'सुमिटोमो मित्सुई बँकिंग कार्पोरेशन'च्या मुंबई शाखेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

23rd Mar 2017
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर सी लिंक यासारखे मोठे प्रकल्प सुरू आहेत. तसेच नागपूर मुंबई समृद्धी मार्ग प्रकल्पही सुरू होत असून या पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील वित्तीय संस्थांसह सुमिटोमो मित्सुई बँकेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जपानमधील सुमिटोमो मित्सुई बँकिंग कार्पोरेशनच्या बांद्रा कुर्ला संकुलातील मुंबई शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामित्सु, एसएमबीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सोसुकी मोरी, महाव्यवस्थापक आणि भारतातील प्रमुख हिरायोकी काकितो, मुंबई शाखेचे महाव्यवस्थापक को इरिझाव्ह, कोटक महिंद्रा बँकेचे उपाध्यक्ष उदय कोटक, राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सामाजिक उत्तरदायित्वमधून पालघरमधील एका गावात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन व एसएमबीसी बँक यांच्यात यावेळी सामंजस्य करार झाला. यानुसार बँक पाणी पुरवठ्यासाठी सुमारे ८० लाख (८ मिलियन रु.) रुपये देणार आहे.


image


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हा देशातील एक प्रगत व उद्योगदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. देशातील परकीय गुंतवणुकीपैकी सर्वात जास्त पन्नास टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगातील आर्थिक केंद्रापैकी पाचव्या स्थानावर याचा क्रमांक लागतो. राज्य शासनाने बांद्रा कुर्ला संकुल येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर मुंबई ही देशाचे पॉवर हब होईल. त्यामुळे उद्योगांचे सर्वात पसंतीचे हे स्थान होईल. त्याचबरोबर येथून बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


image


राज्य शासनाने नुकताच आपला आर्थिक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य शासनाने केलेल्या उपाय योजनेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्राची सकारात्मक वाढ झाल्याचे अहवाल दिसले आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गेल्या वर्षी चार हजार गावे टंचाईमुक्त केली आहेत. यंदा ११ हजार गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून तीही लवकरच टंचाईमुक्त होतील. या अभियानामुळे शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील. तसेच खासगी कंपन्यांच्या सहाय्याने राज्यातील दोन हजार गावांचा कायापालट करण्याचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. सामाजिक उत्तर दायित्वातून बँकेने या प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जपानचे भारतातील राजदूत हिरामित्सु म्हणाले की, जपान व भारत यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील. तसेच अनेक जपानी कंपन्या भारतात पुढील काळात गुंतवणूक करु इच्छित आहेत. विशेषतः महाराष्ट्रात विविध कंपन्या व वित्तीय संस्थांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.


image


मुख्यमंत्री महोदयांचे कौतुक करुन कोटक म्हणाले की, मुंबई ही देशाचे आर्थिक इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेल्या योग्य पावलामुळे सध्या भारत व महाराष्ट्र हा विकासाच्या वाटेवर आहे. येथे गुंतवणूक करण्याची हीच योग्य अनोखी संधी आहे. 

बँकेचे भारतातील प्रमुख हिरायोकी काकितो म्हणाले की, बँकेने व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरविले आहे. यानुसार आज बँक आणि पालघर जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य करार (मोमोरँडम ऑफ कि टर्म्स) करण्यात आला आहे. यानुसार पालघरमधील एका आदिवासी गावामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी बँक ८० लाख रुपये उपलब्ध करून देणार आहे. 

(सौजन्य - महान्युज)

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India