'फॉरमायशादीडॉटकॉम' भेटवस्तू देण्याची अनोखी कला

13th Apr 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

एखाद्याला लग्नात कोणती भेटवस्तू द्यावी यावर आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होते. खूप विचार करूनही नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीला लग्नात काय द्यावं ते सुचतच नाही. आपल्याला ते वेगळंही हवं असतं आणि इतरापेक्षा हटकेही. पण बऱ्याचदा आपल्याकडे वर-वधूंना एकाच प्रकारच्या २-३ वस्तू तर मिळतातचं. मिक्सर, टी-सेट, क्रॉकरी, भांडी यांचे हमखास ३-४ सेट असतातच. मग बऱ्याचदा यातलं एक्स्ट्रा सामान ‘आहेर’ इतरांच्या लग्नात भेट दिले जातात. 

image


गेल्या वर्षी सुधा महेश्वरी यांनाही अशाच डोकेदुखीतून जावं लागलं. त्यांच्या जीवलग मैत्रिणीचं लग्न होतं आणि तिला वेगळं काय द्यावं हे त्यांना काही सुचत नव्हतं. याकरता त्यांनी वेबसाईटस् धुंडाळल्या पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. आणि मग त्यांनी विवाहात द्यायच्या भेटवस्तूंच्या यादीची वेबसाईट सुरू करायचं ठरवलं.

सुधा यांनी इंग्लंडच्या वारविक बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये एमबीए केलं असून त्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी सिटीबँक, डेलॉइट आणि फिलिप मोरिस या कंपन्यांमध्ये मार्केटिंग, स्ट्रॅटेजी आणि कम्युनिकेशन हे विभाग हाताळले. अतिशय छान करिअर सुरू असताना त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच त्यांनी विवाहात द्यायच्या भेटवस्तूंचं नवं दालन भारतीय बाजारपेठेत आणण्याचं ठरवलं. सहा महिने त्यांनी कुटुंबासोबत चर्चा, मित्र मैत्रिणींची मतं आणि बाजाराचा अंदाज घेतला. यामुळे त्यांना भारतातली मागणी आणि या क्षेत्राची गरज लक्षात आली.

सुरुवात

त्यांनी सुरुवातीला एक पायलट प्रोजेक्ट करायचं ठरवलं. बाजाराचं सर्व्हेक्षण करून याची खरंच किती गरज आहे याची माहिती घेतली. त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. बऱ्याचदा वधू आणि वराला काय आहेर देऊ? अशी नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून विचारणा होत असते, ही गोष्टही सुधा यांच्या ध्यानात आली. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांकडूनही नवीन जोडप्याला घरी उपयोगी पडेल असाच आहेर दिला जातो. म्हणूनच ही व्यवस्था औपचारिकरित्या सुरू करावी असं सुधा यांना ठामपणे वाटू लागलं.

अखेरीस एवढ्या सगळ्या सर्व्हेनंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या ‘फॉरमायशादी’ (ForMyShaadi) या वेबसाईटची मुहूर्तमेढ रोवली. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या जोडप्यांना हव्या असणाऱ्या भेटवस्तूंसाठी ही वेबसाईट आहे.

फॉरमायशादीच्या संस्थापक आणि सीइओ सुधा महेश्वरी सांगतात, “एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स आणि नवपरिणीत जोडप्याला अनोखा अनुभव देणारी ही ऑनलाइन साईट आहे. कारण त्या जोडप्याला लग्नानंतर त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी यात असते. त्यामुळे एकाच प्रकारच्या २-३ वस्तू न मिळता आवश्यक त्या गोष्टीच मिळतात. यामुळे आहेर देणाऱ्यांनाही ते देण्याचं सार्थक आणि घेणाऱ्यालाही गरज असणारी वस्तू मिळते”.

एकदा का जोडप्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी तयार झाली की, विवाहोस्तुक जोडपं ती यादी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत शेअर करतात. ही मंडळी मग वेबसाईटला भेट देऊन ही यादी पाहतात. त्यांना काय द्यायचयं ते ठरवतात. याच साईटवर विविध उत्पादनांचीही यादी आहे, ही यादी पाहून खरेदी केली जाते आणि मग जोडप्याकरता सुंदर संदेश निवडला जातो. अशाप्रकारे लग्नात द्यायच्या आहेराच्या डोकेफोडीतून त्यांची सुटका होते.

ब्रँडस, व्यापारी, वेडिंग प्लानर्स, ऑनलाईन चर्चा आणि लोकांमध्ये त्यांच्या या साईटची चांगलीच चर्चा रंगत आहे. ही लगीनघाई अशीच रंगत जावी आणि भारतीय विवाहांमध्ये आहेर देण्याची ही नवी पद्धत लवकर रुजावी अशी अपेक्षा सुधा व्यक्त करतात.

व्यापाराची गणितं

सुधा यांनी ६६ लाख ६० हजार ४४५ रुपयांची गुंतवणूक करून ऑनलाईन साईट सुरू केली. साईट डेव्हलपमेंट आणि व्यापाऱ्यांना साईटवर आणण्यामध्ये यातली बरीचशी रक्कम खर्च झाल्याचं सुधा सांगतात. सध्या या साईटवर ६० ब्रँडस् उपलब्ध आहेत. प्रत्येक विक्रीवर ठराविक रक्कम साईटला देण्यात येते. महिन्याला तीन हजार हिटस् मिळत असल्याचा या साईटचा दावा आहे. जोडप्याला हव्या असणाऱ्या वस्तूंच्या यादीतल्या किंमतीची एकूण रक्कम एक ते दोन लाख रुपये असायला हवी. नोंदणी झाल्यावर ५० ते ७५ जणांना ते ही यादी पाहायचं आमंत्रण देऊ शकतात. सुधा म्हणतात, “आम्ही मार्केटींगकरता प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. गुंतवणुकीच्या पुढच्या फेरीत आम्हाला नक्कीच अर्थसाहाय्य मिळेल अशी आशा आहे”.

त्या म्हणतात, "बाजारात आम्हाला मान्यता मिळत आहे, ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम आहे, त्यामुळे आता आम्ही गुंतवणुकीच्या पुढच्या फेरित तीन कोटी ३२ लाख ९३ हजार ७२५ रुपये मिळण्याकरता प्रयत्न करणार आहोत. या कल्पनेचा प्रसार आणि ब्रँडची जाहिरात करण्याकरता या निधीचा वापर करू."

बाजार आणि स्पर्धा

सध्या भारतातला विवाहाचा बाजार साधारण शंभर हजार कोटींच्या घरात आहे. दर वर्षाला यात २५-३० टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतात विवाहाचा सरासरी खर्च पाच लाख ते पाच कोटींच्या घरात होतो. या क्षेत्रातील एका उद्योग अहवालानुसार भारतातल्या लग्नात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचा बाजार वर्षाला २,६६४ अब्ज ३९ कोटी ८० लाख रुपये इतका अवाढव्य आहे. यातही दरवर्षी २५ टक्क्यांनी वाढ होतेय. विवाह भेटवस्तूंच्या क्षेत्रात शादीसागा, फ्लॅबेरी, गोगप्पा यासारख्या आणखीही काही साईटस् आहेत. गेल्या वर्षी बाजारात उतरलेल्या शादीसागा या साईटने अवघ्या तीन महिन्यातच आउटबॉक्स व्हेंचरकडून भांडवल मिळवलं. या क्षेत्रात आणखीही बरेच नवे खेळाडू उतरण्याच्या तयारीत आहेत. सुधा सांगतात, “या क्षेत्रात आणखीन नव्या गोष्टी करायला खूप वाव आहे. लग्नाच्या भेटवस्तूंची मागणी प्रचंड आहे. या मागणीनुसार योग्य पुरवठा केला तर आपण बाजी जिंकलीच असं समजा”.

या क्षेत्रातल्या आव्हानांबाबत त्या म्हणतात, “विवाहभेटवस्तूंची नोंदणी हा भारतातला एक तुफानी आणि अनोखा शोध आहे. नवीन असल्यामुळे, पारंपरिक गोष्टींमध्ये अडकलेल्या काही लोकांना हे असं काही पसंतही पडणार नाही. पण विवाहाच्या भेटवस्तू देण्याची पद्धत टेन्शनफ्रि व्हावी हाच फॉरमायशादीचा उद्देश आहे. या वस्तू निवडताना, देताना आणि घेतानाही मौज-मजा, आनंद मिळावा. तसंच या गोष्टींचा वापर व्हावा. काही काळानंतर भेटवस्तू द्यायला सर्वांनी याचा मस्त वापर करावा असंच आम्हाला वाटतं”.

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – साधना तिप्पनाकजे 

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Latest

Updates from around the world

Our Partner Events

Hustle across India