संपादने
Marathi

अच्छे दिन आनेवाले है…. सिनेमा प्रदर्शनाचा अनोखा प्रयोग.....

Narendra Bandabe
17th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

काही वर्षांपूर्वी विशीतले दोन तरुण भेटतात. मुंबई विद्यापीठातल्या डिपार्टमेन्ट ऑफ थिएटर्स आर्ट्समध्ये. एकाला अभिनेता व्हायचंय आणि दुसऱ्याला अभिनयाबरोबर दिग्दर्शनही करायचंय. दोघंही मध्यमवर्गीय कुटुंबातले. घराच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी कॉलेज करताना नोकरी करणारे.... आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणारे.... कॉलेजची दोन वर्ष संपल्यानंतर स्ट्रगलला सुरुवात झाली खरी पण हवं तसं काम मिळत नव्हतं. त्यामुळे मिळेल ती नोकरी करता करता नाटक-सिनेमाचं वेड जपणं सुरु झालं. एक दिवस दोघांनी ठरवलं आपला स्वत:चा सिनेमा तयार करायचा. स्क्रिप्ट तर होतीच. दोघांना आवडलेली... अगदी मनापासून... पण बॉलीवुडच्या महासागरात ते नवखे होते. मुंबईकर असूनही या शहरात उभ्या राहिलेल्या या मायानगरीतल्या लाखो स्ट्रगलर्स पैकी एक. इथं ‘सन ऑफ सॉईल’ अर्थात भुमीपुत्राची कुठलीच आंदोलनं कामी येत नाहीत. सर्व काही बेभरवशाचं. निर्मात्याचा शोध शुरु झाला. भारतात सिनेमा बनवण्याची प्रक्रिया फार किचकट आहे. अनप्रोफेशनल म्हणू हवं तर. इथं रोज एक नवा तारा चमकतो आणि गायबही होतो. मग अशा नवख्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला कोण विचारणार. सिनेमात काम करणारा प्रत्येकजण हा स्वप्नाळू असतो. स्वत:चं काम सिल्वर स्क्रिनवर पाहण्याचं स्वप्न बाळगणारे लाखो लोक रोजच आपल्या जगाचे हिरो असतात. अखेर सर्व काही जुळून आलं. प्रोड्यूसर सापडले, तुटपुंज्या अर्थसहाय्यावर का होईना पण सिनेमाची सुरुवात झाली. सिनेमा कागदावर पूर्णपणे तयार होता. अगदी हॉलीवुडमध्ये असतो ना तस्साच. आता त्याला मुर्त स्वरुप द्यायचं होतं. एक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर फिल्म तयार झाली. अगोदर सिनेमाचं नाव होतं ना भुतो ना भविष्यती. सिनेमाचा एकूण बाज पाहता अखेर त्याचं नाव झालं अच्छे दिन आनेवाले है. मनिष आंजर्लेकर आणि अजय शंकर दोन मित्रांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण झालंय. आता प्रतिक्षा आहे ती सिनेमा प्रदर्शित होण्याची. पण हा मार्ग ही तेवढा सोपा नाही हे त्यांना माहितेय. म्हणूनच या नवख्या कलावंतांवर विश्वास ठेऊन सिनेमा निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या नितेश बत्रा यांनी आपली व्यवस्थापनाची सर्व शक्ती लावली आहे. ध्येय एकच आहे, अच्छे दिन आनेवाले है प्रदर्शित करण्याचं. 

image


नितेश बत्रा यांनाही सिनेमा क्षेत्राचा अनुभव नव्हता. ते मॅनेजमेन्टची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेले आणि तिथं सिनेमाच्या प्रेमात पडले. मग तिथं टेलिविजन प्रोडक्शनचा कोर्सही केला. मॅनेजमेन्टचा विद्यार्थी असल्यानं फक्त शौक म्हणून गोष्टी करण्यापेक्षा त्यामागचं अर्थकारण समजावून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. अमेरिका आणि भारतातल्या सिनेमाक्षेत्रात जमीन आसमानाचा फरक आहे. जगभर पसरलेल्या हॉलीवुडचा पसारा तेवढा का वाढला यामागचं गणितही स्पष्ट आहे. सिनेमा निर्मिती करण्यापूर्वीच त्याची व्याप्ती किती, कुठला कलाकार जगातल्या कुठल्या प्रांतात चालतो, यावर सर्व गणित बसवून सिनेमा फायद्यातच गेला पाहिजे असं थेट समीकरण ही हॉलीवुडची खासीयत आहे. आपल्याकडे ३०० ते ४०० कोटी कमवणाऱ्या सिनेमांमध्ये ही या समयसुचकता आणि योजनाबध्दतेची कमतरता असते. हॉलीवुड तसं नाही. सर्व काही कागदावर स्पष्ट. स्टोरीबोर्डींगपासून ते डिस्ट्रिब्युशनपर्यंत सर्व काही. थेट आणि अचूक असतं. नितेश बत्रा यांना हेच आवडलं होतं. आणि याचाच अभ्यास ते करत होते. 

image


थिएट्रीकल रिलीज पेक्षा नेटफ्लिक्स आणि इतर माध्यमांचा सिनेमाच्या रिलीजसाठी होणारा वापर त्यांना प्रभावित करत होता. अमेरिकेतून पुन्हा भारतात आले तेव्हा अचानक मनिष आणि अजयशी भेट झाली. त्यांची धडपड त्यांनी ऐकली होती. अमेरिकेतल्या या गोष्टी भारतात अवलंबणं कठीण आहे हे लक्षात असूनही त्यांनी ‘अच्छे दिन आनेवाले है’च्या निर्मितीची धुरा उचलली. त्यांना साथ मिळाली ती किशोर गोखरु या मित्राची. सिनेमाचं चित्रिककरण राजस्थानमध्ये झालं. अगदी तुटपुंज्या बजेटमध्ये सिनेमा चित्रित होत होता. सुमारे ५० ते ६० जणांचा चमू राजस्थानच्या रणरणत्या उन्हात शुटींग करत होता. पैसे नसल्यानं मित्रांच्या ओळखीनं जी वाडी मिळाली तिथं बस्तान बसवलं. त्यात अगदी आश्रितासारखं राहून या सर्वांनी सिनेमा चित्रित केला. 

image


सिनेमा चित्रित होऊन तो एडीट व्हायला एक वर्षे गेलं. अनेकदा पैसे नसल्यानं एडीटींगचं काम थांबायचं. मग पैसे आल्यावर पुन्हा सुरु व्हायचं. असं एक वर्षे गेलं. आता नितेश, अजय आणि मनिष यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली होती. जसजसा सिनेमा तयार होत होता तसतसा त्यांचा आत्मविश्वासही वाढत होता. दीड दोन वर्षे केलेली मेहनत आता पडद्यावर पाहण्यासाठी ते उत्सुक होते.

या काळात नितेशनं आपली नोकरी सुरु ठेवली. मनिषही पुन्हा नोकरीकडे वळला आणि तर अजय नोकरी करता करता जाहिरात क्षेत्रात आपलं नशिब आजमावू लागला. हे करताना सिनेमाचं प्रमोशन आणि त्याच्या वितरणासंदर्भातली बोलणी सुरु झाली होती. अगदी यशराज ते वायकॉम 18 या आघाडीच्या वितरकांनी सिनेमा पाहिला. सिनेमा चांगला झाल्याची शाबासकीची पाठीवर थापही दिली. पण सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. सिनेमाचा विषय विडंबनात्मक, सामाजिक संदेश देणारा, तंत्रज्ञ, कलाकार सर्व काहीजण नवीन. त्यामुळं सिनेमाचं वितरण करण्यासाठी कुठलीही कंपनी पुढे आली नाही. सिनेमा चांगला आहे पण तो वितरीत करण्यामागचं अर्थकारण जमत नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं. 

image


आता जवळपास एकवर्षे झालं सिनेमा बनून... पण वितरक न मिळाल्यानं हार्डडिस्कमध्ये राहिलेला हा सिनेमा आता नव्या तंत्राचा वापर करुन वितरीत करण्याचा प्रयत्न नितेश बत्रा यांनी सुरु केलाय. परदेशात वेब शोची चलती आहे. सिनेमा इंटरनेटच्या माध्यमातून रिलीज करण्याची नवीन पध्दती तिथं विकसित झालीय. हिटस् आणि शेअरींगच्या माध्यमातून सिनेमा तयार करण्यासाठी लागलेला पैसा परत मिळवण्याची ही एक कल्पक बिजनेस स्ट्रटेजी आहे. युटुब आणि नेटफ्लिक्सचा वापर करत आपल्या सिनेमाचं वेबशोच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा हा प्रकार खूप चर्चिला जातोय. त्यानं सिनेमाच्या पारंपारिक वितरण प्रणालीला धक्का दिलाय. म्हणूनच जेव्हा अभिनेता कमला हसननं आपला विश्वरुपम सिनेमा थेट डिशटीव्ही ग्राहक आणि इंटरनेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर अनेक बंधनं आणली गेली. भारतात असा प्रयोग पहिल्यांदा होणार होता. पण अखेर वितरक आणि एक्झीबीटर्सच्या दबावामुळं कमल हसनला माघार घ्यावी लागली. टेक्नॉलॉजीमुळे आपल्या पसंतीचे कंटेन्ट पाहण्याचा हक्क प्रेक्षकांना मिळालाय. ते ही जिथं असेल तिथं. घरातून बाहेर पडण्याचीही गरज नाही. अगदी अपने आप.

नितेश आणि त्यांच्या टिमनं यानुसार आपली आखणी सुरु केलीय. यानुसार स्ट्रटेजिक मार्केटींग करुन सिनेमासाठी ग्राहकवर्ग तयार करण्याची योजना आहे. यापूर्वी असा प्रयोग ‘शीप ऑफ थिसिस’ या आनंद गांधी दिग्दर्शित सिनेमाच्या बाबतीत करण्यात आला होता. सोशल मीडियाचा वापर करत या सिनेमाबद्दल हवा तयार करण्यात आली. ‘वोट फॉर युअर सिटी’ या डिजिटल मोहिमेचा वापर करत आपल्या शहरात हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी मत नोंदवण्यास लोकांना सांगण्यात आलं. यामुळे झालं असं की लोकांनी मत नोंदवल्यानं अगोदर फक्त पाच शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा या मोहिमेमुळं पाच मोठ्या शहरांसोबत इतर २६ छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ही प्रदर्शित झाला. शिवाय युटूब आणि सोशल मीडियाचा फायदा झालाच. 

image


विश्वरुपम आणि शीप ऑफ थिसीसचा अनुभव पाहता त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन बेव शोच्या माध्यमातून सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात येत आहे. यानुसार अच्छे दिन आनेवाले है चे प्रोमो फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंगवर पसरवले जात आहेत. त्याची चांगलीच हवा होत आहे हे विशेष. ही प्रसिध्दी झाल्यावर काही दिवसात एपीसोडच्या माध्यमातून सिनेमा युटुब आणि इतर डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येईल. याचा अर्थ असा नव्हे की सिनेमाचं थिएट्रिकल रिलीज होणार नाही. ९० मिनिटांचा सिनेमा ६० मिनिटांमध्ये विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याबरोबरच येणाऱ्या हिट्स आणि शेअरींगचा विचार करुन सिनेमाच्या थिएट्रीकल रिलीजसाठीही प्रयत्न केला जाणारेय. 

image


डिजीटल तंत्रज्ञानामुळं सिनेमांची संख्या वाढली आहे. बर्लिन फिल्म फेस्टीवलचे डायरेक्टर डाटरन कोसलिक यांच्या मते ‘’डिजीटल तंत्रज्ञान जेवढं वाढतंय, तेवढ्या त्याच्या अनेक बाबींचा गांभिर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. डिजीटल माध्यमाचा वापर करुन सिनेमा बनवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आमच्याकडे १००० हून अधिक डिजीटल सिनेमे विविध विभागात येतात. त्यापैकी फक्त १५० ते २०० सिनेमांना फेस्टीवलमध्ये जागा मिळते. बाकीच्या ८०० हून अधिक सिनेमांचं काय होतं. याची कल्पना करवत नाही.”

या अश्या सिनेमांसाठी इंटरनेट वरदान ठरत आहे. बेवशो, एपिसोडीक शो तयार करुन हे सिनेमे त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवले जातात. त्यासाठी प्रेक्षकवर्ग तयार केला जातो. तो हा सिनेमा पाहिल याची खात्री केली जाते आणि त्यानुसार आर्थिक गणित जुळवून आणलं जातं. ‘अच्छे दिन आनेवाले है’ या सिनेमाच्या बाबतीत ही ही सोशल मीडिया मार्केटीग आणि सोशल मीडिया ऑप्टीमायजेशनची मदत घेण्यात येत आहे. 

image


याचा एक फायदा ही आहे. एकदा का आपला सिनेमा वेबशो किंवा एपिसोडीक शोच्या माध्यमातून इंटरनेटवर प्रदर्शित झाला की त्याला टेरीटरी किंवा कुठल्या विशिष्ट देश किंवा खंडापुरता मर्यादीत राहत नाही. तो जगभरात पोचतो. त्याला वैश्विक रुप येतं. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणं सोपं होतं आणि सिनेमा निर्मात्याला फायदाही होतो. तंत्रज्ञानामुळे नव्यानं विकसित झालेल्या या वितरण प्रणालीचा वापर करुनच अच्छे दिन आनेवाले है जगभरात नेण्यात येणारेय.

माणूस स्वप्न पाहतो, त्यासाठी झटतो, कसोशीनं प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना यश नाही आलं तर त्याचं रडगाणं गात राहत नाही. कारण मानवी स्वभाव मुळात नवीन काही तरी करण्याचा आहे. त्याला नव्याचा ध्यास असतो. सातत्यानं नाविन्याचा हा शोध, नवनवीन संधी उपलब्ध करुन देतो. अच्छे दिन आनेवाले है च्या बाबतीत ही हेच घडलंय. जगभरातले फिल्म फेस्टीवल, वितकरांनी नकार दिल्यानंतरही करोडो रुपये खर्च करुन तयार केलेला आपला सिनेमा त्याच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी सध्या नितेश आपलं मॅनेजमेन्ट कौशल्य आणि अमेरिकेतला अनुभव वापरतायत आणि त्यांना विश्वास आहे, अच्छे दिन खरंच आनेवाले है!!!!!  

अच्छे दिन साठी इथे क्लिक करा

युटुब लिंक - https://www.youtube.com/watch?v=TY-nk_6ysmA&feature=youtu.be

फेसबुक पेज - https://www.facebook.com/adawhwebseries/?fref=nf

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags