लहान मुलांना हसत-खेळत शिकवण्याबरोबर पालक आणि शिक्षकांना व्यक्तिमत्व विकासाचा मंत्र देणारी 'किड अँड पॅरेन्ट फाऊंडेशन'

लहान मुलांना हसत-खेळत शिकवण्याबरोबर पालक आणि शिक्षकांना व्यक्तिमत्व विकासाचा मंत्र देणारी 'किड अँड पॅरेन्ट फाऊंडेशन'

Friday November 27, 2015,

5 min Read

काळ बदलत चालला आहे तशी शिक्षणपद्धतीही बदलायला हवी...पण अजूनही बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. त्यातच पालकही त्यांच्या काळातील दोषपूर्ण शिक्षण पद्धतीनुसारच मुलांवर दबाव टाकत असल्याचं पाहून अपर्णा अत्रेया यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक सर्वसमावेशक असा विकास कार्यक्रम तयार केलाय. अपर्णा या एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्या कथाकथनही करतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण पद्धतीत रस वाटेल असा अभ्यासक्रम तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातूनच किड अँड पॅरेन्ट फाऊंडेशनची स्थापना झाली. अपर्णा यांनी यात स्वत: गुंतवणूक केली आहे. एक यशस्वी जीवन जगायचं असेल तर प्रत्येकानं आपल्यातील लहान मुल जिवंत ठेवायला हवं असं अपर्णा यांना वाटतं. या फाऊंडेशनतर्फे लहान मुलं, पालक आणि शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम तयार केले जातात. यात मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी सृजनशील लोकांचाही समावेश आहे. या विकास कार्यक्रमांमध्ये कथाकथन, संगीत, नाट्य आणि प्रत्यक्ष कृतींचा उपयोग करण्यात आलाय.


image


सर्वांगीण जागृती आराखडा अर्थात AHAM® (A Holistic Awareness Model) हा या संस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा विकास कार्यक्रम आहे. यात अगदी लहान मुलांच्या सामाजिक-भावनिक वाढीचा विचार करण्यात आलाय. यात गोष्टी, संगीत, नाट्य आणि कृतींचा सूचना देण्यासाठी वापर करण्यात आलाय. हा कार्यक्रम सीबीएसईच्या अभ्यासक्रमाशी संलग्न आहे. कथा लिहिणं आणि सांगणं हा आपला छंद होता आणि मुलांच्या माध्यमातून आपण आजच्या शिक्षण पद्धतीतील त्रुटींकडे पाहत होतो, त्यामुळे त्यात सुधारणा झाली पाहिजे या हेतुने ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं अपर्णा सांगतात. त्याचबरोबर पाँडेचेरीमधल्या श्री अरविंद यांच्या आश्रमात मिळालेल्या अध्यात्मिक अनुभवानं आणखी प्रोत्साहन मिळाल्याचंही त्या सांगतात.

बालशिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा आधीच अनेक स्पर्धक होते त्यामुळे सुरूवातीला खूप अडचणी आल्या, निराशा आली होती. त्याचबरोबर ठराविक साच्यातील शैक्षणिक कार्यक्रम सोडून काही नवीन आणि सृजनशील संकल्पना तयार करुन त्या नवीन माध्यमातून शिकवण्याचं आव्हान होतं, असं अपर्णा सांगतात. त्याचबरोबर लहान मुलांना अगदी कमी वयातच स्वयंविकासाचे धडे दिले गेले पाहिजे हे शैक्षणिक संस्थांना पटवून देण्याचं सगळ्यात मोठं आव्हान होतं, असंही त्या सांगतात. त्यामुळे बालशिक्षणाच्या या क्षेत्रात उतरल्यानंतर खूप कष्ट करावे लागले आणि त्यातूनच शिक्षणव्यवस्थेत नेमकी कुठे पोकळी आहे ते समजून घेता आलं. त्याचबरोबर लहान मुलांना शिकण्यासाठी मदत केल्यास भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि संतुलित नागरिक घडवता येतात हे लोकांना पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागल्याचंही त्या सांगतात.


image


शिक्षण म्हणजे वस्तुस्थिती शिकणं नव्हे तर मनाला विचार करण्यासाठी प्रशिक्षण देणं, असं आइनस्टाईनने म्हटलंय. आज अनेक भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या उच्चपदी आहेत पण किती भारतीयांची नावं संशोधन किंवा शोधकार्यात घेतली जातात? असा सवालही त्या विचारतात. मुलांमध्ये सृजनशीलता मोठ्या प्रमाणात असते आणि ती वाढवताही येते. आपल्या समाजात प्रौढांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काही निर्माण करण्याचं स्वातंत्र्य, काही गोष्टींसाठी तडजोड न करण्याचं स्वातंत्र्य असतं का? असा प्रश्नही अपर्णा विचारतात. जीवनातील प्रश्नांना एकच योग्य उत्तर असते. पण पालक मुलांवरही प्रत्येक बाबतीत या एकाच उत्तराची सक्ती करतात. उदा. पालकांना वाटत असलेले चांगले किंवा वाईट रंग मुलांनी वापरावे अशी सक्ती त्यांच्यावर केली जाते, असं अपर्णा सांगतात. त्यापेक्षा मुलांना जे वाटतं ते करु द्या, त्यांना कंटाळू द्या, त्यावर त्यांनाच विरंगुळा शोधू द्या. लहान मुलांना त्यांच्या सुप्त गुणांची जाणीव होणं यालाच स्वातंत्र्य म्हणतात, असा सल्ला अपर्णा पालकांना देतात.


image


परिवर्तनाची तयारी नसणं हा व्यक्तिमत्व विकासातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. शारिरीक, भावनिक आणि अध्यात्मिक वाढीत परिवर्तनाची प्रक्रिया असते. पण आपण लहान असताना बदल करणं धोक्याचं असतं हे मनावर बिंबवलं गेल्यामुळे प्रौढ झाल्यावरही बदल करण्याचा प्रयोग करायला अनेक लोक घाबरतात. अपर्णा यांच्या मते लहान मुलं असो किंवा पालक असोत, व्यक्तीमत्व विकासासाठी एक मंत्र आहे – ‘३ c’ (Connect – संबंध जोडा , Change- बदल करा, Consequence- परिणाम) आणि ‘3 R’(Read - वाचन करा, Reinvent – स्वत:चं परीक्षण करत रहा, Responsibility- झालेल्या परिणामांची जबाबदारी घ्या) या प्रक्रिया पाळल्या तर वैयक्तिक विकास सहज होतो असं त्यांचं मत आहे.

प्रत्येक मार्गात अडथळे असतातच फक्त त्यातून मार्ग काढण्याची क्षमताही प्रत्येकात असते. आपण कशात कमी पडतो हे जर एखाद्या मुलाला लहानपणापासूनच कळलं तर ते नक्कीच यश मिळवू शकतं. आपल्याकडे फक्त चिकाटी असणं गरजचें आहे असं अपर्णा सांगतात. अपयश कायम टिकत नसतं हे आपण समजून घेतलं पाहिजे असंही त्या सांगतात.


image


कथाकथनाच्या या शैक्षणिक कार्यक्रमात वापर करण्याच्या संकल्पनेबाबत अपर्णा सांगतात की एखादी माहिती कथेच्या रुपाने जर सांगितली तर ऐकणाऱ्याच्या मेंदूत ती कायमस्वरुपी बसते. तसंच कथा सांगणारा आणि ऐकणारा यांच्यात एक नातं तयार होतं. संस्थेतर्फे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानुसार व्यक्तिमत्व विकास करण्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीची असते. प्रत्येक व्यक्तीने स्वत:बद्दल चिंतन करणं आवश्यक आहे कारण त्यातून प्रत्येकाला जबाबदारी, मुल्यमापन करण्याची सवय लागते आणि वैयक्तिक विकासासाठी ते फायद्याचं ठरतं. सृजनशीलता वाढण्यासाठी जिज्ञासा, अंमलबजावणीची मानसिकता आणि सकारात्मकता हे तीन गुण आवश्यक असल्याचं त्या सांगतात.

या उपक्रमाला अपर्णा यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारानं आर्थिक मदत केली आहे. पण आता त्या बाहेरुन निधी उभारण्याचा विचार करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्या सांगतात. अनेक पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांना त्यांची शिक्षणपद्धती आवडल्याचंही अपर्णा सांगतात. “पण जेव्हा एखादा मुलगा प्रशिक्षण वर्ग झाल्यावर, आम्हाला असं कधीच शिकवलं गेलं नाही आणि तुम्ही आम्हाला कधीही सोडून जाऊ नका असं सांगतो, ती मोठी पावती असते”, असं अपर्णा सांगतात.

इतरांनी व्यक्तिमत्व विकासासाठी काय करावं याकरीता मदत करता करता स्वत:चाही व्यक्तिमत्व विकास होतोय असं अपर्णा सांगतात. काहीतरी नवीन करायचं असेल तर तुमच्यातील लहान मुलाला विसरु नका, प्रत्येक गोष्टीबाबत लहान मुलांसारखे जिज्ञासूपणे वागा, यश आणि अपयशाला लहान मुलांसारखं सामोरं जा, त्यावर जास्त विचार करु नका असा सल्ला अपर्णा देतात.

किड अँड पॅरेन्ट फाऊन्डेशनसाठी इथं क्लिक करा: www.kiddywiki.com

लेखक- राखी चक्रवर्ती

अनुवाद – सचिन जोशी