संपादने
Marathi

सिलिकॉन व्हॅलीतून प्री-ओन्ड फॅशनच्या दुनियेत! Spoyl!!

Team YS Marathi
27th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आम्ही अगदी कधीतरी वापरतो, अशी बुटाची एखादी जोडी, एखादा टॉप, एखादे शर्ट, एक-दोन पँट आणि एखाददुसरा खास असा बेल्ट वगैरे आमच्याकडे असते. म्हणजे आम्ही ते एखाद्या खास अशा समारंभासाठी वगैरे राखून ठेवलेले असते. किंवा मग ही सगळी अशी परिधाने, प्रावरणे असतात जी आम्ही दिवसा सहसा घालत नाही. काही कपडे व वस्तू तर अशा असतात ज्या खरेदी केल्यापासूनच पडून असतात. या वस्तूंनी कधी उजेडही पाहिलेला नसतो. थोडक्यात काय तर बरीच म्हणजे जवळपास ५० टक्के प्रावरणे आम्ही वापरतच नाही, ही सगळी कपाटात पडून असतात… आणि याच गोष्टीतून ‘Spoyl’ चा जन्म झालेला आहे.

… आणि तोही याच २०१५ म्हणजे सरत्या वर्षाच्या सुरवातीस. भार्गव एर्रांगी या २९ वर्षांच्या युवकाने आपल्या मित्राची तगमग पाहिली. या मित्राला त्याचे ब्रँडेड बुट विकायचे होते. फेसबुकच्या माध्यमातून त्याचा तसा प्रयत्न चाललेला होता. भार्गव यांचे लक्ष या गोष्टीकडे नुसतेच वेधले गेले नाही, तर खिळले. फेसबुकला शेवटी एक विशिष्ट मर्यादा होती. नंतर अनेक जण अशाच वस्तू अशाच व्यासपीठावरून खरेदी वा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आणखीही काही मित्रांची उदाहरणे भार्गव यांच्या पाहण्यात आली. आणि त्यांच्या तोंडून अनायसेच ‘अहा’ असे आनंदोद्गार काहीतरी गवसल्यागत निघाले. त्यावेळी भार्गव सिलिकॉन व्हॅलीत ‘इन्ट्युइट’मध्ये कार्यरत होते.

image


भार्गव म्हणतात, ‘‘माझे विचारचक्र सुरू झालेले होते. आधीच एखाद्याच्या मालकीच्या असलेल्या आणि त्याला विकायच्या असलेल्या असल्या वस्तूंसाठी संपूर्ण समाजाला उपयुक्त ठरेल असा मार्केटप्लेस प्लेटफॉर्म आपण का म्हणून आजमावू नये? लोकच विक्रेते असतील, लोकच ग्राहक असतील आणि आपण असू एक विश्वासू मध्यस्थ… आपल्याला जिंकावा लागेल तो केवळ लोकांचा विश्वास… पुढे सगळे काम लोकशक्तीतून आपोआपच घडत जाईल.’’ भार्गव यांनी जैव-वैद्यकीय अभियांत्रिकीतून पीएचडी केलेले आहे... आणि भागीदारीच्या (पार्टनरशिप नव्हे शेअरिंग) अर्थव्यवस्थेवर भार्गव यांची अगदी आधीपासूनची श्रद्धा आहे!

नव्या जगात प्रवेश

अमेरिकेत जवळपास १४ वर्षे घालवल्यानंतर भार्गव यांनी भारतात परतण्याचे ठरवले. भार्गव म्हणतात, ‘‘मी परतलो त्या दरम्यान सिलिकॉन व्हॅलीत कारकीर्द सुरू करणे म्हणजे एक भरवशाचे स्टार्टअप होते. मलाही वाटत होते, की तंत्रधिष्ठित आणि ग्राहकोन्भिमुख उत्पादनांसाठी भारतीय बाजार हा अधिक खुला आहे.’’

तथापि, भारतात परतल्यानंतरचे सुरवातीचे दिवस जरा कठीणच गेले. भार्गव यांचे इथे फारसे कुणाशी संबंधही नव्हते. चौदा वर्षांचा दुरावा स्वदेशाशी होताच. अगदी शून्यापासून त्यांना सुरवात करावी लागली. नेटवर्क प्रस्थापित करणे आपल्यासारखा दृष्टिकोन असलेल्या मंडळींची जमवाजमव करणे आणि Spoyl या अभिनव व्यावसायिक उपक्रमाला गती देणे, ही सगळीच भार्गव यांच्यासाठी आव्हाने होती.

‘इन्ट्युइट’मधील अनुभव गाठीला होता. चांगल्या आणि होतकरू लोकांच्या बळावर इन्ट्युइटने आपला ठसा उमटवलेला होता. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेले हे प्रतिष्ठान होते. यातूनच भार्गव यांना एवढे मात्र नेमके कळलेले होते, की चांगली माणसे सोबत घेतली म्हणजे चांगली कल्पना तडीला जातेच जाते. भार्गव सांगतात, ‘‘माझ्यासमोर सुरवातीला एक चांगली टिम उभारण्याचे आव्हान होते. मी हैदराबादला गेलो. नेटवर्क उभारले आणि काही मोजक्या मंडळींना सोबत घेतले. प्रोत्साहन दिले. हे सगळे लोक आज Spoyl चे आधारस्तंभ आहेत.’’

सुमित अग्रवाल हे याच मंडळींतले एक. भार्गव यांच्यासमवेत ते ‘इन्ट्युइट’मध्येही सहकारी म्हणून होते. ते Spoyl चे सहसंस्थापक. भार्गव यांचे दुसरे महारथी म्हणजे भास्कर गंजी. Spoyl चे ते पहिले सहकारी. भास्कर इथे रुजू होण्यापूर्वी आंध्र प्रदेशातील एका छोटेखानी कन्सल्टन्सीमध्ये नोकरीला होते. भार्गव म्हणतात, ‘‘भास्कर यांनी सुरवातीच्या काळात इतर सगळ्याच कामांच्या जबाबदाऱ्या अगदी एकहाती सांभाळल्या आणि सगळी कामे अशी चुटकीसरशी हातावेगळी केली.’’ भार्गव यांनी कधीकाळी काही ॲअॅप विकसित करण्याच्या कल्पनांसंदर्भात भास्कर यांची भेट घेतली होती. ही भेट परस्परांवरील विश्वास वाढवणारी ठरली आणि भास्कर भार्गव यांच्या नव्या वाटचालीतले एक खंदे वाटेकरी ठरले.

भार्गव म्हणतात, ‘‘आमची आधीची ओळख होतीच. माझ्या कामकाजासंदर्भातील आतापर्यंतच्या वाटचालीत मला गवसलेले भास्कर म्हणजे एक नाणावलेले अभियंते. ते आयआयटीचे नाहीत की बीआटीएसचेही नाहीत, पण यापैकी कुठल्याही वरल्या श्रेणीतील अभियंत्याशी आजच्या घडीला तोडीस तोड ठरतील, किंबहुना सरस ठरतील, अशा प्रकारची गुणवत्ता त्यांच्यात आहे.’’ इरम रुकिया या आणखी एक आघाडीच्या सहकारी. आधी त्या Myntra आणि Wooplr मध्ये होत्या. भार्गव यांनी लिंक्डइनवर त्यांचा मागोवा घेतला होता.

Spoyl चमूने काही बिटा रन होऊन झालेलेच होते आणि ॲअॅपचे एक नवे व्हर्जन लाँच केले. Spoyl आता iOS आणि Android वर उपलब्ध झालेले होते. AWS वर सादर होणाऱ्या Python-Django सारख्या परिणामकारक तंत्रावर चमूने भरवसा टाकला. ॲअॅप अनुभवातील उच्च दर्जाची इलॅस्टिकसर्च तंत्राधारित गुणवत्ता या तंत्राच्या ठायी होती. सर्वप्रकारचे डॉक्युमेंट Spoyl च्या प्लेटफॉर्मवर शोधले आणि पाहिले जाऊ शकतील, अशी व्यवस्था झालेली होती. अगदी अलीकडले छायाचित्रही पाहिले जाऊ शकत होते. मुळात विक्रेत्याला आपल्या वस्तूचे चित्र, किंमत आणि इतर सगळी माहिती अशी लागून अपेक्षित असे. विक्रेत्यांकडून Spoyl ला ते पाठवून झाले, की Spoyl त्याची पडताळणी करत असे आणि आपल्या प्लेटफॉर्मवर हे सगळे प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व प्रकारची खातरजमा करत असे आणि मगच ते प्रसिद्ध व्हायचे म्हणजे हे असेच आजतागायत सुरू आहे. ऑर्डर एकदा नोंदवली गेली, पडताळणी झाली, की Spoyl च्या पिकअप-डिलिव्हरीची जबाबदारी पाहणाऱ्या सहकारी कंपनीचे काम सुरू होते. ही कंपनी विक्रेत्याशी संपर्क साधते आणि डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू होते. Spoyl स्टँडर्ड मार्केटप्लेस रिव्हेन्यू मॉडेल फॉलो करते. ज्या रकमेचा व्यवहार होतो, त्यातून सगळा खर्च वजा जाता ठराविक टक्के रक्कम Spoyl कडून आकारली जाते. Spoyl आपली वस्तू विकू इच्छिणाऱ्यांना मनाजोगी किंमत यावी म्हणून आपले अधिक परिणामकारक असे ऑनलाइन फॅशन दालनही उपलब्ध करून देते. वस्तू मूळ मालकाकडून आणणेही या सेवेत अंतर्भूत आहे. भार्गव सांगतात, ‘‘ही सेवा खास त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे या कामासाठी पुरेसा वेळ नाही.’’

Spoyl चे ११०० ॲअॅप डाउनलोड करण्यात आलेले आहेत. ८०० कार्यरत युजर्स आहेत. दररोजच्या सरासरी आठ ऑर्डर्स कंपनीला मिळतातच मिळतात. टीम म्हणते, की मार्केटिंगसाठी जाहिरातबाजी वगैरे ते फार करत नाहीत. सेवेचा प्रकार, दर्जा या सगळ्यांच्या बळावर एकदा आमच्या माध्यमातून व्यवहार करणारा ग्राहक आमचा संदर्भ इतरांना देत असतो आणि आमचा व्यवसाय अशा पद्धतीने वाढत चाललेला आहे.

५००० कार्यरत युजर्सपर्यंत संख्या नेणे हे कंपनीचे ध्येय आहे. कंपनीला इथून पुढे आक्रमकपणे आपला व्यवसाय करायचा आहे. लवकरच दररोज २५ ऑर्डर्स पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवलेले आहे. इतर शहरांतून व्यवसाय नेण्याबरोबरच त्याआधी तेथून पिकअप आणि डिलिव्हरीची सुविधा देणारे ठरवायचे आहेत.

भार्गव म्हणतात, ‘‘आमच्या व्यवसायाला तूर्त तरी कुठलीही स्पर्धा वगैरे नाही. काही बोटावर मोजण्याइतकी मंडळी या व्यवसायात आलेली आहेत, पण त्यांचा उपक्रम अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. आमची टीम सशक्त आहे. सेवा सत्वर आहे आणि या बळावर आमची आगेकूच सुरूच राहील.’’

Spoyl सध्या TLabs या प्रगतीवर्धन कार्यक्रमाचा एक भाग बनलेली आहे आणि TLabs सह इतर गुंतवणुकदारांकडून मिळून एक लक्ष डॉलर एवढी रक्कम कंपनीने उभी केलेली आहे. कंपनीचे सल्लागार म्हणून Myntraचे माजी COO गणेश सुब्रमण्यम हे नव्याने दाखल झालेले आहेत. अशाप्रकारे कंपनीची शक्ती वाढलेली आहे.

युअर स्टोरीचे मत

‘प्री-ओन्ड फॅशन’ या क्षेत्राकडे एक अभिनव आणि नव्याने उदयाला आलेले व्यवसाय क्षेत्र म्हणून काही व्यावसायिकांचे लक्ष गेल्या काही दिवसांत वेधले गेलेले आहे. भारतात असे काही स्टार्टअप्स सुरू झालेले आहेत. Elanic, Revamp My Closet, Once Again, Zapyle आणि Etashee ही यातली काही नावे. प्राइज वाटरहाउस कुपर्सच्या (पीडब्ल्यूसी) ताजा अहवालानुसार २०२५ पर्यंत जागतिक पातळीवर ३३५ अब्ज डॉलरचा महसूल जाऊ शकतो, इतके पोटेंशिअल या व्यवसायात आहे. प्री-ओन्ड फॅशनच्या बाजाराची व्याप्ती अधिक स्पष्ट करणारी कुठलीही अधिकृत आकडेवारी आजमितीस उपलब्ध नसली तरी गुगलच्या अहवालानुसार भारतामध्ये हा व्यवसाय २०२० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सचा झालेला असेल.

भारतातही ब्रँडेड लाइफस्टाईल विकसित होते आहे. दिवसेंदिवस ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शुज, ब्रँडेड बेल्ट असे सगळेच ब्रँडेड वापरण्याचे फॅड विशेषत: तरुणाईमध्ये फोफावलेले आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्याही तरुणांची आहे. आता हे मार्केट वाढले आहे आणि वाढतेच आहे म्हटल्यावर प्री-ओन्ड फॅशनलाही सुगीचे दिवस येणारच, हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. सुक्याबरोबर ओलेही जळतेच! पण तरीही प्री-ओन्ड फॅशनच्या बाजाराचा आकडा नेमका किती फुगतो हे शेवटी येणारा काळच सांगेल.

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags