संपादने
Marathi

लहान मुलांच्या कपड्यांच्या जागतिक बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी ‘किडॉलॉजी’

Team YS Marathi
29th Dec 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

महाविद्यालयात असताना अंकुर मित्तल, नेहा सच्चर मित्तल आणि करीना राजपाल यांनी स्टार्ट अपच्या कल्पनांवर चर्चा करत अनेक तास घालवले. पण महाविद्यालयातल्या शिक्षणानंतर मात्र त्या तिघांनी वेगवेगळे कॉर्पोरेट मार्ग निवडले. पण स्टार्टअपचं स्वप्नं मात्र कायम होतं. त्यामुळेच महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांनी खास लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड्ससाठी किडॉलॉजीसाठी एकत्र यायचं ठरवलं.


image


चार्टर्ड अकाऊंटंट आणि अमेरिकेच्या जॉर्जटाऊन विद्यापिठातून एमबीएची पदवी घेतलेले अंकुर गेली चार वर्ष न्यूयॉर्क आणि लंडनच्या दरम्यान सतत चकरा मारत होते.सिटीग्रुप आणि क्रेडिट स्युससाठी ते गुंतवणूक बँकर म्हणून काम करत होते. याच काळात त्यांना लक्षात आलं की भारतात बाळं, लहान मुलांच्या आणि गर्भवती महिलांच्या चांगल्या दर्जाच्या फॅशनेबल कपड्यांसाठी खूप मोठी मागणी आहे. या क्षेत्रात खूप मोठी संधी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

दरम्यान, करीना जॉर्जटाऊन विद्यापिठातून एमबीए पूर्ण करून त्यांचा भारतातला पिढीजात कपडे, त्याच्याशी संबधित वस्तू आणि फर्निचरच्या व्यवसायात काम करायला लागल्या होत्या.

नेहा यांनी झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधून पदवी पूर्ण केली आणि त्यांचा अंकुरशी विवाह झाला. त्यांनी एनडीटीव्ही आणि टीव्ही 18 सारख्या कंपनीत मनोरंजन शोसाठी निवेदक आणि निर्माता म्हणून जवळपास आठ वर्ष काम केलं.

२००९ मध्ये आपल्याकडे असलेल्या कौशल्याला आणखी वाव मिळेल असा नवीन व्यवसाय सुरु करायचं करीना यांनी ठरवलं. अंकुर आणि नेहासोबत एकत्र येऊन त्यांनी लहान मुलांसाठी लाईफस्टाईल स्टोअर उघडायचं ठरवलं. अशा रितीनं २०१० मध्ये किडॉलॉजी सुरु झालं.

आम्ही भारत आणि परदेशात राहणाऱ्या नवीन पिढीतल्या ० ते १० वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी भारतीय फॅशन ब्रँड्स विकसित करायचं ठरवलं,असं किडॉलॉजीचे सहसंचालक अंकुर सांगतात.

यामध्ये अगदी नवजात ते कुमार वयातल्या मुलं आणि मुलींसाठी भारतीय, पाश्चात्य तसंच दोन्ही पद्धतीचे मिळून बनवलेले कपडे आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. त्यांनी तयार केलेल्या कपड्यांसोबतच गौरी आणि निहारिका गुप्ता, सिद्धार्थ टायटलर आणि मालिनी रमाणी या प्रसिद्ध भारतीय डिझायनर्सना खास मुलांसाठी कपडे बनविण्याची विनंती करण्यात आली.हे कपडे किडॉलॉजीच्या नावाखाली वितरीत होतात, असंही अंकुर यांनी सांगितलं.

नवी दिल्लीतल्या डिएलएफ प्रोमेनाड मॉलमधल्या प्रमुख स्टोअरपासून या लेबलची सुरुवात झाली. भारतात किडॉलॉजीचे कपडे मुंबई, हैदराबाद, चेन्नई, लुधियाना आणि कोलकता या शहरांमधल्या अनेक डिझायनर्स स्टोअर्समध्ये विकले जातात. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, सिंगापूर, सिडनी आणि न्यूयॉर्कमध्ये किडॉलॉजीचं अस्तित्व आहे.

कपड्यांचे डिझाईन, निर्मिती, गुंतवणूक बँकिंग, वितरण आणि फॅशनच्या पीआरमध्ये आम्ही एक टीम म्हणून एकमेकांना साजेसे आहोत, असं अंकुर यांनी सांगितलं.

कपडे तयार करणं, त्याचं वितरण आणि विक्री यावरच कंपनीचं भांडवल अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही कसं काम करतो ते बदललं आहे. विक्रीची किंमत कमी करून आमचा सरासरी नफा वाढवणं आणि वितरण वाढवणं परिणामी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं यावर आता आमचा भर आहे, असं अंकुर सांगतात.

भारत आणि भारताबाहेरच्या स्वत:च्या आणि इतर स्टोअर्समधूनच स्वत:चा निर्माण केलेला ब्रँड विकण्यावर सुरुवातीला किडॉलॉजीनं भर दिला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन विक्रीवरही ते लक्ष केंद्रित करत आहेत.

आमची सीबाझार, स्नॅपडील, एक्सक्लुझिव्हली डॉट कॉम आणि अन्य ऑनलाईन कंपन्यांसोबत भागीदारी आहे. यामधून जगभरातील परदेशस्थ भारतीय नागरिकांमध्ये भरपूर संधी असल्याचं लक्षात आले. त्यानंतर मग आम्ही ऑनलाईन विक्रीला सुरुवात केली, असं अंकुर सांगतात. मात्र हे परीवर्तन सोपं नव्हतं. त्यांना त्यांची डिझाईन्स आणि किंमतीही बदलायला लागल्या. आम्ही काही अशी डिझाईन्स आणली ज्यामुळे मापासाठी कपडे बदलायची वेळ शक्यतो येऊ नये. सध्या आम्ही किंमतींवर संशोधन करत आहोत. जेणेकरून ब्रँडला साजेशी स्टाईल आणि डिझाईन तेच ठेवून आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असं अंकुर सांगतात. सध्या किडॉलॉजीमध्ये अगदी पाच हजारांपासून २५ हजारांपर्यतच्या किंमतीचे परवडणारे असे लक्झरी कपडे उपलब्ध आहेत. पण सध्या ते कपड्यांसाठी हीच किंमत तीन हजार तर एक्सेसरीजसाठी ५०० रुपयांपर्यंत कशी आणता येईल यावर काम करतायेत.

आम्ही आमच्या ब्रँडच्या प्रतिमेमध्ये कोणतीही तडजोड न करता आणखी काही कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. यासोबतच आमचं उत्पादन आणि ब्रँड योग्य रितीने दाखवलं जाईल याचीही आम्ही खात्री करून घेतो, असं अंकुर सांगतात.

कच्च्या मालाच्या किंमतीत आणि कुशल कारागिरांच्या किंमतीत सतत वाढ होत असली तरी किंमत आणि नफा कायम ठेवून दर्जात सातत्य राखणं हे सध्या व्यवसायातलं मोठं आव्हान बनलंय. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कंपनी उत्तम दर्जाच्या कच्च्या मालाची खरेदी करते किंवा बाहेरून मागवते. त्याशिवाय अगदी दुय्यम किंवा तृतीय स्तराच्या शहरांमध्येही जागांच्या वाढलेल्या किंमती हेही एक मोठं आव्हान आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, वाव मिळण्यासाठी ऑनलाईनवर अस्तित्व असणं अपरिहार्य आहे.

एसॉचॅमनं केलेल्या अभ्यासानुसार यावर्षीपर्यंत लहान मुलांच्या कपड्यांचं मार्केट ८० कोटींपर्यंत जाऊन पोहोचेल असा अंदाज आहे. फक्त महानगरांमध्येच नाही तर डेहराडून, चंदीगड, पुणे, नाशिक, इंदूर आणि वाराणसी अशा शहरांमध्येही लहान मुलांच्या ब्रँडेड कपड्यांसाठी काही हजार खर्च करायला आता ग्राहक तयार आहेत. त्यामुळेच अशी शहरंही लहान मुलांच्या ब्रँडेड कपड्यांसाठी मोठं मार्केट बनली आहेत. माध्यमं, पालकांचं दुप्पट झालेलं उत्पन्न तसंच मित्रांचा दबाव या कारणांमुळे लहान मुलंही सध्या जास्त फॅशन आणि ब्रँड्सबद्दल जागरूक बनली आहेत, असं या अभ्यासातून पुढं आलं आहे.

लहान मुलांची भारतातील बाजारपेठ अजून बाल्यावस्थेत आहे. पण इथं आता मदर केअर, फर्स्टसिटी, मॉम अँड मी, बरबेरी कीड्स, अर्मानी ज्युनियर, फेंडी कीड्स आणि गुस्सी कीड्स असे ब्रँड्स आणि स्टोअर्स सुरू झालेत.

या वर्षी लहान मुलांच्या उत्पादनांचे किरकोळ विक्रेते असलेल्या फर्स्टसिटीने चौथ्या टप्प्यात तीन कोटी साठ लाख रुपये निधी उभारला आहे. सध्या त्यांचा एकूण निधी सात कोटींच्या जवळ पोहोचलाय. फेब्रुवारी २०१५ मध्ये महिंद्रा समुहाने व्हीसीचा पाठिंबा असलेल्या लहान मुलांची उत्पादनं ऑनलाईन विकणाऱ्या बेबीओयेचा ताबा घेतलाय.

फर्स्ट सिटी आणि मॉम अँड मी हे दोन मोठे स्पर्धक लहान मुलांच्या कपड्यांच्या क्षेत्रात अजूनही टिकून आहेत. ही बाजारपेठ मोठी असली तरी लिलीपुट कीड्सवेअर आणि जीनी अँड जॉनी सारख्या ब्रँड्सनी मोठं नुकसान झाल्यानं आपली अनेक स्टोअर्स बंद केली आहेत.

संघटित ब्रँडेड क्षेत्राचा विस्तार होत असला तरी किड्सवेअर बाजारपेठेच्या आकारामानापुढे ते छोटं आहे. नवीन स्पर्धकांना आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना या क्षेत्रात उतरण्याच्या खूप संधी आहेत. वेगानं वाढणाऱ्या या क्षेत्रात कीडॉलॉजी आपलं काम करतेय. त्यांनी या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलंय आणि उत्पादनाच्या समस्याही सोडवल्या आहेत, असं अंकुर सांगतात.

पुढील वर्षभरात एक कोटी डॉलर कमावण्याचं ध्येय असल्याचं अंकुर सांगतात. तर पुढील पाच वर्षात वीस कोटी अमेरिकन डॉलर कमावण्याचं ध्येय असल्याचंही ते सांगतात. नुकतंच इंडियाबुल्सचे सहसंस्थापक आणि माजी उपाध्यक्ष सौरभ मित्तल यांनी कीडोलॉजीमध्ये गुंतवणूक केलीये.

उत्सवानिमित्त परिधान करण्याच्या लहान मुलांच्या कपड्यांच्या क्षेत्रात आणि परवडणारी कपडे तयार करण्याच्या क्षेत्रात यशस्वी होण्याचं ध्येय असल्याचं अंकुर सांगतात.


लेखक- तौसिफ आलम

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags