संपादने
Marathi

अनाथांच्या नाथा तुज नमो! गरिब मुलांचा ‘मसिहाँ मानव’

Chandrakant Yadav
13th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘‘मै तो अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग आते गये और कारवाँ बनता गया!’’

विख्यात उर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांच्या या ओळी. तरुण गुप्ता यांच्या जीवनकथेला तंतोतंत लागू पडतात. देशाच्या राजधानीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ते अनाथ आणि निराधार मुलांसाठी आधार केंद्र चालवतात. २००६ मध्ये सेवेची ही साखळी सुरू झाली. मुलाला वाढदिवसानिमित्त ज्या काही भेटवस्तू मिळाल्या, त्या सर्व गरिब मुलांमध्ये वाटप करण्याचा उपक्रम या वर्षात राबवला. दरवर्षीच ते हा उपक्रम घेऊ लागले. उपक्रमाने पुढे मोहिमेचे रूप धारण केले. लोक आपला सहभाग नोंदवू लागले. सहभाग वाढत गेला आणि ‘कारवाँ’ बनत गेला… अनाथ आणि निराधार मुलांसाठी ‘प्रेरणा सेवा संस्थान’ हे आधार केंद्र आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’मध्ये या ‘कारव्या’ची परिणती झाली.

वेळ पुढे सरकत गेला आणि सेवाकार्य वाढत गेले त्या ओघात तरुण गुप्ता कधी ‘आचार्य तरुण मानव’ म्हणून ओळखले जाऊ लागले, त्याचा स्वत: त्यांनाही पत्ता लागला नाही. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी म्हणून गाझियाबाद पोलिसांनी चालवलेल्या ‘ऑपरेशन स्माइल’ या मोहिमेत तरुण गुप्ता यांचा व त्यांच्या संस्थांचा सक्रिय सहभाग होता. पोलिसांची मोहीम फत्ते होण्यात या सहभागाची मोलाची भूमिका होती. तरुण यांनी ‘सेल्स आणि मार्केटिंग’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलीय. पुढे ‘मॅन पॉवर कन्सल्टन्सी’ चालवली. कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कितीतरी बड्या कंपन्यांना ते कर्मचारी पुरवत. यादरम्यान त्यांना पुत्ररत्न झाले. मुलाच्या आगमनाने तरुण यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. मुलाच्या वाढदिवसाला गरजू मुलांसाठी उपक्रम राबवत असतानाच मुलांसाठीच्या सेवाकार्याच्या वर्तुळाचा व्यास वाढवत नेण्याचे त्यांनी ठरवले होते. पुढे अशा मुलांच्या सेवेतच त्यांनी जीवनम् समर्पयामी केले.

image


सुरवातीच्या काळाबद्दल बोलताना तरुण सांगतात, ‘‘मुलाचा जन्म झाला तसे आमच्या घरात खुळखुळ्यापासून ते झबल्यांपर्यंत ढिग लागलेला होता. मी या वस्तू माझ्या कार्यालयाजवळील झोपडपट्टीत वाटायला सुरवात केली. थोड्या दिवसांनी माझ्या वर्तुळातल्या लोकांनीही घरातले जुने कपडे, विनावापराचे सामान असे या मुलांना द्यायला सुरवात केली.’’

झोपडपट्टीतील मुलांसमवेत तरुण यांचा सहवास वाढत गेला तशी त्या मुलांबद्दलची सहवेदनाही वाढत गेली. झोपडपट्टीतील मुलांची दयनीय अवस्था पाहून, अगदी साध्या-साध्या गोष्टींसाठी या मुलांना तरसताना पाहून तरुण करुणरसात नखशिखांत बुडाले. मुलांसाठी काम करणाऱ्या ‘बचपन बचाओ’ संस्थेशी त्यांनी संपर्क केला. नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांची ही संस्था. संस्थेचे उपांग असलेल्या ‘चाइल्ड राइट ॲअॅडव्होकसी’साठी (बाल्याधिकार समर्थन) तरुण यांनी स्वयंसेवक म्हणून कार्याला सुरवात केली.

तरुण सांगतात, ‘‘त्यावेळी ‘बचपन बचाओ’ चळवळीत सहभागी होऊन गरिब आणि अनाथ मुलांसाठीच्या सरकारी योजना मी समजून घेतल्या. किंबहुना त्यावरच लक्ष केंद्रित केले. आम्ही विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेतली. योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाही, ही धक्कादायक बाब लक्षात आली. आम्ही सातत्याने संबंधित शासकीय विभागांशी तसेच संबंधित मंत्रालयांशी संपर्क साधू लागलो. बाल हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणे एनसीपीसीआर आणि एनएचआरसीच्या समोर मांडू लागलो. बाल हक्कांसाठी भांडू लागलो.’’

image


बालहक्कांचा हा लढा काही दिवस सुरू ठेवल्यानंतर लक्षात आले, की देशभरातून मोठ्या संख्येने बेपत्ता होणाऱ्या मुलांची माहिती संकलित करणारी तसेच ती उपलब्ध करून देणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाहीये.

तरुण सांगतात, ‘‘आमच्या देशात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात. आम्ही लक्ष घातले नव्हते तोवर बेपत्ता मुलांचा कुठलाही मध्यवर्ती डाटा उपलब्ध नव्हता. हे लक्षात घेऊन मी ‘मिसिंग चिल्ड्रेन ऑफ गाझियाबाद’चे प्रकाशन सुरू केले. वर्षनिहाय जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलांचा हा डाटा त्यात उपलब्ध असे. २०१२ मध्येही प्रकाशन केले आणि त्यासह अनाथ मुलांना आधार देण्यासाठी ‘ज्वुवेनाइल जस्टीस ॲअॅक्ट’अंतर्गत एका बाल आश्रमाची नोंदणी केली. गाझियाबादमधले हे पहिले आधार केंद्र होते.’’

शिवाय भीक मागणाऱ्या आणि रस्तोरस्ती कचरा गोळा करणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ‘डे केअर सेंटर’ सुरू केले. विवेकानंद नगर भागात हे केंद्र सुरू आहे. केंद्रात सध्या ४५ नोंदणीकृत मुले आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या प्राथमिक उपचाराकडेही लक्ष पुरवले जाते. ऋतुनिहाय कपडेवाटप, दातांची निगा, नेत्र-तपासणी असे उपक्रमही या मुलांसाठी घेतले जातात.

image


गाझियाबादेतील कवीनगर परिसरात एका भाड्याच्या घरात सध्या ‘प्रेरणा परिवार बाल आश्रम’ सुरू आहे. अनाथ आणि निराधार मिळून २६ मुले या आश्रमात राहात आणि शिकत आहेत.

तरुण म्हणतात, ‘‘सुरवातीला समस्या आल्या. आश्रम सुरू करण्यासाठी जागा आणि निधी ही तर सर्वांत मुख्य अडचण होती. बरं सरकारी अनुदान आम्हाला मिळत नाही.

समाजातल्या दानशूर लोकांनी केलेल्या मदतीच्या बळावर जगन्नाथाचा हा गाडा चालतो आहे.

आमच्याकडची १८ मुले खासगी शाळांमळून शिकताहेत, हे विशेष! सर्वांची फी वेळेत अदा केली जाते. मुलांना उत्तमोत्तम सुविधा पुरवण्याकडे आमचे लक्ष असते. ही मुलेही शेवटी देशाचे भविष्य आहेत. एक जबाबदार भारतीय म्हणून स्वत:च्या पायावर ते उभे राहिले पाहिजेत, हाच आमचा हेतू आहे.’’

‘‘लोकसहभागातून लवकरच राष्ट्रीय राजमार्ग २४ वर आश्रम उभा राहणार आहे. ४५ लाख रुपये मोजून इथे जागा विकत घेऊन झालेली आहे. जागा खरेदी करण्यासाठी मी स्वत:ची दुकानेही विकून टाकली. बांधकाम लवकरच सुरू होईल. जवळपास अडीच कोटी रुपये खर्च त्यासाठी येईल, असा अंदाज आहे.’’ हे नमूद करताना तरुण यांना साहजिकच समाजातल्या दानशुरांकडून मदतीची अपेक्षा असतेच.

‘बचपन बचाओ’चे कैलाश सत्यार्थी हे तरुण यांचे आदर्श आहेत. तरुण हे इतर लोकांना योगासनाचे धडेही देत असतात म्हणूनही त्यांना आचार्य हे बिरुद बिलगडलेले आहे. तरुण यांचा जाती-पातीवर अजिबात विश्वास नाही. मानवता हाच सर्वोच्च धर्म आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. ‘आचार्य तरुण मानव’ हे नवे नाव अर्थातच त्यांना उगीच पडलेले नाही!

image


भीक मागणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या आणि अन्य भटकलेल्या मुलांच्या पुनर्वसनातही तरुण गुप्ता सक्रिय असतात. आपल्या वर्तुळातील सर्वांनाच ते बाल हक्कांबद्दल जागरूक करत असतात. बालमजुरीविरुद्ध लढ्यातही त्यांचा सहभाग असतो. माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने ते बाल कामगारांना मुक्त करतात आणि मुख्य प्रवाहात आणून सोडण्यासाठी जिवाचे रान करतात. कितीतरी मुलांना त्यांची अशी मदत झालेली आहे.

भेटीचा शेवटही आचार्य तरुण मानव कवितेच्या एका ओळीने करतात. या ओळी म्हणजे आचार्य तरुण मानव यांच्यासाठी जीवनविषयक तत्वज्ञानच आहे. तरुण यांनी सादर केलेल्या उर्दू कवी निदा फाजली यांच्या या ओळी अशा…

‘‘घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें,

किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये.’’

रडत-विव्हळत असलेल्या मुलांना हसवणे ही परमेश्वराला सर्वाधिक प्रिय असणारी प्रार्थना होय, हा या ओळींचा भावार्थ.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags