संपादने
Marathi

रिक्षाचालकाच्या समाजसेवेचा अनोखा आदर्श

Pramila Pawar
27th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एखादा रुग्ण घरी असेल, रस्त्यावर पडलेला असेल किंवा अपघातात जखमी असेल त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आजच्या काळात कोणी पुढे सरसावत नाही...का? तर कोण कशाला कुणाच्या भानगडीत पडणार? पोलिसांच्या नको त्या चौकशीला कोण तोंड देणार? असा विचार न करता त्यांना विनामुल्य हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार्‍या सर्वासामान्य रिक्षाचालक अजिज इनामदार यांची काळजाचे ठोके चुकविणारी ही अनोखी कहाणी...

पुण्यात कुठही कोणताही अपघात घडला अथवा घरात कुणी सदस्य गंभीर आजारी असेल आणि त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये न्यायचे असेल तर गरिबातला गरीब माणूस त्याच्याकडे असलेल्या तुटपुंज्या पैशातून कसा बसा रूग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतो. हातावर पोट चालणार्‍या अनेक गरिबांच्या घरात अगोदरच पैसे नसतात आणि अचानक त्यांच्या घरातील व्यक्तीला काही झाले तर पहिले त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसे न्यायचे हा विचार डोक्यात असतो. पण तुटपुंज्या पैशात कोण आपल्या कुटूंबियांना हॉस्पिटलमध्ये नेणार? असा प्रश्‍न आता पुणेकरांच्या मनातही येत नाही. कारण सर्व रूग्णांना हॉस्पिटलमध्ये नेणारा सर्वसामान्य रिक्षाचालक अजिज इनामदार हा त्यांच्या मदतीला धावून येतो. हे ऐकून अनेकांच्या समोर प्रश्‍न घर करून बसेल असतील की यात काय नवीन? तो रूग्णांच्या नातेवाईकांकडून भाडे तर घेत असेलच की...पण थोडं थांबा...रिक्षाचालक अजिज हा रुग्णांची आणि अपंगांची वाहतूक करायला कधीच नाही म्हणत तर नाहीच, पण उलट त्यांना मदत व्हावी या उद्देशाने, त्यांनी गेली अडीच वर्षे या सेवेतून कोणताही मोबदला घेतला नाही. अजीज इनामदार या जेमतेम ३५ वर्षे वयाच्या रिक्षाचालकाने हे रूग्णसेवेचे व्रत अंगीकारले आहे. पुण्यात एका भाड्याच्या घरात राहणार्‍या अजिज यांचा संपूर्ण महिन्याचा खर्च हा महिन्याच्या तुटपुंज्या पगारातून चालत असे. वन रूम-किचन मध्ये महिनाभराचा खर्च भागवून जे काही पैसे हातात पडतील त्यावर तीन मुलं, पत्नी असा पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा ते हाकत असत. यापूर्वी ते खेड येथील योगिनी टेक्नोआट्र्स प्रा. लि. कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत होते. सुखाने सुरू असलेल्या त्यांच्या या संसारात काळाने घाला घातला आणि अजिजच्या आयुष्याला एका प्रसंगामुळे वेगळे वळण लागले. अजिज यांची पत्नी काही वर्षांपूर्वी पॅरालिसिसने आजारी पडली व तेव्हापासून तिच्या उपचारासाठी रूग्णालयात फेर्‍या होऊ लागल्या. तिच्या काळजी घेण्यासोबत घरात असलेल्या तीन चिमुकल्यांचाही त्यांना सांभाळ करावा लागत होता. या संघर्षात कामावर होणार्‍या जादा सुट्ट्यांच्या कारणानं हातची नोकरीही गेली होती. हातात रोजगार नाही, पत्नीचे आजारपण आणि मुलांचे हाल या सगळ्या वातावरणात जणू काही उतरली कळा लागली होती. जगण्यासाठी पैसा लागतो आणि पत्नीच्या उपचाराचा खर्च भागवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी काम तर केलंच पाहिजे, असा विचार करून शेवटी अजिज यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. मात्र, पत्नीच्या आजारपणात तिला रुग्णालयात नेताना त्यांना फार त्रास सहन करावा लागला. एकतर रुग्णालयात जाण्यासाठी लवकर वाहन मिळायचं नाही, मिळालं तरी सोबत रूग्ण पाहून ते रिक्षावाले रुग्णालयात जाण्यास नकार द्यायचे. शेवटी अक्षरश: कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे पाहून ते स्वत: उचलून घेत त्यांनी आपल्या आजारी पत्नीला अनेकदा रुग्णालयात नेले आहे, हे जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्ठा स्पष्टपणे झळकतात.

image


दिवसभर रिक्षा चालवून आपल्या थकलेल्या हाताने पत्नीला घास भरवणे... शेजारचं कुणीतरी भाजी आणून देतं. गल्लीतली लहान मुलं औषधं आणून देतात... महिन्याला रिक्षा चालवून जमा होणार्‍या पैशातूनच घराचं भाडं देवून आणि घरखर्च भागून औषधालाही पैसे उरत नसायचे. अशा परिस्थितीत अजिजचे मित्र प्रशांत ठोकरे यांनी त्यांच्या मुलांना आपल्या घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. अचेतन झालेल्या शरीराने अंथरूणाला खिळलेल्या पत्नीची अवस्था पाहून ते मात्र खचले नाही.

आजारपणात अथवा अपंगत्व असो मध्यमवर्गीय नागरिक सोय म्हणून रिक्षाचा वापर करतात. मात्र अनेकदा या रुग्णांच्या किंवा अपंग व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रिक्षावाले तयार होत नाहीत, याचा अनुभव त्यांनी घेतला होता. आपल्याबाबतीत जे झालं, ते इतर रुग्णांच्या बाबतीत होऊ नये असा निश्चय अजीज यांनी केला आणि मग त्यातून अजीज यांनी सुरू केली ही आगळीवेगळी समाजसेवा !

आपल्या रिक्षाच्या धंद्यातून वेळ काढत अजीज आपल्या परिसरातील रुग्ण आणि अपंगांची मोफत वाहतूक गेल्या अडीच वर्षांपासून करत आहेत. यामध्ये आपल्याला समाधान मिळते असे ते सांगतात. अनेकदा गरीब रुग्णांकडे औषधासाठीही पैसे नसतात, तर वाहतुकीसाठी पैसे देणार कसे. अशांना या मोफत वाहतुकीमुळे खूप मोठा दिलासा मिळतो. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांतील समाधान माझ्यासाठी मोलाचं आहे, असे अजीज सांगतात. तसेच इतर रिक्षाचालकांनीही रुग्ण आणि अपंगाची वाहतूक करणे न टाळता त्यांना मदत करावी असेही ते आवर्जून सांगतात. ज्या गरजू रुग्णांना रुग्णालयात जायचं असेल, मेडिकल मध्ये जायचं असेल किंवा अपंगांना कोणत्या कामासाठी बाहेर जायचं असेल ते अजीज इनामदार यांना ९६५७८७८६१५ दूरध्वनीवरून संपर्क साधू शकतात. पुण्यातील गरीब जनता ज्या हॉस्पिटलमध्ये जास्त प्रमाणात जाते अशाच हॉस्पिटलच्या शेजारी ते आपली रिक्षा उभी करून ठेवतात. जेणेकरून रूग्णांना तात्काळ मदत मिळेल. अजिज यांच्या या समाजसेवेमुळे पुण्यातील गरीब रूग्णास जीवनदान मिळाले आहे. आज पुण्यातील अनेक रूग्ण हे कोणतीही चिंता न करता थेट त्यांच्याशी संपर्क करून सहीसलामत हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे अजिज हे मुस्लिम धर्मीय असल्याने कोणताही जाती-भेद न पाहता केवळ एक रूग्ण या दृष्टीने व मानवता या नात्याने त्यांची ही समाजसेवा अखंडरित्या सुरू असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अनेक प्रसिद्दी माध्यमांनी अजिज यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेतली. परंतू मिळालेल्या प्रसिद्धीचा गर्व मनात त्यांनी कदापि ठेवला नाही. त्यांच्या या प्रवासातील एक किस्सा सांगताना ते म्हणतात, "आजवर अनेक प्रसिद्धी माध्यमांनी माझ्या कार्याची दखल घेतली. तसेच माझ्या कार्याबद्दल नेते उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार होणार होता. परंतू मी एक गरीब, सर्वसामान्य घरातला साधा माणूस असल्याने त्या कार्यक्रमात बघ्यांची होणारी गर्दी आणि मोठ-मोठी मंडळी पाहून मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही". हे ज्यावेळी ते सांगत होते, त्यावेळी त्यांच्यातील साधेपणा दिसून येत होता. शेवटी बोलताना त्यांनी एक वाक्य म्हटले की, ‘‘ मी जे हे समाजकार्य सुरू केले आहे ते माझ्या स्वतःच्या समाधानासाठी आणि गरिबांच्या मदतीसाठी...’’ अशा निस्वार्थी भावनेने केलेल्या या कार्याला सन्मान देण्यासाठी परदेशी नागरिक श्याम भुरके यांनी त्यांना रोख रक्कमेचे बक्षिस दिले. एव्हढेच नव्हे तर तेथील स्थानिक नेते नेम शेख यांनी अजिज यांना भाड्याच्या घरातून हलवून हक्काची जागा उपलब्ध करून राहण्याची व्यवस्था करून दिली.

अनेकदा रिक्षावाल्यांना त्यांच्या सोईने भाडे हवे असतात, त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात नेहमीच वाद होतात. त्यातही रुग्ण, अपंग प्रवासी म्हटले की भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांच्या डोळ्यात अजीज इनामदारांनी आपल्या या मोफत सेवेच्या माध्यमातून झणझणीत अंजन घालत समाजसेवेच एक उदाहरणच घालून दिले आहे. 

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

‘रेलयात्री’, रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवणारा सोबती

गरजूंच्या उपयोगी पडणारा मुंबईचा ' 'सेवेकरी टॅक्सीवाला' विजय ठाकूर !

थॉमसची सायकल, रस्ता ऐसा सरे; वनातली पाखरे, गिरविती अक्षरे!


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags