संपादने
Marathi

राज्यात ३२० निसर्ग पर्यटनस्थळांची निवड, ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार

Team YS Marathi
29th Sep 2017
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

राज्यात २०१५ साली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर ३२० निसर्ग पर्यटनाची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीची मान्यता देखील प्राप्त झाली आहे, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज जागतिक पर्यटन दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निसर्ग पर्यटनासंबंधी माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वनक्षेत्रालगत असलेल्या निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास करणे, त्यामाध्यमातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे, पर्यटनस्थळाच्या ठिकाणी निसर्गाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेत पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळामार्फत केले जात आहे. त्याअंतर्गत ११६ पर्यटनस्थळांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून याठिकाणच्या विकास कामांसाठी वन खात्याच्या राज्य पर्यटन विकास निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.


image


निसर्ग पर्यटन स्थळापैकी वन्य जीवांकरिता संरक्षित क्षेत्र ही महत्वाचे आहेत. राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने, ४८ अभयारण्ये आणि ६ संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. त्यापैकी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई चा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचे नियोजित आहे. याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती येथे ही पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वन्य जीवांकरिता असलेल्या संरक्षित वनक्षेत्राशिवाय वनक्षेत्रामध्ये येणारे किल्ले, काही देवस्थाने, पाणस्थळे व जैव विविधता संवर्धन उद्यान यांचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येत आहे. जैव विविधता संवर्धन उद्यानामध्ये विसापूर उद्यानाकरिता ४० कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ करिता नियोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महादेव वनाची महत्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. त्याकरिता जवळपास २४४.१४ लाख रुपयांचा निधी आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ येथे वनोद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी १६६ . ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरणांतर्गत राज्यात ६८ ठिकाणी स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी चालू वर्षी २६.८६ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. रायगड किल्ला परिक्रमा, नाशिक जिल्ह्यातील ३ ऐतिहासिक किल्ले ( राजदेर, ईंद्राई अणि कोल्दर किल्ला), यांच्या विकासाकरिता ७ कोटी रुपयांचे प्रकल्प आराखडे महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केले आहेत, त्याकरिता ही निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय पंढरपूर येथील तुळशी वनोद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. चंद्रपूर येथील झोपला मारूती, बिलोलीचे दत्तमंदिर, अंबाजोगाईचे रेणुका माता मंदिर, धामणगावचे संत मुंगसाजी महाराज समाधी स्थळ, देऊळगावचे महालक्ष्मी संस्थान या काही देवस्थानाजवळ निसर्ग पर्यटन विकासाची कामे करण्यात येत आहेत. या सर्व कामांसाठी चालू वर्षी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाकरिता १३६ कोटी रुपयांचा नियतव्यय राज्य योजनेमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags