दिशा – एक प्रवास

दिशा – एक प्रवास

Saturday June 04, 2016,

10 min Read

‘मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दींचे कारण’ असे संत रामदास यांनी अभंगात का म्हटले आहे? कारण माणसाच्या उन्नती आणि अवनती या दोन्ही मागे प्रेरक मनाचे विचार आणि ती कृती करण्याचे धाडस देण्याची शक्ती असते. त्यामुळे मनाचे आरोग्य बिघडले तर जीवनाची ‘दिशा’ही बिघडू शकते हे जाणून चार मुलींनी एक स्वप्न पाहिले ते होते --- मुंबई शहरात एक संपूर्ण मानसिक आरोग्य केंद्र स्थापित करण्याचे! या स्वप्नातच दिशा समुपदेशन केंद्राचं बीज होतं. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न युअर स्टोरीच्या वाचकांसाठी आम्ही केला, त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “डी.जी.रुपारेल कॉलेज मध्ये मैत्री जुळल्यानंतर आमची मने जुळली. फायनल ईयरला, मानसशास्त्र लॅबमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने जवळ आलो, आणि या स्वप्नांचा पाया रचला गेला. पुढे आम्ही सर्वांनीच पदव्युत्तर केलं, आणि चक्क वेगवेगळ्या ठिकाणी कामालाही लागलो”. या चौघींनी सांगितले.

एकदा शितल यांच्या घरी गप्पा-टप्पा चालू असताना त्यांच्या लक्षात आले, की जरी त्या सर्व आवडीच्या क्षेत्रात कार्यरत होत्या, तरी कार्यसमाधान काही हाती लागत नव्हते. मनासारखे काम करता येत नव्हते. तेव्हा मग, एकेकाळी पाहिलेल्या या स्वप्नाला साकारण्याचा निर्धार त्यांनी केला! मग उत्साहाने आणि हुरुपाने त्यांनी जागा शोधायला सुरुवात केली. दैवानेही अगदी तगडी साथ दिली – क्षणभरही त्यांचा उत्साह कमी होऊ दिला नाही. दादर-माहीम सारख्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळणे, आणि ती सुद्धा त्यांच्या अगदी तुटपुंज्या भांडवलात – अगदी अशक्यातली गोष्ट होती. पण म्हणतात ना – मनसोक्त स्वप्न पाहणा-याला सर्व शक्ती साथ देतात.

“अगदी तसेच आमच्या बरोबरही झाले. आम्हाला माहिमला सिटीलाईट सारख्या ठिकाणी जागा मिळाली. जागेचे मालक हे व्यवहारी आणि व्यावसायिक स्वभावाचे होते, पण त्यांच्यातली माणुसकी मात्र सजग होती! आमचा हुरूप आणि हिम्मत पाहून, आणि आमची अडचण समजून, त्यांनी आम्हाला जागा देण्याचे कबूल केले. भाड्याऐवजी आमच्या मिळकती मधील काही रक्कम दरमहा घेण्यास कबूल झाले. याला ‘पर्सेंटेज शेअरिंग’ असे म्हणतात हेही आम्हाला त्यावेळी माहित नव्हते!” त्या सांगत होत्या.

वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ पूनम घाडीगावकर आर.ए.पोद्दार कॉलेजच्या आयोजित सत्रात मार्गदर्शन करताना

पण हा पर्याय त्यांच्या साठी उत्तम ठरला! आणि अशा प्रकारे ७ मार्च १९९९ रोजी 'दिशा' अस्तित्वात आली. “आमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार, शिक्षक आणि प्राध्यापक या सर्वांच्या संपूर्ण समर्थनाने, पाठींब्याने आणि आशीर्वादाने, आम्ही काम सुरू केले. ८ मार्च, आंतर राष्ट्रीय महिला दिन, हा आमचा पहिला कामाचा दिवस. चाळीस हजाराचे छोटेसे आर्थिक भांडवल, पण जिद्द, काम करण्याची तयारी, आणि मोठ्यांचे आशीर्वाद या सर्वांनी ओतप्रोत भरलेले असे आमचे हुरूपाचे भांडवल, यावर आम्ही दिशाची पहिली काही वर्षे निभावून नेली.” त्या सांगतात.

त्या छोट्याशा सुरुवातीपासून, आज दिशाने १७ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. फार मोठा पल्ला एवढ्या वर्षांमध्ये पार पाडला आहे. आज या चौघी तर आहेतच, पण त्यांच्या बरोबर इतर ८-९ जणांची टीम आहे. आवश्यकतेनुसार सहयोगी सल्लागारही कामाच्या वेळेला साथ देतात. आज खऱ्या अर्थाने दिशा एक संपूर्ण मानसिक आरोग्य केंद्र आहे. इथे मुले, युवा, तसेच प्रौढांचे समुपदेशन होते. दिशाच्या टीम मध्ये समुपदेशक, व्यवसाय मार्गदर्शक, मानसोपचारतज्ज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पेशल एजुकेटर असे तज्ञ आहेत. मानसशास्त्रावर आधारित अशा सर्व सेवा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये सखोल व्यवसाय मार्गदर्शन, मानसिक आकलन, विविध लक्ष्य गट, वैयक्तिक आणि गट मानसोपचार, प्रतिभासंपन्न (gifted) मुलांचे आकलन, hyperactive आणि autistic मुलांचे आकलन व थेरपी, कॉर्पोरेट कार्यशाळा अशा अनेक गोष्टी आहेत. आज त्यांच्या ग्राहकांच्या यादीत वैयक्तिक रुग्ण, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्वयंसेवी संस्था असे भिन्न गट आहेत. अनेक सुप्रसिद्ध शाळा आणि महाविद्यालयांना इथे सेवा प्रदान करतो. आमच्या ‘कॉर्पोरेट क्लाएंट’च्या यादी मध्ये पेप्सी, लार्सन अॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर संशोधन केंद्र, केसरी टूर्स, रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज, रिलायन्स एनर्जी, टाटा मोटोर्स, शहपूर्जी पालमजी, बँक ऑफ बरोडा अशा अनेक सुप्रसिद्ध कंपन्या आहेत.

दिशा - करियर प्रदर्शन

अर्थात, हा प्रवास काही पूर्णत: सोपा आणि सरळ नव्हता. त्या सांगतात, “सुरवातीच्या काळात आम्ही चौघी फक्त दिशांच्या भागीदार नव्हतो – कार्यालयाची स्वच्छता, बारीक सारीक कामांसाठी करावी लागणारी पायपीट, अकौंटस – हे सर्वच आम्हाला पाहायला लागायचे. मानसशास्त्राचे शिक्षण तर घेतले होते, पण व्यवसाय चातुर्य मात्र नव्हते. कामाचा योग्य मोबदला न मिळणे, ग्राहकांकडून पैशाची वसुली करणे, इतर सम व्यावसायिकांची कुरघोडी करून काम हिसकावून घेणे अशी अनेक आव्हाने आमच्या समोर आली.”

वित्तीय व्यवस्थापन सर्वात मोठे आव्हान होते -

 “एक वेळ तर अशीही आली होती की महिन्याचे भाडे भरण्या इतके पैसे सुद्धा नव्हते. तो दिवस आमच्यासाठी अतिशय तणावपूर्ण असा होता - make or break अशी वेळ आली होती. पण कारकीर्दीच्या या सर्वात खालच्या बिंदूवर असतानाही आम्ही हिम्मत हरली नाही आणि तोच आमच्या साठी टर्निंग पाॅईन्ट ठरला. चढ-उतार हे कोणत्याही व्यवसायात यायचेच – पण शस्त्र टाकून न देता त्यांना सामोरे जाणे, आपले सर्वस्व देणे, हाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.” त्या सांगतात. इतर अनेक प्रकारची आव्हाने सुद्धा आली. पश्चिम सिद्धांत आणि संकल्पना असलेल्या थेरपी भारतीयांच्या मानसिकतेशी जुळवणे, मर्यादित बजेटमध्ये निभावणे, मर्यादा असणा-या चाचण्यांचा वापर करणे, असे अनेक प्रकारचे प्रश्न येत गेले आणि त्या त्या वेळी त्यांना सामोरे जावे लागले. प्रत्येकातून नवीन काहीतरी शिकायला मिळालं, व्यवसाय कसा चालवला पाहिजे याचे धडे मिळत गेले.

अतिथी मानसशास्त्रज्ञ रवी नारायणन, लिमये आश्रम शाळेच्या मुलांना कथा सागताना, पडसरे गाव,पाली.

त्या म्हणतात, “चार स्त्रिया एकत्र एक उपक्रम चालवतात – कसं शक्य आहे? असा प्रश्न आम्हाला अनेकदा विचारला जातो! तुमच्यात भांडण होत नाही का? भांडण, नाही! पण वाद मात्र भरपूर होतात! आम्ही चौघी तशा एकमेकींपासून फार वेगळ्या. प्रत्येकीचा स्वभाव भिन्न, गुण-दोष भिन्न, परंतु एकमेकींना पूरक. म्हणूच तर इतकी वर्षे हे स्वप्न जोपासून आम्ही त्याला वाढवू शकलो. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी आमचे मतभेद झाले तरी आमच्या संस्थेची कार्यप्रणाली आणि तत्त्व लक्षात घेऊन आम्ही योग्य तोच निर्णय घेतो.”

अत्यंत अभिमानाने त्या सांगतात की, “आड वाटा शोधून, कमी मेहनतीत जास्त नफा कमावण्याची संधी समोरून चालून आली तरी आम्ही ती घेत नाही – तसे करण्याचा मोह देखील आम्हाला होत नाही! कोणत्याही पेच प्रसंगात अतिशय संयमाने आणि सर्वकष विचार करूनच आम्ही निर्णय घेतो”.

चार मैत्रिणींनी सुरु केलेल्या एका लहान उपक्रमापासून एक व्यावसायिक संघटना पर्यंतची ही वाटचाल. एक अज्ञात अस्तित्वापासून शहरातले उत्तम समुपदेशन केंद म्हणून ओळखले जाण्यापर्यंतचा हा प्रवास, एका सर्वसामान्य समुपदेशन केंद्रापासून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणाऱ्या विशेष अशा संस्थेची उभारणी करण्याचा हा प्रवास ...... यातून या चौघींची देखील वाढ होत गेली. व्यावसायिक आव्हाने, तसेच वैयक्तिक प्राधान्यक्रम याचा समन्वय साधून प्रत्येक पाऊल एकत्रितपणे उचलत जाणे हाच दिशाच्या यशाचा पाया आहे.

त्या चौघी आहेत-

शितल रवी :

संचालक शीतल रवी बीलबॉन्ग शाळेत करियर विषयक मार्गदर्शन करताना

डोंबिवली मधील शितल रवी. यांनी Counseling Psychology मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आहे. शितल या दिशामध्ये मुले, किशोरवयीन तसेच प्रौढांचे समुपदेशन करतात. शितल यांचे कौशल्य व्यक्तिमत्व मुल्यांकन [Personality Assessments], वैयक्तिक समुपदेशन आणि उपचार पद्धतीमध्ये पहायला मिळते. Marital Counseling मध्ये त्यांची विशेष क्षमता आहे. शाळकरी मुले, कॉलेज कुमार, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते अशा निर-निराळ्या गटांबरोबर कार्यशाळा घेणे तसेच व्यापक प्रशिक्षण देणे यात त्या निपुण आहे. शाळा व कॉलेज मध्ये त्यांना समुपदेशक म्हणून व अनेक कार्यशाळा राबवविण्यासाठी आमंत्रित केले आहेत.

शितल एक सर्जनशील लेखिका देखील आहेत. आणि अनेक सुप्रसिद्ध मासिके व वृत्तपत्रांमध्ये जसे की डीएनए, युवा सकाळ, डोम्बिविली-कल्याण टायम्स ह्यामध्ये मानसिक आरोग्य, पालकत्व, आणि इतर संबंधित विषयांवर त्या लेखन करतात. त्याचबरोबर त्यांचे ‘बॉर्न टू विन’ [Born to Win] हे अभ्यास कौशल्यावर संकलित केलेले पुस्तक आहे. शितल स्वत:ला सतत अपडेट करण्याला महत्त्व देतात. आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून त्यांनी आपले कौशल्य सुधारित करण्याचा सतत प्रयास केला आहे. यामध्ये आर्ट थेरपी, प्ले थेरपी, संमोहन चिकित्सा (हिप्नोथेरपी) अशा अनेक विशिष्ट गोष्टींचा समावेश आहे. डान्स थेरपी हा तर त्यांचा अगदी जीवा-भावाचा विषय! यामध्येही अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत.

मानसोपचार तज्ञाबरोबरच शितल एक अतिशय उत्तम व कुशल नृत्यांगना देखील आहेत! भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य शैली मध्ये त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण मिळवलेले आहे. श्रुंगार मणी, नृत्य शिवाली, नाट्य मयुरी अशी राष्ट्रीय पातळीवरची शीर्षके त्यांनी मिळविलेली आहेत. मानसशास्त्र आणि नृत्य या आपल्या दोन कौशल्यांना सम्मिश्रीत करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. नृत्याचा उपचारात्मक हेतूने अभ्यास करण्यामध्ये त्यांना खास रस आहे.

अनुराधा प्रभुदेसाई : 

संचालक अनुराधा प्रभुदेसाई, एचटी - कॅम्पस कॉलिंग येथे आयोजित  करीयर विषयक चर्चासत्रात मार्गदर्शन करताना

अनुराधा यांनी व्यवसाय मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशनच्या क्षेत्रामध्ये खुप प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांनी Counseling Psychology मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आहे, आणि व्यवसाय मार्गदर्शनाच्या क्षेत्रामधील त्यांचे ज्ञान अफाट आहे. दिशाच्या व्यापक व्यवसाय आणि करीयर डेटाबेस अनुराधा यांनी निर्माण केला आहे. अनेक संस्था, शाळा व कॉलेज मध्ये व्यवसाय मार्गदर्शन व माहिती या विषयावर आपले मत देण्याकरता त्यांना अनेकदा आमंत्रित केले जाते. मुंबई शहरात व मुंबई बाहेरही विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये करिअर नियोजन कार्यशाळा त्या आयोजित करतात. एवढेच नव्हे, तर त्यांनी लर्निंग डीसेबिलीटी (LD) व बौद्धिक विकलांग मुलांसाठी देखील व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम तयार केलेले आहेत. एज्युकेशन टाइम्स, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत आणि सकाळ सारख्या अनेक सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात आणि मासिकांमध्ये त्या या विषयावर लेख लिहितात. दूरदर्शन, स्टार माझा, आयबीएन लोकमत आणि इतर टीव्ही चॅनेलच्या विविध शोमध्ये एक तज्ज्ञ म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. ‘करीयर पाथवेज’ या ऑनलाइन पोर्टलची स्थापनाही त्यांनी केली आहे.

सायकोमेट्रीक मोजमापन व कॉर्पोरेट प्रशिक्षणात सुद्धा त्या विख्यात आहे. MBTI ही जगप्रसिध्द व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात त्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे. अनेक विख्यात संस्थांमध्ये व्यक्तिमत्व चाचणी, नवीन कर्मचा-यांची भरती, ट्रेनिंग या क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून त्यांना बोलवले जाते. दिशाचा नवा उपक्रम ‘सायकोमेट्रीका’ याचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर आहे. ‘सायकोमेट्रीका’ ऑनलाइन पोर्टल द्वारे देशभरात, नव्हे तर जगभरातून कुठूनही तुम्ही सायकोमेट्रीक टेस्ट देऊ शकता व त्याचा परिणाम व रिपोर्ट तुमच्या पर्यंत इमेल द्वारे पोचवला जातो. सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, ऊर्जा आणि उत्साह, ड्राइव्ह, big picture पाहण्याचा डोळसपणा, टीम व्यवस्थापन या अनुराधा यांच्या विशेष क्षमता आहेत.

मुग्धा बावरे: 

संचालक मुग्धा  बावरे दिशा इन-हाउस सत्रात मार्गदर्शन करताना

Counseling Psychology मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करून व्यवसाय मार्गदर्शनच्या क्षेत्रामध्ये मुग्धा यांनी स्वत:ला स्थापित केले आहे. अभिक्षमता चाचणी आणि विविध करीयर्स बद्दलची बरीच माहिती त्यांच्याकडे आहे. या नात्याने मुग्धा यांनी अनेक शिबिरे, प्रशिक्षणे आयोजित केली आहेत. तसेच एक तज्ञ सल्लागार म्हणून वर्तमान पत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. सायकोमेट्रीक मोजमापन आणि आकलन करण्यातही त्या प्रशिक्षित आहेत. त्यांनी व्यवसाय मार्गदर्शनामध्ये अनेक वर्षे काम करून नाव व लौकिक मिळवले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुग्धा स्पोर्ट्स कौन्सेलिंग या क्षेत्रामध्ये अमुल्य कामगिरी बजावत आहेत. त्या स्वत: एक राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू आहेत, आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरीय छत्रपती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. क्रीडा मानसशास्त्र हे आपल्या देशात नवीन असे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र विकसित करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) च्या सल्लागार आहे आणि नियमितपणे क्रिकेटपटू करता गट आणि वैयक्तिक सत्र आयोजित करतात. त्या टेनिस, टेबल टेनिस, बुद्धीबळ, पोहणे आणि विविध इतर खेळातील खेळाडूंना मदत करतात. खेळ मानसशास्त्रज्ञ या नात्याने अनेक संस्था आणि क्लबशी त्या संलग्न आहेत. सध्या पुढील वर्षी ऑलम्पिक्सला जाणाऱ्या women's wrestling team चे समुपदेशन व मानसिक ट्रेनिंग त्या देत आहेत.

समिंदरा सावंत:

संचालक समिंदरा सावंत रिलायन्स एनर्जी  येथे आयोजित सत्रात मार्गदर्शन करताना

समिंदरा यांचे पदव्युत्तर शिक्षण क्लिनिकल सायकोलॉजी या विषयामध्ये झाले आहे. मानसिक आरोग्याचे आकलन तसेच मानसिक रोगांचे निदान आणि चाचणी या क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष नैपुण्य आहे. मुले, किशोरवयीन, तसेच प्रौढांच्या मानसोपचार आणि सायकोथेरपी या क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. विद्यार्थी, पालक, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, अशा गटांबरोबर त्यांनी प्रशिक्षणे घेतलेली आहेत. अतिचंचल मुलांबरोबर (ADHD) काम करण्यामध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.

मानसशास्त्रज्ञ या नात्याने, समिंदरा यांना अनेकदा सुप्रसिद्ध मासिके व वृत्तपत्रे यामध्ये मानसिक आरोग्य, पालकत्व, आणि इतर संबंधित विषयांवर लिहायला निमंत्रित केले गेले आहे. त्यांनी www.rediff.com या पोर्टलसाठी वैवाहिक समुपदेशनवर मानद तज्ज्ञ म्हणून लेख लिहिलेले आहेत. एप्रिल २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या 'Taming the Tornado: A Parent Manual to Manage the ADHD Child' या पालकांसाठीच्या पुस्तकाच्या त्या लेखिका आहे.

समिंदरा स्वत:ला अद्यतन ठेवून सतत स्वत:च्या कौशल्य सुधारणे साठी प्रयास करतात. त्या Integrated Healing मध्ये विश्वास ठेवतात, आणि मानसोपचार बरोबर हिप्नोथेरपी, पास्ट लायफ रिग्रेशन, क्रीस्टल हिलिंग, तसेच रेकी या शास्त्रांचाही वापर करतात. त्या एक प्रमाणपत्रप्राप्त 16PF Professional सुद्धा आहेत. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात त्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यांना शिकवण्यात खूप रुची आहे आणि म्हणून त्या मानसशास्त्र व त्यावर आधारित विषयांवर लेक्चर्स सुद्धा घेतात.

अश्या या चार मैत्रिणी मानसोपचारांच्या क्षेत्रातील आपल्या आवडीतून आज समाजाच्या फार मोठ्या महत्वाच्या सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचा हा मानसशास्त्राच्या क्षेत्रातला प्रयास असाच चालु राहो... युअर स्टोरीच्या वतीने त्यांना शुभेच्छा!

वेबसाईट: www.dishaforu.com

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

एका विरामानंतर नव्याने कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे लक्ष्य... 

अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….