संपादने
Marathi

मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील युवा इंदुरकर… हॅकर ते तंत्राप्युनर ५ हजारांच्या भरवशावरील उत्पन्नाचे उड्डाण चक्क ५ कोटींपर्यंत!

शशांक चौरे… इंदूरच्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील मुलगा… वयाच्या तेराव्या वर्षी संगणकाच्या प्रेमात पडला. सुरवात कॉम्प्युटर गेम्सने झाली आणि मग रात्र-रात्र फक्त हाच एक उद्योग… शाळेला काय, चक्क परीक्षेलाही या नादात दांडी असायची. ‘सोळावं वरीस धोक्याचं’, असं म्हणण्याची वेळ त्यानं आई-बाबांवर येऊच दिली नाही. आई-बाबांच्या दृष्टीने तर वयाच्या तेराव्या वर्षीच शशांकच्या आयुष्याचे तीन तेरा झालेले होते… पण वस्तुस्थिती तशी नव्हती. शशांक पुढे जाऊन आई-बाबांच्या सर्व शंका दूर करणार होता… यशाची लंका जिंकणार होता…

Chandrakant Yadav
3rd Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

शशांक चौरे… इंदूरच्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील मुलगा… वयाच्या तेराव्या वर्षी संगणकाच्या प्रेमात पडला. सुरवात कॉम्प्युटर गेम्सने झाली आणि मग रात्र-रात्र फक्त हाच एक उद्योग… शाळेला काय, चक्क परीक्षेलाही या नादात दांडी असायची. ‘सोळावं वरीस धोक्याचं’, असं म्हणण्याची वेळ त्यानं आई-बाबांवर येऊच दिली नाही. आई-बाबांच्या दृष्टीने तर वयाच्या तेराव्या वर्षीच शशांकच्या आयुष्याचे तीन तेरा झालेले होते… पण वस्तुस्थिती तशी नव्हती. शशांक पुढे जाऊन आई-बाबांच्या सर्व शंका दूर करणार होता… यशाची लंका जिंकणार होता…


शशांक चौरे…

शशांक चौरे…


कोकेनसारखे व्यसन ‘कोडिंग’चे…

एखाद्याला कोकेनचे जडते तसे ‘कोडिंग’चे व्यसन शशांकला जडलेले होते. चॅट रुम्समधील त्याच्या नव्या मित्रांमध्ये तर हॅकिंगचे फॅडच होते. आणि काळ पुढे सरकू लागला तसा हा या सगळ्यांच्याच तुलनेत महाहॅकर ठरत गेला. माहितीच्या महाजालातील चौर्यकर्मात अशाप्रकारे शशांक चौरे हे नाव चौखूर उधळू लागले. ‘क्रॅकपॅल.कॉम’च्या माध्यमातून शशांकच्या कमाईलाही सुरवात झालेली होती. एका ई-मेल अकाउंटसाठी ही वेबसाइट तेव्हा ५० डॉलर मोबदला देत असे. सोळाव्या वर्षीच त्याच्या खिशात पैसा खेळू-खुळखुळू लागलेला होता.


व्हायरस आणि इंटरपोल…

अभियांत्रिकी पदवी प्रशिक्षणादरम्यानचे पहिले वर्ष शशांकने हॅकिंगच्या उद्योगातच घालवले. स्वत: शशांक यांच्या शब्दांत सांगायचे तर… ‘‘चाळीसच्या वर भारत सरकारच्या आणि शंभरावर बड्या कंपन्यांच्या वेबसाइटस् मी आठ मिनिटांत हॅक केल्या. एनटीपीसीचे टेंडर, दिल्ली सरकारच्या प्रशासकीय साइटस् असे बरेच काही त्यात होते. सरकारच्या या अत्यंत तकलादू सायबर सुरक्षेबद्दल इत्थंभूत माहिती द्यावी म्हणून मी ‘सीईआरटी’ आणि ‘एनआयसी’ला विस्तृत अहवालही पाठवले, पण त्यांच्याकडून थंड प्रतिसाद होता. शेवटी मी हात टेकले.’’


शशांक यांनी कितीतरी व्हायरस ट्रॅक केले. सायबर सुरक्षेसंदर्भात उपयुक्त ठरतील अशा तंत्रावली तर एकापाठोपाठ लिहिल्या.


इंदुर पोलिसांसमवेत दोन वर्षे

इंदुर पोलिसांसमवेतही काम केले. तब्बल दोन वर्षे शशांक इंदुर पोलिसांचे अधिकृत सायबर सुरक्षा तज्ज्ञ होते. वेब सुरक्षा हा आगामी काळातला कळीचा मुद्दा होता, पण बक्कळ पैसा कमावण्याच्या संधी शशांक यांच्या दृष्टीने त्यात कमीच होत्या. ‘आयआरसी चॅट नेटवर्क’च्या तज्ज्ञ पॅनेलवर शशांक होते, पण खुद्द शशांक यांच्या मते हे (पॅनेल) एक असे ठिकाण होते, जेथे इंटरनेटच्या दृष्टीने बाष्कळ ठरतील अशाच गोष्टी तेवढ्या चालत असत.


‘आयआरसी’ची आणखी एक मजेदार गोष्ट अशी, की तुम्हाला कळतच नसे की तुम्ही कुणासोबत चॅटिंग करत आहात. इंटरपोल, एफबीआय, सीआयए, डेफ्कॉन हॅकर्स की आणखी कोण… कुठलंही नाव घ्या अगदी सगळे झाडून हजर! बड्या कंपन्या इथं आवर्जून हजर असत. वर्षभर या कंपन्यांच्या लिलाव प्रक्रियांतील एक घटक म्हणून शशांक यांनी भूमिका बजावली, पण यात एखादवेळी आपलाच बोऱ्या वाजेल, हे त्यांच्या लक्षात आले. शशांक सांगतात, ‘‘हे काम जोखमीचे तर होतेच, पण वाईटही होते. पुढे मी खूप काही चांगले केले, भव्य-दिव्य केले कारण मला तेव्हाच कळून चुकलेले होते, की ई-मेल आणि तत्सम बाबी हॅक करण्यासाठी माझा जन्म नाहीये!’’


…आणि विशेष म्हणजे शशांक यांचा जन्म कॉलेज वगैरे शिकण्यासाठीही नव्हताच… सेकंड इअरला त्यांनी दांडी मारलीच किंवा डच्चू दिला म्हणा…


कॉलेज ड्रॉपाउट/वेब सिक्युरिटी एक्सपर्ट


स्टिव्ह जॉब्ससुद्धा रिड कॉलेजचे ड्रॉपआउट आहेत आणि पुढे त्यांनी ‘ॲपल’सारखी कंपनी उभी केली. बिल गेटस् हे याच यादीतले. तेही हॉवर्डचे ड्रॉपआउट आहेत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांचेही असेच… पण हे सगळे युरोप-अमेरिकेत ठिक आहे. आपल्याकडे भारतात कॉलेज ड्रॉपआउट म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने दगडच! शशांक यांच्याबाबतीत एक बरे झाले, की त्यांना घरातल्यांची बोलणी यामुळे खावी लागली नाहीत. शशांक तेरा वर्षांचे होते, तेव्हापासून आपला मुलगा कशा वळणाचा आहे, हे त्यांच्या आई-बाबांच्या अंगवळणी पडलेले होतेच, पण शेजाऱ्यांची तोंडे कशी गप्प राहाणार? ‘‘चौऱ्यांचा शशांक वाया गेला,’’पासून ते आणखी काय-काय या तोंडांनी ऐकवले.


शशांक काय उत्तर देणार? त्यांच्यासमोर एकचएक अगडबंब प्रश्न उभा ठाकलेला होता… आता पुढे काय? एखाद्या कंपनीत वेब सिक्युरिटी कन्सलटंट म्हणून काम पत्करावे? शशांकना ही चांगली कल्पना वाटली. रिझ्युममधील कॉर्पोरेट अनुभवात भर पडेल आणि खिसाही जड होईल. इंदुरमधलीच एक चांगली कंपनी शशांक यांनी निवडली आणि कंपनीच्या क्लायन्टस्च्या वेबसाइट हॅक करणे आणि त्यायोगे कंपनीला उपयुक्त माहिती मिळवून देणे, व्यवसायवृद्धीच्या कल्पना सुचवणे वगैरे सुरू झाले. दीड वर्ष या कंपनीत शशांक होते आणि दीड वर्षात किती प्रमोशन्स मिळवले तर तब्बल तीन! कंपनी सोडली तेव्हा शशांक प्रोजेक्ट मॅनेजर होते. दुसऱ्या एका कंपनीकडून भक्कम पॅकेजची ऑफर आली आणि शशांक यांनी ती स्वीकारलीही, पण कसले काय? ४५ दिवस नव्या नोकरीला उलटलेले होते आणि पगाराच्या नावावर एक छदामही शशांक यांना दिसलेला नव्हता. वेळेत पगार जिथे मिळत नाहीये अशा कंपनीत नव्या संधींचा विचारच न केलेला बरा म्हणून खिशात केवळ ५ हजार रुपये असताना निशंक मनाने शशांक यांनी या नावाला असलेल्या नव्या नोकरीचा राजीनामा दिला.


काम, काम आणि फक्त काम…

२३ फेब्रुवारी २००९ ही शशांक यांच्यासमोर शून्य उभा करणारी ती तारीख होती. राजीनामा देऊन ते कार्यालयाबाहेर पडले तेव्हा सायंकाळचे पाच वाजलेले होते. डिग्री नाही, डोळ्यासमोर नोकरीची कुठली संधी नाही… शशांक यांनी ठरवून टाकले, की ते ऑनलाइन काम करणार. शशांक सांगतात, ‘‘त्याच तारखेला रात्री आठ वाजता मी डेटा एंट्रीचे काम मिळवले. पीएसडी टू एक्सेल असे त्याचे स्वरूप होते. १८ डॉलर्स त्यातून मिळणार होते. घरातल्याच पेंटिअम थ्री कॉम्प्युटरवर रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी मी ते पूर्ण केले.’’


महिनाभराच्या कामात इतके पैसे जमले, की शशांक यांनी दुसरा कॉम्प्युटर विकत घेतला. आणखी एका मित्रालाही सोबत घेतले. लवकरच आणखी एक कॉम्प्युटर घेतला आणि सोबतीला दुसरा एक आणखी मित्र. तीन कॉम्प्युटर्स झाले आणि तीन माणसे झाली. मोबदला म्हणून मिळणाऱ्या पैशांचाही असाच गुणाकार होऊ लागला. या दोन्ही मित्रांनी पुढे इंजिनिअरिंग पूर्ण केले, पण आजतागायत त्यांना नोकरी मिळालेली नाही, ही नियतीची म्हणा, परिस्थितीची म्हणा एक विडंबनाच…


सर्व्हिस इटसेल्फ इज अ प्रॉडक्ट!

दोन्ही मित्रांनी पुढे शशांक यांची साथ सोडली. शशांक यांनीही आपले पाऊल आता ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ क्षेत्रात टाकून पाहिले. चाचपडत, सांभाळत ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी मोजक्या माणसांसह ‘इंडिया इन्फोटेक’ ही कंपनी सुरू केली. इतर कंपन्यांना सेवा पुरवणारी ही कंपनी होती. सेवाकेंद्रित उद्योग आणि उत्पादनकेंद्रित उद्योग या दोघांमधला फरक एव्हाना शशांक यांच्या लक्षात आलेला होता. अधिक नाव, अधिक पैसा कमवायचा तर उत्पादनकेंद्रित उद्योगाला पर्याय नाही, हेही अर्थातच लक्षात आलेले होते. पण अडचण होतीच. स्वत:चे प्रॉडक्ट सुरू करायचे तर पुरेसे भांडवल नव्हते. मग एक मधला मार्ग काढला… ‘‘प्रॉडक्ट असे विकायचे जसे सेवाच देत आहोत!’’

‘ईकॉमर्स वेबसाइटस् डेव्हलपमेंट’च्या रूपात परवडेल अशी एसईओ सेवा जगभरात विकायला त्यांनी सुरवात केली. एसईओ सेवेचे प्रारूपच असे काही बनवलेले होते, की एखाददुसरा अपवाद वगळता सर्वच ग्राहकांना ते सारखेच पुरवले जात असे. प्रारूपामुळे एक फायदा असा झाला, की मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना एकाच वेळी सेवा उपलब्ध करून देता आली. शशांक सांगतात, ‘‘ग्राहक कंपन्यांशी कायमचे नाते निर्माण करण्यावर आम्ही भर दिला. आमच्या अगदी सुरवातीच्या पाच एसईओ ग्राहक कंपन्यांपैकी तीन कंपन्यांना आजही आम्हीच सेवा पुरवत आहोत, ही आमच्या या धोरणाचीच फलनिष्पत्ती!’’


सेकंद-सेकंद संघर्षाचा… घामाच्याच हर्षाचा

सुरवातीचे संपूर्ण वर्ष शशांक यांनी आपल्या नव्या कंपनीच्या कार्यालयात काढले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शशांक यांच्या दृष्टीने सेकंद-सेकंद संघर्षाचा होता. कार्यालयापासून घर अवघ्या ७ किमी अंतरावर असूनही या काळात ते घराकडे फारसे फिरकले नाहीत.


१०,००० प्लस यशस्वी एसईओ प्रोजेक्टस्

पंचेचाळीस दिवसांची बिनपगारी नोकरी सोडून होण्याला २०१४ च्या फेब्रुवारीमध्ये शशांक यांना पाच वर्षे उलटलेली होती. नोकरी सोडताना पाच हजार रुपये तेवढे खिशात होते… आणि या क्षणाला ते वर्षाला पाच कोटी कमवत होते.


शशांक यांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी अनेक प्रोजेक्टस्वर काम करणे हे कंपनीचे मुख्य सूत्र राहिले. आतापावेतो महिन्याकाठी सरासरी ३०० प्रोजेक्टस्वर काम झाले आहे. चालू महिन्यात ४२५ प्रोजेक्टस् हातात आहेत. सगळ्या क्लायन्टस्ना दर्जेदार सेवा देऊन त्यांचे हित साधणे हेच उद्दिष्ट आहे. एसईओ सेवा अधिकाधिक तपशीलवार करणे या ओघात आलेच. गुगल तंत्रावली बदलणे, बाजारातील बदलते ट्रेन्ड एवढ्यापुरती क्लायन्टस्ची सामान्यपणे मजल जाते. पण जेव्हा आम्ही इतक्या साऱ्या प्रोजेक्टस्वर काम करत असतो तेव्हा संशोधनातही आणि त्यासाठीच्या संसाधनांतही (रिसोर्सेस) आम्ही अधिक व जातीने लक्ष घालत असतो, हे इथे वेगळे सांगण्याची गरज नाही… आणि केवळ त्यामुळेच आम्ही बाजाराची बरीवाईट स्थिती कुणापेक्षाही अधिक चपखलपणे जाणू शकतो आणि सांगू शकतो. शशांक यांचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव शर्मा सांगतात, ‘‘आम्ही फेब्रुवारी २०१४ पर्यंत १० हजारांहून अधिक एसईओ प्रकल्प यशस्वीपणे राबवलेले आहेत. पुढले प्रोजेक्टही धरले तर ही संख्या बारा हजारांच्या पुढे निश्चितच जाईल. ‘इंडिया इन्फोटेक’कडे आजमितीला ४००० वर क्लायन्टस् आहेत. आमच्या व्यवसायाचा आकृतिबंधच आम्ही असा तयार केला होता, की अधिकाधिक नफ्याची निर्मिती त्यातून सहज व्हावी. कुठल्याही पारंपरिक कंपनीच्या तुलनेत आमचे ‘रिव्हेन्यू मार्जिन’ त्यामुळेच अधिक आहे.’’


‘इंडिया इन्फोटेक’च्या एकूण व्यवसायापैकी दोनतृतीयांश व्यवसाय हा एकट्या अमेरिकेतून होतो. दी वॉलस्ट्रिट जनरलनुसार डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रिजमध्ये एकट्या अमेरिकेत ६२ बिलियन डॉलर्स गुंतलेले आहेत. मोठमोठे उद्योग, व्यवसाय आता डिजिटल मार्केटिंगमध्ये स्वारस्य दाखवत आहेत, त्याचाच हा परिणाम आहे. सोशल मिडियादेखील डिजिटल मार्केटिंगमध्ये आता क्रांतीकारक वळणावर आहे. नव्या पिढीच्या आवडत्या ॲपल टीव्ही, क्रोमकास्ट टीव्हीतून जाहिरातींचे व्हिडिओपट ही पुढली हाक ठरणार आहे. व्हिडिओ ॲडस् मार्केट दिवसेंदिवस वाढतच जाईल, हा शशांक यांचा दावा आहे.


शशांक म्हणतात, ‘‘चांगली माणसे मिळणे, हे मोठे आव्हान असते. माझ्यापुरते बोलायचे तर मी लोकांवर सहज अगदी आंधळेपणाने विश्वास टाकतो म्हटले तर वावगे ठरू नये. मला वाटते, जर तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर तुमचा विश्वास नसेल तर त्यापेक्षा अशा लोकांना सोबत घ्यायचेच कशाला?’’


अर्थात काही कटू अनुभवही शशांक यांच्या गाठीशी आहेत. त्यांचे जवळचे मित्र आणि अगदी सुरवातीपासूनचे ७ सहकारी त्यांच्या नकळत त्यांच्याच स्पर्धक कंपनीसाठी काम करत होते. शशांक म्हणतात, ‘‘मी या सातही जणांना तत्काळ कामावरून कमी केले आणि नवी टिम बांधली. वर्षभरापूर्वी असाच एक कटू अनुभव वाट्याला आला. मला वाटते मी या अनुभवांतून पुरेसा शिकलोच नाही. कारण अजूनही मी माझ्या टिमवर डोळे झाकून विश्वास टाकतोच.’’


दिवसातले अठरा तास कार्यमग्न राहणे हा शशांक यांचा परवापरवापर्यंत नित्यनियम होता. आताशात पूर्वीप्रमाणे अधाशीपणे कामावर तुटून पडणे शिल्लक राहिलेले नाही. शशांक सांगतात, ‘‘आराखडा तयार करणे, नियोजन करणे, प्रक्रिया तपासणे, अंमलबजावणीच्या पद्धतींवर नजर टाकणे असेच आता माझ्या जबाबदारीचे स्वरूप असते. तरीही दिवसातले ८-१० तास त्यात जातातच. माझ्या उपजत क्षमतांसह मी जगासाठी आणि जनतेसाठी वेगळे असे काही करू इच्छितो, काही चांगले बदल घडवू इच्छितो, पण नामनिराळा राहून!’’


एक चांगला बदल तर आता घडलेलाच आहे. पूर्वी शशांक यांचे शेजारी त्यांच्याकडे बघून जसे तोंड वेंगाळत, तसे ते आता वेंगाळत नाहीत. शशांक आपल्या सुपरबाइकवर किंवा शायनी कारमधून घराबाहेर पडतात, तेव्हा बघा तो चालला सुपरस्टार, शायनिंग स्टार, असेच भाव या शेजाऱ्यांच्या डोळ्यांत असतात.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags