संपादने
Marathi

सात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे

Nandini Wankhade Patil
9th Jul 2017
Add to
Shares
12
Comments
Share This
Add to
Shares
12
Comments
Share

‘साथी हाथ बटाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना’ असे बॉलिवूड सिनेमातील गाणे आपण रेडिओवर कधीतरी ऐकले असेल किंवा दूरचित्रवाणीवर पाहिले असेल. यातून जो संदेश मिळतो नेमका तोच संदेश एका अवघ्या चाळीशीच्या आतील नाशिक मधील तरूण उद्योजकाने अंमलात आणला आणि ते आज सुमारे १२ ते १५ व्यावसायिक कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, असे सांगितले तर कदाचित आपणांस आश्चर्य वाटेल.


image


होय, नाशिकच्या अध्यात्माचा वारसा लाभलेल्या देवभुमीत जेथे परोपकार, दान-धर्म यातून मानव कल्याणाची परंपरा येथे शतकानुशतके राखली गेली आहे, तेथे केवळ अशाच ‘दुस-यासाठी काहीतरी करावे’ या विचारातून एक उद्योगाची गंगोत्री निर्माण झाली. आणि मंदिरा आणि देवळांच्या या नगरीत ‘नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी’ अशी गीतकार जगदिश खेबुडकरांच्या गीतेमधील ओळी सार्थ करणा-या उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात २५० ते ३०० जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. शंभर ते सव्वाशे उत्पादने निर्मिती आणि विक्रीतून सुमारे ३५ कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल करणा-या एस एम ग्रुपने ही कामगिरी केली आहे. या समूह उद्योग करणा-या सुमारे १२ ते १५ कंपन्यांच्या विस्ताराची प्रक्रिया निरंतर- दररोज नव्या गतीने आणि दिशेने सुरू असून ‘सोमेश्र्वर’ या ब्रॅन्ड नावाने ओळखल्या जाणा-या वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या निर्मिती आणि विक्रीच्या क्षेत्रात हा उद्योग समूह वाटचाल करत आहे. या सा-या संकल्पना आणि उद्योगाच्या पाठीमागे ज्यांची महत्वाची भूमिका आहे त्या व्यवस्थापकीय संचालक महेंद्र साखरे यांची युवर स्टोरी मराठीच्या वतीने भेट घेवून या उद्योगाच्या कार्यपध्दतीची माहिती आम्ही जाणून घेतली.


image


त्यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, “ या उद्योगाची सुरूवात कुणाला तरी मदत करावी या अंत:प्रेरणेतून झाली आहे आणि त्यानंतर या कामातून जो आनंद निर्माण झाला त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली.”

ही सुरूवात कशी झाली त्याची कहाणी सांगताना ते म्हणाले की, ‘नाशिकच्या भद्रकाली भागात २००७-०८च्या सुमारास त्यांच्या वडिलोपार्जित मसाल्याच्या दुकानात ते काम करत होते, तीन भाऊ आणि कुटूंबिय मिळून हे दुकान चालवत असताना सर्वात छोटे असणाऱ्या महेंद्र यांना एका गरजू महिलेने काही काम असेल तर द्या अशी याचना केली. तिची निकड जाणून आणि मदत करण्याच्या हेतूने तिला चार पैसे मिळावे म्हणून त्यांनी तिला धान्य साफ करण्याचे काम दिले. मात्र या कामातून तिला चार पैसे मिळाले तरी साखरे यांना त्यातून काहीसे नुकसानच होत होते हे समजल्यानंतर त्या स्वाभिमानी स्त्रीने असे काम नको म्हणून सांगून दिले. मात्र तिला विन्मुख जावू द्यायचे नाही म्हणून मग तिला मिरचीची देठ काढण्याचे काम देण्यात आले जेणेकरून तिला चार पैसे चरितार्थासाठी मिळावे. मात्र त्यातूनही नव्या व्यावसायिक समस्या निर्माण झाल्या. हा सारा ‘रिकामा उद्योग’ होत आहे म्हणून मग त्या मिरच्यांचा मसाला करून विकला जावू लागला, ज्याचे मार्केटिंग ‘एका गरजूला मदत करण्यासाठी हा मसाला घ्या’ असे करण्यात आले आणि काही काळाने का होईना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे महेंद्र म्हणाले.


image


ते म्हणाले की, “ ‘चांगल्या भावनेने लोकांकडे गेलो तर काम होतेच’ आणि ‘इतरांची मदत केली तर परमेश्वर तुमची मदत करतो’ या वाक्यांची त्यावेळी प्रचिती आली.” मग झोपडपट्टी भागात अशा गरजू महिलांना काम देण्याच्या आणि त्यातून त्यांच्या चरितार्थाला हातभार लावताना आपला व्यवसाय करत आनंद निर्माण करण्याच्या कामाला वेग आला. महेंद्र म्हणाले की, त्यावेळी ते बँकेत नोकरी करत होते आणि कुटूंबियांच्या व्यवसायाला हातभार लावत होते. मात्र अनेकांना उद्योगाच्या निमित्ताने जोडले तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या संधी आणि आनंद निर्माण करता येतील असा विचार करत त्यांनी पुढाकार घेवून काही जणांकडून चार लाख वीस हजार रूपये गोळा केले त्यात स्वत:च्या बँकेतील कर्जाचे तीन लाख रूपये घातले आणि झोपडपट्टीतल्या लोकांना रोजगार देणा-या उद्योगाची सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात शिकत, अनुभवत चुका करत हा उद्योग सुरू झाला त्यात मसाले, आणि तत्सम खाद्य पदार्थ निर्मिती अणि विक्री करताना नुकसान झाले.


image


सन २०१०-१२ च्या सुमारास तरीही मग पुन्हा नव्याने व्यक्तिगत दहा लाखांचे कर्ज आणि काही सोबतच्या काम करणा-यांचे योगदान असे चाळीस लाख रुपये उभारून नव्याने उद्योगाची कास धरली आणि मोठ्या प्रमाणात १५-२० जिल्ह्यात काम सुरू झाले. या काळात व्यवसायातील तीव्र स्पर्धा, बाजारातील अफवा आणि व्यावसायिक डावपेच यांचा सामना करत फरसाण निर्मिती आणि विपणन यांचे काम सुरू झाले, असे महेंद्र म्हणाले. अनेक अडचणी आल्या त्यातून लोकांचा भलेपणाही समोर आला, साथ मिळाली आणि मग लोणची, नुडल्स, हॉटेल सामान, ऑइल रिपॅकींग, बेसन पॅकींग आणि विक्री, गहू ट्रेडिंग अशा वेगेवेगळ्या खाद्य सामुग्रीची विक्री करण्याची सुरूवात झाली, यातून एक-दोन–तीन अशा वेगेवगळ्या कंपन्या एका छत्राखाली सुरू करण्याची सुरूवात झाली. मात्र सुरूवातीला जो हेतू होता की ‘गरजूला मदत करायची’ त्याचा कधीच विसर पडला नाही आणि मग या उद्योगातील आवश्यक कामे अपंगांच्या मदतीने करून घेत स्वार्थ आणि परमार्थ अशा सेवाभावी वृत्तीने व्यवसायाची वाटचाल सुरूच राहिली. यातून आपण जी नैतिकमुल्य निर्मिती करतो आहोत, त्यातून चांगला संदेश निर्माण होत राहील जो आपले काम सुकर करेल हा विश्वास आणि भावना घेवून काम करत राहिल्याने आजही गरजू लोक येतात आणि आपला वाटा उचलताना आपोआप उद्योगाला हातभार लावत तो पुढे घेवून जात मोठा करत आहेत असे साखरे म्हणाले.


image


मग हा आनंद आणखी वाढत विस्तारात गेला, ज्या गरजू अपंगांना आपण रोजगार देतो त्यांना खावू घालण्याचा आणि नंतर त्यांच्या हाताने आपण खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो ज्याची तुलना करता येणार नाही. आमच्याकडे गरजू अपंग व्यक्तींना प्राधान्याने रोजगार दिला जातो, असे ते म्हणाले. म्हणजे ‘व्हॅल्यू प्रमोशन मधून सेल्स प्रमोशन, बिझनेस प्रमोशन आणि अंतिमत: सर्वकल्याण’ हा परोपकारातून उद्योग आणि उद्योगातून आनंद असा प्रवास असतो. महेंद्र म्हणतात की, वयाच्या ३२व्या वर्षी ज्या नैतिक मुल्यांची जाणीव मला होते ती नव्या पिढीतल्या मुलांना लवकर व्हावी असे वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणेकरून वेगळ्या कृतीतून आनंदाचा भाव निर्माण होईल जो तुमच्या जीवनाला नव्या दिशेने पुढे घेवून जातो. 


image


भारतीय स्त्रियांच्या घरगुती स्वादाच्या अनेक खाद्यजिनसाना प्रोत्साहन देत त्यांना बाजारात आणण्याचा सोमेश्र्वरच्या माध्यमातून सध्या प्रयत्न सुरू आहे अशी माहिती देताना ते म्हणाले की, जो आनंद एखाद्या महिलेला इतरांना खावू घालण्यातून मिळतो त्याला व्यापक कसे करता येईल हाच या मागे प्रयत्न आहे. त्यातून नवीन माणसे आणि नवे संकल्प जुळतात आणी तसेच आनंद आणि प्रेमातून सोमेश्र्वरच्या उद्योग विश्वाचा पसारा वाढत चालला आहे. नित्य नवी माणसे, नवे उत्पादन, नवी बाजारपेठ, नवे संकल्प आणि नवा आनंद असा हा उद्योग- व्यवसायातून मानवी मुल्य निर्मितीचा ‘सोमेश्र्वर’ चा प्रवास निरंतर सुरू राहिला आहे.

या सा-या उद्योगात साखरे कुटूंबिय गुण्यागोविंदाने एकत्र काम करत आहेत. तीन भाऊ, त्यांचे इतर कुटूंबिय यांची मोलाची साथ आणि सहभाग यातूनच हे सारे शक्य झाले आहे असे ते आवर्जून सांगतात. महेंद्र सांगतात की, “ माझी आई ‘हिराबाई’ आजही नित्य नेमाने ज्या उत्साहाने दिवसभर काम करते तोच स्टॅमिना मला मिळावा असे मला वाटते. आजही तिचं काम सकाळी चार ते रात्री बारा पर्यंत सुरु असतं, माझी आई माझे पहिले प्रेरणास्त्रोत आहे. आईने भरभरून प्रेम केले तसेच व्यावसायिक गणिते गिरवायला वडिलांनी शिकवलं. त्यामुळे उद्यमीपणाची वृत्ती त्यांच्यामुळे माझ्या घरातच रोवली गेली. माझे भाऊ आणि वाहिनी यांचा मजबूत पाठिंबा मला मिळला आणि आजही मिळतो आहे. कंपनीच्या एकूणच यशामागे कंपनीच्या काम करणाऱ्या सर्वच सहका-यांचा कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. कंपनीला मोठे करण्यात सर्व भागीदार, वितरक, स्टॉकीस्ट यांचा मोठा सहभाग आहे. माझे सहकारी किशोर जगताप यांच्याकडून आम्ही २०१२ मध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यांना आपल्या कंपनीच्या मुल्यांवर इतकी श्रध्दा आहे की, त्यांनी कंपनीत एका मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मयूर आणि राकेश जगताप यांना माझ्या कामात सहभागी केले, ज्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.

एखाद्या गोष्टीची तुम्ही मनापासून कामना केली तर ब्रह्मांडशक्ती ती गोष्ट तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत देतेच अर्थात ‘लॉ ऑफ अॅट्रॅक्शन’ या सिद्धांतावर महेंद्र साखरे यांचा विश्वास आहे. ते म्हणतात की, “व्यवसायात आपल्या सभोवतालच्यांना मदत करत मोठे करत राहायचे म्हणजे आपण आपोआप मोठे होत असतो, त्यात ज्या समाधानाच्या लहरी वातावरणात निर्माण होतात त्या जीवनात वेगळाच आनंद देत असतात ज्याचे मूल्य सांगता येणार नाही. हाच संदेश आपल्याला द्याय़चा आहे असे ते म्हणतात.

image


कुटूंबियांच्या बद्दल भरभरून सांगताना ते म्हणाले की, ‘माझी पत्नी देखील या सा-या वाढ-विस्तार आणि उद्योगाच्या प्रेरणा देणारी आणखी एक मुख्य घटक आहे’ त्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या विश्वास, हिंमत आणि प्रेरणेतून पुढची वाटचाल निश्चित दैदिप्यमान राहील असा आत्मविश्वास वाटतो. ते म्हणतात की, ‘आमच्या सर्वात स्पर्धा आहे, पण ती एकमेकाला जास्तीत जास्त समजून घेण्याची, एकमेकांसाठी सर्वाधिक त्याग करण्याची आणि एकमेकांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याची! 
“मला असे वाटते, दररोज घरातून निघताना आईच्या पाया पडूनच बाहेर पडावे. आईच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकद आणि ऊर्जाशक्ती असते, ज्यामुळे कामं करण्यास एक प्रकारची ऊर्जाशक्ती मिळत असते. तेव्हा हि गोष्ट सर्वांनी आत्मसात करून पाहावी, निश्चितच सकारात्मक बदल जाणवतील” महेंद्र सांगतात.

भविष्यात पतंजलीच्या पावलावर पाऊल ठेवत उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकण्याचे स्वप्न असल्याचे महेंद्र साखरे सांगतात, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात नावाप्रमाणेच साखर डोळ्यात मिश्कील आत्मविश्वासाचा गोडवा अनुभवता येतो. ते म्हणतात की अमेरिका आणि चीन मध्ये जे सूत्र वापरण्यात आले ते आपल्यासाठी देखील फायद्याचे आहे, प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त रोजगार संधी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी मदत मिळाली तर हा देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. हा उद्योग हजार कोटीची उलाढाल करणारा असावा ‘जेथे मागेल त्याला रोजगार’ देण्याची क्षमता निर्माण व्हावी आणि कुणालाही येथे आल्यावर निराश होवून जावे लागू नये असा हा उद्योग निर्माण करावा असा संकल्प असल्याचे महेंद्र साखरे सांगतात. त्यावेळी ज्या सात्विक भावनेतून ते उद्योग- व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. त्यांच्या समोर जीवनाचा फार मोठा पल्ला आहे, कमी वयात सात्विक भावनेतून इतरांच्या कल्याणाचा गोडवा वाटत फिरणारे महेंद्र ‘साखरे’ असेच नव्या पिढीसमोर नितीमत्तेचा आदर्श आणि उद्योग व्यवसायाची क्षितीजे निर्माण करत राहोत हीच सदिच्छा.

Add to
Shares
12
Comments
Share This
Add to
Shares
12
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags