संपादने
Marathi

फाटलेले बूट फेकू नका..आता ‘त्यांना’ याची गरज आहे - ‘ग्रीनसोल’..एक अनोखा उपक्रम

क्योंकी हर चप्पल पर लिखा है पहनने वाले का नाम !

21st Aug 2015
Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share

श्रियंस भंडारी. ३ एप्रिल, २०१५


मी श्रियंस भंडारी. मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी. माझा एक मित्र आहे, रमेश धामी. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातून तो मुंबईत आलाय. त्यानं तुमच्या-आमच्यासारखं शाळा-कॉलेजात जाऊन शिक्षण घेतलेलं नाहीये. पण तरीही तो आज एक राष्ट्रीय स्तरावरचा अॅथलेटिक्स खेळाडू आहे. आम्ही ग्रीनसोल कंपनीचे फाऊंडर अर्थात संस्थापक आहोत. आमची ही कंपनी म्हणजे एक अनोखा प्रयत्न आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही पुनर्प्रक्रिया केलेल्या स्लीपर्स आणि बुटांचं मार्केटिंग करतो, त्या विकतो. पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे आम्ही अशा स्लीपर्स किंवा बूट अशा लोकांना मोफत देतो, ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे या गोष्टी विकत घेता येत नाहीत. वापरून टाकाऊ झालेल्या स्पोर्ट्स शूजमधून आम्ही नव्या को-या स्लीपर्स घडवतो.

‘ग्रीनसोल’चं कारण...

जगभरात दरवर्षी तब्बल 35 कोटी स्पोर्ट्स शूज फेकून दिले जातात. तर सव्वाशे कोटींहून जास्त लोक कोणत्याच प्रकारचे स्लीपर्स किंवा बूट घेऊ शकत नाहीत. आपण पाहिलं तर हा आकडा आपल्या भारताच्या संपूर्ण लोकसंख्येइतका आहे !

या कल्पनेची सुरुवात...

मी आणि रमेश, आम्ही दोघेही अॅथलिट्स असल्यामुळे आमच्या स्पोर्ट्स शूजची प्रचंड झीज होते. त्यामुळे आम्हाला दरवर्षी किमान तीन ते चार स्पोर्ट्स शूजचे जोड फेकून द्यावे लागतात. नेहमीच काहीतरी नवीन बनवण्याचा आमचा अट्टहास असायचा. त्यामुळे या फाटलेल्या बुटांपासून चपला बनवून आम्ही वापरायला लागलो. काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की आमच्या हाती एक भन्नाट कल्पना लागलीये. या कल्पनेचा फायदा अक्षरश: लाखो गरजू लोकांना होऊ शकतो. आणि तिथेच पाया रचला गेला ग्रीनसोलचा.

फाटलेल्या स्पोर्ट्स शूजपासून बनवलेली लेडीज चप्पल

फाटलेल्या स्पोर्ट्स शूजपासून बनवलेली लेडीज चप्पल


अनपेक्षित आणि उत्तम प्रतिसाद...

आमच्या या विलक्षण कल्पनेला अनपेक्षितपणे उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या काळात आम्ही अशा प्रकारे फाटलेल्या बुटांपासून बनवलेल्या नव्या को-या चपलांचे 50 जोड थेट ग्राहकांना विकले. त्यांना ते खूप आवडलेही. पण त्यासोबतच आम्ही असे 100 जोड मुंबईतल्या गरजूंनाही वाटले. आमच्या नावावर अशा प्रकारच्या चपलांच्या दोन डिजाईन्सचे पेटंट आहेत. D262161 आणि D262162. आम्ही बनवलेल्या प्रत्येक डिजाईनमध्ये या पेटंटची हमखास झलक असते.

आमच्या या छोट्याशा पण यशस्वी प्रवासामध्ये आम्हाला काही चांगले मार्गदर्शकही मिळाले. एनईएनचे मुंबईतील कन्सल्टंट उदय वानकावाला, एक्झिम बॅंक इंडियाचे चेअरमन यदुवेंद्र माथुर, बीएनएचएसचे संचालक व अनेक प्रकल्पांमध्ये मुख्य संशोधक म्हणून काम केलेले असद रहमानी आणि अजमेरच्या मायो विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मेजर जनरल के. व्ही. एस. ललोत्रा यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आम्हाला मोठी प्रेरणा मिळाली.

श्रियंस भंडारी आणि  रमेश धामी, मदतीचे हात नेहमीच प्रेरणादायी ठरतात

श्रियंस भंडारी आणि रमेश धामी, मदतीचे हात नेहमीच प्रेरणादायी ठरतात


एका फाटलेल्या स्पोर्ट्स शूजपासून सुरू झालेला हा प्रवास अनेक ठिकाणी नावाजला गेला. ज्यामुळे आम्हाला अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. यापैकी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे आर आयडिया नॅशनल बी प्लॅन स्पर्धेमध्ये मिळालेला दुस-या क्रमांकाचा पुरस्कार. आशियातली सर्वात मोठी बी प्लॅन स्पर्धा म्हणून जिला ओळखलं जातं, त्या आयआयटी मुंबईतल्या युरेका स्पर्धेमध्येही आम्हाला टेक्नॉलॉजी अॅण्ड सस्टेनेबिलिटी अॅवॉर्डने गौरवण्यात आलं. टाटा फर्स्ट डॉट स्पर्धेमध्ये आमचा समावेश भारतातल्या पहिल्या 25 नवउद्योजकांमध्ये करण्यात आला. याशिवाय अहमदाबादमधल्या इडीआयआय या उद्योग क्षेत्रातल्या मानाच्या समजल्या जाणा-या संस्थेने देशातल्या सर्वोत्कृष्ट 30 संशोधकांमध्ये आमचा समावेश केला. गेल्याच वर्षी आम्ही जयहिंद कॉलेज आणि एनईएन संस्थेत भरवण्यात आलेली बी प्लॅन स्पर्धा जिंकली. पण हा प्रवास जितका वाटतो आणि जितका आम्हालाही सुरुवातीला वाटला होता तितका सोपा नक्कीच नव्हता. आम्हाला या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अजब कल्पनेमागे वेळ देण्यासाठी आमचे कुटुंबिय, मित्रपरिवार, कॉलेज व्यवस्थापन यांना या कल्पनेचं महत्त्व पटवून द्यावं लागलं. शेवटी कुणालाही सहज न पटणारी आणि न पचणारीच ही कल्पना होती !

आता पुढे काय?

आम्ही करत असलेल्या या उपक्रमाला इतक्या सा-यांची पसंती मिळतेय हे पाहून खरंच खूप समाधान वाटतं. आता हा उपक्रमच आमच्या आयुष्याचं ध्येय बनलाय. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांची चपला घेण्याचीही ऐपत नाही अशा गरजूंना चपला पुरवणं, समाजातल्या गरजूंसाठी काहीतरी करण्याची आमची ही इच्छाच आम्हाला आमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी अखंडपणे प्रोत्साहित करते. जुन्या स्पोर्ट्स शूजपासून चपला बनवण्याची आमची कल्पना आधी संपूर्ण भारतात आम्ही राबवणार आहोत आणि त्यानंतर भारताबाहेर जगभरात या कल्पनेचा प्रसार करायची आमची इच्छा आहे.

अर्ध जग दररोज फक्त 150 रूपयांच्या उत्पन्नावर जगतं यावर विश्वास बसणंच कठीण आहे. पण त्याहून धक्कादायक बाब ही की दरवर्षी फक्त पायात काहीही न घातल्याने लाखो लोकांना भयानक आजारांची लागण होते. आणि ब-याच जणांना या रोगात आपले प्राणही गमवावे लागतात. याचसाठी आम्ही कॅटापूल्ट(Catapooolt) या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून जगभरातल्या लोकांना मदतीचं आवाहन करतोय.

समाजाकडून मिळणा-या या आर्थिक मदतीतून एक बदल घडवण्याचं आमचं स्वप्न आहे. जुन्या स्पोर्ट्स शूजचा अधिक चंगला वापर करून, पुनर्प्रक्रिया केलेल्या चपलांचं अधिक चांगलं मार्केटिंग करून आणि प्रत्येक गरजूच्या पायात चपलांचा एक तरी जोड घालून, ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. नव्या चपला किंवा बुटांचा जोड बनवताना वातावरणात कार्बनची भर पडत असते, जी आपल्या सर्वांच्याच आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या प्रयत्नातून हे कार्बनचं प्रमाणही कमी होऊ शकेल. या प्रकल्पामध्ये आम्हाला मदत करणा-यांसाठी काही विशेष भेट देण्याचाही आमचा मानस आहे. आणि अर्थातच ती भेटही ‘ग्रीनसोल’मधलीच असेल, ज्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स शूजपासून डिझाईन केलेल्या स्लीपर्स किंवा मी लिहिलेल्या ‘बर्ड्स ऑफ अरावलीस’ या पुस्तकाची प्रत असेल. याशिवाय भारतातील मागास गावांना कुणी दत्तक घेतल्यास या गावांमध्ये ‘ग्रीनसोल’चे 40 स्लीपर्स जोड आम्ही पुरवणार आहोत.

बदल घडवून आणायचं स्वप्न आहे - श्रियंस भंडारी

बदल घडवून आणायचं स्वप्न आहे - श्रियंस भंडारी


‘ग्रीनसोल’ हा कोणताही व्यवसाय नसून तो एक समाजोपयोगी प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रकल्पाला मनापासून पाठिंबा आणि मदत द्याल, आणि आपण सर्व मिळून समाजात छोटासा का होईना पण बदल घडवून आणू शकू. आपल्या घरातले जुने फाटलेले बूट कुणासाठी तरी आनंदाचा क्षण बनू शकतात. मला अशी आशा आहे की समाजातल्या समस्या सोडवण्यासाठी आमचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरावा. शेवटी आपण सर्वच जण या समाजाचं काहीतरी देणं लागतो..नक्कीच.

(लेखक ‘ग्रीनसोल’ या कंपनीचे संस्थापक आहेत)

Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags