जेलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकलेला सी.ई.ओ.

जर कुणी तुमचा लॅपटॉप, मोबाईल काढून घेतला आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर त्याचा परिणाम चांगलाही होऊ शकतो, कदाचित तुम्ही जेलमध्ये लिहिलेल्या डायरीचं पुस्तक रुपाने प्रकाशनही होऊ शकतं !

जेलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकलेला सी.ई.ओ.

Wednesday August 19, 2015,

7 min Read

अगदी बॉलिवूडच्या चित्रपटात शोभेल अशी कथा. आजच्या काळातलं स्मार्ट, कॉर्पोरेट व्यक्तिमत्त. शिक्षण – अमेरिकेतील प्रतिष्ठित केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची डिग्री. सोशल स्टेट्स – अमेरिका रिटर्न. मोठ्ठा पगार, मोठं घरदार, सुंदर बायको, दोन गोंडस मुलं, दोन पाळीव कुत्रे तर दाराशी, दोन गाड्या. स्वप्नाप्रमाणे वाटावं असं खरंखुरं आयुष्य... पण सुसाट धावत असलेली भरभराटीची ट्रेन पुलावरून अचानक नदीत कोसळावी... मोकळ्या आकाशात चांदण्या रात्री फिरताना नेमकी वीज कोसळावी तशी घटना घडली. निष्कलंक आयुष्याला लागले आरोपांचे डाग. भारतीय दंड कायद्यानुसार कलम ३४, ४०६ आणि ४२० नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. थोडक्यात सांगायचे तर, आयुष्यातील पराकोटीचे विरोधाभास दाखवणारी ही कथा आहे चेतन महाजन यांची... ती ही मध्यांतराआधीची...सध्या चेतन हे नामांकित एचसीएल लर्निंग कंपनीच्या सी.ई.ओ. पदावर कार्यरत आहेत. 


जेलमधली शाळा

जेलमधली शाळा


वळूयात त्यांच्या आयुष्यातील तुरूंगवासाच्या घटनेकडे, त्यासाठी चित्रपटाप्रमाणे थोडंसं प्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. ते साल होतं २०१२ चे, जेव्हा चेतन महाजन यांना एवरॉनच्या डिव्हिजनप्रमुख पदाची ऑफर आली होती. एवरॉन ही शिक्षण संस्था आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ‘टॉपर्स’ नावाने कोचिंग क्लासेस चालवते.

‘टॉपर्स’ कोचिंग क्लासेसच्या ब्रँचेस अनेक ठिकाणी होत्या. मध्यपूर्वेच्या मोठ्या ग्रुप्सनी एकत्रित येऊन जेम्स ग्रुपची स्थापना केली होती. या जेम्स ग्रुपकडे एवरॉनची मालकी होती. एवरॉनच्या टॉपर्स या आयआयटीच्या कोचिंग क्लासेसनी बोकारो, झारखंडमध्ये चांगला जम बसवला होता. चेतन महाजन एवरॉनमध्ये रुजू झाल्यावर, अवघ्या ३ महिन्यांतच बोकारो केंद्रातील काही शिक्षक तीव्र स्पर्धेमुळे कोचिंग क्लास सोडून निघून गेले आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीची ठिणगी पडली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी परत करण्याची मागणी केली. या घटनेवेळी चेतन महाजन सगळ्यात सिनिअर होते, पण फी परत करण्याचे कोणतेही अधिकार त्यांच्याकडे नव्हते. त्यासाठी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी आवश्यक होती. शिक्षक नसल्याने होणारं विद्यार्थ्यांचं नुकसान, तर दुसरीकडे फी परत देण्याची पालकांची मागणी हा सगळा वाद विकोपाला गेला. आणि या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. त्यात पोलिसांनी हा कोचिंग क्लास बंद करून टाकू असं म्हणतं आगीत तेल ओतलं. त्यानंतर परिस्थिती मात्र खूपच चिघळली. इतकी, की चेतन महाजन यांना अटक झाली. ‘…गुडगाव इथे राहणारे डिव्हिजनल मॅनेजर चेतन महाजन यांना पळून जाण्याच्या प्रयत्नात असण्याच्या संशयावरून विद्यार्थी-पालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. २०० विद्यार्थांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या भारतीय दंड कलमाखाली महाजनांविरोधात गुन्हे नोंदवले…’ अशी बातमी दुस-या दिवशीच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये छापून आली.


द बॅड बॉईज ऑफ बोकारो जेल

द बॅड बॉईज ऑफ बोकारो जेल


अटक तर झाली पण त्याहून वाईट म्हणजे ती २४ डिसेंबरला झाली. चेतन महाजन यांना बोकारोच्या चास मंडल कारागृहात नेण्यात आलं. अंगावर राल्फ लॉरेन जॅकेट आणि अल्दो कंपनीचे महागडे शूज अशा पेहरावात ते तुरूंगात पोहोचले. उद्यापर्यंत किमान जेलमधून बाहेर पडू, अशी आशा त्यांना वाटत होती. पण २४ डिसेंबरची अटक वाईट यासाठीच होती की, २५ डिसेंबरपासून नाताळच्या सुटट्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे चेतन महाजन यांना त्यांची केस कोर्टात येण्यासाठी अनेक आठवडे वाट पाहावी लागली. आपलं मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवण्यासाठी, त्यांनी जेलमध्येच दैनंदिनी लिहायला सुरुवात केली. आणि त्या दैनंदिनीला 'द बॅड बॉईज ऑफ बोकारो जेल' या नावाने ‘पेंग्विन इंडिया’ने अलीकडे पुस्तक रुपात प्रकाशित केलं. पूर्णपणे वेगळ्या दुनियेत, महिन्याभराचा खडतर कारावास, जेलमधलं ते महिन्याभराचं वास्तव्य, तेही अनोळखी आणि सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या असणा-या कैद्यांसोबत – काहींवर गंभीर गुन्ह्याचे आरोप, तर काहींवर फसवणूक, खून, बलात्कार, हुंडाबळी असे गुन्हे दाखल. आयुष्यभर मार्गदर्शन करेल अशी वैचारिक दिशा त्या महिन्याभरातल्या कैद्यांसोबतच्या सहवासात मिळाली. थोडक्यात अध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर ख-या जीवनाचा साक्षात्कार झाला. कारावासाच्या अनुभवानंतर आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू क्षितिजावर दिसू लागलीत. रोजच्या जगण्यात प्राधान्य कशाला द्यावं आणि कशाला टाळावं हे देखील स्पष्ट होऊ लागलं.

चेतन महाजन यांच्या तुरूंगवारीच्या घटनेने काही लोकांना त्यांच्याशी पूर्वीप्रमाणे बोलणं आता कठीण वाटतंय. त्यांना कुठेतरी आतून वाटतंय, की ही व्यक्ती महिनाभर आतमध्ये होती म्हणजे नक्कीच काहीतरी चूक केली असणार. आजच्या युअरस्टोरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने चेतन महाजन यांनी त्यांना कारागृहात उमजलेलं जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आपल्या सोबत शेअर केलंय...

तुमच्या कारागृहातल्या अनुभवानंतर तुम्ही आता मॅनेजर म्हणून पूर्वीपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहात?

हा अनुभव थोडासा विचित्र आहे कारण हा अनुभव दोन भिन्न प्रकारचा आहे, त्यातही अनुभवाचे हे दोन्ही प्रकार परस्परांच्या अगदी विरुद्ध आहेत. पहिल्या प्रकारात, मी लोकांबद्दल मला माहीत असलेल्या चिमूटभर माहितीच्या आधारे त्यांच्याबद्दल मत बनवत नाही. मला नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्यायचे असते आणि मगच त्याबद्दल निर्णय करायचा असतो. फक्त एकाच प्रकारच्या माहितीच्या आधारे एखाद्याचं व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव ठरवणे हे त्या व्यक्तीवर अन्यायकारक ठरेल.

त्याचवेळी दुस-या प्रकारच्या अनुभवात, मला जाणवतं की मी आता खंबीर झालोय. कधी-कधी मला असे काही निर्णय घ्यावे लागतात जे घेणे मानवतेच्या दृष्टिकोनातून खूप कठीण असतात. कदाचित मी कधी-कधी कंपनीत चांगल्या उमेदवाराला बढती द्यायला असमर्थ असतो, तर कधी परिस्थिती नेमकी याउलट देखील असते. जेव्हा मला कोणाला नोकरी सोडण्यास सांगायचे असायचे, त्यावेळी मला मानसिक पातळीवर खूप त्रास व्हायचा. पण, आता तो त्रास सहन करणे मला शक्य होऊ लागलंय. ते कठीण आहे. मला हे माहित आहे, की आयुष्य सर्वांसाठी सर्व वेळ सोप्पं नसतं. पण, हे सर्व अवलंबून असतं ते त्यावेळच्या तुमच्या व्यक्तिमत्त्वावर. डायर स्ट्रेट्स नेमका हेच सांगतोय:

“कधी तुम्ही गाडीची पुढची काच असता...

तर कधी त्या काचेवर बसलेला कीडा”

तुमची नोकरी जाणे ही जगातली सगळ्यात वाईट गोष्ट नाहीय. त्यापेक्षाही वाईट गोष्टी आयुष्यात घडू शकतात.

तुमच्या जेलच्या अनुभवातील अशा ३ गोष्टी सांगा ज्या तुम्ही केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये कधीच शिकू शकला नसता.

- जर कुणी तुमचा लॅपटॉप, मोबाईल काढून घेतला आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर त्याचा परिणाम चांगलाही होऊ शकतो, कदाचित तुम्ही जेलमध्ये लिहिलेल्या डायरीचं पुस्तक रुपाने प्रकाशनही होऊ शकतं!

- भारतीय कायद्यात खोलवर झिरपत असलेला भ्रष्टाचार रोखण्याचे प्रभावशाली मार्ग.

- झारखंड पोलिसांना मी समजवू शकतो, की कंपनीच्या मॅनेजमेंट बोर्डावर नसलेली व्यक्ती ही त्या कंपनीच्या कोणत्याही कायदेशीर बाबीला जबाबदार नसते. आणि मीडियाच्या दबावामुळे निर्दोष व्यक्तीला अटक करण्यासारखा दुसरा गुन्हा नाही.

तुमच्या जेलच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला रोजच्या कामात कसा होतो?

- खेडेगावातील किंवा किंमतवर आधारित बाजारपेठेसाठी प्रोडक्ट डिझाईन करत असताना, मला त्या भागातील लोकांची विचार करण्याची पद्धत माहीत झाल्याने निर्णय घ्यायला फायदा होतो.

मी चांगल्या प्रकारे लिहू लागलोय.

जेलप्रकरणामुळे तुमच्या करिअरमधला तुम्ही पार केलेला सगळ्यात मोठा अडथळा कोणता?

खरं म्हणजे एचसीएल ही चांगली कंपनी आहे. ते मला कंपनीच्या बोर्डावर सामावून घेण्यासाठी अनुकूल होते. त्यांची फक्त एकच अट होती – जी अगदी योग्य होती, ती अट म्हणजे माझ्यावर सुरू असलेले खटले संपुष्टात यावेत. एका अर्थाने ते बरोबर सुद्धा होतं. कोणत्याही कंपनीला कायदेशीर खटला चालू असलेल्या व्यक्तीला कामावर ठेवणं हे पटण्यासारखं नव्हतं. २०१३ मध्ये माझ्यावरचे सगळे खटले कोर्टाने रद्द केले,

मग मी लगेच एवरॉनचा राजीनामा दिला आणि एचसीएलमध्ये रूजू झालो.

तरीही, माझ्या जेलप्रकरणानंतर मला जाणवलं की, काहीजण माझ्याकडे अजूनही वेगळ्या नजरेने पाहतात. कित्येकजण अजूनही माझ्या नजरेला नजर भिडवून बोलायला कचरतात. जणूकाही मी जेलमध्ये जाऊन आलोय ही गोष्ट त्यांना अजूनही अस्वस्थ करतेय. मी माझ्या पुस्तकात माझ्या अनुभवाचं वास्तव मांडलंय. पण तरीही कुठेतरी त्यांना अजूनही वाटतंय की जर ह्याने एक महिना जेलमध्ये काढलाय, तर याने नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असणार!

जेलच्या अनुभवाने तुमचा जगाकडे आणि समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, असं तुम्हाला वाटतं का?

- मला वाटतं, की मला आयुष्यातल्या लहान-सहान गोष्टींमधलं सुख उमजू लागलंय आणि मी त्याचा आनंद घेऊ लागलोय. जेलमधून सुटल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या आवडीचं जेवण हॉटेलमध्ये ऑर्डर केलं, त्यावेळी तर मला खूप मोठं सुख गवसल्याचं समाधान मिळालं. मुलांनी मारलेली मिठी तर अमूल्य होती. आताही मी अनेक छोट्या गोष्टींची पूर्वीपेक्षा जास्त कदर करतो. आणि या सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं असेल तर माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणे.

आता काही गोष्टी मी ग्राह्य धरू लागलोय, जर अशी अनेपक्षित दुर्दैवी घटना माझ्यासोबत घडू शकते, तर यापेक्षाही खूप चांगली किंवा खूप वाईट गोष्ट कधीही घडू शकते. हेच माझ्यासाठी जास्तीत जास्त वर्तमानात जगण्यासाठी प्रेरणादायी आहे. आतापासून १० वर्षांपर्यंतच्या गोष्टींचं नियोजन करण्यात काहीच अर्थ नाही. ती वेळ कदाचित येणारही नाही. मला माझं आयुष्य वर्तमानकाळात शक्य तितकं जगायचं आहे; कारण वर्तमानकाळ हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे.

वाचकांना तुमच्या पुस्तकातून तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता?

जसजसं तुम्ही वाचत जाल तसतसं तुमच्या लक्षात येईल, की हे पुस्तक हे दैनंदिनीप्रमाणे आहे. ते लिहीत असताना माझ्या डोक्यात कोणतीही संकल्पना नव्हती, कोणती कथा नव्हती. त्यात आहे तो फक्त रोज घडलेल्या दिवसाचा घटनाक्रम. म्हणून माझ्या डोक्यात वाचकांना देण्यासाठी कोणताही संदेश नाहीये. हे आलकेमिस्टप्रमाणे जीवनाचं कोणतंही तत्त्वज्ञान सांगणारं पुस्तक नाहीये. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बघितल्यास प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत काही ना काही वेगळं दिसतंच; तसं काहीसं या पुस्तकाच्या बाबतीत घडतंय अस म्हणायला हरकत नाही. बहुतेकांना वाटतंय की माझ्या तुरूंगवास प्रकरणावर पुस्तक निघणे हे माझ्या जीवनातल्या यशाचं प्रतिबिंब आहे. कठीण काळात चांगलं शोधण्याची वृत्ती जोपासता आली पाहिजे. काहींना तर माझं तुरूंगात जाणंसुद्धा खूप महत्त्वाचं वाटलं. या अनुभवातल्या शिकवणीतून माणुसकीवरचं प्रेम आणखी घट्ट झालं आणि मनाच्या अंधारलेल्या गाभा-यात जाणिवेची ठिणगी पडली की तुरूंगातले सगळेच कैदी हे राक्षस नाहीयेत, तर तीही संवेदनेने, भावनेने आणि अद्भूत शक्यतेने काठोकाठ भरलेलेली माणसंच आहेत.

आणखी एक जाणीव मनाला झालीय, तुरूंगाबाहेर असूनही आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या बंदिवासातच जगत असतो. हा तुरूंग असतो आपल्याभोवती लादलेल्या वेगवेगळ्या मर्यादांचा. आणि आपण सर्व या मर्यादेच्या तुरूंगातून सहीसलामत सुटू शकतो, गरज आहे ती आयुष्याकडे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची.

तुमच्या आयुष्यातील मर्यादांच्या कोणत्या तुरूंगातून तुम्हाला बाहेर पडायला आवडेल?