संपादने
Marathi

रुग्णासाठी घरबसल्या आरोग्यसेवा म्हणजे पोर्टिया

Team YS Marathi
28th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

घरातला एक जण दुर्धर आजाराने त्रस्त आहे आणि त्याची वाताहत तर सुरूच आहे, सोबत कुटुंबाचीही, वेदनांच्या अशा कितीतरी कहाण्या सर्वदूर ऐकायला, बघायला मिळतात. विभक्त कुटुंबपद्धती, पती-पत्नी दोघे नोकरी-व्यवसायात अशा प्रकारचे चित्र विशेषत: शहरी भागांतून हमखास आहे. अशात घरातील आजारी सदस्याकडे बघायचे आणि त्याच्या सेवा-सुश्रुषेकडे लक्ष पुरवायचे तर एक म्हणजे त्याच्यावरला खर्च आणि दुसरे म्हणजे त्याच्याकडे लक्ष देण्यात बुडालेल्या कामधंद्याची वजाबाकी असे कुटुंबाचे सगळेच गणित कोलमडते. या सगळ्या कारणांनी कुटुंबातला आजारी सदस्य म्हणजे आजच्या काळातले एक मोठे संकटच. त्यावर मात करायची तर दोनच पर्याय. एकतर तुमचे दैनंदिन कामकाज सोडून आजारी आप्तावर लक्ष पुरवा किंवा मग एखादी निवासी परिचारिका शोधा. त्यात पुन्हा प्रशिक्षित परिचारिका शोधणे काही फार सोपेही नाही.

के गणेश आणि मीना गणेश हे या अनुभवातून होरपळलेले आहेत. एका कुटुंबीयाला कर्करोग असल्याचे निदान झाले. गणेश दांपत्य व्यावसायिक आणि गुंतवणूकदारही. आधीच कामाचा मोठा व्याप. त्यात ही नवी भर. घरगुती सुश्रुषेच्या प्रांतात आपल्याकडे आधीच मोठी बोंब. त्यावेळेपूर्वी गणेश दांपत्य ट्युटर व्हिस्टा या आपल्या व्यावसायिक उपक्रमाच्या यशाने मोठे मजेत होते. आनंदावर आप्ताच्या या आजाराचे विरजण पडले. दुसऱ्या अन्य संधींच्याही हे दांपत्य मागावर होतेच आणि हे संकट मागे लागले.

image


Portea च्या सहसंस्थापिका मीना सांगतात, ‘‘परवडेल अशा दरात आणि समाधान होईल अशा दर्जाची गृहसुश्रुषा सेवा मिळवणे आम्हाला मोठे जिकिरीचे गेले. खूप साऱ्या उणिवा या सुविधेत होत्या आणि त्या आपण भरून काढून शकतो, असे आम्हाला जाणवले.’’ २०१३ मध्ये पोर्टियाची स्थापना झाली.

प्रगती आकड्यापल्याड

बंगळुरूतील एक छोटेखानी कार्यालय हा २०१३ मध्ये सुरू झालेल्या या प्रवासाचा आरंभबिंदू होता. मोजके लोक टीममध्ये होते. बंगळुरू आणि दिल्ली एनसीआर मिळून ५० ग्राहकांपर्यंतची मजल सुरवातीच्या काळात कशीबशी गेलेली होती. आज ३५०० प्रशिक्षितांचा चमू पोर्टियाच्या दिमतीला आहे. भारत आणि मलेशियामध्ये व्यवसायाचे मोठे जाळे विणले गेलेले आहे. महिन्याकाठी सरासरी ६० हजार रुग्णांच्या घरी व्हिजिट्‌स होतात.

पोर्टियाच्या दाव्यानुसार मागच्या वर्षी उत्पन्नात झालेली वाढ तब्बल २०० टक्क्यांची होती. होम व्हिजिट्‌सचे प्रमाण १५१ टक्क्यांनी वाढले होते. सेवा घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्क्यांनी वाढलेले होते. रुग्णांच्या डेटाबेसमध्ये ३०७ पटींची वाढ होती. शहरनिहाय क्लिनिकचा बेस २५५ वरून २३०० टक्क्यांपर्यंत गेलेला होता. सध्याचे उत्पन्न आणि इष्टांकी उत्पन्नाबाबत काहीही सांगण्यास कंपनीने नम्रपणे नकार दिलेला आहे. पोर्टियाने तब्बल ४६.५ दशलक्ष डॉलर एवढा फंड गोळा केलेला आहे. Accel Partners, जागतिक बँक समूहाचे सदस्यत्व असलेले International Finance Corporation (IFC), Qualcomm Ventures आणि Ventureast अशा नावाजलेल्या गुंतवणुकदारांकडून हा निधी कंपनीला प्राप्त झालेला आहे. दुर्धर आजाराने पीडित असलेल्या भारतातील रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा रास्त दरात देता यावी म्हणून Medybiz Pharma ही आघाडीची औषधवितरक कंपनीही पोर्टियाने अधिग्रहित केलेली आहे.

मीना सांगतात, ‘‘कल्पनेपलीकडे गेलेले वृद्धीचे आकडे आमचा प्रभाव दर्शवण्यास पुरेसे आहेत आणि हाच आमचा विश्वास आहे. आम्ही एक असा उद्योग उभा केला आहे, जिथे आधी केवळ शून्य होता. भारतातील गृहसुश्रुषेच्या प्रांतात आम्ही विश्वासार्हता निर्माण केली. दृश्य परिणाम निर्माण केले. ‘ग्राहकाची आरोग्यनिगा’ ही कल्पना आणली.’’

image


पोर्टियाची ही सेवा सुरू होण्यापूर्वी कुटुंबाला वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जावे लागत होते. आता कोणता दवाखाना कुठे तर कोणता कुठे. वयनिहाय सुश्रुषेच्या गरजा त्यात वेगळ्या. शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीचे काय. रुटिन चेक-अप्स, निदान, वैद्यकीय साधने, विशिष्ट औषधी अशा सगळ्याच समस्या होत्या. आणि नेहमीच काय म्हाताऱ्याकोताऱ्यांवरच ही वेळ येते, असेही नाही. एखाद्या गंभीर अपघातानंतर सावरत असलेल्याबद्दलची गोष्ट घ्या नाहीतर एखाद्या खेळात गंभीर स्वरूपाची दुखापत झालेल्याची गोष्ट घ्या, त्याला काय फक्त फिजिओथेरेपीची गरज पडते. अवती-भवती सतत कुणीतरी त्याला लागतेच लागते.

मीना सांगतात, ‘‘सध्या आम्ही कामाचे जे स्वरूप आखलेले आहे, त्यात पोर्टिया ही एक सहयोगी सेवा आहे आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष पुरवणारी सेवा आहे.’’ गृहसुश्रुषेपासून ते वैद्यकीय साधने भाड्याने देण्यापर्यंत, प्रयोगशाळेतील तपासणीपासून ते डॉक्टर उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्याच प्रकारच्या सेवांमध्ये कंपनीने दमदार पाऊल टाकलेले आहे.

आरोग्य-निगेला तंत्राची जोड

मीना सांगतात, ‘‘आम्ही वैद्यकातले ‘रिमोट डायग्नोस्टिक्स’सह सर्वच प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो.’’ नियंत्रित कामकाजाच्या व्यवस्थापनासाठीही पोर्टिया तंत्रज्ञानाचा वापर करते. प्रक्रिया ठरल्याबरहुकूम व्हाव्यात म्हणून तंत्राचा वापर केला जातो. पोर्टियाने पॉइंट-ऑफ-केअर डिव्हाइसेस वापरायलाही सुरवात केलेली आहे. रुग्णाच्या घरातील वैद्यकीय उपकरणे रिमोटवर चालतील, अशीही सुविधा याअंतर्गत आहे. पोर्टियाशी संलग्न ‘क्लिनिशिअन’ रुग्णाच्या घरी भेट देतो. तेव्हा त्याला डायग्नोस्टिक टूल्सचा वापर करून पेशंटचा सगळा डाटा उपलब्ध होतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून तो ईएमआर प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला असतो. हा प्लॅटफॉर्म पुढे रुग्णाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अंदाज बांधतो आणि मग त्यानुसार पाउले उचलली जातात. समजा रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियमितपणे डॉक्टरचीच व्यवस्था गरजेची असेल तर ती केली जाते. रुग्णाचे संवेदनशिल अवयव धोक्याच्या पातळीवर आले असतील तर मदतीला असलेली सूत्रबद्ध पूर्वानुमान यंत्रणा खबरदार करते. सुरू असलेल्या औषधाविपरित नव्याने सुचवण्यात आलेल्या नव्या औषधाचा काही दुष्परिणाम रुग्णावर ओढवला असेल तर अशावेळीही हे तंत्र सहाय्यभूत ठरते.

पोर्टियाचा रुग्ण विशेषज्ञाकडून निगराणीखाली असतो. तीन पातळ्यांवर हे काम चालते. क्लिनिशिअनच्या कामकाजावर विशेषज्ञाचे निरीक्षण असते तर विशेषज्ञांचा कामकाजाचा आढावा पोर्टियाच्या वैद्यकीय संचालकांकडून घेतला जातो. पोर्टियाची टीम कन्सल्टिंग स्पेशॅलिस्ट आणि रुग्णाच्या डॉक्टरसमवेत अगदी खांद्याला खांदा लावून काम करते.

आव्हाने

पोर्टिया सुरू झाले तेव्हा गृहारोग्यसुश्रुषेविषयी जागरूकता आणणे, हेच मुख्य आव्हान या स्टार्टअपसमोर होते.

मीना सांगतात, ‘‘कुठल्याही क्षेत्रात ग्राहकांचा ब्रँड म्हणून प्रतिमा निर्माण करणे सोपे नसते. आरोग्यनिगेसारख्या क्षेत्रात तर ते अधिकच अवघड. कारण हा एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनेशी निगडित विषय आहे. कामाच्या स्वरूपातील ही निकड लक्षात घेऊन त्या पातळीवर काम करणे आणि परिणामकारकपणे करणे ओघाने आलेच. दर्जा राखणे, दर नियंत्रित ठेवणे ही सगळी आव्हाने होती.’’

पोर्टियाने सुरवातीला वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी आणि आउटडोअर कँपेनिंगच्या माध्यमातून आपला प्रचार-प्रसार केलाच. शिवाय कॉर्पोरेट कार्यालये तसेच अपार्टमेंट कॉम्प्लेक्स अशा प्रकारच्या भागांतून शिबिरेही आयोजित केली. वैविध्यपूर्ण भूमिका, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जबाबदारीनुरूप चपखल बसणारे सहकारी निवडण्यातही पोर्टियाला यश आले. पोर्टियाच्या एकूण उभारणीत योग्य टीम हा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

image


मीना गणेश

मीना म्हणतात, ‘‘गृहआरोग्यनिगा हे नवे व्यवसायक्षेत्र व्यापणाऱ्या लोकांच्या प्रोफाइल पाहिल्या, की ही माणसे की वैविध्यपूर्ण खजिना असा प्रश्न पडतो. आता आमच्याच सहकाऱ्यांपैकी काही जण नामांकित बिझनेस स्कुलमधून आलेले आहेत, तर काही अभियांत्रिकी क्षेत्रातून आहेत. आम्ही ग्रामीण आणि निमशहरी भागांतील कौशल्यही आमच्या उपक्रमातून वापरतो. ग्रामीण महिला आणि पुरुषांना आम्ही नर्सिंग अटेंडंट म्हणून प्रशिक्षण देतो आणि आपल्या पायावर उभे करतो.’’

अर्थात राष्ट्रीय कौशल्य विकास संघटना ही जबाबदारी पोर्टियासाठी पार पाडते. इथेच उमेदवाराचे प्राथमिक प्रशिक्षण पार पडलेले असते. मुलाखतीनंतर उमेदवाराला शिष्टाचार, आरोग्य विज्ञान, वर्तन आणि ग्राहक निगा या कौशल्यांत पारंगत केले जाते.

पोर्टिया कार्यरत असलेल्या या क्षेत्राची मूलभूत गरज म्हणजे रुग्णाच्या गरजांना आपल्या केंद्रस्थानी मानणे ही होय.

मीना सांगतात, ‘‘पोर्टियाचे रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय पोर्टियाकडे त्यांच्या अगदी गरजेच्या वेळेस आलेले असतात. ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवतो. रुग्णाच्या रूपातील कुटुंबाचा भार आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेला असतो. बांधिलकीचे हे नाते असते, ते काही फक्त रुग्णावर उपचारापुरते मर्यादित नसते.’’

पोर्टियाच्या अनेक ग्राहकांसाठी, पोर्टियाची सेवा ही त्यांची आवश्यकता बनलेली आहे. बंगळुरूतील मल्लेश्वरममधील रहिवासी पांडुरंग पै आणि त्यांच्या पत्नीचेच उदाहरण बघा. पांडुरंग पै ८० वर्षांचे आहेत. पै सांगतात, ‘‘माझी दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. आम्ही दोघे त्यांच्याशिवाय इथेच राहात असल्याने मुले काळजीत असत. पण पोर्टियाशी आमचा संबंध आला आणि मुलांची काळजीच संपली. पोर्टियाच्या परिचारिका योग्य सल्ला देतात. नियमित तपासणी करतात. आम्ही औषधं नियमितपणे घेतली, की नाही यावर बारीक नजर ठेवतात. मुख्य म्हणजे या परिचारिकांशी आमची गप्पाष्टकंही रंगतात.’’

संधी

आम्हाला फक्त सभोवताली एक दृष्टिक्षेप टाकण्याची गरज आहे आणि कुटुंबावर एक नजर टाकण्याची गरज आहे. एवढे जरी आम्ही केले तरी आमच्या लक्षात गृह आरोग्यनिगेचे महत्त्व आलेच म्हणून समजा. भारतातील आरोग्यनिगा हे क्षेत्र खरोखर जर्जर अवस्थेत आहे. पायाभूत पातळीवरही इथे बरेच काम होण्याची गरज आहे. दुर्धर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्करोग, उच्चरक्तदाब आणि मधुमेह या आजारांनी भारतातील ५१ टक्के ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. ‘ग्लोबल एज वॉच’च्या अहवालातील या नोंदी आहेत. ग्लोबल एज वॉचनुसारच २०५० पर्यंत भारताची २० टक्के लोकसंख्या ही ६० वर्षांवरील असेल. गृह आरोग्यनिगेची गरज तेव्हा अधिकच वाढलेली असेल.

पती-पत्नी दोन्ही कमवते असणाऱ्या कुटुंबांचे वाढतच चाललेले प्रमाणही या क्षेत्राची आवश्यकता दिवसेंदिवस वाढवत नेणारे आहे. या विषयाशी निगडित असलेले हे सगळे आकडे पाहिले, की गृह आरोग्यनिगा हा विषय आताच कळीचा मुद्दा झालेला आहे. लवकरच तो लोकांची मूलभूत गरज बनल्यास नवल वाटायला नको. पोर्टियासह इंडिया होम हेल्थकेअर, युनिक होम केअर बाय अपोलो, हिलर्स अँड होम अँड नाइटेंगल्स हे सगळे पोर्टियाचे समव्यवसायी स्पर्धक स्वत:साठी मोठा बाजार निर्माणही करू शकतील आणि तेवढ्याच मोठ्या बाजारावर आपला कब्जाही करू शकतील. अर्थात तशीच परिणामकारक सेवाही त्यांना पुरवावी लागेल, हे सांगायला नको.

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags