संपादने
Marathi

मोदींच्या हस्ते स्टार्ट-अप इंडियाचा शुभारंभ १६ जानेवारीला

Team YS Marathi
6th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘युवरस्टोरी’च्या शिरपेचात आजवर कितीतरी मानाचे तुरे खोवले गेले. आता या शिरपेचात जणू मोरपिस रोवले गेलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टार्ट-अप इंडिया’ अभियानात भारत सरकारसमवेत सहभागाची संधी ‘युवरस्टोरी’ला बहाल करण्यात आलेली आहे. ‘युवरस्टोरी’चा हा अत्यंत मोठा गौरव आहे. अत्यंत अभिमानास्पद अशी ही बाब आहे. ‘स्टार्टअप’ हा ‘युवरस्टोरी’साठी जिव्हाळ्याचा विषय आहे… आणि या क्षेत्रात ‘युवरस्टोरी’चे निरलस योगदान आहे. ‘युवरस्टोरी’ने ‘स्टार्टअप्स’ना नैतिक धैर्य देण्याचे कार्य अविरत चालवलेले आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारच्या स्टार्टअप अभियानाच्या आयोजनातील सहभागाची ही संधी म्हणजेच ‘युवरस्टोरी’ आणि ‘स्टार्टअप्स’ हे नाते किती घट्ट आहे, किती एकात्म आहे, यावर एका अर्थाने शिक्कामोर्तबच आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक हे अभियान सुरू होते आहे. ‘युवरस्टोरी’ही अभियानातील आपल्या योगदानासाठी सज्ज आहे.

‘स्टार्ट-अप अभियान’ म्हणजे देशातील नवोन्मेषी उद्यमशिल चैतन्याचा उत्सवच आहे. १६ जानेवारीला या उत्सवाचा शुभारंभ आहे. देशभरातील १५०० वर ठळक स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक या शुभारंभाला हजेरी लावणार आहेत. समारोपाच्या सत्रात दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील. अभियानाचा औपचारिक प्रारंभही त्यांच्याच हस्ते होईल. स्टार्ट-अप कृती आराखडा नेमका कसा असेल, त्याचे वरकरणी प्रारूपही पंतप्रधान स्पष्ट करतील.

image


केंद्रिय अर्थ व उद्योग मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अभियानाच्या शुभारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान भवनात सकाळी ९.३० वाजता होईल. वाणिज्य आणि उदयोग राज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन या प्रमुख अतिथी असतील.

स्टार्टअप उद्योजकता या विषयावर अविरत एक दिवसीय जागतिक कार्यशाळा या अभियानांतर्गत होणार आहे. कार्यशाळेत गटचर्चाही झडेल. चर्चेचे विषय खालिलप्रमाणे असतील.

• मुक्त उद्यमशिलता आणि नवता : भारतीय स्टार्टअप्सना प्रगती आणि वैभवाकडे नेण्यासाठी नेमक्या गरजा काय?

• ‘शक्ती’ उत्सव : उद्यमात अभिनव कल्पना राबवणाऱ्या महिलांच्या प्रेरक कथा

• ‘डिजिटलायझेशन’मुळे भारताच्या भवितव्यात कसे बदल होतील.

• ‘हेल्थकेअर’मधील अडथळे दूर करून हे उद्यमक्षेत्र प्रगतीपथावर कसे नेता येईल.

• वित्तपुरवठा आवाक्यात कसा आणता येईल.

image


‘‘मला पैसे दाखवा : उद्यमशिलतेचे भांडवलीकरण आम्ही कसे करायचे, निधी कसा उभारायचा?’’ या विषयावरील गटचर्चेच्या अध्यक्षस्थानी अर्थराज्य मंत्री जयंत सिन्हा असतील. थेट प्रश्नोत्तराचे स्वरूप असलेला ‘‘धोरण आखणाऱ्यांसमवेत समोरासमोर’’ हा कार्यक्रमही आयोजिण्यात आलेला आहे. स्टार्टअप्ससाठी सरकार कशा पद्धतीने अनुकूल वातावरण निर्माण करणार आहे, त्याबद्दल महत्त्वाच्या मंत्रालयांतील आणि विभागांतील सचिव मंडळी या ‘समोरासमोर’ कार्यक्रमात विविध प्रश्नांना सामोरे जातील. उत्तरे देतील.

स्टार्टअप्सच्या संदर्भातील सरकारच्या वचनबद्धतेला प्रत्यक्षात साकारणे, स्टार्टअप्ससाठी जेणेकरून ते बहरावेत अशा पद्धतीचे अनुकूल वातावरण सर्वच पातळ्यांवर निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. महसुल, मनुष्यबळ आणि विकास, उद्योग, वित्त सेवा, अर्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग आणि कौशल्य विकास विभाग आदी विभागांचे सचिव या गटचर्चेत सहभागी होतील. सेबी (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आणि सिडबीचे (स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) प्रतिनिधित्वही या गटचर्चेत असेल.

विविध उद्यमांत जागतिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या उद्योजकांसह तसेच भांडवल पुरवठादारांसह परिसंवादाचे आयोजनही या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेले आहे. श्री मासायोशी सॉन (मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, सॉफ्टबँक), श्री ट्रॅव्हीस कॅलॅनिक (संस्थापक, उबेर) आणि श्री ॲडम न्यूमन (संस्थापक, वुईवर्क) यांचा या परिसंवादात मान्यवर म्हणून सहभाग असेल. अग्रमानांकित ४० वर स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, वित्तपुरवठादार आणि सिलिकॉन व्हॅलीतील अँजेल गुंतवणूकदार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातही या सगळ्यांचा सहभाग असेल.

‘गुगल’ही ‘लाँचपॅड ॲक्सिलेटर’ शीर्षकांतर्गत एक अभिनव सत्र या उत्सवात आयोजित करणार आहे. अगदी प्राथमिक अवस्थेत असलेल्या स्टार्टअप्सपासून ते संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत एक जिवंत पुल जणू या सत्रांतर्गत उभारला जाईल. सॉफ्टबँकेचे अध्यक्ष आणि मुख्य संचलन अधिकारी निकेश अरोरा या सत्रात फंडिंग या स्टार्टअप्ससाठीच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर संवाद साधतील. विशेष कामगिरी बजावलेल्या, उद्यमात अभिनव कल्पना राबवणाऱ्या या सम याच स्वरूपाच्या स्टार्टअप्सची माहिती देणारे एक प्रदर्शनही कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातल्या गत भागातून सूचित केल्याप्रमाणे स्टार्टअप इंडियाच्या थेट कृती आराखड्याला या उत्सवातून प्रतीकात्मक सुरवात होणार आहे. खरंतर पंतप्रधानांचा आराखडाही या क्षणापासून कार्यान्वयनासाठी, अंमलबजावणीसाठी सज्ज होणार आहे. आराखड्याबरहुकूम स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण निर्मिती आणि या अनुकूल वातावरणाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी सरकारतर्फे घेतले जाणारे पुढाकार आणि त्यासाठी सरकार लागू करणार असलेल्या सगळ्याच प्रकारच्या योजनांवर या कार्यक्रमातून ठळक प्रकाशझोत टाकला जाईल.

देशातील स्टार्टअप संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयआयटी, केंद्रिय विद्यापीठे आणि ३५० वर जिल्ह्यांतील तरुणांच्या समूहांमधून त्याचे लाइव्ह टेलिकास्ट (थेट प्रसारण) केले जाणार आहे.

औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागातर्फे (डीआयपीपी, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशन) इन्व्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इकोसिस्टिम प्लेयर्स आयस्पिरिट, युवरस्टोरी, NASSCOM, SheThePeople.tv, कैरोज्‌ सोसायटी, FICCI आणि CII च्या युवक आघाडीच्या सहकार्याने हा उत्सव आयोजिला जात आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags