संपादने
Marathi

जमिनीची इत्यंभूत माहिती देणाऱ्या उपकरणाची निर्मिती, डॉ.विजयराघवन यांची यशस्वी कामगिरी

Team YS Marathi
23rd Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डॉ. विजयराघवन विश्वनाथन यांना आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. महाविद्यालयात पहिल्या दिवशी त्यांना स्वतःबद्दल काही बोलण्यास सांगण्यात आले. त्यावेळेस ते स्वतःबद्दल इंग्रजीत काही शब्दच बोलले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. कारण त्यांना समजत नव्हते की, स्वतःबद्दल काय सांगावे आणि काय करावे. मात्र आज तेच डॉ. विजयराघवन CERN मध्ये संशोधक म्हणून काम करत आहेत. त्याचसोबत ते एक उद्योजकदेखील आहेत. मदुराईच्या राजपलायममध्ये एका शेतकरी कुटुंबात विजय यांचा जन्म झाला. शिक्षणाचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे, याची जाणीव विजय यांना सुरुवातीच्या काळातच झाली होती. त्यांच्यात लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. त्यांना कायम स्वतःला सिद्ध करायचे होते. इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांना रस असल्याने त्यांनी कोइंबतूरमध्ये अमृथा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

image


अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत असताना आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. मात्र काही नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा आपले शिक्षण सुरू केले. याशिवाय शिष्यवृत्तीने त्यांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्यात मदत केली. महाविद्यालयात तृतीय वर्ष संपल्यानंतर विजय यांना पवई येथील लार्सन एण्ड टुब्रो येथे नोकरी मिळाली. आपल्या महाविद्यालयातील दिवसांच्या आठवणी सांगताना विजय म्हणतात की, महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात ते आपल्या शिक्षिका मिनी मेनन यांना प्रचंड घाबरत असत. कारण त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. मिनी मेनन यांच्यासोबत इंग्रजीमध्ये संभाषण करण्यात विजय यांना भीती वाटायची. असे असूनही मिनी मेनन यांनी एक दिवस विजय यांच्याशी संभाषण केले आणि विजय यांना असा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले. त्यांनी विजय यांना सल्ला दिला की, दररोज इंग्रजी वर्तमानपत्रातील संपादकीय त्यांनी वाचावे, भले त्याचा अर्थ त्यांना समजू दे वा नको. त्यानंतर असा कोणताही इंग्रजी शब्द ज्याचा अर्थ विजय यांना समजत नसे, ते तो शब्द लिहून घेत, शब्दकोशातून त्याचा अर्थ समजून घेत आणि लक्षात ठेवत.

दुसऱ्यांपेक्षा अलिप्त आणि अंतर्मुखी असलेले विजय आपला अधिकतम वेळ वाचनालयात व्यतित करत. तृतीय वर्षात असताना त्यांना शिष्यवृत्तीबद्दल समजले, ज्यामुळे ते उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत झाले. त्यानंतर त्यांनी अनेक विश्वविद्यालयांमध्ये अर्ज केले. विजय एक गुणवान विद्यार्थी होते, त्यांनी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला ८८ टक्के गुण मिळवले होते. पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एका बॅंकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ते कर्जाची रक्कम कशी फेडणार?, हा प्रश्न उपस्थित करुन बॅंक व्यवस्थापकाने त्यांचे कर्ज मंजूर करण्यास नकार दिला. या घटनेनंतर विजय उदास झाले, मात्र त्यानंतर त्यांनी अशा विश्वविद्यालयांचा शोध घेतला जे १०० टक्के शिष्यवृत्ती बहाल करतात. नशीबदेखील त्याच लोकांवर आपली कृपा करते, जे मेहनत करतात. इटली, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या विश्वविद्यालयांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. त्यानंतर त्यांनी इटली-भारत शिष्यवृत्ती कार्य़क्रमाअंतर्गत शिष्यवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या शिष्यवृत्तीकरिता भारतातील तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, ज्यात विजय यांचा समावेश होता. तामिळनाडूबाहेरही कधी न गेलेले विजय ५ सप्टेंबर २००७ रोजी इटलीकरिता रवाना झाले. जेव्हा ते मिलान येथे उतरले, तेव्हा तिथे बर्फवृष्टी होत होती. या बर्फवृष्टीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विजय यांच्याकडे जॅकेटदेखील नव्हते. विजय हे खूप सरळमार्गी होते, त्यामुळे त्यांनी कोणाकडे पैशाची मागणीदेखील केली नाही. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना स्वतःचे जॅकेट दिले. विजय यांच्या अडचणींचा अंत अजून झाला नव्हता. परदेशात असताना एकदा ते जेवणासाठी बाहेर गेले. एका रेस्तरॉमध्ये जाऊन त्यांनी शाकाहारी जेवणाची मागणी केली. मात्र तेथे सॅंडविचवरदेखील मासा होता. त्यामुळे त्यांना महिनाभर तांदळाच्या कोंड्यावर गुजरन करावी लागली. या दरम्यान काही लोकांच्या मदतीने विजय जेवण बनविण्यास शिकले. या सर्व कटू अनुभवानंतरही विजय यांनी शिक्षणावरुन आपले लक्ष विचलित केले नाही. दोन वर्षांच्या नॅनोटेक्नॉलॉजी कार्यक्रमात ११० पैकी १०८ गुण प्राप्त केले. मात्र त्यांची शिक्षणाची भूक अजुनही संपली नव्हती. त्यामुळे त्यांनी नॅनो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॅमेरा डिझायनिंगमध्ये थ्रीडी स्टॅकिंगमध्ये तज्ज्ञता मिळवण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम सरकार, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या आपापसातील सहयोगाने चालवण्यात येत होता.

image


या दरम्यान CERN ने युरोपियन कमिशनच्या सहाय्याने प्रगत उत्सर्जित किरणांचा (Advance Radiation) शोध लावण्यासाठी एका प्रकल्पाची घोषणा केली. मात्र त्यावेळेस त्यांच्या काकीचे कर्करोगाने निधन झाले, ज्याचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी कर्करोगाशी संबंधित असेलेल्या मुद्द्यांमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली. जेव्हा CERNने या कामाकरिता जगभरातून १४ लोकांचा शोध घेणे सुरू केले, तेव्हा विजय यांनी या कामासाठी आपले नावदेखील पुढे केले. CERN आणि झेक रिपब्लिकमधील एक कंपनी चालवत असलेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. या दरम्यान विजय यांना आपल्या विचारांचे रुपांतर एका उत्पादनात करायचे होते. त्यासाठी ते आतुर झाले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य संशोधनासहित उद्योजकतेला प्राधान्य देण्याचा होता. वडिल शेतकरी असल्याने विजय यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यासंबंधित बाबी चांगल्यापद्धतीने माहित होत्या. विविध पद्धतींची माहिती गोळा करण्याव्यतिरिक्त विजय अनेकदा विचार करत असत की, समाजाची परतफेड कशी करणार आहे. चार वर्षांनंतर जेव्हा विजय राजपलायमला परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की, ज्या परिसरात पूर्वी गोड्या पाण्याचा खळखळाट होत होता. तेथील लोक आता पाणी कमतरतेच्या संकटाचा सामना करत होते. तेव्हा विजय यांनी विचार केला की, जर कोणाजवळ १०० लीटर पाणी असेल, तर त्याचा तो सर्वोत्तम उपयोग कसा करू शकेल. विजय यांनी सांगितले की, ʻआमच्याकडे प्रत्येक गोष्ट मापण्यासाठी एक इंजिन आहे. यामुळे मी असे उपकरण बनविण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भूजल, खनिज, मातीचा पोत आणि अन्य गोष्टींची माहिती मिळू शकेल.ʼ

सहजरित्या वापरता येऊ शकते, अशा उपकरणाचा विजय यांनी आराखडा तयार केला. मातीशी संबंधित माहिती मापण्याशिवाय ही सर्व माहिती शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर पोहोचवण्याकरिता सक्षम असे हे उपकरण होते. या उपकरणामुळे शेतकऱ्याला लगेचच आपल्या मातीबाबतची सर्व माहिती मिळत होती. शेतकऱ्याला रंगाच्या माध्यमातून ही माहिती दिली जात होती. त्याकरिता लाल आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात येत होता. हिरवा रंग म्हणजे मातीची परिस्थिती चांगली आहे. तर लाल रंगाचा अर्थ म्हणजे खराब असा होता. याशिवाय त्यांनी अशा फवारणी यंत्रणेचा विकास केला, जी जमीनीची माहिती घेऊन त्याच ठिकाणी पाण्याची फवारणी करते, जिथे पाण्याची सर्वाधिक गरज आहे. यामुळे फक्त ३० टक्क्यांपर्यंत वीजबचतीसोबतच पाण्याची बचतदेखील होते.

image


देशात या प्रकल्पाला कोणीतरी सहाय्य करावे, अशी विजय यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा CERNची मदत घेतली. एका महिन्याच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या कारभारात कशाप्रकारे बदल करता येऊ शकतो, याचे त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना प्रोटोटाईप विकासाकरिता आर्थिक मदत मिळाली, त्यामुळे देशात ते आपले तंत्रज्ञान राबवू शकत होते. एक महिना सुट्टी घालवल्यानंतर ते संशोधन आणि जमिनीच्या स्तराचे काम करण्यासाठी भारतात परतले. या दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, ज्यात शेतीसंबंधित जोडलेल्या जगभरातील १५० नव्या संशोधनांच्या यंत्रणेचा समावेश करण्यात आला होता. त्यात विजय यांच्या सर्वाधिक १५ प्रकल्पांचा समावेश होता. विजय यांच्या मते, त्यांना Climate-KIC, CERN, ARDENT, EPFL, PSG-STEP या कंपन्यांकडून, सहकाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून मदत मिळत होती. मे २०१५ साली ʻस्मार्ट एग्रीʼची निवड जपान येथे आय़ोजित करण्यात आलेल्या आशियाई उद्योजकता पुरस्कारासाठी कऱण्यात आली. ʻस्मार्ट एग्रीʼने स्वित्झर्लंडमध्येदेखील पुरस्कार प्राप्त केला. विजय यांना विदेशातून भरपूर मदत आणि सहयोग मिळत आहे. मात्र त्यांना या कार्यात भारत सरकारनेदेखील मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण हे उत्पादन भारत देशाला लक्षात ठेवून बनविण्यात आले आहे. विजय ʻस्मार्ट एग्रीʼचे काम सप्ताहाच्या अखेरीस रात्री करत असत. याशिवाय रेडिएशनचे कामदेखील ते करत आहेत. विज्ञानाचे फायदेशीर परिणाम जेव्हा सर्वसामान्य मनुष्याला मिळतील, तेव्हाच विज्ञानाची गरज आणि संशोधनाचा त्याला अर्थ समजेल, असे विजय यांना वाटते.

लेखक - हरीश बिश्त

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags