संपादने
Marathi

‘ड्रग- अॅडिक्शन’ने भाऊ गमावल्यानंतर प्रत्येकच वेदनेमध्ये 'जेनपू'ची सहवेदना

Chandrakant Yadav
19th Oct 2015
1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

‘एकाची नशा, घराची दुर्दशा’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अवघे कुटुंब नासवायला कुटुंबातला एक व्यसनी पुरेसा असतो. दारुड्या बापाचे आक्रस्ताळे वागणे बघताना मुलांची काय मानसिक दशा होते, ते शब्दांत बांधता यायचे नाही. व्यसनी बाप मुलांचे अख्खे भावविश्वच उद्ध्वस्त करतो. बापाकडून आईला मारहाण हे दृश्य ज्यांच्यासाठी रोजचे आहे, त्या मुलांचा तर देवच वाली!

जेनपू रोंगमाई यांचे बालपण अशाच त्रासात गेले. वडील अट्टल दारुडे होते. आईला नेहमी मारझोड करत. पैशांच्या अडचणीमुळे जेनपू यांना कॉलेज सोडावे लागले. नैराश्याच्या गर्तेत अडकलेला धाकटा भाऊ डेव्हिड तर ड्रग्सच्या आहारी गेला… आणि यातच अगदी अवेळी त्याची अखेर झाली. पाठच्या भावाच्या मृत्यूने जेनपू हादरून गेले होते.

आईला त्यांच्याशिवाय आधार नव्हता. त्यांनी कसेबसे स्वत:ला सावरले. आल्या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या संकटांचा कुठलाही वाईट परिणाम त्यांनी स्वत:वर होऊ दिला नाही.

image


जेनपू म्हणतात, ‘‘हे सोपे नव्हते, पण मी माझे वळण बिघडू दिले नाही.’’ जेनपू हे आज एक वैचारिक अधिष्ठान असलेले व्यक्तिमत्व आहे. जेनपू म्हणजे जणू एक दृष्टिकोन… जेनपू म्हणजे दीपस्तंभच…

‘कम्युनिटी अॅव्हेन्यू नेटवर्क’ (CAN)

जेनपू ३० वर्षांचे आहेत. वंचित असण्याचे दु:ख काय असते, ते आपल्याला चांगले कळते. विवंचनांतून तर आपले सगळे चिंतन साकारलेले… मग त्याचा वापर इतर वंचितांसाठी करायलाच हवा म्हणून त्यांनी ‘कम्युनिटी अॅव्हेन्यू नेटवर्क’ (CAN) या संस्थेची स्थापना केली. इतर समविचारी, समध्येयी युवकांना सोबतीला घेतले. ड्रगॲडिक्ट, अल्कोहोलिक, एचआयव्ही/एड्सग्रस्त मुले, गरिब बेरोजगार तरुण, निराधार मुले, अडचणीतील महिला असे सगळे दु:ख त्यांनी आपल्या या संस्थेच्या वर्तुळात समावून घेतले. ड्रग्ज आणि एकुणातच व्यसनांविरुद्ध त्यांनी यल्गार पुकारलेला आहे. त्यांचा हा लढा सतत सुरू असतो. समुपदेशन तर सारखे चाललेले असते. एचआयव्हीग्रस्त मुलांना इलाजासह पूरक पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी जेनपू जिवाचे रान करतात. युवकांना व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देतात. स्वयंसेवी कार्यासाठी महाविद्यालयीन युवकांना प्रेरित करतात. एखाद्या खेड्यातून एक स्वयंसेवक मिळणार असेल तरी त्या खेड्यापर्यंत जाऊन आपले सेवाकार्य समजावून सांगतात. जेनपू सध्या बाल-हक्क आणि महिला-हक्कांसाठी कार्यरत ‘नागालँड-युती’ (नागालँड अलायन्स) या संघटनेचे प्रसिद्धी सचिवही आहेत.

image


‘माझा गतकाळ हीच माझी प्रेरणा’

ते सांगतात, ‘‘माझा गतकाळ हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. मी किती संघर्ष केलाय, हे मला ठाऊक आहे. अन्नापेक्षाही दु:खे पचवत-पचवतच मी मोठा झालेलो आहे. पाठच्या भावाचा मृत्यू मी पचवलेला आहे. शेकडो तरुणांच्या डोळ्यात अशीच विवंचना मला दिसते. अशीच वेदना दिसते. वेदनाच वेदना असलेला माझा गतकाळही सतत माझ्या डोळ्यांसमोर असतो. वेदनांची मग सरमिसळ होते. सहवेदना नावाचे नवे रसायन यातून तयार होते. हे रसायनच मला जमेल त्या सेवेसाठी समदु:खी तरुणांच्या मागे पळवत असते.’’

जेनपू हे ‘एक्यूमेन इंडिया’च्या २०१५ मध्ये स्थापन समितीचे फेलोही आहेत. जेनपू म्हणतात, ‘‘अगदी मोकळेपणाने बोलायचे तर इशान्येकडील राज्यांत आणि उर्वरित भारतात खरंतर संवादाचा अभाव आहे. दिसण्यापासून समस्या आहेत. पण मला अन्य समितीचे फेलो असलेल्या अन्य राज्यांतील मित्रांकडून उदंड प्रेम मिळाले. माझ्याशी सर्वांचेच वागणे आदरपूर्वक होते. असल्या काही गोष्टीच इशान्य भारत आणि उर्वरित भारतादरम्यान दुवा म्हणून काम करतात, असे मला वाटते.’’

ड्रगॲअॅडिक्शन नावाच्या शैतानाने जेनपूंच्या तरुण भावाचा घास घेतला होता. भाऊ तर काही केल्या परतणार नाही, पण समाजातले ड्रगॲअॅडिक्शन पळवून लावण्यासाठी आपण शस्त्रे हाती घ्यायची. तलवार, बंदुकांनी तर ड्रग अॅडिक्शन पळणार नव्हते. सेवा, समुपदेशन हीच त्यासाठीची शस्त्रे होती. जेनपू यांनी ती सारी परजली. आपल्या हृदयाच्या भात्यात रोवली. ‘कम्युनिटी अॅव्हेन्यू नेटवर्क’ (कॅन) च्या रूपात सैन्य उभारले. अर्थात सेवा हीच या सैन्याचीही शस्त्रे.

image


जेनपू सांगतात, ‘‘सुरवातीला पैशाचा अभाव हीच आमची अडचण होती.’’ पण पैशाच्या सोंगाखाली त्यांना लपयाचेही नव्हते. आपण काम तर सुरू करू या पाहू या पुढे काय होते ते म्हणून त्यांनी निरंतर शिक्षणाचा ध्यास धरला. त्यांना स्वत:ला शिक्षण अधेमधे सोडावे लागलेले होते. नैराश्याचे हेही एक कारण जे पुढे व्यसनाधिनतेला जन्म देऊ शकते. हे एक कारण तर आपण संपवूयात म्हणून शाळा सोडून दिलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास त्यांनी सुरवात केली. नंतर परिस्थिती अनुकूल होत गेली तशी व्यसनमुक्तीच्या लढ्याची व्याप्ती त्यांनी वाढवत नेली.

‘एचआयव्ही’ग्रस्त मुलेही देवाघरची फुले!

एचआयव्हीग्रस्तांसाठीही त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. २०११ मध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते हजर होते. मंत्री, नागालँडमधील आणि बाहेरील मान्यवरांची हजेरी या कार्यक्रमाला होती. तिथे एका लहान मुलासह त्याचे आई-बाबाही आलेले होते. जेनपूंनी चौकशी केली. अवघे कुटुंब एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. आणि इलाजासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, ही खंत बोलून दाखवायलाच ते या कार्यक्रमात आलेले होते. सरकारी दवाखान्यांतून ‘एआरटी’ [Anti Reroviral Therapy] ट्रिटमेंट विनामूल्य मिळते, मग हे असे का? या प्रश्नने जेनपूंना त्रस्त केले आणि सेवेच्या या एका नव्या दालनाचे दार त्यांनी स्वत:च स्वत:साठी उघडून घेतले.

गरिब मुलांचे दत्तक पालकत्व तर ते घेत आलेलेच होते. आता एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांचेही असेच पालकत्व स्वीकारायला त्यांनी सुरवात केली. ते कुठलाही आश्रम अशा मुलांसाठी चालवत नाहीत. मुले आपल्या कुटुंबातच राहिली पाहिजेत, अशी जेनपूंची भूमिका असते. मुलांचा जो खर्च पालकांकडून पेलवला जात नाही, त्याचा भार जेनपू स्वत:कडे घेतात. शिक्षण, जेवण आणि इतर सगळा खर्च जेनपूंची ‘कॅन’ करते. सुरवातील जेनपूंकडे अशी ९ मुले होती आता ही संख्या २५ वर गेलेली आहे.

दिमापूरमधील खासगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण अर्धवट सोडलेल्या व कुठल्याही परिस्थितीत पुढे शिक्षण चालू ठेवण्यास तयार नसलेल्या मुलांसाठी जेनपू व्यवसाय प्रशिक्षण चालवतात.

image


जेनपू ही सर्वच सेवाकार्ये लोकवर्गणीतून चालवतात. वर्गणीसाठी ४०-५० लोकांना भेटतात तेव्हा कुठे २-३ जण वर्गणी द्यायला तयार होतात. फार कष्ट पुरतात, पण जेनपू हिंमत सोडत नाहीत. जेनपूंना वाटते, की खूप लोक त्यांच्यासोबत या कार्यात यावेत. इतर सेवाभावी संस्था त्यांच्या संस्थेशी संलग्न व्हाव्यात. सरकारकडून तर त्यांना कुठलीही मदत सध्या नाही.

शहाणा करून सोडावा ‘इशान्य’ अवघा

‘‘लोक बेरोजगारीवर बोलतात. बेरोजगारांवर बोलतात, पण अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांबद्दल कुणीही बोलत नाही.’’ ही जेनपू यांची खंत आहे. विशेषत: नागालँडसारख्या प्रदेशामध्ये जिथे बंड पुकारणे ही एक सामान्य बाब आहे, बंडखोरांची मोठी संख्या या प्रदेशात आहे. शिक्षण अर्धवट सोडणारी मुले या बंडासाठी खतपाणीच ठरणार ना? हा प्रश्न जेनपू यांना अस्वस्थ करतो. नैराश्य, विवंचना आणि शिक्षणाचा अभाव यातून पुढल्या भवितव्यासाठी कशाप्रकारची पिढी निर्माण होणार? हा प्रश्न जेनपू यांना झोपू देत नाही.

प्रत्येक प्रांत, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक घटकाला समान संधी मिळायला हवी. शिक्षण अर्धवट सोडणारे, गरिब, शोषित, एचआयव्ही पॉझिटिव्हही सोयीसुविधांनी समृद्ध असावेत, हे जेनपू यांचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल? जेनपू यांच्या शब्दांतून या प्रश्नाचे उत्तर असे…

हम होंगे कामयाब एक दिन...

‘‘हे फार सोपेही नाही, पण सुरवातच जर तुम्ही अपयशाच्या धसक्याने कराल तर कुठलेही काम तडीला जाऊ शकणार नाही. मी माझ्या परीने काम करतोय. माझे मन मला सांगते, की माझे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तो एक दिवस येईलच. समतेची पहाट उजाडेली असेल. कदाचित ते बघायला मी हयात नसेन. पण आजच्या पुरतेच बोलायचे तर मला समाजाच्या प्रत्येक घटकातून पाठिंबा मिळतोय. माझ्या कार्यात प्रत्येक घटकातून सक्रिय सहभाग नोंदवला जातोय. शिक्षणाच्या सार्वत्रिकिकरणाचा मंत्र तर सरकारपासून ते समाजातील तळागाळापर्यंत आजच सगळीकडे झिरपू लागलेला आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने हे चांगले संकेत नाहीत काय?’’


1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags