संपादने
Marathi

ग्रेनेडच्या स्फोटात अपंगत्व आल्यानंतरही इयत्ता दहावीत सर्वप्रथम, प्रेरणेचेच दुसरे नाव आहे ‘मालविका अय्यर’

sunil tambe
11th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मालविका अय्यरला आजही तो २६ मे २००२ चा दिवस जणू काही ती कालचीच गोष्ट असावी असा लख्ख आठवतो. त्यावेळी मालविका ९ वर्षांची होती आणि ती इयत्ता नववीत शिकत होती. शाळेला उन्हाळ्याची सुटी पडलेली होती. एका रविवारी तिच्या घरी काही पाहुणे आले. त्यावेळी तिचे वडिल दिवाणखान्यात बसलेले होते. मालविकाची बहिण स्वयंपाकघरात चहा बनवत होती आणि तिची आई घरातील कुलरमध्ये पाणी भरत होती. मालविका सांगते की त्यावेळी तिने जी जीन्स घातलेली होती, त्या जीन्सचा एक खिसा फाटलेला होता आणि तो चक्क बाहेर लटकत होता. आणि ते दिसायला चांगले दिसत नव्हते. त्यावेळी तिच्या मनात असा विचार आला की या फाटलेल्या खिशाला फेव्हिकॉलने चिकटवले पाहिजे जेणे करून ते खराब दिसणार नाही. त्यानंतर ती आपल्या गॅरेजमध्ये गेली आणि तिथे पडलेल्या समानाच्या ढिगातून खिसा चिकटवण्यासाठी फेव्हीकॉल शोधू लागली.

image


काही वेळा पूर्वी कॉलनीतल्या दारूगोळ्याच्या डेपोला आग लागली होती याची मालविकाला जराही कल्पना नव्हती. अय्यर कुटुंब राहत असलेले हे बिकानेरमधील एक ठिकाण होते. दारूगोळा डेपोला आग लागल्यामुळे त्याचे बरेचसे तुकडे आसपासच्या भागात पडलेले होते. मालविका जेव्हा गॅरेजमध्ये जाऊन फेव्हिकॉल शोधू लागली तेव्हा तिच्या हाती एक विचित्र वस्तू लागली. ती वस्तू हानीकारक वाटत नव्हती. मालविका ती वस्तू घेऊन आपल्या बेडरूममध्ये आली. ती वस्तू म्हणजे ग्रेनेड होते याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यावेळी दुपारचा बरोब्बर सव्वा वाजला होता. जेव्हा स्फोट झाला तेव्हा घड्याळाचे काटे ज्या स्थानावर होते त्याच स्थानावर थांबले होते याच कारणामुळे मालविकाला नेमकी वेळ आजही लख्ख आठवत असल्याचे मालविका सांगते.

image


जेव्हा बेडरूममध्ये स्फोट झाला तेव्हा घरातील लोकांना वाटले की हा आवाज मालविकाच्या खोलीतील टीव्हीतून आलेला आवाज आहे. आणि हे स्वाभाविक सुद्धा होते, कारण आपल्या छोट्या मुलीच्या खोलीमध्ये कधी बॉम्ब स्फोट होईल असा कुणी स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही. या स्फोटानंतर मालविकाच्या शरारीतील मज्जासंस्था निकामी झाली होती. यामुळे तिला वेदनांची जाणीवच होऊ शकली नाही. जेव्हा तिची आई तिच्या खोलीत आली आणि ते दृष्य पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला आणि ती मोठ्याने किंचाळली, “ माझ्या लेकीचे हात गेले.” /यानंतर मालविकाच्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रानी तिला उचलले आणि कारमध्ये बसवून रूग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी मालविकाच्या शरीरातून इतका रक्तस्त्राव झाला होता की असे वाटत होते जणूकाही तिने रक्ताने आघोळ केली होती. तिची ही अवस्था बघणारा प्रत्येकजण घाबरला होता. त्यावेळी तिच्या लक्षात आले की तिचा पाय हवेत लटकत होता आणि तिची त्वचा खूपच खराब झाली होती. ज्यावेळी तिच्या पायांनी तिच्या काकांनी नकळत स्पर्श केला तेव्हा मालविका अक्षरश: किंचाळली होती. त्यानंतर तिने आपला पाय रूमालाने बांधून टाकला.

image


मालविका सतत चार दिवस वेदनेने त्रस्त होती. एकीकडे तिच्या पायांना संसर्गाचा धोका वाढत चालला होता, तर दुसरीकडे डॉक्टर मोठया सावधगिरीने तिच्यावर इलाज करत होते. कारण ग्रेनेडचे खूप छोटे छोटे तुकडे तिच्या पायांमध्ये शिरलेले होते आणि त्यामुळे तिच्या पायांमध्ये भरपूर छोट्या छोट्या जखमा झालेल्या होत्या. जवळजवळ तीन महिने मालविका या जखमा उघड्या ठेललेल्या होत्या. त्या काळात मालविका त्या जखमा स्वच्छ करण्याचे काम ही होती. ही घटना घडण्यापूर्वी तिचे बालपण एखाद्या स्वर्गाहून कमी नव्हते. त्याकाळात ती लोकांसोबत एखाद्या ‘टॉमबॉय’ सारखी वागायची. मालविका बालपणीच्या आठवणी सांगताना म्हणते, की ती कॉलीनीतल्या मुलांची लिडर असायची आणि संगीत, नृत्य तसेच खेळांमध्ये तिला विशेष रूची असायची. त्यावेळी ती आपला वेळ सजण्याधजण्यात न घालवता ती नृत्यामध्ये गुंतलेली असायची. या छंदामुळेच तीने वयाच्या सात वर्षांपर्यंत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षणही घेतले. नृत्याव्यतिरिक्त ती रोलर स्केटचीसुद्धा खूप वेडी होती. ती सांगते की कुणीतरी तिला रोलर स्केट भेट दिले होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या वेळी ती चोवीस तास, सातही दिवस रोलर स्केट घालूनच असायची. मग भले तिला कुठे जायचे का असे ना, पण ती रोलर स्केट मात्र मुळीच काढायची नाही.

image


याच आठवणींच्या सोबत मालविकाने शस्त्रक्रियेनंतर १८ महिने काढले. शस्त्रकिया आणि थेरपीच्यावेळी मालविकाला असह्य वेदनांचा सामना करावा लागला, परंतु रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. याचे कारण म्हणजे तिचे सर्व मित्र बोर्डाच्या परिक्षेच्या तयारीला लागलेले होते आणि आपल्या आयुष्याची पुढील प्रगती कशी करावी याबाबत योजना आखत होते. मालविकाला मात्र हेच माहित नव्हते की तिला पुढे काय करायचे आहे. मालविका सांगते, की या दुर्घटनेनंतर ती पुन्हा शाळेत जाणे सुरू करण्याच्या स्थितीमध्ये नव्हती आणि मालविका आता पुर्वीप्रमाणे शाळेत जाऊ शकेल अशी अपेक्षा तिच्या कुटुंबियांनीही तिच्याकडून केलेली नव्हती. मात्र आपल्या जीवनाला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणारी मालविका अशा परिस्थितीत सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीप्रणाणे पुढे जाऊ पाहत होती. म्हणूनच आपण येणा-या बोर्डाच्या परिक्षा पूर्णपणे गंभीरतेने द्यायच्याच असा निश्चय तिने केला.

image


या दुर्घटनेमुळे मालविका नववी आणि दहावीचा अभ्यास करू शकली नव्हती आणि बोर्डाच्या परिक्षेला फक्त ३ महिनेच उरले होते. त्याकाळात जास्तीत जास्त वेळ बिछान्यावरच घालवण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही दुर्घटना घडण्यापूर्वी मालविका अभ्यासात एक साधारण विद्यार्थ्यासारखी होती. त्याकाळात ती आपला जास्तीतजास्त वेळ थट्टा मस्करीमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये घालवत असायची. मात्र आता तिचे जीवन बदलून गेलेले होते. आता तिने जगासमोर स्वत:ला सिद्ध करण्याचा निश्चय केला. यानंतर तिने बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म भरला आणि मन लावून पुस्तकाच्या दुनियेत हरवून गेली. परीक्षांना गंभीरपणे घेत ती स्थानिक कोचिंग क्लासचे मार्गदर्शन ही घेऊ लागली. त्यावेळी तिची आई तिला कोचिंग क्लासला नेणे आणि आणण्याचे काम करायची. अभ्यासात विशेष रस घेऊन तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तिने परीक्षा दिली आणि त्यानंतर तो दिवसही उगवला. विशेष सांगायचे म्हणजे दुर्घटनेनंतर मालविकाला लिहिणे जमत नसल्याने गणित आणि शास्त्रासारख्या विषयांच्या परीक्षाही तिने डिक्टेट करून दिल्या. परीक्षा संपल्यानंतर तिला पूर्णपणे खात्री होती की, ती या परिक्षांमध्ये केवळ पासच होणार नाही, तर खूप चांगले मार्कही मिळवेल.

केवळ मालविकालाच नाही तर तिचे कुटुंबीय देखील ज्या दिवसाची अधीरतेने वाट पाहत होते तो दिवसही आला होता. तिचे आयुष्य एका नव्या वळणावर उभे होते, कारण ज्या दिवशी निकाल आला त्यानंतर मालविकाचे जीवन एका रात्रीत बदलून गेले होते. कारण मालविकाला ५०० पैकी ४८३ गूण मिळाले होते. इतकेच नाही, तर गणित आणि शास्त्रासारख्या विषयात तिला १००/१०० गूण मिळाले होते, तर हिंदी भाषेत ९७ गूण मिळवून ती राज्यात पहिली आली होती. तिच्या या यशामुळे प्रसारमाध्यमांची नजर तिच्यावर पडली. यानंतर बॉम्ब स्फोटामुळे गंभीर जखमी झालेली एक अपंग मुलगी इतके चांगले गूण कसे काय मिळवू शकते हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात इच्छा निर्माण झाली होती. तिने घेतलेल्या परिश्रमांकडे पाहून तेव्हाचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी तिला भेटायला बोलावले. हा तिच्या आयुष्यातला न विसरण्याजोगा क्षण होता., जरी आपल्या आयुष्यात विशेष काही बदललेले नाही असे अनेक अर्थाने तिला जाणवले असले तरीही. ती पहिल्यासारखीच नटायची. तिला नटणे खूप आवडायचे. ती वेगवेगळ्या मुलाखतींसाठी वेगवेगळे कपडे घालून जायची आणि आपण सुंदर दिसले पाहिजे या गोष्टीची ती पुरेपुर काळजी घेत असायची.

image


मालविकाच्या जागी जर दुसरे कुणी असते तर अशा दुर्घटनेनंतर त्याने आत्मविश्वास पुर्णपणे गमावला असता. परंतु मालविकाने केवळ स्वत:ला सावरलेच नाही, तर आपण अपंग असूनही आपल्यात मोठी प्रतिभा आहे, हिम्मत आहे, उत्साहही आहे हे सिद्ध करून दाखवले. यानंतर तिने शाळेचा पुढचा अभ्यास सुरू ठेवला आणि सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अशा प्रकारे ती भक्कमपणे केवळ उभीच राहिली नव्हती, तर तिच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास देखील आलेला होता. त्यानंतर न थांबता मालविकाने ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’ मधून सामाजिक कार्यात मास्टर्सचा अभ्यास सूरू केला. त्यावेळी मालविकाच्या लक्षात आले की हे जग अतिशय जलगतीने बदलते आहे. त्यावेळी फिल्ड वर्कसोबत मालविका अपंग मुलांना शिकवण्याचे काम सुद्धा करू लागली. यावेळी अपंग मुलांमध्ये असलेल्या हिमतीचा आणि ताकदीचा तिला अनुभव आला.

मालविकाने आपल्या आयुष्यात अनेक मोठे निर्णय घेतल्यामुळेच ती समाजात आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकली असे तिला वाटते. या दुर्घटनेनंतर मालविकाबद्दल लोक अनेक प्रकारच्या चर्चा करत असत. लोक म्हणायचे की ही मुलगी आहे, आणि अशा अवस्थेत आता हिच्यासोबत कोण लग्न करणार? तिने काय करावे आणि काय करू नये हे लोक तिला सांगायचे. सुरूवातीला मालविकाने त्यांच्यावर विश्वास ठेवणे सुरू केले परंतु काही काळानंतर ती वेगळ्या प्रकारे विचार करू लागली आणि जेव्हा तिला आपल्या स्वत:बद्दल विश्वास निर्माण झाला तेव्हा तिच्या आयुष्यात बदल घडू लागले. आज मालविका पीएचडी स्कॉलर आहे आणि शिवाय ती ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ सुद्धा आहे. युट्यूबवर असलेला तिचा टेड वार्तालाप हजारो लोकांनी पाहिलेला आहे. तिला कपड्यांचा मोठा छंद आहे. अपंग लोकांसाठी जे डिझायनर्स कपडे डिझाईन करतात अशांसाठी ती मॉडेल म्हणून काम करते. रॅम्पवर असताना जेव्हा मालविकावर स्पॉटलाईट्स पडलेल्या असतात असतात तेव्हा तिला वाटते, की आपण एखाद्या बॉलिवूडच्या कथेचाच एक भाग आहोत. मालविका हील घालू शकत नाही, म्हणून तिने स्वत:साठी विशेष प्रकारच्या चप्पला बनवून घेतल्या आहेत.

मालविका सांगते की एक दिवस ती चेन्नईच्या एका बाजारात फिरत होती. त्या दिवशी उष्णताही भरपूर होती. वातावरणातल्या उष्म्यामुळे मालविका घामाघूम झाली होती. यामुळं तिचा कृत्रिम हात गळून खाली पडला. अशा परिस्थिती ज्या प्रकारे लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून कुणीही त्रासून गेले असते, घाबरले असते. परंतु मालविका स्वत: खूप हसत होती. कारण तिच्यासोबत कोणत्या प्रकारची दुर्घटना घडली होती याची त्या लोकांना चांगलीच कल्पना होती. मालविकाच्या पायांमध्ये भरपूर कमतरता आहेत. त्या दूर करण्यासाठी तिला पायांची कॉस्मेटिक सर्जरी करायची असल्याचे मालविका सांगते. यासाठी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी आपण अशी सर्जरी करू शकत नाही असे म्हणत हात वर केले. मालविकाच्या पायाला भरपूर ठिकाणी जखमा असल्याने ती चालूही शकणार नाही असेही वर डॉक्टरांनी सांगून टाकले. यावर असे असले तरी आपण स्वत:च चालत आपल्या दवाखान्यात आल्याचे मालविकाने डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले. मालविकाचे हे आत्मविश्वासपूर्वक उत्तर ऐकून डॉक्टर प्रभावित झाले, परंतु मालविकाच्या पायांना जोडणारी ‘नर्व्हस सिस्टम’ ७० ते ८० टक्के निकामी झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर मालविकाचे पाय सध्या जे काही थोडेबहुत काम करत आहेत ती पायांची क्षमता कशी टिकून राहिल याकडेच आता मालविकाने लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले.

इतके सगळे झाल्यानंतर देखील लोक मालविकाला ती अपंग असल्याची जाणीव करून देतच राहत असत. अशा वेळी ती स्कॉट हॅमिल्टनच्या शब्दांना आठवते. हॅमिल्टननी म्हटले आहे, ‘कोणाच्याही आयुष्यात जर कोणते एकमेव अपंगत्व असेल तर ते म्हणजे व्यक्तीचा वाईट दृष्टीकोन हेच.’ जरी मी कधी देशाची राष्ट्रपती बनले, तरी देखील लोक मला मी अपंग असल्याचे मानून माझ्यावर दयाच दाखवतील. असे मालविकाला वाटते. कारण हे लोकांच्या स्वभावात आहे असे ती सांगते. यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रीत करायला मालविकाने सुरू केले आहे. आणि याच कारणामुळे आपले जीवन बदलण्यात ती यशस्वी ठरली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात. या संधींना वाया न घालवता त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करा, लढा आणि पुढे जा, हेच मालविकाचे सांगणे आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा