संपादने
Marathi

भिंतीमध्ये वाढलेल्या देशी झाडांच्या पुनःरोपणातून जैवविविधतेचे रक्षण करणारी ‘ग्रीन अम्ब्रेला’

Anudnya Nikam
26th Jan 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आपल्या मनमोहक फुलांनी पहाणाऱ्याच्या मनाला भुरळ पाडणारे गुलमोहराचे झाड तसे सर्वांनाच परिचित आहे. आपल्या देशात गुलमोहराला जवळपास २०० वर्षांचा इतिहास आहे. त्याच्या लाल, पिवळ्या, नारंगी सौंदर्याला भुलूनच जागोजागी हे वृक्ष लावले गेले, वाढविले गेले. अगदी एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटच्या माहितीपत्रकावरही गुलमोहराला आवर्जून स्थान मिळालेले असते. केवळ त्या कागदावरच नाही तर प्रत्यक्ष जमिनीवरही स्थानिक झाडांवर बुलडोजर फिरवून गुलमोहर लावला जातो. मात्र आपल्या देशात सर्रासपणे दिसणारा हा वृक्ष मुळचा आफ्रिका खंडातील मादागास्कर इथला आहे आणि या वृक्षामुळे अन्नसाखळीला धोका पोहचण्याबरोबरच जमिनीचा pH ( pH-जमिनीचे आम्ल आणि अल्कली गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य) सुद्धा कमी होतो हे क्वचितच कुणाला माहिती असेल. गुलमोहराप्रमाणेच इतरही अनेक विदेशी झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात केली जाते. जी अन्नसाखळीसाठी धोक्याची आहे. मात्र अज्ञानामुळे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण त्यांचेच संवर्धन करित आहोत. जे पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागचेही एक महत्त्वाचे कारण आहे. समाजातील हे अज्ञान दूर करण्यासाठी आणि वड, पिंपळ, पळस यासारख्या अगणित देशी वृक्षांना वाचवून अन्नसाखळीवर होणारा परिणाम रोखण्यासाठी विक्रम येंदे हा तरुण २००३ सालापासून प्रयत्नशील आहे.

image


विक्रम लहानपणापासूनच झाडांमध्ये रमायचा. त्यातही वडाचे झाड त्याला जास्त आवडायचे. त्यामुळेच अलिकडे वटपौर्णिमेच्या सणाला वेळे अभावी वडाची पूजा करायची सोडून वडाच्या फांद्या छाटून आणून घरी केली जाणारी फांद्यांची पूजा त्याला खटकायची. “एकदा मला इमारतीच्या गच्चीत भिंतीमध्ये वडाचं रोप आलेलं दिसलं. आता इमारतीला धोका नको म्हणून हे रोप काढून फेकून दिलं जाईल हे माझ्या लक्षात आलं. मी ते रोप भिंतीतून काढून वाढवायचं ठरवलं. खूप काळजीपूर्वक रोपाचं आणि भिंतीचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन मी ते रोप बाहेर काढलं आणि एका कुंडीत लावलं. पुढच्या वर्षीच्या वटपौर्णिमेला आईला हे रोप पूजा करण्यासाठी दिलं. माझ्या या कृतीतून मला खूप आनंद मिळाला आणि एक झाड वाचवल्याचं समाधानही,” विक्रम सांगतो.

image


तो पुढे सांगतो, “मी ठाण्यामध्ये लहानाचा मोठा झालो. लहानपणी शाळेतून येता-जाता खूप झाडं नजरेस पडायची. नंतर जसजसं इथल्या जमिनींवर बांधकाम वाढत गेलं तसतशी झाडांची संख्याही घटली. त्यामुळे परिसरातल्या पक्ष्यांची किलबिलसुद्धा कमी झाली. त्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी अनुभवलेल्या आनंदातून माझ्या मनात वृक्ष वाचविण्याची आणि त्यांचे पुनःरोपण करण्याची आवड निर्माण झाली. मी माझा मित्र योगेशशी याविषयी बोललो आणि त्यानेही या कामात रस दाखवला.”

वृक्षसंवर्धन करायचे म्हणून कुठले मिळेल ते झाड वाढवायचे हे विक्रमला मान्य नाही. म्हणूनच त्याने विविध झाडांचा अभ्यास सुरु केला आणि या अभ्यासामुळे एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे विक्रमचे लक्ष वेधले गेले. “विविध झाडांचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आले की देशी वनस्पतींचं प्रमाण दिवसेंदिवस खूप कमी होत चाललं आहे. आपल्या आसपास मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या गुलमोहर, निलगिरी, अॅकेशिया, सुबाभूळ, रेनट्री आणि पेल्ट्रो फोरम या वनस्पती मुळच्या आपल्या देशातल्या नाहीत आणि त्यामुळेच आपल्या इथल्या पर्यावरणाला आणि अन्नसाखळीलाही त्या उपयोगी नाहीत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर गुलमोहर हा वृक्ष सर्रास सगळीकडे आढळतो. मात्र साध्या जास्वंदावर येणाऱ्या किडीने गुलमोहर मरतं. गुलमोहरामुळे जमिनीचा Ph सुद्धा कमी होतो. हे झाड वादळामध्ये फार काळ टिकाव धरु शकत नाही. याउलट वडाच्या झाडावर चार ते पाच हजार जीवजंतू वाढतात. हे कीटक खाण्यासाठी तसंच वडाच्या झाडाची फळं खाण्यासाठी अनेक पक्षी या झाडावर येतात,” विक्रम सांगतो.

image


तो पुढे सांगतो, “या अभ्यासानंतर मी केवळ देशी झाडांचे पुनःरोपण करण्याचे ठरविले. हळूहळू आणखी पाच-सहा मित्र आमच्याबरोबर या कामामध्ये सहभागी झाले. आम्ही भिंतीमध्ये उगवलेली रोपटी सुव्यवस्थितपणे काढून ती पिशवीमध्ये लावू लागलो. वड, पिंपळ, उंबर अशा अनेक झाडांचं पुनःरोपण केलं. दरम्यान मी ‘हरियाली’ संस्थेबरोबर काही दिवस काम केलं. तिथे मी बियांपासून रोप तयार करायला शिकलो. त्यानंतर आमच्या कामाचा परिघ वाढत गेला. मी जंगलांमधून झाडांच्या बिया शोधून आणून त्यांच्यापासून रोप बनवायला लागलो. बघता बघता आमची नर्सरी तयार झाली. सुरुवातीला माझ्या इमारतीच्या गच्चीवर आम्ही ही झाडं ठेवली. चार-पाच झाडांवरुन हळूहळू जवळपास ५० झाडं झाली. मात्र इथे अडचणींना सुरुवात झाली. बिल्डिंगमधल्या लोकांनी ‘आम्हाला त्रास होतो’ असं म्हणत ही रोपटी गच्चीवर ठेवायला नकार दिला. मग आम्ही आमची नर्सरी बिल्डिंगच्या खाली पुढच्या बाजूला हलवली. तिथे नर्सरी असताना आमच्या रोपट्यांची संख्या ५० वरुन १०० पर्यंत गेली. मात्र काहीच दिवसात रहिवाशांनी त्या जागेवरही आक्षेप घेतल्यामुळे आम्ही बिल्डिंगच्या मागच्या कोपऱ्यात नर्सरी हलवली. मात्र तिथे रोपटी ठेवण्याचाही लोकांना त्रास होऊ लागला. तोपर्यंत आमच्या नर्सरीमध्ये जवळपास १५०-२०० रोपटी जमा झाली होती. दरम्यान ठाणा कॉलेजचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रोफेसर डॉ नागेश टेकाळे यांनी आम्हाला रेस्क्यू टीम सुरु करण्याबाबत सुचवलं आणि ‘ग्रीन अम्ब्रेला’च्या प्रवासाची सुरुवात झाली.”

image


‘ग्रीन अम्ब्रेला’ अंतर्गत सुरु असलेले या मित्रांचे काम खरोखरच कौतुकास्पद असले तरी‘टीम ग्रीन अम्ब्रेला’ला लोकांचा व महापालिकेचाही समाधानकारक पाठिंबा मिळाला नाही. विक्रम पुढे सांगतो, “बिल्डिंगमधील रहिवाशांच्या तक्रारींमुळे अखेर आम्हाला नर्सरी बिल्डिंग परिसरातून हलवावी लागली. पण एवढी झाडं ठेवावी एवढी मोठी जागा आमच्याकडे उपलब्ध नव्हती. मग कळवा खाडीजवळच्या मोकळ्या जागेत आम्ही ही झाडं ठेवली. नर्सरीला जागा मिळावी म्हणून मी महापालिकेकडेही मागणी केली होती. मात्र महापालिकेने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर काहीच दिवसात कळवा खाडीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत उद्यानाचं काम सुरु करण्यात आलं. आता इथूनही आम्हाला नर्सरी हलवावी लागणार हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी महापालिकेतील अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना एक कल्पना सुचवली आणि गार्डनमध्ये नर्सरीसाठीही जागा मिळविली.”

image


विक्रमला नर्सरीसाठी जागा मिळवून देणारी ही कल्पना होती ‘नक्षत्रवना’ची. “आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये २७ नक्षत्रांसाठी वेगवेगळे पूजनीय वृक्ष सांगितले आहेत. ते सगळे वृक्ष त्यावेळी माझ्या नर्सरीमध्ये उपलब्ध होते. मी त्या अधिकाऱ्यांना जाऊन हे वृक्ष लावून ‘नक्षत्रवना’ची संकल्पना राबविण्याची कल्पना सुचविली आणि ती त्यांनाही आवडली. मी त्या गार्डनमध्ये ‘नक्षत्रवन’ उभारुन दिले. त्यामुळे माझ्या नर्सरीतील झाडं तिथेच ठेवण्यासाठी जागाही मिळाली. मात्र पुन्हा संकट आ वासून उभं राहिलं. सहा महिन्यांपूर्वीच एका स्थानिक नगरसेवकाने स्वच्छतागृह बांधण्यासाठी त्या जागेवर बुलडोजर चालवला. काही झाडं बुलडोजर खाली गाडली गेली. काही त्या लोकांनी फेकून दिली. यामधून जी काही झाडं वाचली ती आता मी एका मित्राच्या मदतीने कोपरीतील दत्ताजी साळवी उद्यानात ठेवली आहेत,” विक्रम सांगतो.

विक्रमने कळवा उद्यानाप्रमाणेच आणखीही दोन-तीन ठिकाणी ‘नक्षत्रवन’ तयार करुन दिले आहे. आतापर्यंत त्याने जवळपास तीन हजार वृक्षांचे पुनःरोपण केले असून बियांपासूनही जवळपास तितकीच रोपे तयार केली आहेत. अनेक संस्था वृक्षारोपणाकरिता विक्रमकडून रोपटी घेऊन जातात. दोन वर्ष एका सहकारी बँकेच्या एका प्रोजेक्टसाठी त्याने झाडे पुरविली. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावण्यासाठीही वनखात्याला दोन वर्ष विक्रमने रोपे पुरविली. विशेष म्हणजे ही रोपे तो विनामूल्य पुरवितो.

image


“गावातील लोक जमिनी बिल्डरला विकतात आणि बिल्डर तिथे बुलडोजर चालवतो. अशावेळी तिथले अनेक स्थानिक वृक्ष जमिनदोस्त होतात. त्यामुळे तिथे येणारे पक्षीही काहीच दिवसात दिसेनासे होतात. अशा जमिनींवरील नैसर्गिक संपदा जमिनदोस्त करण्याऐवजी बिल्डरने या जमिनींवर स्थानिक वृक्षांच्या सहाय्यानेच हिरवाई फुलवावी. जेणेकरुन तिथे पक्ष्यांचा किलबिलाटही कायम राहिल,” असं विक्रम सांगतो.

वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविताना केवळ झाडे लावणे हे उद्दीष्ट न ठेवता अभ्यासपूर्ण पद्धतीने झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वनखाते, महापालिका आणि सर्वसामान्य नागरिकही ‘ग्रीन अम्ब्रेला’च्या पाठीशी सक्रियतेने उभे राहिले तर देशी वृक्षसंपदेचे संवर्धन करुन जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या विक्रमच्या निरपेक्ष प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि हरवलेल्या झाडांबरोबर हरवलेले पक्षीही पुन्हा परततील.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags