अवघे ८२ वर्षे वयमान, पंचवटीच्या अन्नपूर्णेची कहाणी : 'सीताबाईची मिसळ' !
वयाची चाळीशी ओलांडल्या नंतर अनेक तरुण तरुणींना विविध व्याधी जडलेल्या आपल्याला दिसून येतात. घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळत महिला तर वयाच्या पस्तिशीतच पन्नाशीच्या दिसू लागतात. त्यातच घरचा कर्ता नसेल आणि महिलेला ती जबाबदारी पार पडावी लागत असेल तर कुटुंबाची परवड होते. मात्र ८२ वर्षाच्या सीताबाईना बघितलं तर त्यांचा उत्साह तरुणांना लाजवतोय.
वय वर्ष ८२ असलेल्या सीताबाई नाशिक शहरात एक हॉटेल चालवितात. सिताबाईची मिसळ या नावाने त्या नाशिकच्या भद्रकाली आणि पंचवटी परिसरात प्रसिध्द आहेत.. स्वातंत्र्यापूर्वी लग्ना नंतर सीताबाई यांच्या पतीला मोठ्या आजाराने ग्रासले होते आणि शरीराची लाहीलाही होत असल्याने त्याच्या पतीला काम करणे शक्य नव्हते. नंतर पतीचा मृत्यू झाल्याने घरातील सर्व जबाबदारी सीताबाई यांच्यावर आली. घर खर्चासाठी दुध व्यवसाय सुरु करण्यात आला. सीताबाई यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सीताबाईवर असल्याने त्यांनी मुलांना सांभाळत असताना दुध व्यवसायही केला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण केले.
काही वर्षा नंतर सीताबाई यांनी दुध व्यवसाय करताना स्वतःचे हॉटेलही सुरु केले. या हॉटेलमध्ये सुरवातीला ग्राहकांसाठी शेव तयार करण्यात आली. नंतर मिसळ मिळू लागली आणि सीताबाईची मिसळ या नावाने प्रसिद्धही झाली. सीताबाई दररोज पहाटे पाचला उठून अकरापर्यंत हॉटेल चालवायच्या आणि नंतर घरकाम आणि पुन्हा संध्याकाळी व्यवसाय असा दिनक्रम गेल्या पन्नास वर्षांपासून सातत्याने सुरु आहे.
सीताबाईं यांचा एक मुलगा महापालिकेत नोकरीला आहे तर दुसरा नासिक करन्सी प्रेसमध्ये काम करतोय. सिताबाईंचे जावई पोलीस उपनिरीक्षक आहे. नातू पणतू झाले तरी तितक्याच हिरीरीने त्यांचं काम आजही अव्याह्तपणे सुरुच आहे. मिसळव्यतिरिक्त त्यांची शेवप्रसिध्द आहे. आजही कुठला कामगार हाताशी न घेता त्या या वयात स्वतः गरम तेलात शेव काढण्याचं काम करतात. जबाबदारीच भान आजही त्यांचे हात थरथरु देत नाहीत. त्यांची मिसळीची चव आज ही तशीच आहे आणि अजूनही मिसळ खाण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली असते.त्यांच्या हातावरील चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या या अपार कष्टाचं द्योतक आहे .
आतापर्यन्त आलेल्या सर्व संकटावर मात करीत सीताबाई यांनी आपला व्यवसाय उभा केलाय. कितीही संकटे आली तरी अपार कष्ट आणि जिद्दीने त्याच्यावर यशस्वीपणे मात करता येते हे सिताबाईनी आपल्या मेहनतीने दाखवून दिले आहे. महिला व्यावसायिकानो, नाशिकच्या दंडकारण्यातील सीतेला नक्की भेट द्या आणि सीताबाईच्या मिसळीची चव चाखून तर पहा.