संपादने
Marathi

स्नॅकीबलः एक पाऊल निरोगी जगण्याच्या दिशेने

Team YS Marathi
10th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

सध्याच्या काळात खास करुन मोठ्या शहरांमध्ये लोकांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे, धावपळीचे झाले आहे. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या डेडलाईन्स पाळण्याचा प्रचंड तणाव सगळ्यांनाच सहन करावा लागतो आणि हे करत असताना सर्वाधिक दुर्लक्ष होते ते आरोग्याकडेच.... खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि त्यातही आरोग्याला हानिकारक असे स्नॅक्स आणि जंकफुड तर आरोग्याचे अधिकच नुकसान करतात. या गंभीर समस्येवर काहीतरी चांगला उपाय देण्याचे लक्ष्य आहे स्नॅकीबल (Snackible) चे....

आदित्य संघवी या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून स्नॅकीबलचा जन्म झाला. आसपासच्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींनी त्यांना अस्वस्थच केले होते आणि म्हणूनच एकप्रकारे भारतातील स्नॅकींग उद्योगात क्रांतीकारी बदल करण्याच्या हेतूने त्यांनी मे, २०१५ मध्ये स्नॅकीबलला सुरुवात केली. मुंबईमध्ये थेमिस या सल्लागार कंपनीत काम करत असताना त्यांना ही कल्पना सुचली होती. आरोग्याला पोषक असे प्रिमियम रेंजचे स्नॅक्स वाजवी दरात आणि सहजपणे उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य समोर ठेवून स्नॅकीबलचे काम सुरु आहे.

कुठल्याही कामाच्या ठिकाणी तेथील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी या एकसारख्याच असल्याचे आदित्य यांना प्रकर्षाने जाणवू लागले होते. “ जेवणाच्या सुट्टीनंतर दोनेक तासांनी म्हणजे साधारणपणे साडेचार ते सहा या वेळात माझे बहुतेक सहकारी हे स्नॅक्स खाताना दिसायचे. एकप्रकारे या गोष्टीची त्यांना सवयच जडली होती. त्यातही मुख्यतः यामध्ये आरोग्याला हानीकारक अशाच पदार्थांचा, जसे की रस्तोरस्ती गाड्यांवर विकल्या जात असलेल्या तळकट-तेलकट पदार्थांपासून ते काऊंटरवर मिळणाऱ्या विविध प्रक्रिया केलेल्या पॅकेज्ड स्नॅक्सचा यामध्ये समावेश असे,” पंचवीस वर्षीय आदित्य सांगतात.

image


विशेष म्हणजे यापैकी बहुतेक लोक हे सकाळचा नाष्टा आणि दोन्ही वेळच्या जेवणासाठी पोषक जेवणाचीच निवड करत असल्याचेही आदित्य यांनी पाहिले. मग चारच्या नाष्ट्याचाच अपवाद का? हा विचार सहाजिकच त्यांच्या मनात आला. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, या वेळेत मिळू शकतील असे, वाजवी दरात उपलब्ध असलेले आणि त्याचबरोबर आरोग्यदायी, पोषक आणि चविष्ट असे स्नॅक्सचे पर्यायच उपलब्ध नाही, मात्र नेहमीप्रमाणेच एकदा सुपरमार्केटमध्ये गेले असताना त्यांना दिसून आले की काही ठराविक सुपरमार्केटस् मध्ये, जसे की नेचर्स बास्केट आणि फुड हॉल, पोषक स्नॅक्सचे काही पर्याय नक्कीच उपलब्ध होते. पण त्यांच्या साधारणपणे किंमती अशा होत्या, की सामान्य लोकांना ते महागच वाटले असते.

याबाबत अधिक विचार करता, त्यांना ठामपणे वाटू लागले की, चांगले स्नॅक्स उपलब्ध करुन देण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता तो आरोग्य आणि चव यामध्ये असलेल्या संघर्षचा... उदाहरणार्थ हाय फायबर कुकीजची तुलना आपल्या आवडीच्या चॉकलेट कुकीजच्या चवीशी होऊच शकत नाही तसेच मल्टीग्रेन डायट खाकरा हा आपण नेहमी चहाच्या वेळी खात असलेल्या खाकऱ्यापेक्षा चवीला अगदीच कमी असतो.

“ जर का आपण अशा एखाद्या संकेतस्थळावर लॉग-ऑन करु शकलो, जेथे चव आणि आरोग्य या दोन्ही गरजा पूर्ण करतील, असे स्नॅक्सचे विविध पर्याय उपलब्ध असतील आणि त्यातून आपल्या आवडीच्या पर्यायाची निवड करता येईल, तर? आणि जर का हे स्नॅक्स आपल्या घरपोच पोहचवून हे संकेतस्थळ आपले आयुष्य अधिकच सोपे करणार असेल, तर? हाच विचार मला आणखी एक पाऊल पुढे न्यायचा होता,” आदित्य पुढे सांगतात.

युकेमधील कार्डीफ विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या आदित्य यांना त्यांच्या अनुभवामधून एक गोष्ट माहित होती, की अशी काही सबस्क्रीप्शन मॉडेल्स आहेत, ज्याचा वापर केल्यास त्यांना त्यांचा विचार प्रत्यक्षात आणता येईल. ज्यामुळे ग्राहकांना पोषक आणि चविष्ट स्नॅक्सचा बॉक्स परवडणाऱ्या किंमतीत मिळू शकेल, अशाच एका मॉडेलचा वापर करुन आदित्य यांनी स्नॅकीबलची रचना केली.

एकदा संकेतस्थळ आणि मॉडेल निश्चित झाल्यावर आदित्यने आपली कोअर टीम बनविण्यास सुरुवात केली. मार्केटींग आणि स्ट्रॅटेजी विभागाचा प्रमुख म्हणून अर्जुन मेहता त्यांच्याकडे आले. कॅनडामधून राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयात पदवी घेतलेल्या अर्जुन यांनी त्यापूर्वी मिडडे आणि एझबी ऍन्ड पार्टनर्स या लॉ फर्ममध्ये काम केले होते. तर बिझनेस डेवलपमेंट आणि सेल्सच्या प्रमुखपदी अमन तुळजापुरकर आले. अमन हे न्यूयॉर्क विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांना सर्वात महत्वाची साथ मिळाली ती निभ्रंत शाह यांची... अनेक उद्योगांचा अनुभव असलेले आणि एंजल इन्व्हेस्टर शाह हे या टीमचे धोरण सल्लागार बनले.

image


स्नॅकीबलकडे सध्या अकरा जणांची टीम आहे. जी ऑपरेशन्स, पॅकेजिंग आणि क्वालिटी कंट्रोल, फुड इनोव्हेशन, मार्केटींग, बिझनेस डेवलपमेंट आणि सेल्स, या विभागांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर आपल्या पोषक स्नॅक्समध्ये अधिक नाविन्य आणण्याच्या हेतूने त्यांनी देशभरातील विविध फुड टेक्नॉलॉजिस्ट अर्थात अन्न तंत्रज्ञ आणि आहारतज्ज्ञांनाही करारबद्ध केले असल्याचेही आदित्य सांगतात.

कच्चा माल मिळविणे, उत्पादन, पॅकेजिंग आणि वितरण याची संपूर्ण काळजी ही इनहाऊसच घेतली जाते. आदित्य सांगतात की प्रत्येक उत्पादनानुसार प्रक्रियेत बदल करावा लागतो. ते पुढे सांगतात, की पोषक स्नॅक्सची स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आणखी एक निर्णय घेतला, तो म्हणजे देशाच्या विविध भागांमधून कच्चा माल आणण्याचा....

हिमालयन ब्लॅक सॉल्ट ऍपल चीप्स या त्यांच्या एका उत्पादनाचे उदाहरण यानिमित्ताने ते देतात. या उत्पादनासाठी त्यांची टीम खास हिमाचल प्रदेशमधील ऑर्गॅनिक फार्मपर्यंत गेल्याचे आदित्य सांगतात आणि या उत्पादनासाठी आवश्यक ती सफरचंदे त्या हंगामात तेथूनच मागविली जातात. त्यानंतर जवळच्याच उत्पादन सेटअपमध्ये ती पाठविली जातात. या सेटअपचा शोधही त्यांच्या टीमला हिमाचलमध्ये काम करतानाच लागला होता, तेथे हे चीप्स बनविले जातात आणि मुंबईतील घाटकोपर येथे असलेल्या गोदामाकडे रवाना होतात.

या ठिकाणी या चीप्सची चव चाखून त्यांची गुणवत्ता तपासली जाते. सुरुवातीला त्यांनी क्वालिटी चेक अर्थात गुणवत्ता तपासणीसाठी या व्यवसायात नावाजलेल्या इश्मीत चंडीओक यांची नेमणूक केली. आज ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे सुरु आहे. प्रत्येक उत्पादनासाठी उत्पादन प्रक्रिया आणि सेटअप वेगवेगळे असतात.

सध्या स्नॅकीबलकडे त्यांच्या इनहाऊस प्रॉडक्ट इनोव्हेशन टीमने तयार केलेले सतरा प्रकार आहेत. दरमहा ते साधारणपणे तीन नवीन स्नॅक्सचा समावेश करतात. त्यांच्याकडे सध्या असलेल्या उत्पादनांमध्ये होल व्हीट वॅफल्स, हिमालयन ब्लॅक सॉल्ट ऍपल चीप्स, सीडी ट्रेल मिक्स, हॉट वसाबी पीनटस् आणि बेक्ड बाकरवडी यांचा समावेश आहे.

“ आमच्याकडे असलेल्या वेबसाईट बिहेवियर डेटाचा उपयोग करुन आम्ही सातत्याने आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्येही सुधारणा करत असतो. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आणि बॅक एंड ऑपरेशन्स सुरुळीत करण्यासाठी काही मूलगामी तांत्रिक बदलांवरही आमचे काम सुरु आहे,” आदित्य सांगतात.

प्रती आठवडा पंचवीस टक्क्यांनी आपली वाढ होत असून देशभरातील ३८ शहरांमध्ये आपले ग्राहक असल्याचा टीमचा दावा आहे. तसेच आतापर्यंत सहा हजारच्या वर ऑर्डर्स पूर्ण केल्याचेही ते सांगतात. नुकतेच त्यांनी रिटेल ऑपरेशन्समध्येही पाऊल टाकले आहे आणि फक्त मुंबईमध्येच ३,५०० च्या वर मॉडर्न ट्रेड शॉप्सपर्यंत पोहचू शकण्याच्या दृष्टीने वितरकांबरोबर त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. तर आगामी तीन महिन्यांच्या काळात सर्व महानगरांमध्ये रिटेलच्या माध्यमातून विक्री सुरु करण्याची त्यांची योजना आहे.

थेमिसचे सीईओही असलेल्या निभ्रंत यांच्याकडून स्नॅकीबलने सीड फंडींग उभारले आहे. आदित्य पुढे सांगतात की मोठा डेटा आणि ऍनॅलिटीक्स वापर करत असलेले त्यांचे प्रोपरायटरी अल्गोरीदम्स लवकरच ग्राहकांना त्यांच्या प्राधान्यानुसार आणि अचूक आहारानुसार तयार केलेला बॉक्स देऊ शकतील.

युवर स्टोरीचे मत

आरोग्याबाबत वाढती जागरुती आणि वाढती संपन्नता यामुळे स्नॅकींग उद्योगामध्ये पोषक स्नॅक्स महत्वाचे ठरताना दिसत आहेत. पीडब्ल्यूसी-एफआयसीसीआयच्या एका अंदाजानुसार पोषक पदार्थ, शीतपेये आणि इतर पूरक घटकांच्या विभागाचा देशातील बाजारपेठेतील वाटा १४,५०० ते १५,००० कोटी रुपये एवढा आहे.

योगा बार्स, व्हॅलेंशिया, ग्रीन स्नॅक्स, या आणि यांसारख्या इतर अनेक खेळाडूंची या विभागातील वाढती संख्या याची वाढती लोकप्रियता दाखवून देते. आजही हल्दीरामचा महसूल हा ३५०० कोटी रुपये एवढा असून तो मॅकडोनाल्डस् आणि डोमिनॉज सारख्या बड्या खेळाडूंच्या एकत्र महसूलापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोषक स्नॅक्सच्या विभागातील ब्रॅंडस् ना या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी त्यांना खरोखरच नाविन्यपूर्ण आणि वेगळे असावे लागेल.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

सेंद्रिय अन्नपदार्थ आणि उत्पादने मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण ‘फार्म 2 किचन’

"छंद सोडू नका..त्यातून तुमचं आयुष्य बदलू शकतं " सरिता सुब्रमण्यम -‘दि बेकर्स नूक’

‘भाकरीचे गाव’ अशी ओळख असलेले ‘तक्का गाव’

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags