, ʻʻफॅण्ड्रीʼ चित्रपट पाहिल्यानंतर मला फार अस्वस्थ वाटत होते. त्या चित्रपटातील नायक जब्या एका कपड्यांच्या शोरुममधील जीन्सकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. असे दृश्य प्रत्यक्षात न पाहता फक्त चित्रपटात पाहूनही मला फार वाईट वाटले. आपल्या आजुबाजुलादेखील असे अनेक जब्या उपस्थित असतील, ज्यांची साधे कपडेदेखील घेण्याची आर्थिक परिस्थिती नसेल. अशा गरजुंसाठी आपल्याला काय करता येईल, हा प्रश्नच डोक्यात घेऊन मी चित्रपटगृहातून बाहेर पडलो. त्यानंतर मी माझे काही मित्र प्रवीण दाभोळकर, विपुल पोरे, प्रथमेश दिवेकर, शशांक बोरे व प्रदीप भालेकर यांच्याशी अशा मुलांना काय मदत करता येईल, यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा अशा मुलांना नवे कपडे घेऊन देणे तर आम्हाला आर्थिकदृष्ट्या महाग पडले असते. त्यामुळे आम्ही जुने पण वापरण्यास योग्य असलेले कपडे ओळखीच्या लोकांकडून घेऊन ते अशा गरजू लोकांना दान करण्याचा निर्णय घेतला. ʻफॅण्ड्रीʼ चित्रपटावरुन ही संकल्पना सुचल्याने आम्ही आमच्या संस्थेचे नाव ʻफॅण्ड्रीʼच ठेवण्याचे ठरविले.ʼ सुरुवातीला फॅण्ड्री फाऊंडेशनचा प्रचार आणि प्रसिद्धी ही फक्त समूह संपर्क माध्यमांवरच (सोशल मिडिया) होत होती आणि त्यातूनच गरजूंना मदत करण्याची इच्छा असलेली समविचारी मंडळी एकएक करुन गोळा होत गेली. त्यामुळे ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼला ऑनलाईन चळवळ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. व्हॉटस एप आणि फेसबूकवर सुरू झालेल्या या ऑनलाईन चळवळीत अवघ्या वर्षभराच्या कालावधीतच जवळपास १५० शिलेदार जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे त्यात मुलींची संख्यादेखील लक्षणीय आहे आणि अनेक कुटुंबांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले असून, त्यात ते अधिकतम योगदान देण्याचे प्रयत्न करतात. ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼचे स्वयंसेवक कोणताही प्रोजेक्ट शिस्तीने आणि एकविचाराने पार पाडतात. ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼ ही ʻवन मॅन आर्मीʼ नसून अनेक स्वयंसेवकांच्या साथीने गरजूंना मदत करणारा एक समाजोपयोगी उपक्रम आहे. ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼने आतापर्यंत गरजूंकरिता कपडे दान, शैक्षणिक वस्तुंचे वाटप, आदिवासी पाड्यात स्वच्छतेचे महत्व, ʻएक भेट आपुलकीची, आपल्या नात्यापलीकडचीʼ, ʻएक करंजी मोलाचीʼ असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत.

image


आपल्या पहिल्या प्रोजेक्टबद्दल बोलताना रविंद्र सांगतात की, ʻजुने परंतु वापरण्यास योग्य असलेले कपडे दान करण्याचा आमचा निर्णय झाल्यानंतर आम्ही त्यासंदर्भात २५ मे २०१४ रोजी चार-पाच जणांनी मिळून फेसबूकवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टला मग आमचे फेसबूकवरील मित्रदेखील एक-एक करुन जोडले गेले. तेव्हा काही लोकांनी आम्हाला जुन्या कपड्यांसोबतच आर्थिक मदत देऊ केली. आर्थिक मदतीचा आम्ही विचारही केला नव्हता. मात्र तेव्हा फक्त फेसबूक पोस्टच्या माध्यमातून आमच्याकडे जवळपास ३९ हजार रुपये जमा झाले. मग आमच्या काही स्वयंसेवकांनी डहाणूला भेट देऊन तेथील आदिवासी पाड्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जेणेकरुन त्यांना कशाप्रकारची मदत करायची, हे चित्र आमच्यापुढे स्पष्ट झाले. तेव्हा आमच्या स्वयंसेवकांनी आम्हाला सांगितले की, तेथील मुलांना शालेय वस्तुंचीदेखील आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही जुन्या कपड्यांसोबतच त्या मुलांना शैक्षणिक वस्तू देण्याचा निर्णय घेतला. तसेच सांघिक खेळांमध्ये तेथील काही मुले उत्तम होती. मात्र त्यांच्याकडे एकसारखे गणवेश नव्हते. म्हणून आम्ही त्यांना ते देऊ केले. आम्ही पाच जणांनी फेसबूकवरुन या प्रोजेक्टला सुरुवात केली होती. मात्र डहाणूमध्ये जवळपास ४५ स्वयंसेवक उपस्थित होते.ʼ त्यानंतर त्यांनी ठाण्यातील येऊर येथील अनाथाश्रमातील मुलांकरिता एक नव्या प्रोजेक्टची आखणी केली. त्यासाठीदेखील फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याकडे जवळपास ७४ हजार रुपये जमा झाले. त्या पैशातून त्यांनी येऊर येथील अनाथाश्रमातील मुलांना दोन महिने पुरेल, एवढे अन्नधान्य, त्यांचा साठा कऱण्यासाठी मोठे डब्बे दिले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील एका आश्रमातील मुलींकरिता नवे गणवेश आणि कडधान्ये दिली. या संपूर्ण प्रवासात एक अडचण म्हणजे आर्थिक मदत करणाऱ्या लोकांना पावती मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही संस्थेच्या नोंदणीचा निर्णय घेतला, असे रविंद्र चाचे सांगतात. या संस्थेला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नाही.

image


सध्या ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼ इगतपुरीतील कुरुंगवाडी गावाकरिता स्थानिक शाळेतील मुख्याध्यापक श्री तेल्लुरे सर यांच्या सहकार्याने आणि डहाणू मधील कोटबी गावातील खिंडपाडा बुजडपाडा यांच्या करिता स्थानिक शिक्षक शिवदर्शन वाले यांच्या सहकार्याने काम करत आहेत. याबाबत बोलताना रविंद्र चाचे सांगतात की, ʻया दोन्ही गावांना स्वावलंबी बनविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. जेणेकरुन स्थानिकांनी आम्हाला सांगावे की, आता आम्हाला मदतीची गरज नाही. इगतपुरीचा परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने खुप चांगला आहे. त्यामुळे तिथे स्थानिकांच्या मदतीने काही साहसी खेळ उपलब्ध करुन देता येऊ शकतात का?, याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यामुळे तेथील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच डहाणूमध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे तेथे ऑर्गेनिक शेतीचा आम्ही प्रय़त्न करणार आहोत. जेणेकरुन ते देखील स्वयंपूर्ण होतील.ʼ ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼच्या इतर प्रोजेक्टबद्दल बोलताना रविंद्र चाचे सांगतात की, ʻआमची कोल्हापूरची टीम शिये गावातील करुणालय नावाच्या एका आश्रमात मदत करते. त्या आश्रमात एड्सची लागण झालेल्या विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ते विद्यार्थी वारंवार आजारी पडत असतात. परिणामी त्यांचे शाळेचे फार नुकसान होते. ते टाळण्यासाठी आम्ही त्यांच्याकरिता ई-लर्निंगची सोय करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांकरिता आम्ही ʻएक भेट आपुलकीची, आपल्या नात्यापलीकडचीʼ हा उपक्रम राबविला होता. ज्यात आम्ही तळोजा येथील परमधाम नावाच्या वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळींना मुंबई दर्शनाकरिता घेऊन गेलो होतो. तसेच आम्ही त्या वृद्धाश्रमात ट्रान्झिस्टर आणि पेन ड्राईव्ह दिले होते, जेणेकरुन त्यांना विरंगुळ्याकरिता त्यांच्या आवडीची भजन-किर्तन ऐकता येतील. त्याशिवाय आम्ही दिवाळीकरिता ʻएक करंजी मोलाचीʼ हा उपक्रम राबविला. इगतपुरीतील कुरुंगवाडी या गावातील मुलांनी करंजी प्रत्यक्षात पाहिलीदेखील नव्हती, त्यांना फक्त ती चित्रात माहित होती. त्यामुळे अशा मुलांना आम्ही गेल्या वर्षी दिवाळीत करंज्या वाटल्या. गेल्या वर्षी सुरू केलेल्या या उपक्रमाची यावर्षी आम्ही कक्षा वाढवली. विशेष म्हणजे आमच्या महिला स्वयंसेवकांनी या प्रोजेक्टमध्ये भरपूर मेहनत घेतली. पाड्यात जो फराळ वाटपाचा उपक्रम आम्ही करणार होतो, त्यासाठी त्या सर्व महिलांनी विशेष मेहनत घेऊन वेळात वेळ काढून फराळ तयार केला होता.ʼ गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या या ʻफॅण्ड्री फाऊंडेशनʼबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास तसेच त्यांच्या या चळवळीत सहभागी व्हायचे असल्यास http://fandryfoundation.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

image


Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags