संपादने
Marathi

वेदनांमधून निपजलेला देवमाणूस

Anudnya Nikam
15th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

सुर्यकांत भांडे पाटील पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक.. पुण्यातील शिरवळमधील बंगल्यात त्यांचे कुटुंब सुखात नांदत होते. मात्र २९ नोव्हेंबर १९९९ हा दिवस त्यांच्या सुखावर दुःखाचं सावट घेऊन उगवला. साडे तीन वर्षांचा संकेत.. सुर्यकांत भांडे पाटील यांचा लहान मुलगा बाहेर खेळत होता. सर्वजण घरामध्ये आपापल्या कामामध्ये व्यस्त होते आणि काही वेळातच संकेत बेपत्ता झाल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. बरीच शोधाशोध झाली. मात्र संकेत कुठेच सापडेना. संकेतचे अपहरण झाले होते.

अपहरणकर्ता भांडे पाटलांकडे खंडणीची मागणी करु लागला. भांडे पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरु झाला. महिन्यांवर महिने पुढे सरकत होते. मात्र पोलिसांकडून आश्वासनांवर आश्वासने मिळण्याव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही लागत नव्हते. अखेर या हतबल पित्याने स्वतः तपासकार्यात सहभाग घेतला. दोन वेळा ट्रॅप लावून अपहरणकर्त्याला खंडणी घेण्यासाठी बोलावले. मात्र पोलिसांसमक्ष अपहरणकर्ता पैसे घेऊन पसार झाला. त्याच दरम्यान पुण्यामध्ये आणखी एक अपहरणाची घटना घडली. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पाटील यांनी त्या दिशेने तपास सुरु केला आणि तब्बल आठ महिन्यांच्या तपासानंतर अपहरणकर्त्यापर्यंत पोहचण्यात भांडेपाटील यशस्वी झाले. संकेत बेपत्ता झाला त्यादिवशी बंगल्याबाहेर घरातील फर्निचरला पॉलीश करणाऱ्या कामगारानेच घात केल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र आता खूप उशिर झाला होता. अपहरणकर्त्यांनी संकेतची हत्या केली होती.

image


या घटनेने पाटील कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. “ती घटना आजही मनाला वेदना देते. अशा घटनांनंतर पालकांना काय यातनांमधून जावं लागतं हे मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणूनच त्यानंतर मी अशा घटनांमध्ये लोकांना मदत करायचं ठरवलं,” पाटील सांगतात. पाटील यांनी ‘स्पाय संकेत’ नावाची डिटेक्टीव्ह एजन्सी सुरु केली. या अंतर्गत पाटील अपहरणाच्या घटनांमध्ये आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलीस आणि पीडित कुटुंबियांना मदत करतात. विशेष म्हणजे त्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत.

“अनेकदा अपहरणाच्या घटनांमध्ये पालकांकडून पोलिसांना दिलेली माहिती अपूर्ण असते. एखादी गोष्ट पालकांच्या दृष्टीने तितकीशी महत्त्वाची नसते म्हणून त्याबद्दल ते पोलिसांना सांगत नाही आणि नेमकी तीच गोष्ट आरोपीपर्यंत पोहचण्यास महत्त्वाची ठरते. म्हणूनच योग्य तपासासाठी पालकांनी पोलिसांना इत्तंभूत माहिती देणे गरजेचं असतं,” असं भांडे पाटील सांगतात. पोलिसांना तपासकार्यात मदत करण्याबरोबरच पालकांनी पोलिसांना नेमकी कशा पद्धतीने माहिती द्यावी याबाबत ते अपहरण झालेल्या मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करतात. “पालकांनी पोलिसांना छोट्यातली छोटी गोष्ट सांगणं गरजेचं असतं. पालकांनी स्वतः कुठलेही अंदाज लावून त्या दृष्टीकोनातून माहिती देऊ नये. त्यामुळे पोलीसांच्या तपासाची दिशा चुकण्याची शक्यता असते,” असं ते सांगतात. ते पोलीस आणि पालकांमधला दुवा बनतात आणि आपल्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला तपासकार्यात प्रत्यक्ष सहभागी करुन घेतात. “प्रत्येकवेळी आपण पोलिसांवर सर्व जबाबदारी टाकून केवळ बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा स्वतः योग्य पद्धतीने तपासकार्यामध्ये सहभागी झालो तर पोलिसांना मदत होण्याबरोबरच गुन्हेगारांना जरब बसायला मदत होईल. केवळ पोलिसच नाही तर समाजाचीही भिती गुन्हेगारांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे” असे भांडे पाटीलांचे लोकांना सांगणे आहे.

image


“पीडित कुटुंबातील व्यक्तींना घेऊनच मी प्रत्येक घटनेसाठी एक छोटीशी नवीन टीम बनवितो आणि तपास करतो. मात्र आरोपीपर्यंत पोहचण्यात कुठलीही बाधा येऊ नये म्हणून मी कुठलेही पुरावे त्यांच्यासमोर उघड करत नाही. ती टीम त्या केसपुरती माझ्याबरोबर काम करते,” भांडे पाटील सांगतात. ते पुढे सांगतात, “इतर एजन्सीज आणि माझ्या कामामध्ये फरक हा आहे की इतर लोक क्ल्यू देतात, मी पुरावा देतो. यासाठी एक पैसाही घेत नाही. आरोपीला पकडून दिल्यावर पालकांच्या चेहऱ्यावरचे भाव मला समाधान देतात.”

अनेकदा भांडे पाटील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपी पकडून देतात. मात्र आरोपीने गुन्हा कबुल न केल्यास सबळ पुराव्याअभावी पोलीस त्याला सोडून देतात. अशावेळी पालकांचा लढा थांबू नये यासाठी ते पालकांना पुढे कोर्टाची लढाई लढायलाही संपूर्ण मदत करतात.

भांडे पाटील यांनी आतापर्यंत जवळपास ५५ अपहरणाच्या घटनांमध्ये तपासकार्यात सहभाग घेतला आहे आणि त्यापैकी जवळपास ४० आरोपींना पकडून देण्यात त्यांना यश मिळाले आहे. ते सांगतात, “या आरोपींना पकडून दिलं तरी त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठीही बरीच लढाई लढावी लागते. कित्येक वर्ष अशा केसेस सुरुच राहतात. या आरोपींना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हावी म्हणून कायद्यात योग्य ते बदल होणं आवश्यक आहे.”

image


“माझ्या मुलाच्या बाबतीत जे घडलं तशा प्रकारचा गुन्हा आजवर महाराष्ट्रात घडलेला नाही. त्याने संकेतचं अपहरण केलं, खंडणी घेतली आणि त्याला मारुनही टाकलं. मात्र आरोपीला पुरेशी शिक्षा झाली नाही. त्यावेळी मी स्वतः आरोपी पकडून दिला होता. मात्र जेलमधून तो पळून गेला. नंतर पुन्हा त्याला अटक झाली. २००२ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २००३ मध्ये पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने त्याला फाशी सुनावली आणि २००४ मध्ये हायकोर्टाने त्याची फाशी रद्द केली. त्यानंतर सुप्रिम कोर्टात अपिल केलं. मात्र सुप्रिम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. म्हणूनच मला वाटतं की व्यक्तीला फाशी देण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा आता अशा प्रवृत्तीलाच फाशी झाली पाहिजे,” आपल्या कटु आठवणींना उजाळा देत भांडे पाटील सांगतात.

आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केलेला हा दुर्देवी पिता इतरांच्या मुलांना वाचविण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीही जिवापाड प्रयत्न करताना दिसतो. कधी पोलीसांच्या तर कधी पीडित कुटुंबीय किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या एका कॉलवर भांडेपाटील त्यांच्या मदतीसाठी हजर होतात. अनेक पीडित कुटुंबांसाठी ते देवमाणूस ठरले आहेत. स्वतःचे दुःख बाजूला सारुन दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटणाऱ्या या देवमाणसाला जगण्याचा खरा अर्थ समजला आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags