संपादने
Marathi

द्वेषमूलक अपप्रचारातून कुणाचे हित साधणार ?

Team YS Marathi
23rd Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

११ सप्टेंबर, १९४८ रोजी, तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांनी आरएसएस प्रमुख गोळवलकर गुरुजी यांना एक पत्र लिहिले. या पत्राला एक संदर्भ होता. महात्मा गांधी यांची हत्या झाली होती आणि भारत सरकारने आरएसएसवर बंदी घातली होती. गोळवलकर यांनी ही बंदी उठविण्याची विनंती करणारे पत्र पटेल यांना लिहिले होते. त्याच पत्राला उत्तर देणारे पटेल यांचे हे पत्र होते. या पत्रात पटेल म्हणतात, “ आरएसएसने हिंदूंची खूप सेवा केली आहे, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही आणि इतरांनाही हे कबूल करण्यात अडचण असता कामा नये.” पण त्यानंतर ते जे काही म्हणतात, ते मात्र आरएसएसला आवडण्यासारखे नाही. पटेल म्हणतात, “ समस्या तेंव्हा सुरु होते, जेंव्हा हेच लोक मुसलमानांचा बदला घेण्यासाठी म्हणून पावले उचलतात, त्यांच्यावर हल्ला करतात. हिंदूंना मदत करणे वेगळी गोष्ट आहे, पण गरीब, असहाय्य, महिला आणि बालकांना लक्ष्य केल्यास ते सहन करता येणार नाही.”

या पत्रातून पटेलांनी अगदी परखडपणे आपले विचार मांडले आहेत. ते आरएसएसवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याचा ठपका ठेवतात – “ ते समाजात विष पसरवत आहेत, त्यांची भाषा जातीयवादी आहे.” हिंदूंचे रक्षण करण्यासाठी द्वेष पसरविण्याची काय गरज आहे? असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि पुढे खेदाने म्हणतात, “ द्वेषाच्या याच लाटांमुळे देशाला आपल्या राष्ट्रपित्याला गमवावे लागले. महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे आरएसएसवर बंदी घालणे अनिवार्य होते.”

imageआज आरएसएस आणि मोदी सरकारने आपला आदर्श म्हणून याच पटेलांची निवड केली आहे, यापेक्षा मोठा उपहास कोणता असेल? पटेल हे एक कॉंग्रेसमन होते. ते महात्मा गांधी यांचे अतिशय विश्वासू आणि खंदे समर्थक होते आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे जवळचे सहकारी होते. पटेल यांना नेहरु यांच्या विरुद्ध उभे करण्याचे सर्व प्रयत्न तर आरएसएसने केलेच पण त्याचबरोबर जर पटेल पंतप्रधान झाले असते, तर देशाचे आजचे चित्र काही वेगळेच दिसले असते, असा आग्रही युक्तीवादही केला. गेल्या काही महिन्यांमध्ये नेहरुंवर टीका करण्याचे आणि त्यांना कमी लेखण्याचे सर्व प्रयत्न होताना दिसत आहेत आणि आज देशाची जी काही दुःखद स्थिती आहे, त्यासाठी नेहरुच जबाबदार असल्याचे सिद्ध करण्याचाही प्रयत्न होताना दिसत आहे. देशाच्या या दोन दिग्गज नेत्यांचे मुल्यमापन इतिहास आपल्या पद्धतीने करेलच, पण त्याचबरोबर इतिहास आरएसएस आणि आरएसएसच्या अनुयायांना कधीच क्षमा करणार नाही.

पटेल यांनी त्यांच्या पत्रात वर्णन केलेल्या या द्वेषाच्या वातावरणाशी मिळतेजुळते असे वातावरण पुन्हा निर्माण केले जात आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली गेल्या दहा दिवसांपासून एक नवाच वाद सुरु झाला आहे. जेएनयुमधील काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारतविरोधी घोषणा आणि जेएनयुएसयुचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला झालेली अटक, यातून या वादाला तोंड फुटले. त्यानंतर दोन प्रकारचे समज जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत – एक म्हणजे जेएनयु हा अतिरेक्यांचा अड्डा आहे आणि ते बंद केले पाहिजे, तर दुसरा म्हणजे, जे कोणी हा समज मानणार नाहीत, असे सर्वजण हे राष्ट्रविरोधी आहेत आणि या नावाखाली सध्या सर्व काही न्याय्य ठरविले जात आहे.

मी जेएनयुमध्ये पुरेसा काळ शिक्षण घेतले असल्यामुळे, ते केवळ देशातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम कॅंपसपैकी एक असल्याचे मला चांगलेच माहित आहे. उदारमतवादी मूल्यांचे ते मंदीर आहे आणि घटनेने स्थापित केलेल्या कोणत्याही विचारावर खुल्या चर्चेला येथे प्रोत्साहन मिळते. सहाजिकच कुठल्याही बंधनांशिवाय विविध प्रकारच्या मतांना आणि विचारधारांना येथे स्थान आहे, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्याचबरोबर हे सत्यही नाकारण्यात काहीच अर्थ नाही की, उदारमतवादी विचारांबरोबरच येथे प्रखर राष्ट्रवादी आणि रॅडीकल अर्थात जहाल क्रांतिकारी विचारांनाही जागा मिळाली आहे. नॉर्थ इस्ट अर्थात इशान्येकडील राज्यांसाठी स्वातंत्र्याची मागणी करणारे आणि त्याचबरोबर काही जहाल काश्मिरी आणि नक्षलवादीही येथे राहिले आहेत. पण केवळ याच आधाराने जेएनयु राष्ट्रविरोधी लोकांना आश्रय देते, असा निवाडा देणे, म्हणजे जेएनयुची निर्मिती ज्या विचारावर आधारित आहे त्या विचाराची आणि भारतीय घटनेने समर्थन केलेल्या सगळ्याचीच थट्टा करण्यासारखे आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला हे सांगू शकतो, की असे टोकाचे घटक हे नेहमीच एका कडेला राहिले आहेत आणि त्यांना कधीच मोठी मान्यता मिळालेली नाही.

जेएनयुच्या प्रतिमेला बट्टा लावण्याचा प्रयत्न का केला गेला जात आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. गोळवलकर यांनी त्यांच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकात लिहिलेल्या एका वाक्याची मला आठवण करुन द्यायची आहे. मुसलमान, ख्रिश्चन्स आणि साम्यवादी हे भारताचे तीन शत्रू असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. जेएनयुने हिंदुत्व या विचारधारणेचा नेहमीच तिरस्कार केला आहे. उलट या विचारधारणेला जेएनयुमध्ये कधीच स्थान बळकट करु दिले गेलेले नाही आणि हा नेहमीच डाव्या विचारसरणीचा गड राहिला असल्या कारणाने, या टोकाच्या विचारसरणींमध्ये नैसर्गिक शत्रुत्व आहे. हिंदू रॅडीकल्सच्या दृष्टीने तर जेएनयु म्हणजे ते विरोध करत असलेल्या सर्व गोष्टींचे जणु प्रतिकच आहे. सहाजिकच या घोषणेबाजीने विरोधी गटाच्या हाती कोलितच मिळाले. पण या घटकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अशा उत्कृष्ट संस्थांची उभारणी करण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागतो, पण त्यांना उध्वस्त करण्यासाठी एक मिनिटही पुरेसा असतो. शिक्षणाच्या जगात जेएनयुला मानाचे स्थान आहे आणि त्याला काळीमा फासण्याचा कोणताही प्रयत्न हा राष्ट्राहिताला बाधा आणेल.

पण त्याहूनही मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, जेएनयुची बाजू मांडणारा आणि काश्मिर किंवा देशद्रोहाच्या मुद्द्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्या कोणालाही देशविरोधी ठरविले जाणे, हा आहे. कन्हैय्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत याबाबतचे कोणतेही पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले नसताही, त्याला यापूर्वीच खलनायक ठरविण्यात आले आहे. परिस्थिती इतकी बिकट झालीये, की त्याला चक्क न्यायालयातच मारहाण करण्यात आली आणि त्याच्या जीवाला गंभीर धोका आहे. त्याहूनही कितीतरी धोकादायक बाब म्हणजे, लोकशाहीतील इतर संस्थांचा दृष्टीकोन... वकील, ज्यांच्यावर खरं म्हणजे, आरोपीच्या बाजूने न्यायालयात न्यायासाठी लढण्याची जबाबदारी आहे, तेच कन्हैय्याला शिक्षा व्हावी या मतावर पोहचले आहेत, तेदेखील खटला न चालवताच... ते कायदा हातात घेत आहेत, हिंसेचा अवलंब करत आहेत, त्यांच्या मताशी सहमत नसणाऱ्या प्रत्येकाला मारहाण करत आहेत, मग ती माध्यमे असोत किंवा सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निरीक्षक. तर दुसरीकडे पोलिस हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी या बदमाश वकीलांना कायदा हाती घेऊ दिला आणि हा लेख लिहीपर्यंत तरी हे वकील मोकळेपणाने फिरत आहेत.

टीव्ही वाहिन्यांपैकी काहींची भूमिकाही निषेधार्ह आहे. काही संपादक आणि निवेदकांची टीव्हीवरील वागणूक ही बदमाश वकिलांपेक्षा काही कमी नाही. ते टीव्हीच्या माध्यमातून असा हिस्टेरीया निर्माण करत आहेत, ज्यामुळे एखादी तटस्थ व्यक्तीही या गोष्टीचा परिणाम न होता राहू शकत नाहीये आणि त्याचबरोबर कन्हैया आणि त्याच्यासारख्यांबद्दल लोकांच्या मनात द्वेष उत्पन्न होत आहे. इतरांपेक्षा अधिक राष्ट्रवादी ठरण्याच्या प्रयत्नात ते कन्हैयाचे काही बनावट व्हिडीओ चालवित आहेत आणि त्याच्याविरुद्ध भावना भडकवित आहेत. सुदैवाने इतर काही समजूतदार टीव्ही वाहिन्यांनी ही लबाडी उघड केली आहे. खरे म्हणजे बनावट व्हिडीओ दाखविणाऱ्या वाहिन्यांनी माफीनामा किंवा चूक कबूल करणारे शुद्धीपत्र द्यायला हवे होते, पण त्यांनी ते केलेले नाही. यातून त्यांचा अपराध दिसून येत आहे आणि माझ्यासारख्या लोकांना यावर विश्वास ठेवणे भाग पडत आहे की तेदेखील या गुन्ह्यातील भागीदार आहेत.

भारत हा एक लोकशाही देश आहे. येथे कायद्याचे राज्य आहे. जेएनयुमध्ये जे कोणी भारतविरोधी कारवायांमध्ये किंवा घोषणाबाजीमध्ये होते, त्यांच्याविरुद्ध कायदा आपले काम करेलच. अशा लोकांना घटनेत सांगितल्यानुसार अटक आणि शिक्षा व्हायला हवी. त्यांना कोणतीच दया दाखविता कामा नये, पण देशभरात द्वेषाचे वातावरण पसरविण्यासाठी हे निमित्त कारण बनू नये. वकील न्यायाधीश बनू शकत नाहीत आणि कायदा हातात घेऊ शकत नाहीत, आमदार कार्यकर्त्याला मारहाण करु शकत नाही, विरोधी राजकीय पक्षांच्या कार्यालयांची तोडफोड करता येऊ शकत नाही, पोलिस निष्क्रीय राहू शकत नाही आणि त्यांच्या कर्तव्यात कसूर करु शकत नाहीत, माध्यम प्रतिनिधींना मारहाण होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही, टीव्ही संपादक भावना भडकावू शकत नाहीत. पण हे सर्व काही घडत असल्यास मात्र आपण या प्रजासत्ताकाचे, ज्याला आपण प्रेमाने भारत म्हणतो, भविष्य सहजपणे वर्तवू शकतो.

गोळवलकरांना लिहिलेल्या त्या प्रसिद्ध पत्रात पटेल या वृत्तीचाच संदर्भ देत होते. द्वेष उत्पन्न करणे खूपच सोपे असते, पण या घटकांनी हे विसरता कामा नये, की हा द्वेषच होता, ज्याने अनेक वर्षांपूर्वी गांधीजींची हत्या केली. अशी आणखी एखादी घटना आपल्याला परवडू शकत नाही. अशा प्रकारे द्वेष पसरविणे ताबडतोब थांबविले पाहिजे. हे कोणासाठीही चांगले नाही.

( वरील लेखाचे मूळ लिखाण इंग्रजी भाषेत वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी केलेले आहे. वरील लेखातील विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. मराठी अनुवाद- सुप्रिया पटवर्धन )

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags