मूक-बधिरांच्या अधिकारासाठी चांगल्या नोकरीला राजीनामा देणारे ज्ञानेंद्र पुरोहित

मूक-बधिरांच्या अधिकारासाठी चांगल्या

नोकरीला राजीनामा देणारे ज्ञानेंद्र पुरोहित

Friday February 26, 2016,

6 min Read

आयुष्यात मनुष्याला नेहमीच चांगल्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागते. सगळ्यात वाईट प्रसंगाला सामोरे जात असताना अनेकदा जगण्याचा खरा अर्थ उमगतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. आणि मग सुरु होते गरजूंची, दीनदुबळ्यांची सेवा. अशा सामाजिक भान जपणाऱ्या सेवाव्रतींमुळेच आपल्या देशाला व समाजाला एक नवीन दिशा मिळते व आपण सुद्धा म्हणू शकतो की ह्या वाईट काळात सुद्धा माणुसकी अजून जिवंत आहे. आपल्या जवळच्याच एका व्यक्तीच्या दु:खद निधनामुळे खचलेल्या एका माणसाने रूढी परंपरेच्या किचकट प्रणालीशी लढा देऊन समाजाच्या अशा वर्गाला मदत करण्याचा निश्चय केला जो अजूनही उपेक्षित आहे. ही गोष्ट आहे इंदोरच्या ज्ञानेंद्र पुरोहित यांची, ज्यांनी आपल्या मूक बधीर भावाच्या मृत्यूनंतर खचून न जाता इतर मूक बधिरांना समाजाचा एक भाग बनवण्यासाठी स्वतःला त्या कार्यात झोकून दिले. सीए चा अभ्यासक्रम मध्येच सोडून मूक बधिरांना न्याय देण्यासाठी एलएलबी व एलएलएम केले तसेच जेव्हा गरज वाटली तेव्हा काळा कोट चढवून न्यायालयात त्यांच्या बाजूने उभे राहिले. या कठीण लढाईत १५ वर्षापासून त्यांच्या पत्नीची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे.

image


सुरवात कशी झाली

या गोष्टीची सुरवात झाली १९९७ मध्ये जेव्हा २६ वर्षीय आनंद पुरोहित यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाला. त्या वेळी आनंदचा छोटा भाऊ ज्ञानेंद्र हा सीए चा अभ्यास करत होता. इच्छा होती की सीए बनून प्रसिद्धी व पैसा मिळवण्याची. पण मोठ्या भावाच्या मृत्यूने ज्ञानेंद्र पूर्णपणे खचला. ते दोघे एकमेकांचे अगदी जिवलग होते. खरंतर आनंद हे ऐकू व बोलू शकत नव्हते त्यांचे कान व आवाज दोन्ही ज्ञानेंद्रच होते त्यामुळे मूक बधीरांची तळमळ ते चांगल्या प्रकारे समजू शकत होते. आनंद व त्यांच्या मूक बधीर मित्रांची मदतही ज्ञानेंद्रच करत असे. त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहचविणे तसेच लोकांचे म्हणणे यांच्यापर्यंत सांकेतिक भाषेमार्फत पोहचवण्याचे दुभाषिकाचे काम ज्ञानेंद्र करत असे. भाऊ व त्यांच्या मित्रांच्या मदतीसाठीच ज्ञानेंद्र यांनी सांकेतिक भाषा शिकली होती. अशातच आनंद यांच्या अकाली मृत्यूचा धक्का पचवणे त्यांच्यासाठी कठीण होते. पण आपल्या भावाला श्रद्धांजली देण्यासाठी त्याने जे पाऊल उचलले त्याने कुटुंबासहित,नातेवाईक व मित्रांना अचंबित केले. आपला सीए चा अभ्यासक्रम मध्येच सोडून ते मूक बधिरांच्या मदतीसाठी निघाले. १९९७ ते १९९९ पर्यंत परदेशात फिरून मूक बधिरांच्या विषयाचा अभ्यास केल्यावर ज्ञानेंद्र यांना जाणवले की आपल्या देशातील अश्या लोकांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही, त्यांची खिल्ली उडवली जाते, पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीची नोंद होत नाही कारण पोलिसांकडे कोणत्याही सांकेतिक भाषेचा तज्ञ उपलब्ध नसतो. सामान्य लोकांप्रमाणे ते सिनेमा बघू शकत नाही,एवढेच नाही तर आपले राष्ट्रगीत सुद्धा त्यांच्यासाठी बनले नाही. पण याउलट परदेशात मूक बधीरांना सामान्य लोकांप्रमाणेच सोयी सुविधा पुरवल्या जातात तसेच त्यांच्या गरजा लक्षात घेऊन नियम व कायदे बनवले आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सन २००० मध्ये ज्ञानेंद्र यांनी मूक बधिरांसाठी ‘आनंद सर्व्हिस सोसायटी’ या नावाने एक संस्था सुरु केली.

image


नोकरीची ऑफर धुडकावली

ऑस्ट्रेलियात पर्थ येथे झालेल्या वर्ल्ड डेफ कॉन्फरेंस मध्ये मूक बधिरांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्ञानेंद्र यांनी एक सादरीकरण केले. ज्यानंतर तेथील एक संस्था वेस्टर्न डेफ सोसायटीने त्यांना एका चांगल्या पगारच्या नोकरीची ऑफर दिली. पण आनंद यांनी हे सांगून ती नोकरी नाकारली की तुमच्या देशापेक्षा भारतातील मूक बधिरांना त्यांची जास्त गरज आहे. २००१ मध्ये ज्ञानेंद्र यांनी मोनिकाशी विवाह केला जी पहिल्यापासूनच मूक बधिरांसाठी काम करत होती. लग्नानंतर पुरोहित दांपत्याने मिळून आपल्या ध्येयाला नवीन दिशा दिली.

image


मूक बधीरांना न्याय देण्याची लढाई

मूक बधीरांना न्याय देण्यासाठी प्रथम त्यांनी राज्यस्थान मध्यप्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. पोलिसांच्या कार्यशाळेत जाऊन सादरीकरण केले त्यात विकलांगांना सुद्धा न्यायाची गरज आहे हे पटून दिले. कोणत्याही मूक बधिरांच्या तक्रारीसाठी त्यांची सांकेतिक भाषा समजायला व मदतीसाठी ते कधीही उपलब्ध राहतील. ज्ञानेंद्र यांचा प्रयत्न यशस्वी झाला. हळूहळू मध्यप्रदेश नंतर बिहार, राज्यस्थान पोलिसांनी सुद्धा मूक बधीरांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी ज्ञानेंद्र यांची मदत घेऊ लागले तसेच हे काम ज्ञानेंद्र हे स्वखर्चाने करत असे. पोलीस ठाण्यानंतर न्यायालयात पण अनेक केस मध्ये सांकेतिक भाषा समजण्यासाठी त्यांना बोलावले जाते. याच दरम्यान त्यांनी कायद्याचा पण अभ्यासक्रम पूर्ण केला. एलएलबी व एलएलएम केल्यानंतर कोणते ही शुल्क न घेता ते मूक बधिरांना न्याय देण्यासाठी लढू लागले. ज्ञानेंद्र यांनी नव्याने अश्या लोकांसाठी एका पोलीस ठाण्याची मागणी केली. सलग दोन वर्षापर्यंत मध्यप्रदेशचे गृहमंत्री व पोलिस वरिष्ठ अधिकारी यांना समजावल्यानंतर साल २००० मध्ये मुकबधिरांसाठी देशातील पहिले पोलीस ठाणे सुरु झाले. इंदोर येथील तुकोगंज भागात अश्या व्यक्तींसाठी वेगळे ठाणे उघडले. जिथे मूक बधीर सांकेतिक भाषेत आपली तक्रार नोंदवू शकतात.पहिल्याच दिवशी इंदोरच्या एका मूक बधीर दांम्पत्याने तक्रार नोंदवली की त्यांच्या घरावर काही गैरसंघटना वाद्यांनी ताबा घेतला आहे. ताबडतोब पोलिसांनी कारवाई करून घर रिकामे केले व त्या दाम्पत्यांना सुपूर्त केले. आतापर्यंत मूक बधीर ठाण्यात २५६ एफआईआरची नोंद झाली आहे. या ठाण्याच्या सफलतेनंतर सतना,रीवा,जबलपूर मध्ये यांची एक शाखा उघडली आहे.

image


मूक बधिरांसाठी सिनेमा

ज्ञानेंद्र यांनी बघितले की मूक बधिरांसाठी मनोरंजनाचे काहीच साधन नसते. त्यांना सिनेमा बघायला तर आवडतात पण एक एक डायलॉग त्यांना सांकेतिक भाषेत सांगणे कठीण आहे. या समस्येवर पण त्यांनी तोडगा काढला. हिंदी प्रसिद्ध सिनेमे हे सांकेतिक भाषेत डब करण्याचा निश्चय केला. कायद्याच्या त्रृटीना दूर करून इंदोर पोलिसांच्या मदतीने ज्ञानेंद्र यांनी शोले, गांधी, तारे जमीन पर, मुन्नाभाई एमबीबीएसला सांकेतिक भाषेत अनुवादित केले. ज्याला देशातील अनेक मूक बधीरांनी बघितले व पसंद केले. आपल्या राष्ट्रगीता पासून सुद्धा हे लोक अनभिज्ञ होते. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी सहित अनेक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत कधी सुरु होऊन संपते हे मूक बधीरांना कळतच नव्हते. या राष्ट्रगीताला सांकेतिक भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी बऱ्याच कायद्याच्या अडचणी होत्या, शेवटी दीर्घ प्रयत्नांनी २००१ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेई यांच्या सरकारने ज्ञानेंद्र यांची मागणी रास्त मानून राष्ट्रगीताला सांकेतिक भाषेत गाण्याची मान्यता दिली.

मूक बधिरांसाठी आरक्षण

२०११-१२ मध्ये ज्ञानेंद्र यांनी सरकारी नोकरीमध्ये मूक बधिरांसाठी आरक्षणाची लढाई सुरु केली. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने केलेल्या दाव्यानंतर केस लढत त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले. सरकारद्वारा मागणी मान्य झाली. २% आरक्षण मूक बधीरांसाठी सरकारी नोकरी मध्ये निश्चित केले गेले. परिणामी शालेय शिक्षण विभागासाठी ३९ हजार पदांसाठी जागेची नियुक्त होणार आहे ज्यात ७८० जागा या मूक बधिरांसाठी आरक्षित आहे.

image


मूक बधिरांच्या सांकेतिक भाषेला घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न

मागील तीन वर्षांपासून आतापर्यंतच्या प्रयत्नांना बघून २०१५ मध्ये टीवी कार्यक्रमात पुरोहित दांपत्याला आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. अमिताभ यांनी विचारले की मी तुमच्यासाठी काय करू शकतो तेव्हा या दांपत्याने त्यांना सांगितले की त्यांनी सरकारला विनंती करून सांकेतिक भाषेला देशातील भाषेचा दर्जा मिळवून द्यावा. अमिताभ यांनी सरकारला विनंती केली की कायद्यातील उपलब्ध नियमावलीनुसार हा नियम लवकरात लवकर लागू करावा कारण ही मूक बधिरांसाठी योग्य मागणी आहे. ज्ञानेंद्र सलग भारत सरकारच्या संपर्कात आहे व आता लवकरच त्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे. 

मूक बधीर गीता जेव्हा पाकिस्तान मध्ये होती तेव्हा ज्ञानेंद्र ईदी फाउंडेशन तर्फे सलग तिच्याशी व्हिडीओ कॉन्फरेंनसिंग तर्फे बोलत होते. गीताला सांकेतिक भाषेचं अपूर्ण ज्ञान असल्यामुळे त्यांनी तिला ही भाषा स्क्रीनवर पूर्ण शिकवली. गीताने ज्ञानेंद्र यांना सांगितले की तिला सलमान खान यांचा बजरंगी भाईजान सिनेमा बघायचा आहे. ज्यासाठी त्यांनी या सिनेमाला सांकेतिक भाषेत डब करण्याचे काम सुरु केले.

आज ज्ञानेंद्र यांनी इंदोर व्यतिरिक्त आदिवासी भागात धार, आलीराजपूर व खंडवा मध्ये सुद्धा आपले केंद्र उघडले आहे. ज्यात ३०० मूक बधीर मुलं अभ्यास करत आहे. ज्ञानेंद्र हे कॉलेजमध्ये लेक्चर व घरी शिकवणी घेऊन आपला घर खर्च चालवतात. ज्ञानेंद्र सांगतात की, "माझ्या भावाच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही जर मूक बधिरांच्या उद्धाराचा विचार आला नसता तर मी पूर्णपणे हताश झालो असतो. यांची मदत करून वाटते की मी भावासाठी काहीतरी करत आहे. प्रत्येकात मला माझा भाऊ दिसतो. देशातील प्रत्येक मूक बधीरांना आनंदी बघण्याची माझी इच्छा आहे’’.

ज्ञानेंद्र यांची पत्नी मोनिका सांगतात की आमच्या डोळ्यांनी तो दिवस बघू इच्छितो जेव्हा देशातील प्रत्येक जिल्यात अश्या लोकांसाठी एक ठाणे असेल व न्यायालयासहित प्रत्येक सरकारी विभागात सांकेतिक भाषेचा एक दुभाषी असेल. 

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपडत आहेत, बनारसचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव! 

'द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंड'च्या विद्यार्थ्यांची थक्क करणारी मसाज कला !

सर्व काही समाजाच्या मानसिक स्वास्थासाठी

लेखक : सचिन शर्मा

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close