संपादने
Marathi

वापरलेल्या वस्तूंपासून गरिबांना आर्थिक मदत आणि पर्यावरण रक्षणही, आर क्यूब चारीटी स्टोर, हिम्मत फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

1st Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ग्लोबल वॉर्मिंग आणि कचऱ्याची विल्हेवाट या दोन समस्या सध्या भेडसावत आहेत. बरेचदा वापरात नसलेल्या अनेक वस्तू काय करायच्या असा प्रश्न पडतो. या वस्तू उपयोगात येत नसल्याने आपण फेकून देतो. अशा वस्तूंवर खर्च केलेले पैसे अनेकदा वाया जातात आणि त्या वस्तूही. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न पुण्याचे प्रशांत शहा करत आहेत. शहा यांनी आर क्यूब हे चारिटी शॉप सुरु केलं आहे. जुन्या झालेल्या वस्तू नागरिक या दुकानात आणून ठेवतात. या वस्तू विकून जे उत्पन्न मिळते, त्या उत्पन्नातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना हिम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. गेल्या पाच वर्षांपासून हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.

प्रशांत शहा हे व्यवसायाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट आहेत. काही वर्षांपूर्वी ते टूथपेस्ट आणायला किराणा दुकाना ऐवजी मॉल मध्ये गेले होते. टूथपेस्ट आणायला गेलेल्या शहा यांनी त्यावेळी ८०० रुपयांची खरेदी केली. घरी आल्या नंतर त्यांना जाणवलं की खरेदी केलेल्या अनेक वस्तूंची काही आवश्यकता नव्हती. अशा अनेक अनावश्यक वस्तू आपण घेतो आणि वापर होत नसल्याने त्या फेकून देतो. या प्रसंगानंतर शहा एक दिवस प्रशांत जैन तत्वज्ञानावर व्याख्यान देत होते. त्यामध्ये अपरिग्रह यावर बोलत होते. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक गोष्टींचा संग्रह करू नये. त्यावेळी शहा यांच्या लक्षात आलं की, जीवनात आवश्यक नसलेल्या अनेक वस्तूंचा आपण संग्रह करतो आणि त्याचा वापर न झाल्यास त्या फेकून पण देतो.


image


आर्थिक विकासामुळे लोकांकडे पैसा आला आहे आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे लोकांचा खरेदी करण्याचा कल वाढला आहे. त्यात मॉल संस्कृतीची भर पडते. प्रशस्त मोठ्या जागेत एसी दुकानांमध्ये खरेदी करायला लोकांना आवडायला लागलं आहे. मॉल मध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आकर्षक पद्धतीने मांडून ठेवल्या असतात. काही वेळा त्याच्या किमतीही फार नसतात. या आकर्षणामुळे अशा वस्तू अगदी सहज खरेदी केल्या जातात. खरेदी करताना त्याचा आपल्याला उपयोग आहे का नाही याचाही विचार केला जात नाही. आणि खरेदी करणं ही प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे अशा अनेक वस्तू आपल्या घरात पडून असतात.

जैन तत्वज्ञानातील अपरिग्रह या तत्वाचं आचरण प्रत्यक्षात कसं आणता येईल याचा विचार शहा करत होते. दुसरीकडे पर्यावरण रक्षण याचाही ते विचार करत होते. मानवाच्या स्वार्थासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो. मानवाला आवश्यक असलेल्या अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी वनस्पती, पशु पक्षी यांचा वापर केला जातो. वेगाने होणारी जंगल तोड आणि त्यामुळे कमी होणारी प्राण्यांची संख्या यामुळे पर्यावरणाचं संतूलन ढासळलंं आहे. यातूनच ग्लोबल वार्मिंग सारखा धोका निर्माण झाला आहे. यासाठी काही करता येईल का याचाही विचार शहा करत होते.

याच दरम्यान ते इंग्लंडला गेले असताना तिकडे त्यांना अनेक ठिकाणी चारीटी शॉप्स दिसली. इंग्लंड मध्ये नागरिक आपल्याला नको असलेल्या वस्तू अशा चारीटी शॉप्स ना देऊन टाकतात आणि त्या वस्तू गरीब लोकं नाममात्र किमतींना विकत घेऊन जातात. असे चारीटी शॉप्स भारतात पण असावेत असं शहा यांना वाटलं. यातूनच त्यांना आर क्यूब चारीटी शॉप ची कल्पना सुचली. या दुकानातून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करायचा नाही, तर याचा फायदा इतर गरीब, गरजू विद्यार्थ्यांना झाला पाहिजे असं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी हिम्मत फाउंडेशन स्थापना त्यांनी केली.

आर क्यूब म्हणजे रिड्यूस, रीयुस आणि रिसायकल. अनावश्यक गोष्टींचा वापर कमी करा, जुन्या झालेल्या वस्तूंचा पुनर्वापर करा आणि वापरून झालेल्या वस्तूंपासून पुनर्निर्मिती करा.यामुळे पर्यावरणाचंही रक्षण होईल, यावर आधारित आर क्यूब चारीटी स्टोर ची सुरवात २७ मार्च २०११ ला गुढी पाडव्याला पुण्यामध्ये झाली. आणि आर क्यूब च्या माध्यमातून शहा यांनी गरिबांना मदत करण्याची आणि पर्यावरण रक्षणाची गुढी त्यांनी उभारली.


image


या चारीटी शॉप ची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. सुरवातीला घरातील वापरात नसलेल्या वस्तू त्यांनी दुकानात विकायला ठेवल्या. त्याच बरोबर त्यांच्या मित्र मंडळीना या नवीन उपक्रमाची माहिती दिली आणि त्यांच्या कडे असलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तू आर क्यूब ला देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दुकानात अनेक वापरलेल्या वस्तू विक्रीसाठी येऊ लागल्या.

आर क्यूब मध्ये एखाद्या मॉल मध्ये मिळतील अशा अनेक वस्तू मिळतात. जुनं फर्निचर, कपडे, पुस्तकं खेळणी, महिलांच्या पर्सेस, बॅग्स यासह रोज वापरातल्या अनेक वस्तू याठिकाणी असतात. कपडे म्हणजे अगदी लग्नात घालायच्या सूट्स पासून रोज वापरायचे साधे कपडे, जीन्स महिलांच्या साड्या, सलवार कुर्ते, असे अनेक प्रकारचे आर क्यूब मध्ये येतात. वापरात नसलेली पण चांगल्या स्थितीतली खेळणी, शालेय पुस्तकं, इंग्रजी, मराठी, हिंदी कादंबऱ्या अशी अनेक उपयुक्त पुस्तकं इथे पाहायला मिळतात. अनेक नागरिक त्यांना नको असलेल्या वस्तू आर क्यूब मध्ये आणून देतात तसंच फॅब इंडिया सारखी मोठी दुकानंही आर क्यूब ला मदत करतात. या दुकानातील विक्री न झालेले जुने कपडे, वस्तू, फर्निचर हे आर क्यूबला दिलं जातं.

image


या वस्तू नाममात्र किंमतीला विकल्या जातात. जे लोक महागातल्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत ते या वस्तू घेऊन जातात आणि वापरतात. तर चांगल्या स्थितीतील कपडे काही लोक घेऊन जातात, ते कपडे धुवून, फाटलेले असल्यास ते शिवून ते एखाद्या खेडेगावात जाऊन विकतात, यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. जुन्या जीन्स आणि शर्ट असे कपडे वेल्डर किंवा गॅरेज मध्ये काम करणारे नाममात्र किमतीला घेऊन जातात. आपल्याला नको असलेल्या कपड्यांचा उपयोग किती जणांना होऊ शकतो हे यावरून दिसून येतं.

या वस्तूंच्या विक्रीतून जे काही उत्पन्न मिळतं त्यातून गरजू विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली जाते. हिम्मत फाउंडेशनच्या वतीनं वर्षाला सुमारे २५ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. ही आर्थिक मदत करताना त्यांच्या हातात पैसे दिले जात नाहीत तर ती फी थेट त्यांच्या शाळेत जमा केली जाते. कारण काही वेळा या मदतीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो आणि मदत सार्थकी लागणार नाही. या हेतूने पैशाची मदत करताना थेट मदत केली जाते.

image


हा उपक्रम राबवत असताना पर्यावरण संरक्षणाचं कामही या माध्यमातून केलं जातं. ज्या वस्तूंपासून पुनर्निर्मिती होणं शक्य आहे म्हणजे कागद. एक टन कागद निर्मितीसाठी १७ झाडं कापायला लागतात. पण ज्या वेगाने झाडं तोडली जातात त्या वेगाने झाडांची लागवड होत नाही. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होतो.

शाळांमधील परीक्षेचे पेपर हे रद्दीत देता येत नाहीत. ते वर्षानुवर्ष जपून ठेवले जातात किंवा जाळून टाकले जातात. अशा काही शाळा प्रशांत शहा यांच्या संपर्कात आल्या. शहा यांनी हे पेपर कागद निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना दिले जातील याची सोय केली. यामुळे अशा पेपर्सचा थेट लगदा करून त्यापासून पुन्हा कागद निर्मिती केली जाते. आपण वापरलेल्या किंवा न वापरलेल्या वस्तू या अखेर भंगारातच दिल्या जातात पण आर क्यूब ला दिलेल्या वस्तूंचा पुनर्वापर तर होतोच शिवाय त्या पूर्णपणे वापरल्या जातात आणि मग भंगारात जातात. ज्या नाशीवंत वस्तू आहेत त्या पूर्ण नाश होईपर्यंत वापरल्या जातात. त्यामुळे त्याचा पर्यावरणाला धोका उद्भवत नाही.

अशा पद्धतीने आर क्यूब हिम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक मदत आणि पर्यावरण रक्षण असं दुहेरी काम केलं जातं. आर क्यूब ची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी www.rcubecharity.org ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. सध्यातरी आर क्यूब स्टोर आणि हिम्मत फाउंडेशनच्या कामाची व्याप्ती पुण्या पूर्तीच मर्यादित आहे. शहा यांना या माध्यमातून अधिकाधिक गरजूंना मदत देण्याची इच्छा आहे. यासाठी अजून काही आर क्यूब चारीटी शॉप्स सुरु करण्याची आवश्यकता आहे आणि चारीटी शॉप्स सुरु करण्यासाठी अधिकाधिक वस्तूंची गरज आहे.

"तुम्हाला नको असलेल्या वस्तू तुम्ही मला द्या मी त्या गरजुपर्यंत पोहोचवीन शिवाय त्याचा पुनर्वापर आणि त्यापासून पुनर्निर्मितीही करीन", असं प्रशांत शहा सांगतात.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags