संपादने
Marathi

दहा हजार शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात ७० टक्क्यांनी वाढ करणारं ‘किसान सुविधा’ अॅप

Team YS Marathi
13th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ‘किसान सुविधा’ नावाच्या मोबाईल अॅपचं उद्घाटन केलं. शेतीस आवश्यक असणारे हवामान, शेतीकरता आवश्यक बाबींची उपलब्धता, बाजारदर, पिक संरक्षण आणि तज्ज्ञांचा सल्ला या पाच गोष्टींबाबतची माहिती शेतकऱ्यांना या अॅपमुळे मिळणार आहे. जागतिक पातळीवर भारताचा स्मार्टफोनच्या वापरात दुसरा क्रमांक लागतो. ग्रामीण भागातली जवळपास आठ कोटी सात लाख जनता मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करते. आपल्याला माहीत आहेच की, आपला देश शेतीप्रधान आहे. आपल्याकडील ७० टक्के जनता शेती आणि शेती संबंधित उद्योग करते. या नवीन अॅपचा अधिकाधिक लोक वापर करून भारतीय कृषी क्षेत्रात क्रांती घडवतील अशी आशा आहे.

पण यात काही अडचणीही आहेत. या अॅपच्या उपयोगाकरता तुमच्याकडे स्मार्टफोन हवाच. सध्या या अॅपवरील माहिती केवळ हिंदी आणि इंग्रजीतच उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या वर्गाला यावरील माहिती मिळवण्यापासून वंचित रहावं लागत आहे. याबाबतीत काही उपाययोजना करण्यात येत आहे. 

विजय प्रताप सिंग आदित्य, संस्थापक एकगाव टेक्नॉलॉजि

विजय प्रताप सिंग आदित्य, संस्थापक एकगाव टेक्नॉलॉजि


दिल्लीच्या एकगाव टेक्नॉलॉजिसचे संस्थापक विजय प्रताप सिंग आदित्य या अॅपबाबत अधिक माहिती सांगतात, “सध्या आम्ही सर्वसाधारण माहिती, सल्ला देत आहोत. त्यामुळे मोबाईलवर आधारित सर्व सेवांचा उपयोग होतच आहे असं नाही. पंधरवड्यातून एकदा प्रसारित होणारा अर्धा तासाचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. पण त्यामुळे फारशी मदत होईल असंही नाही कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या गोष्टींकरता शेती सल्ला हवा असतो. शेतकऱ्याला समजणाऱ्या भाषेत तो देता आला पाहिजे. तसंच शेतात राबवायलाही तो सहज असणं आवश्यक आहे”.

एकगाव तंत्रज्ञान कृषीसंबंधित बाबी दोन स्तरावर हाताळतात. एक म्हणजे, शेतकरी एकगावच्या ‘एक गाव, एक जागतिक नेटवर्क’ या कार्यक्रमात सहभागी होतात. याद्वारे त्यांना शेती उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढवण्याकरता शेतीसल्ला आणि इतर शेतकी माहिती मोबाईल फोनवरुन उपलब्ध होते. तर दुसरीकडे, या संस्थेने एकगावडॉटकॉम (ekgaon.com) ही वेबसाईट बनवली आहे. याद्वारे शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क प्रस्थापित होतो. ज्या लोकांना आरोग्यपूर्ण, सेंद्रीय शेतमाल हवा आहे ते थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधतात. आणि मग दलालांच्या मधल्या साखळ्या तुटून शेतातला माल थेट घरात आणता येतो. यामुळे बळीराजा खरंच राजा बनून त्याचा आणि जनतेचा दोघांचाही फायदा होतो.

दर हंगामी दीडशे रुपयांत मागणीनुसार कृषी सल्ला सेवा

‘मला तुमचं सहाय्य हवयं’ या तत्वावर एकगावचं मॉडेल चालतं. म्हणजे पिकाचा हंगाम सुरू असताना, काही अडचण असल्यास किंवा सल्ला हवा असल्यास स्मार्ट फोनच्या आधारे तोडगा विचारायचा. गरज असेल तेव्हा सल्ला घेऊन कमी खर्चात लागवड करायची आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं, हाच तर या सेवेचा उद्देश आहे. एकगाव या सेवेकरता छोट्या शेतकऱ्यांसाठी ‘एक शेत’ या योजनेअंतर्गत प्रत्येक हंगामाकरता दीडशे रुपये शुल्क आकारणी करते. शेतकऱ्याला त्याच्या पिकाबाबत भेडसावणाऱ्या समस्या ह्या कित्येकदा वेगवेगळ्या असतात. जमीन, हवामान, बियाणं, रोग आणि इतर गोष्टींवर अडचणींचं स्वरुप ठरतं. समस्या वेगळ्या म्हणजे त्यांचं निराकरणही वेगळंच असतं. शेतकऱ्याच्या मागणीनुसार मातीचा प्रकार आणि त्यातील पोषक घटकांचं व्यवस्थापन, पिक आणि हवामानाची स्थिती, रोगांविषयी सूचना आणि बाजारभाव, स्थानिक प्रशासन किती प्रमाणात पाणी पुरवठा करणार आहे? त्यांच्या शेतात ते पाणी कधीपर्यंत पोहचेल यासर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती या सेवेतून मिळते. प्रत्येक पिकं आणि त्याच्या जाती, जमिनीचे प्रकार, माती, जैविकता, हवामान आणि पिक प्रकार यावर आधारित सांख्यिकी माहिती एकगावकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्याला त्याची उत्तरं किंवा माहिती स्थानिक भाषेत एसएमएसद्वारे मिळते. तसंच ठराविक कालावधीनंतर त्याला एकगावकडून त्यांच्या सेवेबाबत आणि माहितीबाबत फोनही करण्यात येतो. एकगावकडून मिळालेली माहिती उपयुक्त आहे, तिचा वापर केला हे सांगण्याकरता शेतकरी एकगावला एसएमएस करतात किंवा एकगावने दिलेल्या विशेष क्रमांकावर फोन करतात. यामुळे कंपनीलाही प्रत्यक्ष शेतात काय सुरू आहे आणि त्यांच्या माहितीचा उपयोग कसा होत आहे, हे कळत राहतं.

image


सध्या एकगाव तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या ४६५ गावांमधील २० हजार शेतकऱ्यांशी जोडलं गेलयं. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या कामाचा किती प्रभाव पडतोय याचा अभ्यास केला. त्यांना खूप फलदायी चित्र दिसून आलं.

विजय सांगतात, “आम्ही आमच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. आमच्या लक्षात आलं की, त्यांच्या उत्पादनात सरासरी दर एकरी १२.०५ क्विंटल वरुन दर एकरी २४.९१ क्विंटल एवढी वाढ झालीय”.

बाजाराचा प्रभाव

विजय म्हणतात, “सध्या महानगरांमध्ये उडदाची डाळ साधारण शंभर ते सव्वाशे रुपये किलोने मिळते. पण वर्षभरापूर्वी उडदाची डाळ ६५ ते ८० रुपये किलोने मिळायची. तर दुसरीकडे गेल्या तीन वर्षात तांदुळाचे दर स्थिर आहेत. पण सरकारच्या किमान उत्पादन मूल्याने वाढत्या महागाईकडे साफ दुर्लक्ष केलंय. यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होणार”.

बासमती तांदुळाचं ते उदाहरण देतात. साधारण दोन वर्षभरापूर्वी नऊशे शेतकऱ्यांनी बासमती तांदुळाचं पाच हजार मेट्रिक टन उत्पादन घेतलं. त्यांना वाटलं की, त्यांच्या दर्जेदार तांदूळाला उत्तम किंमतीत विकता येईल. पण सर्वात मोठा खरेदीदार म्हणजे भारत सरकारने केवळ प्रति किलो १४ रुपये या दराने तांदुळाची खरेदी केली. आश्चर्य म्हणजे हाच तांदूळ बाजारात ग्राहकाला शंभर रुपये प्रति किलोने विकण्यात आला.

शेतमाल आणि खाजगी कॅब कंपन्या

विजय यांच्या मते, उबेर, ओला सारख्या कॅब कंपन्यांनी सर्वांकरता सुसंधी उपलब्ध करुन दिली आहे. पूर्वी टॅक्सीचालकांना महिन्याला कसेबसे १५ हजार रुपये सुटायचे. पण या कंपन्यांमुळे त्यांचं उत्पन्न चौपटीने वाढलं आहे. ग्राहकालाही परवडणाऱ्या किंमतीत आरामदायी प्रवास करता येत आहे. हेच मॉडेल कृषीक्षेत्रातही राबवायला हवं.

एकगावची ऑनलाईन बाजारपेठ

गेल्या वर्षी शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा योग्य बाजारभाव मिळावा यासाठी ‘एकगाव’च्या अंतर्गत ऑनलाईन बाजारपेठ सुरू केली. अवघ्या वर्षभरातच पाच हजार ग्राहकांनी या ऑनलाईन बाजारपेठेत खरेदी केली. महत्त्वाचं म्हणजे यातील निम्मे ग्राहक इथे नियमित खरेदी करतात. तांदूळ, बाजरी, अंबाडी, बियाणं, कडधान्य, मसाले, साखर यासारख्या ५० हून अधिक शेतमालाच्या वस्तू या बाजारात उपलब्ध आहेत. मोबाईल आधारित सल्ला सेवा तसंच बाजारपेठ यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मासिक सरासरी ८,५०० रुपयांनी किंवा ६७ टक्क्यांनी वाढ झालीय.

एकगावच्या बँडखालील सेंद्रीय उत्पादनं

एकगावच्या बँडखालील सेंद्रीय उत्पादनं


पुढच्या काही वर्षात एकगाव किरकोळ बाजारात उतरण्याच्या विचारात आहे. तसंच एक गठ्ठा खरेदीदारांसोबत संबंध प्रस्थापित करणार आहेत. नेटवर्कमध्ये असणाऱ्या सध्याच्या शेतकऱ्यांसोबतच पुढील पाच वर्षात १.५ कोटी शेतकऱ्यांना या नेटवर्कमध्ये सामील करून घेण्याची त्यांची योजना आहे. यासोबतच या कारभाराची उलाढाल शंभर कोटींवर न्यायची आहे.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

महाकिसान... एक पाऊल शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाकडे

महोगनीच्या लागवडीतून आर्थिक स्वातंत्र्य....

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी ʻइको एकोʼ

लेखिका – श्वेता विट्टा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags