संपादने
Marathi

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणारी स्त्री हितवर्धिनी संस्था 'घरोबा'

Ranjita Parab
23rd Jan 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराकरिता प्रेरित करण्यासाठी 'घरोबा' ही स्त्री हितवर्धिनी औद्योगिक सहकारी संस्था कार्यरत आहे. दक्षिण मुंबईतील कामगार परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग येथे गेली ५० वर्षांपासून ही संस्था कार्यरत असून, महिलांना गृहउद्योग, स्वयंरोजगाराकरिता प्रोत्साहन ही संस्था देते. समाजसेविका कमलाताई विचारे यांनी १९६५ साली या संस्थेची स्थापना केली. प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कल्पनेतून सुचलेले 'घरोबा', हे नाव या संस्थेला साजेसे आहे. विशेष म्हणजे, आशिया खंडात महिलांनी एकत्र येऊन चालवलेले हे पहिले भांडार, अशी या संस्थेची खास ओळख आहे. सद्यस्थितीला उर्मिला पडवळ या संस्थेच्या अध्यक्षा असून, गेली २५ वर्षे त्या या पदाची धुरा सांभाळत आहेत. याशिवाय या संस्थेत जवळपास १०० महिला सदस्या कार्यरत आहेत.

image


१९६५ साली सुरुवात झाल्यापासून कालागणिक 'घरोबा'च्या कक्षा रुंदावत गेल्या. परिस्थितीने खचलेल्या, काही कारणास्तव कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्विकारावी लागलेल्या अनेक महिलांनी 'घरोबा'ला घरपण दिले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे विविध उपक्रम 'घरोबा'ने आजवर यशस्वीरित्या राबवले. त्यापैकी महत्वाचे उपक्रम म्हणजे;

 घरोबा वस्त्र भांडार - 'घरोबा' संस्थेचा हा उपक्रम १९९६ सालापासून यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. शिवणकामाचे ज्ञान असलेल्या महिलांना 'मॅक्सी' शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांनी शिवलेल्या मॅक्सी नंतर वस्त्र भांडारात किंवा अन्य ठिकाणी विकण्यात येतात. या उपक्रमाद्वारे ५०हून अधिक महिलांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले.

image


 घरोबा अन्न विक्री केंद्र - 'घरोबा' संस्थेच्या सदस्या असलेल्या भगिनींनी स्थापन केलेल्या 'पंडिता रमाबाई बचत गटा'ने संस्थेच्या स्वतंत्र दालनात २००७ साली अन्न विक्री केंद्रास सुरुवात केली. 'घरोबा' अन्न विक्री केंद्रास सुरुवातीपासूनच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सुरुवातीलाच त्यांना नजीकच्या 'सिप्ला' कंपनीतील ८० कर्मचाऱ्यांना दररोज जेवण पुरवण्याचे काम मिळाले. त्यानंतर इतर स्थानिक कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी दैनंदिन आहारकेंद्राचीदेखील सोय केली. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे मोदक, पुरणपोळी, आंबोळ्या, घावणे, थालीपीठ यांसारख्या पदार्थांचा सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. वाढत्या मागणीनुसार अन्न पदार्थांच्या वाढीव निर्मितीकरिता त्यांनी इच्छुक महिलांना पाककलानिपुण महिलांकडून प्रशिक्षण दिले.

image


 कामाठीपुरा येथील महिलांना प्रशिक्षण – अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 'घरोबा'च्या अध्यक्षा उर्मिला पडवळ यांच्या प्रोत्साहनाखाली आणि मार्गदर्शनाखाली स्वयंरोजगाराचे वर्ग चालवण्यात येतात. त्यात त्यांना आईस्क्रिम बनवणे, मोगलाई आणि चायनीज पदार्थ बनविणे, अगरबत्ती बनविणे यांसारख्या उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 अपंगांना आधारगृह – मुंबईतील माटुंगा परिसरात 'पॅरेप्लेजिक फाऊंडेशन' ही अपंगाना कृपाछत्रात ठेवणारी संस्था कार्य़रत आहे. या संस्थेच्या आग्रहास्तव 'घरोबा' या संस्थेने त्यांना मदतीचा हात पुढे केला. या संस्थेतील अपंग मुलींना 'घरोबा' संस्थेतील स्त्रियांनी शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. तसेच त्यांना मॅक्सी शिवण्यात पारंगत करुन रोजगाराचे एक दालन त्यांच्याकरिता उघडले.

 प्रदर्शने – महिला उद्योजकांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तसेच त्यांच्याद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने ग्राहकांच्या सोयीनुसार विविध ठिकाणी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. पुर्वनियोजित प्रसिद्धीच्या आधारे ही प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. परळ, दादर, चिंचपोकळी, काळाचौकी, भायखळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली प्रदर्शने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महानगरापासून दूरवर असलेल्या परिसरातदेखील अशाचप्रकारची प्रदर्शने आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे.

image


 खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी प्रदर्शनीय ट्रॉली – महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ इतर ठिकाणी विक्रीला नेता यावे म्हणून काचेच्या कपाटाची छोटी ट्रॉली या संस्थेने बनवून घेतली आहे. या ट्रॉलीचा वापर करुन अनेक महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे.

 दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे निर्मिती कौशल्य – महिलांच्या अंगीभूत असलेल्या उद्योजकतेचा कल्पक आणि शास्त्रशुद्ध विकास घडवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी 'घरोबा' संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचे वर्ग आयोजित करण्यात येतात. मोत्यांचे आकर्षक दागिने तयार करणे, अत्तर-सेंट निर्मिती, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, कपडे धुण्याचा साबण तयार करणे, यांसारख्या अनेक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षण वर्गांना तसेच प्रात्यक्षिकांना अनेक महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभतो.

याशिवाय शाई उद्योग, स्टॅम्प पॅड निर्मिती, पारिचारीका, रुग्णसेवा सुश्रुषा कलाशास्त्राचे प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण वर्ग, निसर्गोपचार शिबीर यांसारख्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय 'घरोबा' या स्त्री हितवर्धिनी औद्योगिक सहकारी संस्थेत कार्यरत असलेल्या महिलांकरिता विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. त्यात प्रामुख्याने सदस्य महिलांकरिता शैक्षणिक सहली (ज्यात अभ्यासपूर्ण सहलींचे आयोजन केले जाते), वैद्यकिय तपासणी, बालसंस्कार वर्ग यांचा उल्लेख करावा लागेल. 'घरोबा'मध्ये आलेल्या महिलांचे सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक आणि संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला पडवळ या समुपदेशन करतात. त्यानंतर त्यांना त्यांच्यातील अंगभूत कलांनुसार प्रशिक्षण देऊन अधिक कल्पक बनवण्यात येते. त्यानुसार नंतर त्यांना स्वयंरोजगाराकरिता तयार केले जाते. प्रतिदिन २० हजारांची उलाढाल घरोबामध्ये होते. घरोबामध्ये येऊन किंवा त्यांच्या सहकार्याने अनेकांनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे.

image


image


घरोबाचा आजवरच्या प्रवासाबद्दल अध्यक्षा उर्मिला पडवळ सांगतात की, 'गेली २५ वर्षे मी या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळते आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची अडचण मी समजू शकते. आमच्याकडे येणाऱ्या महिला या स्वयंरोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठीच आलेल्या असतात. आमच्या मार्गात आजवर अनेक अडचणी आल्या असतील. मात्र त्या अडचणींवर मात करत पुढे जाणे, हेच जीवन आहे. तुमच्या वतीने मी सर्वच स्तरातील महिलांना आवाहन करू इच्छिते की, जर कोणाला स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन किंवा मदत हवी असल्यास त्यांनी निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना शक्य तेवढी सर्व मदत करू. शेवटी 'स्त्री ही स्त्रीची खरी मैत्रीण' असते.', असे त्या सांगतात. घरोबा या स्त्री हितवर्धिनी संस्थेच्या आजवरच्या प्रवासावर मॅजिक अवर क्रिएशन्सने 'घरोबा' हा लघुपटदेखील बनवला आहे.

image


image


गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ज्या महिला औद्योगिक सहकारी संस्था कार्यरत आहेत, त्यांच्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांचा विकास करण्यासाठी समाजसेविका कमलताई विचारे यांनी एक जानेवारी १९७३ साली 'स्त्री सेवा सहकारी संघ नियमित' या मध्यवर्ती संस्थेची स्थापना केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिली ही स्वयंपूर्ण मध्यवर्ती संस्था होती. सुरुवातीला त्यांच्या कार्य़क्षेत्रातील २५ महिला औद्योगिक सहकारी संस्था या संघाच्या सभासद झाल्या होत्या. संलग्न संस्थांना अर्थोत्पादन होण्यासाठी कामे मिळवून देणे, संस्थांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, संलग्न संस्थांना शासनामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा मिळवून देणे, त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहाय्य करणे ही 'स्त्री सेवा सहकारी' संघाची उद्दिष्ट्ये होती. या संघाने केलेले उल्लेखनीय काम म्हणजे १९७३ साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी दुष्काळग्रस्तांकरिता मदतीचा हात पुढे केला होता. महिलांनी महिलांकरिता चालवलेल्या या संस्थेत महिलांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी 'स्त्री सेवा सहकारी' संघाने 'घरोबा' याच नावाने विक्री केंद्र योजना सुरू केली. ७ फूट बाय ८ फूट लाकडी स्टॉल उभारुन महिला विक्रेतीच्यामार्फत विक्री करुन उत्पादक आणि ग्राहकांमधील अंतर कमी करणे, हा घरोबाचा उद्देश्य होता. घरोबातील कोणत्याही उत्पादनाची खरेदी म्हणजे स्वावलंबी स्त्रीला प्रेरणा देणे. अशा प्रकारचे अनेक घरोबा उभारुन अनेक महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 'स्त्री सेवा सहकारी संघ' प्रयत्नशील आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags