संपादने
Marathi

स्मार्ट उपकरणांच्या बाजारपेठेत मोठा बदल घडविण्याचे ऍटमबर्ग टेक्नॉलॉजीचे लक्ष्य

5th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आयआयटीचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोज मीना आणि सिबब्रता दास यांनी २०१२ मध्ये जेंव्हा ऍटमबर्ग टेक्नॉलॉजी (Atomberg Technology) सुरु केली, तेंव्हा त्यांच्यासमोर एक खास आणि सुस्पष्ट लक्ष्य होते. हे लक्ष्य होते उर्जा कार्यक्षमता आणि आयओटीसारख्या उदयोन्मुख ट्रेंडस् ना एकत्र आणून स्मार्ट, हुशार आणि एकमेकांशी जोडलेली अशी विद्युत उपकरणे बनविण्याचे... अर्थातच भारतातील उर्जा परिस्थितीचा विचार करुनच त्यांनी हे लक्ष्य निश्चित केले होते आणि त्याचबरोबर मुंबई स्थित या स्टार्टअपचा प्रयत्न होता, तो दोन प्रकाराच्या समस्यांना एक परिणामकारक उत्तर शोधण्याचा. भारतापुढील उर्जा संकट ही त्यामधील अर्थातच पहिली आणि अतिशय महत्वाची समस्या होती तर दुसरी होती ग्राहकांना सोयी-समाधान देणारी सर्वोत्कृष्ठ सेवा कशाप्रकारे पुरविता येईल ही तितकीच महत्वाची समस्या....

भारतापुढील उर्जा संकट – आज २२ टक्के भारतीयांना वीज उपलब्ध नाही. जर भारतातील सर्व पंख्यांच्या जागी गोरील्ला पंखे (हे ऍटमबर्गचे पहिले उत्पादन) बसविले, तर पाच कोटी भारतीयांना वीज उपलब्ध होऊ शकते, तेदेखील सध्याच्याच वीज निर्मिती पातळीवर...

ग्राहकांचे सोयीसमाधान – ऍटमबर्गच्या संस्थापकांच्या मते, भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरगुती उपकरणांमधून त्या दर्जाची सोय किंवा समाधान मिळताना दिसत नाही, ज्यासाठी ते सर्वार्थाने पात्र आहेत. त्याचबरोबर त्यांचा या गोष्टीवर संपूर्ण विश्वास आहे की, स्मार्ट, बुद्धिमान आणि एकमेकांशी जोडलेली अशा विद्युत उपकरणांची निर्मिती केल्यास, हा दर्जा कैक पटींने वाढू शकतो.

image


द गोरिल्ला पंखे आणि स्पर्धा

ऍटमबर्गचे गोरिल्ला पंखे हे भारतातील सर्वाधिक एनर्जी एफीशियंट अर्थात उर्जा-कार्यक्षम असे सिलिंग पंखे आहेत, जे केवळ २८ वॅटचा वापर करतात, जेंव्हा की बहुतेक सर्व इतर पंखे हे ७५ वॅट वीज वापरतात. या पंख्यांची आयआयटी बॉम्बेमध्ये यशस्वी चाचणी झालेले असून ते स्मार्ट रिमोटसह उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सध्या बाजारात असलेल्या पंख्यांमध्ये या पख्यांची वारा देण्याची क्षमता सर्वाधिक आहे. मात्र आतापर्यंत मिळालेल्या या यशानंतर सुस्तावून न बसता, ऍटमबर्गने नेक्स्ट जनरेशन स्मार्ट पंखे विकसित करण्याच्या कामाला यापूर्वीच सुरुवात केली आहे. एसीसह जोडलेले आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून नियंत्रित करता येतील अशा या पंख्यांवर त्यांचे काम सुरु आहे.

स्पर्धेबाबत बोलताना मीना सांगतात, “ आतापर्यंत ऍटमबर्गने बाजारात आणलेले एकमेव उत्पादन हे सिलिंग पंखे हेच असून, आमचे प्रमुख स्पर्धक हे हॅवल्स, ओरियंट आणि क्रॉम्पट ग्रीव्हज यांसारखे मोठे खेळाडू आहेत. पण तेदेखील आमचे थेट स्पर्धक नाहीत कारण ते सुपर एनर्जी एफिशियंट क्षेत्रात कार्यरत नाहीत. आमचा एकमेव थेट स्पर्धक आहे ती कोईमत्तुर स्थित सुपरफॅन ही कंपनी.”

उर्जा-कार्यक्षम, स्मार्ट घरगुती उत्पादनांची बाजारपेठ

उर्जा कार्यक्षम आणि स्मार्ट घरगुती उपकरणांसाठी खूपच मोठी आणि अगदी कमी वापर झालेली बाजारपेठ उपलब्ध आहे. फक्त पंख्यांसाठीच्या बाजारपेठेचा आकार हा चार हजार कोटी रुपये एवढा आहे. प्रत्येक वर्षी सुमारे चार दशलक्ष पंख्यांची भारतात विक्री होते. जर दर वर्षी प्रती पंखा १३०० रुपये वाचविण्याची क्षमता असेल, तर लोक या स्मार्ट आणि उर्जा कार्यक्षम पंख्यांकडे नक्कीच वळतील. ऍटमबर्गच्या संस्थापकांना असा विश्वास आहे की आज नाही तर उद्या संपूर्ण बाजारपेठेचा ताबा ही स्मार्ट उपकरणे घेतील, ज्यामुळे स्मार्ट आणि उर्जा कार्यक्षम उपकरणांना मोठी संधी उपलब्ध असेल.

ऍटमबर्गकडे सध्या वीस जणांची टीम असून त्यांनी आरती ग्रुप प्रमोटरकडून सीड राऊंड भांडवल उभारले आहे. त्यांच्या टीममध्ये प्रामुख्याने आयआयटी आणि आयआयएमचे पदवीधर आणि त्याचबरोबर सेल्स, उत्पादन आणि डिजाईन क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव असलेले तज्ज्ञही आहेत.

हार्डवेअर स्टार्टअपपुढील आव्हाने

“ भारतात हार्डवेअर स्टार्टअप्सच्या क्षेत्रात प्रवेश करण्यात अनेक अडचणी असल्याने येथे फारसे हार्डवेअर स्टार्टअप्स नाहीत. इंटरनेट स्टार्टअप्स मात्र सहज सुरु करता येतात आणि काही महिन्यात चांगल्या चालू शकतात, पण हार्डवेअर उत्पादने विकसित करणे मात्र खूपच अधिक आव्हानात्मक असते,” दास सांगतात. ते पुढे म्हणतात, “ मूळ नमुना तयार करण्यासाठी केवळ एक-दोन महिनेच लागतात, पण उत्पादन पूर्ण करणे हे खूपच आव्हानात्मक असते आणि वेळखाऊही... ठराविक कालमर्यादेत या उत्पादनात सुधारणा करण्याची दुसरी संधी अशी नसतेच. त्याशिवाय विक्रेत्यांचा सेट अप, गुणवत्ता प्रमाण, खरेदी आणि योग्य गुणवत्ता तपासणी प्रक्रिया यासारखी इतर आव्हानेही असतातच.”

प्रारंभिक काळात वापरलेली शक्ती आणि भविष्यातील योजना

“ आमच्याकडे यापूर्वीच ३००० युनिटस् मागणी आली असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आमचे वितरक आहेत. आमचे प्राथमिक लक्ष्य आहे ते येत्या दोन- तीन वर्षांत एक टक्का बाजारपेठ काबीज करण्याचे. ज्याचा अर्थ एका वर्षात सुमारे चार लाख युनिटस् ची विक्री...”

भविष्यातील योजनांचा विचार करता, उर्जा कार्यक्षम आणि स्मार्ट उपकरणांच्या क्षेत्रात पुढील दोन वर्षात अधिकाधिक उत्पादने आणण्याचा ऍटमबर्गचा प्रयत्न आहे. तसेच त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आणि नविन उत्पादनांचा विकास करण्यासाठी अधिक भांडवल मिळविण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

लेखक – सुशील रेड्डी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags