चांगल्या कामाची सवय लावून घेतली तर वाईट कामासाठी वेळच मिळणार नाही- डॉ संदीप तांबारे
ग्रामीण भागात दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण अधिकाधिक वाढत चालले आहे. वाढते व्यसनाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून मुक्तांगण सारख्या व्यसन मुक्ती केंद्राची प्रेरणा घेऊन डॉ संदीप तांबारे यांनी ग्रामीण भागातील जनतेला व्यसनमुक्त करण्यासाठी २१ जून २०१० ला 'यश मेडिकल फाऊन्डेशन'ची स्थापना केली. या फाऊन्डेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सात हजार लोकांना व्यसनमुक्त केले आहे. व्यसन मुक्त होण्यासाठी या केंद्राला आत्तापर्यंत ९३०० लोकांनी भेट दिली आहे त्यापैकी ७००० लोक दोन वर्ष सातत्याने व्यसनमुक्ती केंद्राच्या संपर्कात राहून व्यसनमुक्त जीवन जगत आहेत.
या व्यसन मुक्ती केंद्रात राज्यातून तसेच राज्याबाहेरून अनेकजण उपचारासाठी येतात त्यापैकी प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड, लातूर, पुणे, मुंबई, छत्तीसगड, कर्नाटक, बिदर, येथून उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. डॉ संदीप तांबारे सांगतात की, "व्यसन मुक्त करण्यासाठी लोकांना मारणे, धमकावणे, त्यांचा छळ करणे असे भयंकर प्रकार केले जातात, इथे मात्र अश्या कोणत्याही भयंकर प्रकाराचा अवलंब केला जात नाही, तर वैयक्तिक समुपदेशन आणि इथली उपचार पद्धती पाहून लोकांना आनंद होतो. व्यसन मुक्तीसाठी हे केंद्र एक चांगला पर्याय आहे हे अद्याप अनेकांना माहित नाही.
डॉ तांबारे हे या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसन सोडण्यासाठी येणाऱ्या लोकांची स्वतः मानसिक तयारी करून येतात. चांगले उपचार घेऊन या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी व्यसनी व्यक्तीची ९० % मानसिक केली जाते. त्यानंतर व्यसन सोडवण्याची पुढील प्रक्रिया सहजसोपी होते. ध्यान, औषधं, समुपदेशन या तीन टप्प्यातून त्यांच्यावर उपचार केले जातात. व्यसनी व्यक्तीला विशेष विभागात राहून एक महिना उपचार घ्यावे लागतात, दर सहा महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तीन तपासण्या केल्या जातात.
या व्यसनात तुम्ही कसे अडकलात आणि व्यसनाचे प्रमाण कसे वाढत गेले यावर डॉक्टर सविस्तर चर्चा करतात. त्या व्यक्तीचे व्यसन बंद झाल्यावर जे शारीरिक त्रास होतात त्यावर औषधाेपचार केले जातात. एखादी व्यक्ती व्यसनापासून मुक्त झाली आहे हे ओळखण्यासाठी 'कम्प्लीट होल पर्सन रिक्व्हरी' उपचार पद्धतीचा साधारण दोन वर्षाचा कालावधी आहे. डॉ तांबारे हे वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम घेऊन प्रबोधन करतात.
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी खचून जाऊन व्यसनाकडे वळला आहे त्यातून मुक्त करण्यासाठी यश मेडिकल फाऊन्डेशन आयोजित बळीराज चेतना अभियाना अंतर्गत चारा छावणी मध्ये जाऊन आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आणि व्यसन मुक्ती मेळावा घेण्यात आला या शिबिरात ३२८ शेतकऱ्यांची आरोग्यतपासणी करण्यात आली व मोफत उपचार केले गेलेत. उपस्थितीत सर्व शेतकरी बांधवाना व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सामाजिक न्याय विभागांतर्गत वर्षभरात पाच वेळा कार्यक्रम घेतले जातात. स्वामी विवेकानंद जयंती, महात्मा गांधी जयंती दिनापासून सात दिवस व्यसन मुक्ती सप्ताह साजरा केला जातो. या संस्थेमार्फत महात्मा गांधी व्यसन मुक्ती ग्राम अभियान राबवून गाव व्यसन मुक्त करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. यासाठी दहा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना जिल्हा पोलीस दलाचाही मोठ्या प्रमाणात सहभाग लाभतो. जिल्हा पोलीस कार्यालय अंतर्गत सर्व गावातील पोलीस पाटील यांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
" मला जेव्हा एखादे कुटुंब व्यसनमुक्त झाल्यामुळे भेटायला येते तेव्हा त्यांच्या डोळ्यातला जो आनंद दिसतो तो कुठल्याही शब्दात किवा पैशात मोजता येत नाही याचं आत्मिक समाधान मला वाटतं."डॉ तांबारे सांगतात.
व्यसन मुक्त होण्यासाठी डॉक्टर सांगतात की, चांगल्या कामाची व्यसने लावून घेतली तर वाईट व्यसनाकडे मन वळणार नाही. त्यासाठी चांगल्या कामाची सवय लावून घेतली तर वाईट कामासाठी वेळच मिळणार नाही. जसं की आम्हाला व्यसनमुक्ती करण्याचं व्यसन लागलं आहे तर अन्य व्यसनाकडे वळताच येत नाही. डॉ तांबारे यांना व्यसनमुक्ती व सामाजिक कार्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा