संपादने
Marathi

आयुष्यातल्या अनेक अडथळ्यांवर मात करत कष्टाने, जिद्दीने उभ्या राहिलेल्या 'दीप भोंग' या तरुणाची यशोगाथा

Nandini Wankhade Patil
24th Sep 2016
Add to
Shares
61
Comments
Share This
Add to
Shares
61
Comments
Share

जगभ्रमंती, जी कोणे एके काळी कोलंबसालाच शक्य झाली होती. ती आज सामान्य माणसालाही सहज शक्य आहे. जग इतकं जवळ आलय की जणू माणसाला क्षितीजच उरली नाहीयेत. गावाची वेसही ओलांडायची नाही, या परंपरेत वाढलेल्या भारतातून आज प्रत्येक दिवशी हजारो उड्डाणं केली जातात. परदेश गमन ही आज काळाची खूप मोठी गरज ठरली आहे. अशा रोज होणाऱ्या देशोदेशींच्या प्रवासांमुळे सुरक्षा आणि व्यवस्थांचे अनेक नियम प्रवासी नागरिकांसाठी आखले गेले. पासपोर्ट, व्हीजा यांसारख्या अनेक सेवापूर्तता करणाऱ्या संस्थांची गरज भासू लागली. त्याचप्रमाणे करमणूक, व्यावसायिक एवढेच नाही, तर धार्मिक, आरोग्य, सण, उत्सव, लग्नसोहळे, सामाजिक व इतर अनेक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची परदेशात राहण्याची व फिरण्याची सोय, ही देखील महत्वाची नड ठरु लागली. यातूनच जन्म झाला पर्यटन उद्योगाचा.

याच उद्योगाशी निगडित असलेली पुण्यातील एक नामांकित संस्था म्हणजेच, BTW Visa Services Pvt. Ltd. व्हिजा विषयक सल्ला आणि व्हिजा प्रक्रिया सेवा, एअर तिकिट बूकिंग सेवा, प्रवास विमा, परकीय चलन, साक्ष आणि प्रमाणपत्र सेवा यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी २०११ साली पुण्यात सर्वप्रथम स्थापन झालेली ही कंपनी, आज पुण्यातील व मुंबईतील अनेक प्रवाशांच्या विविध अडचणींचे वेळेत निवारण करते. अनेक सेवाधारी नागरिकांची प्रचंड विश्वासग्राह्यता असणारी ही कंपनी आज जवळजवळ १ लाख व्हिजा प्रक्रियेचा विक्रमी टप्पा ओलांडत आहे. इंदापूर तालुक्यातल्या एका छोट्या खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातला एक धाडसी तरुण म्हणजेच दादा भोंग. BTW आणि या संस्थेशी सलग्न असलेल्या सात यशस्वी कंपन्यांचा संस्थापक. ह्या तरुणाचं नाव ऐकून जरा आश्चर्य वाटेल, परंतु मुळातच घाबरट, रडक्या आणि बुजऱ्या स्वभावाचा हा. असं त्रास देणारं अपत्य म्हणजे पितरांच दुःख, अशी गावाची समजूत. मग तो शांत व्हावा म्हणून त्याला नाव देण्यात आलं, त्याच्या स्वर्गवासी आजोबांच. अशा अंधश्रध्येच्या पगड्यात स्वतःच्या पूर्वजांच नाव घेतलेला हा तरुण आज त्याच्या व्यवसाय क्षेत्रातील एक आघाडीचा ’दादा’च ठरला आहे. आयुष्यातल्या अनेक अडथळ्यांवर मात करुन कष्टाने, जिद्दीने आणि धीराने उभ्या राहिलेल्या या तरुणाची ही यशोगाथा.

दीप भोंग, संस्थापक, BTW Visa Services Pvt. Ltd.

दीप भोंग, संस्थापक, BTW Visa Services Pvt. Ltd.


घरच्या अतिशय बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या दादानं स्वतःचं शालेय शिक्षण गावातच घेतलं. सकाळी रानात चारा कापायचा, जनावरांना घालायचा आणि मग शाळेत जायचं हा नियम. घरी परतल्यावर तेच काम. आजकाल आपण शाळेत शिकताना त्रास होऊ नये म्हणून आपल्या पाल्यांना शाळेत चालतही पाठवत नाही. पण दादाने अत्यंत कष्ट करुन हे दिव्य पार पाडलं, आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दादाने स्वतःचे मामेभाऊ शशिकांत शेंडे यांची मदत घेतली व पुण्यात आला. पोटाला चिमटा काढून पोसणाऱ्या आई वडिलांकडे पैसे मागणार तरी कसे, म्हणून दादाने पुण्यातील सेवाचलित ’युनिअन बोर्डिंग हाऊस’ मध्ये राहून शिकण्याचा निर्णय घेतला. गाठीशी फक्त दोन कपडे घेऊन आलेल्या दादाने रयत शिक्षण संस्थेत ११ वी व १२ वी साठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर स्वतःचा खर्च चालविण्यासाठी पेपर टाकण्यास सुरुवात केली. पेपर टाकून २०० रुपये मिळत होते. बेताचे आणि कधी पुरेसे तर कधी न पुरेसे जेवण होस्टेलमध्ये मिळत होते. पण या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीत दादाने काटकसरीची सवय लावून घेतली. आपले प्रयत्न न थांबवता त्यानी केटररकडे नोकरी केली

image


बारावी पास झाल्यावर दादाला पुढची स्वप्नं स्वस्थ बसू देईनात. म्हणून त्यानी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण या नवीन स्वप्नावर परिस्थितीने विरजण घातले. कॉलेजचा खर्च परवडू न शकल्याने प्रथम वर्षातच दादाला कॉलेज सोडावं लागलं. परिस्थितीपुढे मान टेकणारी अनेक उदाहरणं आपण जगात बघतो. पण दादा त्यातला नव्हता. नुसतं बसायच नाही, शक्य असेल ते करायचं. म्हणून दादानी पुण्याच्या MSIHMCT या कॉलेजला Travel & Tourism क्षेत्रात प्रवेश घेतला. हे शिक्षण सरकारी अनुदानित महाविद्यालयात होत असल्याने खर्च कमी होता, पण गरजेचे खर्च मोठेच होते. अतिशय गरजेचा गणवेश असलेला ब्लेझर सूटही दादाला घेता आला नाही. पण जिवाभावानी जपलेल्या मित्रानी वेळेला याही गरजेची पुर्तता केली. पुन्हा अधिक पैशाची नड भासू लागली म्हणून दादाने एका छोट्या कंपनीत डेटा एन्ट्रीचे काम सुरु केले. सकाळी ५ पर्यंत कॉलेज आणि नंतर रात्री १० पर्यंत काम असा प्रवास सुरु झाला.

image


Travel & Tourism च्या द्वितीय वर्षात प्रवेश झाला होता. द्वितीय वर्षात कामाचा अनुभव घेण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रात पाठवत असे. नवी उमेद, नवे चरण. पण परिस्थितीने पुन्हा खोडा घातलाच. दादाच्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे कळाले. वडिलांची काळजी घेण्यासाठी दादाला द्वितीय वर्ष सोडावे लागले. आता दादाला फक्त तृतीय वर्षातच व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव घ्यायचा होता. दादानी पुन्हा एकदा तयारी केली. आणि पुण्यातील एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिप मिळवली. हे पाऊल टाकताना दादानी स्वतःला एक नवीन नावही दिलं. दादा भोंग आता ’दीप भोंग’ या नावाने ओळखला जाऊ लागला. महत्वाकांक्षा आणि जिद्द यांच्या बळावर दादाने व्हिजा प्रक्रियेचे उत्तम ज्ञान आत्मसात केले. त्यात तो इतका प्रविण झाला की त्याला पहिल्याच आठवड्यात व्हिजा विभागास बदली मिळाली. लोकांशी उत्तम रित्या संभाषण कसे करावे हे दादा कामातून शिकू लागला. मराठी माध्यमात शिकलेल्या आणि गावकडल्या मराठी वातावरणात वाढलेल्या दादानं इंग्रजी भाषेचं शिवधनुष्य सहज पेललं. कष्ट भरपूर होते. अगदी झेरॉक्स काढणे, फाईल लावणे यांसारख्या लहानसहान कामांपासून ते लोकांच्या व्हिजा संबंधित अडचणी सोडवणे इत्यादी अनेक जबाबदारीची कामे करावी लागत होती. आणि पगार मिळत होत फक्त ७०० रुपये. त्यात होस्टेलच्या नियमाप्रमाणे फक्त शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच जागा उपलब्ध असल्याने दादाला हॉस्टेल सोडावे लागले. वारजेला राहण्यासाठी भाड्याने जागा घ्यावी लागली. आता सकाळी पेपर टाकून, नंतर एका पाठोपाठ एक अशा दोन खडतर नोकऱ्या पार पाडून, वारजे ते नोकरी असा सुमारे १८ ते २० किलोमीटर चा प्रवास पूर्ण करत दादा स्वतःचा अभ्यास सांभाळत होता.

image


पुढे नोकरीसाठी दादाने केसरी टूर्स एंड ट्रॅव्हल्स कंपनीतून सुरुवात केली. पण पगार कमी मिळत होता. त्यात दादाने एक धाडसी निर्णय घेतला होता. आपला शैक्षणिक दर्जा अजून वाढावा यासाठी त्याने वाणिज्य क्षेत्रात बाह्य पदवीसाठी प्रवेश घेतला होता. अशा अटीतटीच्या परिस्थितीत दादाने Travel Voyages कंपनीत नवीन नोकरी धरली. या कंपनीने त्याला आधी T- Sysytem कंपनीत इंप्लांट सेंटरला पाठवले. अंतर लांब झाले. सहाच महिन्यात त्याला Tata Johnson नावाच्या कंपनीत हिंजवडीला बदली मिळाली. अजून अंतर वाढले. दिवसभरातल्या जवळजवळ ४० किलोमीटरच्या प्रवासामुळे दादाचा खूपच वेळ जाऊ लागला. त्यात वाणिज्य पदवीचे शेवटचे वर्ष येऊन ठेपले होते. नाइलाजाने चांगली नोकरी सोडावी लागली. नशिबाने परत हुलकावणी दिली होती.

image


वाणिज्य पदवीचे शेवटचे वर्ष संपले. दादाला नोकरीची नितांत गरज होती. जागेच्या भाड्यापासून ते जेवणापर्यंत सर्वच खर्च आ वासून उभे होते. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, आर्थिक मंदीची आट आली. कुठेही नोकरी मिळेना. या परिस्थितीत दादाने Cox & Kings कंपनीत चालू आहे त्याहीपेक्षा कमी पगारावर नोकरी धरली. दोनच आठवड्यात त्यानं तिथं असं काम करुन दाखवलं की कंपनीला त्याची खरी किंमत कळाली व त्यांनी लगेच दादाचा पगार वाढवला. नवीन सत्र सुरू झाले. २००९ पासून २०११ पर्यंत कंपनीला दादाचा अनेक प्रकारे फायदा झाला. दादाच्या वेगवान कार्यपद्धतीमुळे लोक आकर्षित झाले. लोकांचा वेळ वाचू लागला, परिणामी कंपनीचे क्लाएंट्स वाढले. नोकरीत लोक सहसा स्थिरताच शोधतात. नोकरी सुरक्षित रहावी म्हणून हवे ते प्रयत्न करतात. वरिष्ठांची हांजी हांजी करतात. पण दादाने हे कधीच केले नाही. याउलट, कामाशी एकनिष्ठ राहून आपली प्रगती साधली. दोनच वर्षात त्यानं स्वतःच्या नव्या उद्योगाचे धाडसी स्वप्नही बघितलं. दादानी थेट त्याच्या वरिष्ठ व अवनी ट्रॅव्हल्सच्या सर्वेसर्वा मोहिनी बर्वे यांनाच स्वतःच्या नव्या उद्योगाची कल्पना सांगितली. असं करण्यात खरंतर नोकरी जाण्याचा प्रचंड धोका होता. पण दादानं नोकरीची चिंता केली नाही. म्हणतात ना, देव अशा कष्टाळू आणि लढाऊ व्यक्तींना कधीच विसरत नाही, आणि तसंच झालं. मोहिनी बर्वे यांनी दादाचं कौतुकच केलं. कंपनीलाही असा कर्मचारी गमावून चालणार नव्हतं, म्हणून त्यांनी दादाला अवनी ट्रॅवल्सच्या ऑफिस मध्येच व्यावसायिक कामाची संधी दिली. दादाने वरिष्ठांच्या संमतीने BTW या पुण्यातील पहिल्या व्हीजा प्रोसेसिंग कंपनीची स्थापना केली. BTW म्हणजेच Business, Tourist आणि Work permit या तीन क्षेत्रातील व्हिजा प्रक्रियेची जवाबदारी BTW ला देण्यात आली. नव्या उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली. एका टेबल पासून सुरुवात झाली.

image


सुरुवातीला BTW चे उत्पन्न कमी होते, पण दादाने आपले प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले. दुप्पट वेळ काम करायला सुरुवात केली. एकटा योद्धा प्राणपणानी लढू लागला. थोड्याच दिवसात दादाने महिन्याअखेरी २०० व्हिजा प्रक्रिया करण्याचं अशक्य वाटणारं काम, एकट्यानं शक्य करून दाखवलं. BTW ची आवक वाढली, त्याचबरोबर कामाचा व्यापही प्रचंड वाढला.

imageशिक्षणावर अत्यंत प्रेम असलेल्या दादानी, आता एल.एल.बी. साठी आय.एल.एस. महविद्यालयात प्रवेश घेतला. आता दादा ७ ते १० कॉलेज आणि त्यानंतर कंपनीत BTW चे काम करत होता. ते संपवून घरी आल्यावर, ८ पासून परत BTW च्या क्लाएंट्सच्या अडचणी सोडवत होता. या सगळ्या थकावटीच्या दिनचर्येनंतरही दादाचा प्रगतीचा विचार काही थांबत नव्हता. बऱ्याचदा तर रात्री उशीरापर्यंत काम करायचे, म्हणून दादा रात्रीचे जेवणही व्यर्ज करीत होता. "खरी स्वप्नं ती नव्हेत, जी माणसाला झोपल्यावर पडतात. खरी स्वप्नं ती, जी माणसाला झोपू देत नाहीत" हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचं वाक्य दादा अगदी सार्थ करीत होता.

आपला पाया भरभक्कम केलेल्या BTW ला २०११ साली आपला पहिला कर्मचारी मिळाला. कंपनीचा वटवृक्ष आता बहरु लागला. BTW चा वाढता पसारा अंतर्गत रित्या समावून घेणं, अवनी ट्रॅवल्स कंपनीला आता अवघड जाऊ लागलं. दादाला नवीन जागेची गरज होती. नवी जागा म्हणजे नवी गुंतवणूक. काटकसरीने जमवलेले पैसे होते, परंतू त्यात हा नवा खर्च भागवण खूप अवघड होतं. याच काळात दादाला महेश दाते यांच्या रुपानं एक देवमाणूस भेटला. त्यांनी दादाला आपली मोक्याची जागा अत्यंत विश्वासाने आणि अल्प दरात उपलब्ध करून दिली. BTW ला आता नवीन तळ मिळाला. प्रगतीची नवी तोरणं बांधली गेली. कामाला नव्या उत्साहाने सुरुवात झाली.

image


यशाचा वाढता वेग आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे दादाने २०१२ मध्ये नव्या, एअर तिकिट बूकिंग सेवा विभागाची BTW त स्थापना केली. नवनवीन कर्मचारी रुजू होऊ लागले. त्यांची निवड करताना दादाने एक तत्व कायम ठेवले होते. त्याने अनुभवी व्यक्तींपेक्षा नव्या, कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्तींची निवड केली. त्या गुणांचं मोल त्याने चांगलच ओळखलं होतं. "काम येत नसेल तरी चालेल, कष्टाची तयारी हवी. काम शिकवण्याची जवाबदारी BTW ची" हा दादाचा बाणा. BTW ने चांगलाच वेग धरला होता. २०१३ मध्ये BTW ने PEC , या अटेस्टेशन आणि अपोस्टाईल क्षेत्रातील पुण्यातील पहिल्या कंपनीची स्थापना केली. त्यापाठोपाठ २०१४ मध्ये Journey Carts या हॉटेल बूकिंग आणि हॉलीडे पॅकेज देणाऱ्या कंपनीची स्थापना केली. या कामासाठीही दादानी एक अनुभवी व्यक्ती आधीच हेरली होती. आशिश लघाटे या Cox & Kings मधील जुन्या मित्राला Journey Carts ची धुरा सोपवण्यात आली. दादाने एखाद्या व्यक्तीला कामाची जबाबदारी दिली की तो त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत होता. त्यामुळे प्रत्येकालाच कामाचे स्वातंत्र्य मिळत होते. हा त्याचा विश्वासच BTW च्या विस्तारास कारणीभूत ठरत होता. दादाने तर BTW च्या कार्यात स्वतःला वाहूनच घेतले होते.

image


२०१३ साली दादाला अशा साजेशा जोडीदाराची साथ लाभली. नीलम व्यवहारे यांसोबत दादा लग्नबंधनात अडकला. अत्यंत साधेपणानी लग्न उरकून, दादा आपल्या कामी परत रुजू झाला. शेकडो जणांचे हनीमूनसाठी परदेश गमनाचे मार्ग सुलभ करून देणारा हा, स्वतः मात्र कधी हनीमूनला गेला नाही. त्याच्या पत्नीनेही कधी हट्ट धरला नाही. याउलट BTW च्या कामात पत्नीला समावून घेण्याचा निर्णय बोलून दाखवल्यावर तिने दादाला दुजोराच दिला. या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही त्या BTW च्या कामात रुजू झाल्या. पत्नीला प्रोत्साहन देत दादाने कंपनीचे अकाउंट्स सांभाळण्याची महत्वाची जोखीम त्यांना दिली. ’फक्त चूल सांभाळत घरी बसायचे नाही. वेळेचा सदुपयोग करुन घ्यायचा’, ह्या तत्वावर दादा ठाम राहिला.

image


BTW दररोज नवनवीन यशाच्या भराऱ्या घेतंच होतं. २०१४ मध्ये, प्रमोद डोंगरे आणि विशाल तेरकर या जुन्या मित्रांबरोबर दादाने Cart 91 ह्या कंपनीची स्थापना केली. खरंतर ही कंपनी E-commerce क्षेत्रातली. दादाला या विषयात ज्ञान आणि अनुभव, दोन्हीही नव्हते. पण त्याला धंदा कसा करायचा, हे कळलं होतं. सोबत कष्ट करायची तयारी आणि अपार इच्छाशक्ती रक्तात ओसंडत होती. मग काय, Cart 91 नेही आपला झेंडा उंचावला.

image


दरम्यान BTW चा आलेख इतका वर गेला होता, की त्याला आता मोठ्या कंपनीचं स्वरूप देणं भाग होतं. २०१४ मध्ये ही कंपनी, BTW Visa services Pvt. Ltd. या नावारुपास आली. नाव उचांवलं. या कंपनीचे नवे डायरेक्टर म्हणून दादाने स्वतःबरोबर पत्नीचेही नाव जोडले. आता नीलम भोंग या पदासाठी अगदी योग्य उमेदवार होत्या. नव्या बदलांबरोबर नवनवीन गरजाही वाढीस लागल्या. मुख्य गरज होती नवीन कर्मचार्यांची. BTW मध्ये नवीन कर्मचार्यांना उत्तम प्रशिक्षण मिळतच होते. पण आता अशा जागेची गरज होती, जिथे शिक्षणाबरोबर कामाचा उत्तम अनुभव घेऊन नवे कर्मचारी तयार होतील. एका नवीन कल्पनेला स्फुरण चढले. आता दादाचे पुढचे ध्येय होते, Travel & Tourism Institute चे.

हे ध्येय गाठायचं म्हटलं, तर अनेक अडचणी येत होत्या. मुख्य गरज शैक्षणिक क्षेत्रातील एका अनुभवी व्यक्तीची होती. पण दादानी शेवटी योग्य व्यक्ती शोधून काढलीचं. विवेक मोरे या व्यक्तीची क्षमता दादाने ओळखली आणि त्यांना Travind Institute of Travel & Tourism या नव्या शिक्षण संस्थेची जबाबदारी देण्यात आली. BTW च्या पंखात एक अजून पीस जोडले गेले. या संस्थेने जुन्या शैक्षणिक पद्धतीत अमूलाग्र बदल केले. नवी शिक्षणपद्धती रुजवली.

image


या सगळ्या उद्योगांची ओळख जगाला व्हावी या उद्देशाने, मार्च २०१६ मध्ये, WGBL या विपणन क्षेत्रातील कंपनीची स्थापना दादाने केली. तसंच, २०१६ मध्ये दादाला एका पूर्णतः वेगळ्या क्षेत्रातील कंपनीचा शोध लागला. ही कंपनी खाद्यक्षेत्रातील होती. अपुऱ्या व्यवस्थापनामुळे ती बंद पडली होती. गिऱ्हाईकाला त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम फलाहार देणे, हे या कंपनीचे उद्दीष्ट. दादाला ही कल्पना आवडली त्याने ही कंपनी विकत घ्यायचा निर्णय घेतला आणि Fruitism कंपनी BTW च्या छत्राखाली आली.

एका उद्योगावर थांबायचं नाही, नवनवीन क्षेत्रांना गवसणी घालायची हे दादानी ठरवलच होतं. त्याच्या मते, एखादा योग्य व्यक्ती निवडणं आणि त्याला योग्य जागी काम देणं, हेच त्याच्या उद्योगातील यशाचं गमक होतं. शिक्षणाची दारं बंद झालेल्यांमध्येही तो आपली विजयी फौज बघत होता. दादाने इतका मोठा यशस्वी प्रवास आणि तोही इतक्या कमी वेळात केला. त्यानं तब्बल ५ वर्षात, ७ कंपन्यांची स्थापना केली. आज त्या सातही कंपन्या यशाचं शिखर गाठत आहेत. BTW ने तर पुणे, पिंपरी आणि मुंबईतही आपला जम बसवला आहे. निव्वळ ३० वर्षाच्या वयात या गावाकडल्या घाबरट, बुजऱ्या स्वभावाच्या मुलानं एवढी कारकीर्द गाठली. हे कसं शक्य झालं?

image


ही किमया होती अविरत कष्टांची आणि असामान्य इच्छाशक्तीची. कोणताही गुरु नसताना या एकलव्यानं स्वतःच्या अनुभवावरुन आपलं आयुष्य आखलं. स्वतःची तत्व जपली. विश्वासानं पुढं पावलं टाकली. यात त्याला अनेक अडथळे आले, खचून जायचे प्रसंगही आले, पण दादा त्यातूनही जिद्दीनं उभा रहिला. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेऊन त्यानं कुटुंबाच्या आणि उद्योगाच्या सर्व गरजा भागवल्या आणि तेही कोणाची मदत न घेता. आज या दादाकडे, म्हणजेचं दीप भोंग यांच्याकडे बघून त्यांच्या साधेपणाची जाणीव होते. समृद्धीच्या शिखरावर असूनही यांनी आपले पाय जमीनीवर कायम ठेवले आहेत. ते अजूनही त्यांच्या जुन्या दुचाकीवरच फिरतात, पण आपल्या सर्व कर्मचार्यांना घर व गाडी मिळायला हवी यासाठी ते कटिबद्ध आहेत. आजही ते कुठल्याही केबीनचा मिजासी थाट न बाळगता, आपल्या प्रिय कर्मचार्यांबरोबर, त्यांच्याच प्रमाणे एक होऊन ऑफिसमध्ये काम करताना दिसतात. या व्यक्तीने फक्त आपल्या सेवाधाऱ्यांचीच नव्हे तर समाजाचीही बांधिलकी प्रेमाने जपली आहे. आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतून वृक्षारोपणासारखे कार्यक्रम BTW कडून पार पाडले जातात. दादा आपल्या जुन्या लोकांना कधीच अंतर देत नाही, तो आजही त्यांना तितक्याच आपुलकीने वागवतो. स्वतःच्या भूतकाळात वाईट काळ जगलेला हा दादा अनेक गरजूंना आर्थिक मदत देतो, आधार देतो. लक्ष्मीच्या मागून चोरपावलानं येणारा अहंकार मात्र याला शिवू शकला नाही. कुटुंबीयांप्रमाणेच, आपल्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता यानं जपली आणि जाणली सुद्धा. फक्त स्वतःचा फायदा ओरबाडण्याऐवजी, त्यांनी माणूस जोडण्याकडे जास्त भर दिला. शिस्त आणि सचोटी, त्याचबरोबर खेळीमेळीचं वातावरण, यामुळे BTW कंपनी प्रगल्भ झाली. कोणतीही जाहिरात न करता या कंपनीनं, आपल्या अचूक कार्यशैलीमुळे अनेक लोकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं. या सगळ्या संस्काराचं बीज दादानी लावलं. त्यानं स्वतःच्या उद्योगाकडे कधी स्वार्थानं पाहिलचं नाही, याउलट त्यानं इतरांना नव्या उद्योगासाठी नेहमी प्रोत्साहनच दिले, प्रसंगी मदतही केली. अगदी स्वतःच्या कर्मचार्यांना सुद्धा. BTW मध्ये काम करणारे कर्मचारी सहसा कधीच ही कंपनी सोडण्याचा विचार करत नाहीत, ते कदाचित याच कारणामुळे.

image


आजही दीप भोंग, त्यांच्या जवळच्या आणि त्यांना मदत केलेल्या व्यक्तींचा आवर्जून उल्लेख करतात. कॉलेजमध्ये स्वतःचा गणवेश देणाऱ्या रोहन बोर्लीकरला ते विसरत नाहीत. BTW चे पहिले कर्मचारी विशाल डोंगरे हे फक्त BTW चेच नाही. सध्या BTW ची मुंबई शाखा सांभाळणारे विकास दळवी, यांना ते आपला गुरु मानतात. ज्या ज्या क्षेत्रात दादाने खडतर प्रवास केला, ते अजूनही त्यांच्या मनाजवळ आहेत. आजही ते पेपरवाल्यांना तितकीच सहानुभूती देतात.

"व्यसनमुक्त आणि कष्टाळू आयुष्य जगलं पाहिजे. आनंदानी सगळी आव्हानं पेलली पाहिजेत." "कोणताही उद्योगधंदा, प्रथम एका बीजाप्रमाणे रुजतो. त्याचं रोप होतं, ते मोठं होतं आणि कालांतरानी ते मोठं झालं की त्याला फळ येतात. ती फळं चाखायची असतील तर संयम ठेवायला हवा. ती मिळेपर्यंत कष्ट आणि त्रास सहन करायची तयारी हवी. इच्छाशक्ती मोठी हवी. आणि हे सहज शक्य होतं, जेव्हा तुम्ही तुमचा आवडीचा छंद, काम म्हणून स्विकारता" असं ते सांगतात. त्यांच्याशी संवाद साधून मनाला आलेली मरगळ, पार लांब निघून जाते. आजच्या धावत्या जगात, तळातून आलेला व्यक्तीही किती ऊंच झेप घेऊ शकतो आणि योग्य मार्गानी लढून काहीही साध्य करु शकतो, याचं उत्तम उदाहरण दीप भोंग हे आहेत. नैराश्याच्या सावटात गुरफटलेल्या तरुण पिढीसाठी ते खरोखरच प्रेरणास्थान आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

Add to
Shares
61
Comments
Share This
Add to
Shares
61
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags