संपादने
Marathi

बहुभाषेची डिजिटल कवाडं उघडणारा युअरस्टोरीचा भाषा मेळा ११ मार्च रोजी नवी दिल्लीत...

Team YS Marathi
10th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“जर कोणी मोडक्या तोडक्या इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची खिल्ली उडवू नका. कारण त्याला दुसरी कोणती तरी भाषा उत्कृष्टपणे येत असते”.- एच जॅकसन ब्राउन ज्यु.

हे वाक्य आपल्या देशाकरताच असणार हे वेगळं सांगायची गरजच नाही ना! कारण आपल्याला इंग्रजी येत नसेल तर आजूबाजूचे बहुतांश लोक आपल्यात न्यूनगंड निर्माण करायला हजरच असतात. आपल्या देशाची लोकसंख्या आहे एक अब्ज ३१ कोटीच्या आसपास आणि यातल्या केवळ १२ कोटी लोकांनाच असख्लित इंग्रजी बोलता येतं. म्हणजेच केवळ १० टक्के लोकसंख्याचं इंग्रजी जाणते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर उरलेल्या ९० टक्के लोकसंख्येला त्यांची स्वतःची वेगळी भाषा आहे आणि त्यात ते पारंगत आहेत. बरं आपल्याकडे संपूर्ण देशाची एकच सामाईक भाषा आहे असंही नाही. राष्ट्र आणि राज्यभाषेसोबतच आपल्याकडे अनेक स्वतंत्र बोलीभाषाही आहेत. आपल्याकडचे बहुतांश लोक यातल्या किमान दोन्ही भाषा उत्तमपणे जाणतात.

image


असं असलं तरी आपल्याकडे इंटरनेटवर ५६ टक्के मजकूर इंग्रजी भाषेत प्रसारित होतो. इंटरनेटवर भारतीय भाषांचा वाटा फक्त ०.१टक्केच आहे ही खेदाची बाब आहे. याचं कारण म्हणजे शहरी भागांमध्येच इंटरनेटचंं जाळं व्यवस्थित विणलं गेलयं. या भागातले लोक संपर्क, संवाद आणि साहित्याकरता इंग्रजीचाच वापर जास्त करतात. तालुका आणि गावांमध्ये हे लोण अजून फारसं झिरपलेलं नाही. पण या परिस्थितीत आता बदल होऊ लागला आहे. भारतातल्या या लहानमोठ्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये इंटरनेटचा झंझावात येऊ लागलाय. इंटरनेटच्या बाजारात बदलाचे वारे वाहू लागलेत. पुढच्या आकडेवारीवरून आपल्याला हे तथ्य लक्षात येईल.

• ९५ कोटी ७० लाख लोक दूरसंचार सेवेचा वापर करतात. दर महिन्याला ८० ते ९० लाख लोक मोबाईलद्वारे इंटरनेटचं नवीन कनेक्शन घेत आहेत.

• लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता आपल्याकडे दूरवाणीची एकूण घनता ७८ टक्के आहे. यात ४५ टक्के तर ग्रामीण भागाचा वाटा आहे. ७६ कोटी लोकचं ब्रॉडबँडचा वापर करत आहेत. म्हणजेच या क्षेत्रात पाय पसरवायला मोठी संधी आहे.

• भारतात सध्या १० कोटी लोक फेसबुकचा वापर करत आहेत. ८५ टक्के लोक मोबाईलवरून या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करतात.

• ग्रामीण भागातही इंटरनेटचा प्रसार आणि वापर झपाट्याने वाढू लागलाय. जून २०१४ मध्ये सहा कोटींच्या आसपास लोक इंटरनेटचा वापर करत होते. २०१८ पर्यंत ही संख्या २८ कोटींवर पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

• देशातल्या पंचविशीच्या वरचा ५४ टक्के वयोगट इंटरनेटचा वापर करतो. यात ४०-५० टक्के ग्रामीण भागाचा वाटा आहे.

• तर 30 टक्के महिला आहेत.

• साधारण ९० टक्के लोक इंटरनेटकरता मोबाईलचा वापर करतात.

ही आकडेवारी बघितली तर सहज लक्षात येतं की, इंटरनेट वापराच्या भविष्यातल्या नाड्या या प्रामुख्याने ग्रामीण भागाकडे असणार आहेत. तसंच वापरणाऱ्यांमध्ये स्त्री-पुरूषांचं प्रमाणही समान असणार आहे. आणि याकरता मोबाईलचाच वापर जास्त होणार आहे. या नवीन वर्गाला आपल्या भाषेतल्या मजकूराची मोठी भूक असणार आहे.

सरकारने आपला डिजिटल इंडियाचा कार्यक्रम जोमाने पुढे रेटला तर ही आकडेवारी प्रत्यक्षात उतरेल. सरकारने आपली क्रयशक्ती स्थानिक भाषांमध्ये विविध सेवा पुरवण्यावरही खर्च केली पाहिजे. त्यामुळे लोकांना माहितीची देवाणघेवाण करण्यात आणि मजकूर समजण्यास सोप होऊन, जवळीक निर्माण होईल. सरकारसोबतच खाजगी इंटरनेट कंपन्या आणि टेक स्टार्टअप्सनीही या संधीचं सोनं केल्यास त्यांना आणि लोकांनाही याचा चांगला लाभ होईल.

एखाद्या उत्पादनाबाबत आपल्या स्वतःच्या भाषेत माहिती उपलब्ध असल्यास ती लोकांना जास्त भावते आणि ग्राहकाला उत्पादनाच्या जवळ नेऊन ते घेण्यास भाग पाडते, असं अभ्यासावरून दिसून आलं आहे. स्थानिक भाषेच्या वापराने व्यवसायाला नक्कीच चालना मिळते. म्हणजेच खूप भाषांच्या वापर करण्यावर खर्च करण्यात येणारं भांडवल हे भविष्यातल्या फायद्याचं गणित आहे.

इ-कॉमर्स पोर्टल, आरोग्यसेवा किंवा माहितीचा स्त्रोत असणारे व्यासपीठ असू देत. तुम्ही जर स्थानिक भाषेमध्ये माहिती देत असाल तर, तुम्ही डाव जिंकून देणारी चाल खेळत आहात हे नक्की.

विशेषज्ञांच्या मते पुढील पाच वर्षात कॉरपोरेट्स स्थानिक भाषांच्या वापराला चालना देणार आहेत. गुगल, फेसबुक आणि एमेझॉन या मोठ्या कंपन्यांनी याआधीच स्थानिक भाषांच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आहे. लोकांना आपल्या भाषेत गोष्टी उपलब्ध होत असल्यामुळे, आपलं मत आपल्या भाषेत मांडता येत असल्यामुळे या साईटस् खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भाषेतल्या मजकूरावर, त्याच्या जाहिरातींवर चांगलीच रक्कम खर्च करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर युअरस्टोरी पहिला वहिला भारतीय डिजिटल भाषा मेळा भरवत आहे. नवी दिल्लीत ११ मार्चला या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युअर स्टोरी, भारत सरकार आणि केंद्रीय सांस्कृतिक खातं यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

भारतीय इंटरनेट माध्यमात स्थानिक भाषांचा पाया रचण्याच्या कामाला आम्ही याद्वारे सुरूवात करत आहोत. यापूर्वीच इंग्रजी व्यतिरिक्त १२ भारतीय भाषांची कवाड आम्ही उघडून अधिकाधिक लोकांशी या माध्यमाने जोडले गेलो आहोत. भारत आणि इंडियामधली दरी सांधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

या मेळ्यात इंटरनेट कंपन्यांनी बहुभाषी होण्याची गरज आणि स्थानिक भाषेचा इंटरनेटच्या जगातला प्रवेश या विषयांवर आधारित वेगवेगळ्या परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. वेगळ्या वाटा धुंडाळणारे स्टार्टअप्स, गुगल, झियोमी, मायक्रोमॅक्स, बाबाजॉब्स, प्रथम बुक्स, रिवेरी लँगवेज टेक्नॉलॉजीज, रेडिओ मिरची यासारख्या बऱ्याचशा मातब्बर कंपन्या बहुभाषिक झाल्यावरचे, स्थानिक भाषेत रुजतानाचे आपले अनुभव आणि धोरणं सांगणार आहेत. तर आमचे भाषातज्ज्ञ, धोरणकर्ते, अभ्यासक आणि लेखक भाषेच्या डिजिटल माध्यमातल्या प्रवेशाचा एका चांगल्या संस्कारणाकरता कसा उपयोग करता येईल यावर मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबईतला माती-वाणी हा कलागट भाषा विकास आणि वापराच्या वाटेतले अडसर कसे दूर करता येतील हे डिजिटल कार्यक्रमाद्वारे सादर करणार आहेत. जर तुम्हांला बहुभाषिक होण्याची आस असेल तर हा भाषा मेळा तुमच्याकरता नक्कीच एक चांगली संधी आहे.

-टीम युअरस्टोरी

अनुवाद - साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags