संपादने
Marathi

चलती का नाम जिंदगी..., चेन्नईवरील आपत्तीत झाले माणूसकीचे दर्शन

Team YS Marathi
9th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

अखेरीस आता माझ्या घराबाहेरील रस्त्यावरील पाणी निवळू लागले आहे, वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे, माझे इंटरनेट कनेक्शन थांबत थांबत का होईना, परंतु पुन्हा सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहे. माझे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या संपूर्ण आठवड्यात जेव्हा इतर सर्व मोबाईल नेटवर्कने साथ सोडली होती, तेव्हा फक्त माझ्या मोबाईलमधील बीएसएनएलचे कनेक्शन अधिकतम वेळेस काम करत होते. तसेच मोबाईल डाटादेखील काम करत होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत अडकलेली मी माझ्या काही नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी संपर्क साधण्यात सक्षम होती. आता मी येथे माझ्या अग्निपरिक्षेबद्दल, माफ करा संपूर्ण शहरासमोर उभ्या असलेल्या या नैसर्गिक संकटाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करते. ही आपबीती आहे युअरस्टोरीच्या चेन्नई येथील कर्मचारी इंदुजा रघुनाथन यांची त्यांच्याच शब्दातून.


image


इंदुजा सांगतात की, या सर्व नैसर्गिक आपत्तीला एक डिसेंबरपासून सुरुवात झाली, जेव्हा मागीलप्रमाणे पुन्हा एकदा निसर्गाने रौद्ररुप धारण केले होते. ज्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्याचा प्रयत्न करत होती, ते रस्ते पुन्हा एकदा जलमय झाले. मात्र तोपर्य़ंत परिस्थिती नियंत्रणात होती. वास्तविक आम्हा चेन्नईच्या नागरिकांना या जलमय रस्त्यांची जणूकाही सवयच झाली आहे. पाण्याने भरलेले खड्डे, गटारे आणि नाल्यांपासून सावधपणे आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यातील सामानाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत होतो. वास्तविक पाहता, चेन्नई हे भारतातील मुख्य शहरांपैकी एक शहर असल्याने आम्ही एवढे नशीबवान होतो की, बुधवार रात्रीपर्यंत आम्ही या निरंतर पडणाऱ्या पावसाच्या संकटापासून दूर आणि सुरक्षित होतो. मी माझ्या दैनंदिन जीवनातील कामात व्यस्त होते. मात्र माझ्या मोबाईल डाटाच्या हॉटस्पॉटचा मी लॅपटॉपवर अत्यंत धीम्या गतीने वापर करत होते.


image


तो दोन डिसेंबर बुधवारचा दिवस होता. मी माझे दैनंदिन कामकाज आटोपून टीव्हीवर बातम्या पाहण्यात मश्गूल होते. विविध चॅनेलवरील वार्ताहरांमुळे मला हे समजण्यास मदत झाली की, कशाप्रकारे लोकांनी तलावं आणि नाल्यांवर आपली घरे बांधली आहेत आणि ते तेथे वास्तव्य करत आहेत. ज्यामुळे पावसाचे पाणी शहराबाहेर जाऊ शकत नव्हते. माझ्या घरातदेखील या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत मी माझे मत नोंदवले की, आपल्यासाठी नव्या घराची किंवा एखाद्या भूखंडाची खरेदी करताना लोक निसर्गाकडे लक्षच देत नाहीत. अखेरीस दिवसभराच्या थकव्यामुळे माझा डोळा कधी लागला, ते मलाच समजले नाही. सकाळी जवळपास सहाच्या सुमारास मी माझ्या वडिलांच्या गोंधळामुळे झोपेतून जागी झाले. तेव्हा रस्त्यावरुन जाणारी पोलिसांची काही वाहने आवाज करत होती, तसेच आमच्या शेजारी राहणारी एक स्त्री जोरजोरात ʻपाणी-पाणीʼ, असे ओरडत होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर काही प्रमाणात पाणी भरले असेल, असा विचार मी मनोमन केला. तसेच ही काही मोठी आपत्ती नव्हती, ज्यावर एवढा गोंधळा माजायला हवा आणि माझी झोपमोड व्हायला हवी, असे मला वाटले. तेव्हाच मला माझ्या वडिलांचा आवाज आला की, ʻआपल्या घरात पाणी भरले आहे.ʼ तेव्हा मी झटका लागल्याप्रमाणे उठले आणि धावतच घराच्या मुख्यद्वारापाशी पोहोचले. तेव्हा मला तेथे पाण्याची धार वाहत असल्याचे दिसले. जगाच्या कोणत्या कोपऱ्यावरुन एवढे पाणी येथे आले. यावेळेस तर पाऊसदेखील पडत नव्हता. काय सुरू आहे, यापासून अनभिज्ञ असलेली मी रस्त्यावरील गर्दीचा एक भाग झाले आणि आपल्या दिशेने वाढत असलेल्या पाण्याला पाहू लागले. आम्ही सर्व लोकांनी मिळून आमच्या घराच्या मुख्य दरवाज्यापाशी रेतीने भरलेल्या गोण्या आणून टाकल्या, जेणेकरुन आमच्या घरात शिरणाऱ्या पाण्याला आम्ही रोखू शकू. कितीतरी तास हेच सुरू होते. यादरम्यानच आमच्या संपूर्ण परिसराची वीज गायब झाली आणि त्यासोबतच फोनच्या सिग्नलनेदेखील काम करायचे बंद केले.

काही तासांनंतर पाण्याची पातळी काहीप्रमाणात घटली. त्यासोबतच काही निवडक घरांचा वीजपुरवठादेखील पूर्ववत झाला. सुदैवाने त्यापैकी एक घर माझे होते. पाण्याच्या या प्रवाहाचे कारण जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मी टीव्ही चालू केला. तेव्हा मला समजले की, एका जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याने जवळीलच एक नदी ओव्हरफ्लो होऊन पाण्याने शहरात शिरकाव केला. मी कधी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता की, ज्या परिसरात आम्ही राहतो, तेथे किनारपट्टीच्या परिसराप्रमाणे पाणी भरण्याची समस्या उद्भवू शकते. आम्ही सर्वजण अडचणीत होतो. रस्त्यांवर पाणी भरल्याने संपूर्ण चेन्नई शहर ठप्प झाले होते आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही दुसऱ्या परिसरातील घरासमोर जवळपास पाच ते दहा फुटपर्य़ंत पाणी भरलेले पाहिले. तळमजल्यावरील अनेक घरे पाण्याखाली गेली होती. अनेक नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात वाहून गेली होती. या सर्व नैसर्गिक आपत्तीतदेखील मी सुरक्षित होते आणि माझे किमान नुकसान झाले होते, त्यामुळे मी मनोमन ईश्वराचे आभार मानले.

गुरुवारी जेव्हा माझ्या मोबाईल डाटाची सेवा पूर्ववत झाली. तेव्हा मी माझे फेसबूक, ट्विटर अकाऊंट पाहिले, तेव्हा मी त्यावर शेकडो डिस्ट्रेस कॉल, परदेशात राहणाऱ्या हितचिंतकांचे संदेश पाहिले. माझ्या वर्तमानस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आतूर असलेले पोस्ट मी पाहिले. अजुनही आसपासच्या परिसरातील मोबाईल काम करत नव्हते. त्या नागरिकांचे नातेवाईकदेखील त्यांच्याबाबतीत जाणून घेण्यास आतूर झाले होते. या सर्व गोष्टींची जाणीव झाल्यानंतर मी व्हॉटसएपच्या माध्यमातून काही जुन्या मित्र आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला. जेणेकरुन आम्ही सुरक्षित असल्याची माहिती आमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचेल. आमचा संपूर्ण दिवस आमच्या हितचिंतकांना आम्ही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात गेला. अनेक लोकांशी आम्ही संपर्क साधला होता. मात्र अद्यापही काही लोकांशी आमचा संपर्क झाला नव्हता कारण अनेक लोक अद्यापही १० फिट पाण्यापलीकडे होते आणि रस्तेवाहतूक पूर्णपणे ठप्प होती. एका थकलेल्या दिवसानंतर अखेरीस मी बिछान्यावर विसावले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपेतून जागी झाले, तेव्हा माझा इनबॉक्स डिस्ट्रेस संदेशांनी भरलेला होता. त्यात एका गर्भवती महिलेला प्रसूतीकरिता डॉक्टरची आवश्यकता होती, एक ज्येष्ठ दांम्पत्य आपत्कालीन उपचाराची वाट पाहत होते, एक नवजात शिशू दुधाची वाट पाहत होता, अशा अनेक संदेशांचा समावेश होता. फेसबूक आणि ट्विटरवर तयार करण्यात आलेल्या अनेक स्वयंसेवकांच्या गटाने हे संदेश पुढे पोहोचवले आणि बचावकार्याकरिता लोकांना प्रेरीत केले. त्यावेळेस मला जाणीव झाली की, फक्त घरी बसून मी समाधानी होऊ शकत नाही. तेव्हा मी स्वतः घरातून बाहेर पडून लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या एका मित्रासह बाहेर पडली आणि अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले, ज्यांना मदतीची आवश्यकता होती. मला एक वृद्ध दांम्पत्य भेटले, जे या आपत्तीत अडकले होते. आम्ही त्यांना मदत केली. अशा परिस्थितीत त्या वयोवृद्ध दांम्पत्याला भरुन येणे, सहाजिकच होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांपासून त्यांना कोणी दुसरा माणूसच दिसलेला नाही. याशिवाय सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जण छायाचित्र काढतानादेखील आनंदी होते. त्यांनी आम्हाला यापेक्षाही वाईट परिस्थितीतून जात असलेल्या आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्यास सांगितले. त्यापैकी काहीजण तर अशक्त आणि एकटे वृद्ध नागरिक होते. ज्यांना मदतीची नितांत आवश्यकता होती. आम्ही त्यांना मदत केली. त्यापैकी अनेकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलविले.

image


मी माझे हे अभियान अजून काही दिवस सुरू ठेवायचा निर्णय घेतला. लोकांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करुन देण्याचे मी ठरविले. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मी रस्त्यावरच मदतकार्य करत होती. माझ्या काही मित्रपरिवाराच्या साथीने मी गरजूंना पिण्याचे पाणी, बिस्किटचे पुडे, दुध पाकिटे यासोबतच गरजेच्या वस्तुंचे वितरण केले. अशा नागरिकांना तत्काळ मदत करणाऱ्या मित्रांची मी आभारी आहे. आमची टीम आता चौघांची झाली होती. दोन चारचाकी वाहनांच्या साथीने आम्ही वृद्धाश्रमात पोहोचलो. तेथे ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे वृद्ध उपस्थित होते. जेव्हा आम्ही त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. पुन्हा परतत असताना आम्ही पुरामुळे उद्ध्वस्त झालेला एक परिसर पाहिला. तेथे लोक खाद्यपदार्थांचा शोध घेताना रस्त्यावर अडकले होते. आम्ही एका मित्राद्वारे पाठविण्यात आलेली २०० तयार खाद्यपदार्थांची पाकिटे त्या परिसरात वितरीत केली. चेन्नईला आता दाही दिशांकडून मदतीचे हात पुढे येत होते. गरजूंना मदत करण्यासाठी स्वयंसेवकदेखील समोर येत होते. लोकांना आता माणूसकीचे दर्शन होऊ लागले होते. मंदिर, मस्जिद आणि प्रार्थनास्थळांनी गरजू लोकांच्या वास्तव्याकरिता आपले दरवाजे खोलले होते. लोकांनी अनेक अनोळखी गरजूंकरिता जेवण बनविले होते. अखेरीस मी माझ्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे की, मी एका अशा कंपनीत कार्य़रत आहे, ज्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. शिवाय मला काम करण्यासाठी सक्तीदेखील केली नाही. मला समजून घेतल्याबद्दल आणि मला माझ्या चेन्नईकरिता काही करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

image


लेखक - इंदुजा रघुनाथन

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags